Saturday, October 12, 2013

सुख शोधितो मी!



आज सकाळी बोलताना मोठी बहीण म्हणाली "आदू, मनाचे मोठेपण असले न की सर्व समस्या आपसूक सुटतात, किंवा त्या फारशा मोठ्या वाटत नाहीत!" बाकी बोलणे मग बराच वेळ इतर विषयावर चाललं. पण ते वाक्य मात्र खास लक्षात राहिलं. 
 
आपण बरेचजण शहरात, महानगरात राहतो. तिथे व्यावसायिक जगतात बरीच स्पर्धा आहे असे आपण म्हणतो. स्पर्धा असते ती सदैव पुढे जाण्यासाठी. आपण कोठे थांबण्यास तयार नसतो. ह्यात आपण स्वतः एकूण स्पर्धेत कोठे आहोत ह्याचे निरपेक्ष विश्लेषण आपण करीत नाहीत आणि बाकी आपण भारतीयांनी 'आपल्यातील सुप्त क्षमतेचा पुरेपूर विकास आणि वापर केला पाहिजे' ह्या वाक्याचा कल्लोळ माजवला आहे. १९९१ सालापासून आर्थिक धोरणात उदारीकरण आलं, त्यानंतर आपल्या एका पिढीने शैक्षणिक क्षेत्रात जबरदस्त प्रगती केली आणि त्या जोरावर आपली नेत्रदीपक प्रगती केली. 'जरा विसावू ह्या वळणावर' असे म्हणण्याची वेळ आली आहे आता! ह्या गेल्या २०-२२ वर्षात आपण सांस्कृतिक, कौंटुंबिक पातळीवर काय गमावलं ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. व्यावसायिक जीवनातील जीवघेणी स्पर्धेला तोंड देताना ती मानसिकता आपण काही प्रमाणात आपल्या वैयक्तिक जीवनात घेवून आलो आणि आपली तिथेच फसगत झाली. क्रिकेट आणि सिनेमा ह्या व्यतिरिक्त आपण ना छंद जोपासले ना  आवडी निर्माण केल्या. उंचावलेल्या आर्थिक स्थितीबरोबर मानसिकता उंचवावी लागते. ती अजून काही आपण उंचावली नाही. 
आपल्या महिलावर्गाने सुद्धा झपाट्याने प्रगती केली. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात आजवर त्यांच्या त्यागावर जी खंबीर कुटुंबसंस्था उभी होती तिचा बळी गेला. हा अगदी नाजूक मुद्दा आहे. इथे मी स्त्रियांच्या प्रगतीच्या आड आहे की काय असाही आरोप होवू शकतो. 
बरंच काही असं पुढे लिहिता येईल. माझा मुद्दा आहे तो एक समाज म्हणून आपण पुढील काही वर्षात आपल्या व्यावसायिक ध्येयाचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कौटुंबिक संस्थेचे चित्र कसे असावे ह्याचं एक चित्र रेखाटायचा प्रयत्न करावयास हवा. सध्यातरी आपण सर्व हे चित्र कसे असेल ह्याविषयी अनभिज्ञ आणि बरेचसे निराशावादी आहोत. परंतु आशा न सोडता, ह्या प्रश्नावर  एक समाज म्हणून विचारमंथन करण्याची निकडीची गरज आहे!
 
  

No comments:

Post a Comment