Friday, July 26, 2013

वसई ते मुंबई - शिक्षण , नोकरीसाठी प्रवास!


गेल्याच आठवड्यात फेसबुकवरच्या वसई ग्रुपमध्ये अपलोड केलेला भाईदर पुलावरील जुन्या रेल्वेगाडीचा फोटो पाहिला. ह्या गाडीच्या रुपात आता आमुलाग्र बदल झाले असले तरी कायम राहिला आहे तो शिक्षण नोकरीसाठी वसईकरांना करावा लागणारा लोकलगाडीचा प्रवास. हा प्रवास सुसह्य करण्यासाठी पश्चिम रेल्वेने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत तरीसुद्धा वसईकरांना प्रवासात खर्च करावा लागणारा वेळ, शक्ती ह्या गोष्टी मात्र कायम राहिल्या आहेत. काळानुसार ह्या खर्च कराव्या लागणाऱ्या वेळ आणि शक्तीचा वसईकरांच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.
माझी आठवण सुरु होते ती माझ्या वडिलांच्या नोकरीपासून. त्यांची नोकरी कुलाब्याला NPC च्या ऑफिसात. सकाळी साडेसातच्या सुमारास ते घरातून बाहेर पडत. त्याआधी त्यांनी गाईचे दुध काढणे, तिला पाणी पाजणे अशी कामे आटोपली असत. त्यांच्या ट्रेनमध्ये चांगला ग्रुप होता. त्यामुळे डब्यात एकदा आत शिरले की मग फारशी चिंता नसे. विरारला डाऊन जाऊन आलेली मंडळी वांद्र्यापासून उठायला लागत आणि मग त्यांना बसायला मिळे. संध्याकाळी पाचला ऑफिस सुटले की उडी मारून चर्चगेटहून सुटलेल्या विरार गाडीत बसायला मिळाले की सातसाडेसातपर्यंत ते घरी पोहोचत. तेव्हाही गाईला पाणी पाजणे, गड्याने सुट्टी मारली असल्यास गाईचे दुध काढणे ह्या कामासाठी त्यांच्यात शक्ती बाकी असे.
दहावीपर्यंत वसईत शिक्षण घेतल्यावर अकरावीला रुपारेलला प्रवेश घेतल्यावर मी होस्टेलला राहिलो. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी वसईला येण्यासाठी आणि रविवारी संध्याकाळी / सोमवारी सकाळी होस्टेलला परतण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासापुरती रेलवे प्रवास मर्यादित राहिला. अभियांत्रिकी शाखेत स्थापत्य शाखेत VJTI आणि SPCE अशा दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळत असताना वसईहून येण्यासाठी सोयीस्कर म्हणून SPCE ची निवड केली. त्यावेळी कॉलेज साडेचार, पाचच्या आसपास सुटत असल्याने गर्दीचा इतका त्रास होत नसे. परंतु घरी आल्यावर एकाग्रतेने अभ्यास करण्याची क्षमता कमी होत असे.  
ह्यात अजून एक मुद्दा येतो. वसईच्या हवेची शुद्धतेची पातळी ही निर्विवादपणे मुंबईच्या हवेपेक्षा बऱ्याच उच्च दर्ज्याची आहे. त्यामुळे रात्रीच्या गाढ झोपेनंतर माणूस ताजातवाना होवू शकतो आणि वसईत झोपी जाण्याची सरासरी वेळ अजूनही दहाच्या आसपास आहे ह्याउलट मुंबईत ती अकरा- साडे अकरा आहे.
सिंटेलमधला माझा पहिला प्रोजेक्ट वेळेच्या बाबतीत जरा अफलातून होता. आम्हाला सकाळी सीप्झमधील ऑफिसात साडेआठ वाजता पोहोचणे बंधनकारक होते. त्यामुळे सकाळी सव्वासातची वसई लोकल पकडण्याव्यतिरिक्त पर्याय नसे. रात्री साडेआठच्या आधी  ऑफिसातून निघणे अशक्यप्राय असे. ९८ सालची गोष्ट ही. त्यावेळी रात्री सात ते साडेनऊ ह्या वेळात अंधेरी स्थानकावर विरार लोकलमध्ये शिरणे हे महादिव्य असे. आता बऱ्याच अंधेरी लोकल झाल्याने परिस्थिती पालटली आहे. इतके करून वसई स्टेशन ते रमेदी ह्या प्रवासासाठी रिक्षांची मारामारी असे आणि बरेच वेळा पारनाका ते रमेदी चालत जावे लागे. रात्री साडेदहाच्या आसपास घरी पोहोचले कि दिवसातील पहिले पूर्ण जेवण समोर असे. पोट भरून जेवल्यावर कितीही अयोग्य असले तरी लगेचच झोपण्याशिवाय पर्याय नसे. परंतु त्या वयात हे सर्व खपून गेले. ह्यातील एक मजेदार आठवण. एकदा मी पावणेअकराच्या सुमारास वसई बस डेपोत आलो. दोन बस समोर होत्या. पारनाका आणि होळी. पारनाका बस पकडली असती तर पारनाका ते रमेदी चालत जावे लागले असते, होळी बस गिरिजला जावून मग होळी मार्गे रमेदी - पारनाका अशी जाणार होती. पारनाका - रमेदी अंतर चालायला लागू नये म्हणून मी गिरिज- होळी बस पकडली. दहा ते बारा मिनिटात बस गिरीजला पोहोचली तिथे ती वळण घेताना त्याच्या मागे नेमके झाड पडले! पावसाळ्याचे दिवस होते ते! आम्ही पाच - सहा जणच बस मध्ये होतो आम्ही गिरिजला अडकून बसलो. त्यावेळी भ्रमणध्वनी नव्हता माझ्याकडे. मग गिरिज ते रमेदी असा पल्ला मी कूच केला.
