वसईतील
जागरूक नागरिक संस्था आणि सुविचार मंच ह्यांच्या विद्यमाने वसईतील बंगली
येथील लोकसेवा मंडळ हॉल इथे रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता
जेनेरिक मेडिसिन ह्या विषयावर एक परिसंवाद योजण्यात आला होता. ह्या
परिसंवादात डॉक्टर, केमिस्ट आणि शासन ह्या तीन महत्वाच्या संस्थांच्या
प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. डॉक्टर वर्गाचे
प्रतिनिधित्व वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी, केमिस्ट
वर्गाचे प्रतिनिधित्व पालघर जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री.
अनीस शेख ह्यांनी तर शासनाचे प्रतिनिधित्व श्री. गिरीश हुकरे ह्यांनी केलं.
ह्या परिसंवादात चर्चिल्या गेलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा
आढावा.
फादर
फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना ह्या परिसंवादाच्या आरंभी आपले विचार
मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना
सक्रियपणे औषध क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध, पाडल्या जाणाऱ्या चुकीच्या
रूढीविषयी आवाज उठविण्याचे आव्हान केले. जर आपण संघटितपणे ह्या विषयी
आवाज उठवला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला.
त्यानंतर डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी आपले विचार मांडले.
डॉक्टर संयोगिता तवकर
आपल्या
डॉक्टरच्या कंपाउंडरने कधीकाळी आपणास जर पुड्यांमध्ये बांधून औषध दिली
असतील तर ती आपली जेनेरिक औषधांशी पहिली ओळख. प्रत्येक औषधास तीन प्रकारची
नावे असतात असे आपण म्हणू शकतो.
- त्या औषधाच्या molecular structure वरून त्याचे पडलेले रासायनिक नाव.
- ज्या
वेळी एखादे औषध एका विशिष्ट देशातील मानद संस्थेच्या प्रमाणास पात्र ठरते
तेव्हा ती संस्था त्या औषधास जे नाव देते त्यास जेनेरिक नाव म्हटले जाते.
- ज्या वेळी एखादी कंपनी ह्या औषधाचे पेटंट मिळविते त्यावेळी त्या कंपनीने उत्पादित केलेल्या नावास BRANDED नावाने ओळखले जाते.
उदाहरण द्यायचे झाले तर क्रोसिन हे एक branded नाव असून PARACETAMOL हे त्याचे जेनेरिक नाव आहे. ह्याचे रासायनिक सूत्र C44H64O24 हे आहे.
ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीत बरीच तफावत आपणास आढळून येते. ह्या मागील कारण -
कंपनीला
अचूक रासायनिक सूत्र शोधून काढण्यासाठी बऱ्याच वर्षाचे संशोधन करावे
लागते. ह्या संशोधनामध्ये लक्षावधी डॉलर्स खर्च होतात. इतक्या अथक
परिश्रमानंतर त्या ब्रैंडेड
औषधाच्या जाहिरातीवर सुद्धा बराच पैसा खर्च करावा लागतो. ह्या मुळे ही
कंपनी ज्या वेळी आपले उत्पादन विक्रीस काढते त्यावेळी त्याची किंमत बरीच
जास्त असते. ह्या सर्व बाबी लक्षात घेता पेटंट मिळालेल्या कंपनीला पुढील
काही वर्षे ह्या औषधाच्या उत्पादनाचा अनिभिषिक्त हक्क दिला जातो.
पेटंटचा
कालावधी संपल्यानंतर बाकीच्या कंपन्या ह्या औषधाचे उत्पादन करू शकतात
त्यावेळी ती जेनेरिक ह्या नावाने ओळखली जातात. त्यांना संशोधनावर पैसा खर्च
करावा न लागल्याने ह्या औषधांच्या किंमती तुलनेने कमी असतात.
त्यानंतर
डॉक्टर संयोगिता ह्यांनी जेनेरिक औषधाची व्याख्या सांगितली. ह्या औषधाचे
गुणधर्म हे मूळ औषधाच्या गुणधर्मासारखेच असायला हवेत. FDA चा प्रमाणित
करण्याचा निकष हा ब्रैंडेड आणि जेनेरिक ह्या दोन्हीसाठी सारखाच असतो.
गोरेगाव
येथील प्रबोधन औषधपेढी ही जेनेरिक औषधांची विक्री करते. जेनेरिक औषधांचा
वापर केल्यास वयस्क माणसांच्या उपचाराचा खर्च जवळजवळ २० टक्क्यावर आल्याचे
(८० टक्क्यांनी कमी) आढळून आले आहे.
सध्या
अमेरिका जेनेरिक औषधांवर जवळपास ३०० बिलियन डॉलर्स खर्च करते. अमेरिकेच्या
FDA ह्या मानद संस्थेने २९० जेनेरिक औषधांचा वापर प्रमाणित केला आहे;
त्यातील ११० औषधे नामांकित भारतीय औषध कंपन्या उत्पादित करतात आणि ती मग
अमेरिकेत जेनेरिक म्हणून विकली जातात.
Narrow
Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मात्र जेनेरिक औषधांचा वापर करताना
दक्षता घ्यावी लागते. अशा प्रकारच्या औषधात अगदी तीव्र संहितेचा कमी
मात्रेतील डोस दिला जातो. त्यामुळे ह्या औषधांच्या रासायनिक संरचनेत १००%
अचूकता अपेक्षित असते. जेनेरिक औषधांना ह्या बाबतीत काही टक्क्यांमध्ये फरक
असल्याची मुभा असल्याने हा फरक Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मान्य केला जात नाही.
