गेल्या आठवड्यात वसईतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील नारकर मॅडम स्वर्गवासी झाल्या. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय शिकविला किंवा त्यांच्याशी ज्या सर्वांचा संपर्क आला होता, त्या सर्वांच्या मनात नारकर मॅडमच्या आठवणींनी दाटी केली. माझ्या काकींचा नारकर मॅडमशी कित्येक वर्षांचा घट्ट स्नेह. काकी सध्या मुलीकडे अमेरिकेत गेल्याने त्यांना अधिकच दुःख झाले. फोनवर त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यावर काकी म्हणाल्या, "आता त्या जुन्या पिढीतील जवळजवळ सर्व निघून गेले रे! त्या पिढीचा काळ संपला" हे उद्गार बरेच दिवस माझ्या मनात घोळत राहिले आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल वसईचा सुवर्णकाळ ह्या शाळेच्या स्थापनेपासुन बरीच वर्षे टिकला. ह्या कालावधीतील शाळेत अनेक उत्तमोत्त्तम शिक्षकांनी आपल्या ज्ञानाची आणि त्याहून महत्वाचे म्हणजे जीवनसंस्काराची विद्यार्थावर पाखरण केली. त्याकाळी वसईतील बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले ह्या शाळेत जात. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना, मोठ्या भावंडांना ओळखत आणि त्यामुळे बऱ्याच जणांना शाळा ही एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे वाटत असे.
त्याकाळात शिकवण्या सुद्धा मोजक्या असत. परुळेकर सर, फडके सर ह्यासारखे शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेले ऋषितुल्य शिक्षक शिकवण्या घेत. गुणांची टक्केवारी वाढविण्यापेक्षा विषय समजून देण्यावर त्यांचा खास भर असे. मी परुळेकर सरांकडे काही महिनेच अभ्यासासाठी गेलो. ते मला आणि इंग्लिश माध्यमातील एका विद्यार्थ्याला एकत्र अभ्यासासाठी बसवत. तो मला इंग्लिशचा धडा वाचून दाखवे तर मी त्याला मराठीचा! ही सर्व धडपड कशासाठी तर दोघांचे उच्चार सुधारण्यासाठी! फडके सरांकडे सुद्धा पठण आणि लेखन अशा स्वरुपात दररोज अभ्यास दिला जात असे.
मागे वळून पाहता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ह्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थांसमोर आयुष्यात समाधानीपणा, स्थितप्रज्ञता म्हणजे काय असते ह्याचा आदर्श घालून दिला. हा आदर्श जीवनभर समाधानीपणाने जगण्यास पुरेसा होता. आज नेमक्या ह्याच गोष्टीची कमतरता आहे. ह्यात आजच्या पिढीतील शिक्षकांचा दोष आहे असे मी म्हणू इच्छित नाही. काळच बदलला आहे!
कधी कधी मनात विचार येतो, आपण आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातील शाळेतून शिक्षण देऊ, त्यांच्या भविष्यासाठी पैशाची तरतूद करू. पण त्यांच्या मनात समाधानीपणाची, स्थितप्रज्ञतेची रुजवात करून देऊ शकू काय? ह्या प्रश्नाचे मला सुचणारे उत्तर माझ्या मनात बरीच खळबळ माजवते!
मला प्रश्न असा पडतो की मागच्या पिढीने सुद्धा हे स्थित्यंतर अनुभवले असेल काय? बहुधा हो पण त्याकाळी बदलाचा वेग इतका नसल्याने त्यांना ह्या बदलाची तीव्रता इतक्या प्रमाणात जाणवली नसावी!
थोडे विषयांतर! सचिन नोवेंबर महिन्यात वानखेडेवर निवृत्त होईल तेव्हा बऱ्याच क्रिकेटरसिकांच्या मनात सुद्धा क्रिकेटचे एक युग संपल्याची भावना असेल!
बहुधा माझ्याप्रमाणे आज वसईतील त्या काळातील (गंमत पहा तो काळ ह्या व्याख्येत ६० सालापासून ते ९० च्या दशकात शाळेत शिकलेल्या सर्वांचा समावेश आहे) सर्वांना तो काळ, त्या वेळचं वातावरण गमाविल्याची खंत आहे. म्हणूनच १७ नोवेंबरला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजिलेल्या माजी शिक्षक गौरव समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तो काळ तर आपण परत आणू शकत नाही परंतु तो काळ ज्यांनी अनुभवला त्या सर्वांना एकत्र आणून त्या काळच्या स्मृतींना काही क्षण आपण उजाळा तर देवू शकू!
नारकर मॅडमना पुन्हा एकदा प्रणाम!
खुपच छान लिहिलेला blog आहे. 'तो काळ' बद्दलची केलेली व्याख्या appealing वाटते.
ReplyDeleteमी जरी न्यू इंग्लिश स्कूल मधून शिकलो नसलो तरी त्याच काळातला वसईच्या शाळेतील विद्यार्थी आहे (किवा होतो). माझी आई शिक्षिका होती आणि आता माझी बायकोसुद्धा शाळेत शिकवते. फरक फक्त इतकाच आहे की शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर किती हक्क आहे ह्यात बदल झालेले दिसतात.
पूर्वी (त्या काळी) पु. ल. नी सांगितल्या प्रमाणे 'शाळेत शिक्षकांनी ओरडा दिला तर घरी उत्तर पूजा होत असे' इतकी तरी परिस्थिती नसली तरी शिक्षानांना परत-प्रश्न केला जात नसे. हल्ली मुलांना शाळेत ओरडा मिळाला की पालक शिक्षकांशी भांडायला येतात.
आता हा झालेला फरक शाळे मुळे झाला की शिक्षकांमुळे की परिस्थितीमुळे ह्याचे उत्तर ज्याचे त्याने शोधायचे.
-अध्वरी
अध्वरी,
Deleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. शिक्षण ही सुद्धा एक पैसा देऊन विकत घेण्याची सेवा आहे ही जी मानसिकता निर्माण होत आहे ती धोकादायक आहे. निस्वार्थी शिक्षक हे भावी पिढीसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु बाकीचा पूर्ण समाज अगदी स्वार्थी होत असताना केवळ शिक्षकांकडून निस्वार्थ सेवेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. एकदा का आपले पालक आपल्या बाजूने शिक्षकांशी वाद घालत आहेत हे चित्र विद्यार्थ्यास दिसले की त्या शिक्षक विद्यार्थी नात्यास मोठा तडा गेला हेच समजावे!
आदित्य