नशिबाने सिंटेलमध्ये नंतर चांगले प्रोजेक्ट मिळाले. संध्याकाळची पाचला सुटणारी बस पकडू शकण्याएवढे चांगले. त्यामुळे बऱ्याच वेळा पाच पंचवीसची अंधेरीला असणारी लोकल आणि सहा दहाच्या आसपास असणारी होळी बस ह्यांच्या मदतीने मी सहा चाळीसच्या आसपास घरी पोहोचत असे. २००४ मध्ये सिंटेल सोडली. तोवर अधूनमधून इंग्लंड, अमेरिकेच्या फेऱ्या होत राहिल्या. प्रत्येक फेरीनंतर विरार लोकलला सरावायला एखादा आठवडा जाई.
सिंटेलनंतर TCS. ही कंपनी जरा उशिरानेच जागी होई. लोक ऑफिसात दहाच्या आसपास यायला सुरुवात होई. लोकांना रात्री घरी निघण्याची अजिबात घाई नसे. त्यामुळे माझा जीव कासावीस होई. ४१५ बस कधी मिळेल आणि मग कोणती गाडी मिळेल ह्याची गणिते मी सात वाजल्यापासून मांडायला सुरु करी. TCS मधून सलग दोन वर्षे परदेशी राहून परतल्यावर वसईहून प्रवास करणे मला कठीण जावू लागले. ह्यात दोन घटकांचा समावेश होता. एक म्हणजे वाढलेले वय. रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर इच्छा असून सुद्धा पूर्ण आहार करणे अपचनाच्या भीतीने शक्य नव्हते. आणि दुसर म्हणजे वाढलेली जबाबदारी! आधी स्वतःचे काम आटोपले की दुकान बंद! पण आता पूर्ण टीमची जबाबदारी अंगावर होती. मग बोरिवलीला राहण्याचा निर्णय घेतला. कालांतराने TCS सोडली आणि ऑफिस मालाडला आलं.
आता प्रवास अर्ध्या तासावर आला आहे. देवाची कृपा! आता प्रवासात वेळ आणि शक्ती वाचत असल्याने ओफिसातील कार्यक्षमता निर्विवादपणे वाढली आहे. रात्री विरार गाडी पकडण्याच्या दबावामुळे निर्माण होणारी घालमेल होत नाही. वेळ मिळाल्याने ब्लॉग लिहिण्याचे उद्योगहि करतो. आणि …। वसईबद्दलचे प्रेम अनेक पटीने वाढले आहे. दूर राहिल्यावर आपल्या वसईचे महत्त्व अधिकच जाणवत! अगदी सासुरवाशिणीसारखे!
शेवटी काय तर हा भावना आणि व्यवहाराचा प्रश्न आहे. वसईत सर्व वसईकरांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे वसई सोडायचा विचार फार कमी जण करू शकतात. परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलले आहे. अधिकाधिक वसईकर मोठ्या हुद्द्यावर आहेत. ही यादी पाहिली तर थक्क व्हायला होईल आपल्याला! ह्या नोकऱ्यातील कामाचा विचार सतत तुमच्यासोबत राहतो! आणि तो तुम्हाला जास्त थकावितो! ह्या नोकरीच्या बदलत्या स्वरूपामुळे माणसाला फोनवर आणि संगणकाच्या माध्यमातून सतत उपलब्ध असावे लागते. आणि तुम्ही मनाने ताजेतवाने असणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यवस्थित झोप, वेळच्या वेळी आहार  घेणे आवश्यक आहे. माझ्या कार्यालयात बाहेरून आलेले बरेच मित्र आहेत. बोरिवलीत वीस-बावीस हजाराच्या भाड्यावर २ BHK FLAT मिळतो. परंतु ते मालाडला अठ्ठावीस - तीस हजार भाडे भरून FLAT घेतात. त्यातील एक मित्र मला म्हणाला मी हे जास्तीचे पाच हजार अधिक / चांगले काम करून मिळवीन!
आता एक वेगळा विचार. पूर्वी मालाडचे चिंचोळीबंदर हा भाग अगदी अविकसित होता. परंतु गेल्या दहा वर्षात तिथे विश्वास न बसण्याइतकी प्रगती झाली. कार्यालये आली आणि त्याबरोबर इमारती आल्या. कार्यालयात काम करणारी लोकही जवळ येवून राहिली. ह्यामुळे समस्याहि निर्माण झाल्या हा भाग वेगळा. तीच गोष्ट नवी मुंबईची!
मी विचार करतो की वसईत TCS, IBM अशा कंपन्याची कार्यालये कधी येवू शकतील का? आपल्या वसईत अनेक दूरदृष्टी असणारे लोक आहेत. ह्यातील कोणाच्या अजेंडावर हा मुद्दा आहे काय? ह्यात कोणत्या अडचणी आहेत (विजेची आहे ते आपणा सर्वांना माहित आहेच!) आणि त्यावर उपाय कोणते? शहरीकरणामुळे कोणत्या समस्या निर्माण होवू शकतात? ह्याचादेखील विचार होणे आवश्यक आहे.
हा विचार येण्याचे कारण एकच! पुढील पिढीला वसईहून प्रवास करणे अधिकच कठीण होणार आहे, विशेषतः पावसाळ्यात! त्यांच्यासाठी आपण आताच विचार करून योग्य कृती करणे आवश्यक आहे!

