प्रसिद्ध ठिकाणच्या देवदर्शनाच्या बाबतीत मी फारसा उत्साही नसतो. वसईच्या घराजवळ शनी, मारुती आणि गणपतीची साधी पण सुंदर मंदिरे आहेत. शनिवार सोडला तर ती फारशी गजबजलेली नसतात आणि मला त्या मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन घेण्यास आवडते. परंतु काही प्रसंग खास असतात तिथे आपणास आपल्या आवडीनिवडीत काहीसा बदल करून वागावं लागतं. तर झालं असं की माझ्या सासरची मंडळी फार उत्साही. लग्नसमारंभ, सहली ह्यात विशेष रस घेणारी! आणि मी हा असा! असो दरवर्षी सासरची मंडळी कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनास जातात. दरवर्षी मला बोलावतात आणि दरवर्षी मी कामाचे निमित्त (म्हणजे खरोखर काम असतं!) पुढे करून हे आमंत्रण टाळतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा ब्लॉग सासरची मंडळी वाचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माझ्यासारखा शुरवीर सुद्धा काही ठिकाणी आवरते घेईल ह्याची सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी.
तर दरवर्षीप्रमाणे सासरच्या लोकांचा कार्यक्रम ठरला. पत्नीचे तिच्या घरच्यांशी दररोज दूरध्वनीवरून होणाऱ्या बोलण्याकडे मी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत होतो. परंतु शेवटी 'जिसे डरते थे वोही बात हो गयी!' "तू एकविराला आमच्याबरोबर येणार का?" असा गर्भित धमकी असलेला प्रश्न एका क्षणी माझ्या कानावर आला. मी एकंदरीत घरातील वातावरणाचा अंदाज घेतला. थेट नकार दिल्यास काय परिणाम होऊ शकतात ह्याचे झटपट विश्लेषण केले. "आज ऑफिसात कामाचा अंदाज घेऊन रात्री सांगतो" असे उत्तर देऊन मी वेळ मारून नेली. ऑफिसात गेल्यावर कळले की खरोखर शनिवारी काम होते पण ह्यावेळी थोडा बदल करून मी माझ्या टीमवर पूर्ण जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.
एकूण १६ जण ह्या देविदर्शनाच्या सहलीत सहभागी होणार होते. लोणावळा इथे आमच्या ज्ञातीतील एका बँकेचे विश्रामगृह आहे. तेथील दोन बंगल्यांचे आरक्षण करण्यात यश आले होते. एकदा होकार दिल्यावर मीसुद्धा थोडंस घाबरत काही अटी घातल्या. जसे की मी फक्त बसमध्ये येवून बसणार, माझी सर्व तयारी तूच करायची वगैरे वगैरे! आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सर्व मान्य झाल्या. चर्चा संपल्यावर अजून काही अटी घालता आल्या असत्या अशी खंत उगाचच मनाला लागून राहिली!
थोडे विषयांतर! माझ्या मोठ्या चुलतबहिणीचे यजमान बोर्डीचे आहेत. सासरच्या लोकांशी कसे संबंध ठेवावेत ह्याबाबतीत मी त्यांना आदर्श मानतो. त्यांचे लग्न होऊन आता तीस वर्षे होतील. पण ह्या तीस वर्षात पहिली दिवाळी सोडली तर बाकी सर्व वेळी त्यांनी सासुरवाडी राहण्याचा आग्रह कोणालाही नाराज न करता फेटाळला आहे. साधारणतः जेवणं वगैरे आटोपली की "हा मी इथेच पारनाक्यावर एक चक्कर मारून येतो" असं सांगून ते थेट बोर्डीला पोहोचल्यावर "मी पोहोचलो" असा फोन करतात. आता त्यांच्या मोजक्या वेळ आमच्यासोबत घालविण्यावरच आम्ही समाधान मानून घेण्याची सवय करून घेतली आहे. व्यावसायिक जगात म्हटलं जात, "सर्व काही तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांची पातळी कशी ठरविता ह्यावर अवलंबून असतं!"
प्रवासासाठी टेम्पो ट्रेवलर आरक्षित करण्यात आला होता. प्राजक्ताचे धाकटे काका दहिसरला राहतात तिथून प्रवासी मंडळी टेम्पो ट्रेवलरमध्ये प्रवेश करण्यात सुरुवात झाली. धाकट्या काकांचा हरहुन्नरी मुलगा सौरभ आणि प्राजक्ताचा भाऊ स्वप्नील हे ह्या सहलीचे संयोजक होते. आम्हाला सात वाजता तयार राहण्याची सूचना देण्यात आली होती. "सात वाजता सांगितलं म्हणजे साडेसात वाजेपर्यंत आपल्याकडे येतील" हे प्राजक्ताचं वाक्य शुक्रवारी रात्री ऐकून मला गेल्या कित्येक वर्षात काही बदललं नाही ह्याचा आनंद झाला. दहिसर नंतर गोविंदनगरचा थांबा होता. तिथे प्राजक्ताच्या मधल्या काकांचे कुटुंब आणि आजी चढले. सकाळी whatsapp वर टेम्पोचा प्रवास नोंदविला जात होता. आम्ही सकाळी साडेपाच वाजता उठल्याने आमच्या आंघोळी आटोपल्या होत्या. टेम्पो गोंविंदनगरला पोहोचल्याचा अपडेट whatsapp वर आल्यावर सोहमला आंघोळीस धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. धन्य ते इंटरनेट, धन्य ते whatsapp आणि धन्य तो सोहम!
टेम्पो स्वप्नीलकडे बाभईला पोहोचल्यावर आम्हाला बिल्डींगच्या खाली उतरून राहण्याचा फोन आला. "थांबतील ते पाच मिनटे" हे उद्गार अपेक्षेनुसार कानी आले. थोड्याच वेळात टेम्पोट्रेवलर खाली आला, आम्ही कुलपं वगैरे लावली आणि शेवटी एकदाचे साडेसातच्या सुमारास आम्ही खाली उतरलो.
आमच्या आगमन होताच स्वागताचे वयोगटानुसार स्वागतपर शब्द, उद्गार, बोंबा ऐकू आल्या. स्वप्नीलची मुलगी श्राव्या हिला सोहम आणि मोठ्या आत्याच्या आगमनाचा कोण आनंद झाला. टेम्पोट्रेवलरच्या पुढे नारळ फोडून प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला. जावईबापूंना पुढची मानाची सीट देण्यात आली होती. एकंदरीत सर्व पुरुष मंडळी पुढे बसली होती. रस्त्यांचा आणि मुंबईतील पोलिसमंडळींच्या मानसिकतेचा जाणकार सौरभ चालकाच्या बाजूच्या आसनावर स्थानापन्न झाला होता आणि तज्ञ स्वप्नील माझ्या बाजूला बसला होता. शनिवारचे जाडेजुडे पेपरांचे गठ्ठे काकांनी आणले होते त्याचा मी कब्जा घेतला. गाडी थोड्याच वेळात पश्चिम द्रुतगती मार्गावर धावू लागली. प्राजक्ता लेक लाडकी असल्याने तिच्यावर न्याहारीच्या व्यवस्थेची जबाबदारी नव्हती. परंतु बाकीच्या मंडळीनी ठेपले, रवळी (हा सोमवंशीय क्षत्रिय समाजातच बनणारा गोड पदार्थ असावा असा माझा समज!) असे रुचकर पदार्थ बनवून आणले होते. त्याची रसद थोड्या थोड्या वेळाने पुढे पाठवली जात होत होती. जावईबापू एकंदरीत ह्या न्याहारीच्या पदार्थांवर आणि प्रवासावर खुश दिसत होते. श्राव्या आणि सोहमची मागे गडबड सुरु होती. प्राजक्ताची धाकटी बहिण प्रांजली आता सक्रिय झाली होती आणि मागे सुश्राव्य (?) गायन कार्यक्रमास सुरुवात झाली होती. सकाळचा प्रवास असल्याने वातानुकुलीत टेम्पोट्रेवलरची गरज नाही हे केलेलं गृहीतक वाढलेल्या उकाड्यामुळे चुकीचे ठरल्याचे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते.
(क्रमशः )