3 comments:

  1. Dear Aditya, I completely agree with the urbanization of Vasai. I too want MNCs coming up with Offices in Vasai. But the drawback is the natural beauty of Vasai might be compromised if this urbanization is not done with careful planning. I had read on Vasai-Virar website that some salt pan leases are ending in the near future and MNCs are looking to develop an IT hub in those areas. Don't know how true this is...but yes, something to ponder. I for one love the natural beauty and the lovely Marathi culture in Vasai. I hope the urbanization does not take away the charm of Vasai. Regards. David.

    ReplyDelete
  2. सुंदर लेख पण याच्या शेवटाशी मी अजिबात सहमत नाही. या मोठा वादाचा आणि ब्लॉग लिहून न सुटणारा प्रश्न आहे म्हणून थोडक्यात इतकंच म्हणते की मी वसईच्या हिरवाई आणि गावातल्या शांततेला पहिलं प्राधान्य देईन.
    There should be other options to work on the infrastructure issues rather than extending Mumbai everywhere outside of Mumbai thats all I can say.

    ReplyDelete
  3. Nice view and I completely agree. People who say that vasai has natural beauty...I ask them where? Gone are the days of 90's when we actually had natural beauty. I stay at Holi and I see more banglows than trees. The best part of vasai was farming. How many of you see farms in vasai? Not even 5% of the farms have survived. If we want to bring mncs or industry, we require two basic things: land and political will power. Irony of vasai is that all the land east of vasai is owned by political party of vasai, and even after getting a municipal corporation status, we still don't have an IAS officer. I agree with author and his view points and its up to us to take united/combined initiatives to develop vasai now or we will just be stuck as middle class guys who wont even know the beauty of life.

    ReplyDelete