अनिस शेख (केमिस्ट संघटना अध्यक्ष)
अमीर
खान ह्यांच्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमाने जेनेरिक औषधाविषयी जागृती
निर्माण केली. आपल्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये औषधे मिळावी असाच केमिस्ट
लोकांचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. भारतातील औषध
कायद्यानुसार डॉक्टरांनी लिहून दिलेलेच औषध देणे केमिस्टवर बंधनकारक असते.
त्यामुळे आम्हांवर सुद्धा मर्यादा येतात. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचा आता फॅमिली
फार्मासिस्ट (Pharmacist) असायला हवा जो आपणास योग्य जेनेरिक औषध सुचित
करू शकेल. जेनेरिक औषधांच्या वापराने सामान्य नागरिकाचा उपचारांवरील खर्च नक्कीच कमी होईल.
गिरीष हुकरे
आपणांपैकी
कितीजणांस अन्न आणि औषध प्रशासनाविषयी माहित आहे असा प्रश्न विचारून
त्यांनी आपल्या भाषणांची सुरुवात केली. दैनंदिन वापरातील बऱ्याच
गोष्टींच्या दर्जाची जबाबदारी माझी / माझ्या गटाची आहे. स्वातंत्र्यानंतर
६० वर्षे उलटून गेली तरी दुसऱ्यास दोष देण्याचा खेळ आपण खेळत आहोत. आपण
आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा ताबा घेतला पाहिजे. त्यासाठी सम्यक
विचारांचा आपणास आधार घ्यावा लागेल. भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं
जात. जगातील १० टक्के औषधे भारतात उत्पादित होतात. IT क्षेत्रानंतर परकीय
चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमाकांचे क्षेत्र आहे. ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीतील तफावतीबाबत बोलताना डॉक्टर
संयोगिता ह्यांनी सांगितलेल्या कारणांबरोबरच मेडिकल प्रतिनिधी, डॉक्टरांना
पुरस्कृत केल्या जाणाऱ्या विविध सवलती ह्या खर्चाचा सुद्धा ब्रैंडेडऔषधांच्या
किमती वाढीस लागण्यास हातभार लागतो. ६५% भारतीय औषधांच्या उच्च
किंमतींमुळे उपचारांपासून वंचित राहतात. औषधउपचारांवरील खर्च हे भारतीय लोक
कर्जबाजारी होण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतीय लोक भावनिक
असतात, उपचारासाठी सोने, शेतजमीन वगैरे गहाण टाकण्याची आपली मनोवृत्ती
असते. भारतात आरोग्यविमा ही संकल्पना अजूनही फारशी प्रचलित नाही त्यामुळे
७९% टक्के भारतीय हे उपचारांचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. केमिस्ट लोक ब्रैंडेडऔषधांच्या
विक्रीतून जो फायदा कमावतात त्यातील काही हिस्सा त्यांनी सामान्य
लोकांसोबत विभागून घ्यायला हवा. कोणत्याही उपचारपद्धतीत तीन D महत्त्वाचे
आहेत ते म्हणजे Doctor, Diagnostic and Drug. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांची
जेनेरिक औषधांविषयीची जाणीव वाढविण्याचे आव्हान केले. केवळ जेनेरिक औषधे
कमी किंमतीत मिळतात म्हणून ती कमी दर्जाची आहेत असे समजू नकात. बऱ्याच वेळा
ब्रैंडेड
आणि जेनेरिक औषधे एकाच ठिकाणी उत्पादित होतात पण ती रुग्णांपर्यंत दोन
वेगळ्या मार्गांनी पोहोचतात. केवळ केमिस्टने डॉक्टरने सूचित केलेल्या
औषधापेक्षा दुसरे औषध दिले म्हणून त्यावर कारवाई केली जात नाही; बऱ्याच
वेळा रुग्णास चुकीच्या औषधामुळे झालेला त्रास हा ह्या कारवाईमागचा मुख्य
घटक असतो. काही चुकीचं घडलं म्हणून रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध प्रक्षोभक प्रतिक्रिया देण्याचे टाळावे असे आव्हान त्यांनी केलं.
प्रश्नोत्तरे
१> मी तुम्हांला ब्रैंडेड औषध लिहून दिलं आहे. जर तुम्हांला जेनेरिक औषध घ्यायचं असेल तर ते तुमच्या जोखमीवर घ्या असे डॉक्टरनी सांगितल्यास काय करावे?
उत्तर
- ह्या मागे बऱ्याच वेळा डॉक्टरचे अज्ञान असू शकते. आजच्या परिसंवादासारखा
परिसंवाद डॉक्टर वर्गासाठी सुद्धा आयोजित केला जावा असे आव्हान डॉक्टर
संयोगिता ह्यांनी केले.
२> ब्रैंडेडऔषधाचा पुरस्कार करण्यामागे डॉक्टरांचा आर्थिक फायदा हे कारण असू शकते काय? (काहीसा नाजूक प्रश्न)
उत्तर - ही शक्यता कमी असते. जेनेरिक औषधाच्या उपलब्धतेविषयी डॉक्टरचे अज्ञान हा बराच वेळा मुख्य घटक असतो.
डॉक्टर
आणि रुग्ण ह्यांच्यातील सुसंवाद, विश्वास हा मुख्य घटक आहे जो जेनेरिक
औषधांच्या वापरास चालना देऊ शकेल. आपले prescription स्वतःहून नुतनीकरण
करण्याची जी वृत्ती असते तिचा जनतेने त्याग करावा. मेडिकल दुकानात prescription
शिवाय जाऊन केवळ आपल्या ज्ञानाच्या जोरावर औषधे घेणे टाळावे. ह्या सर्व
गोष्टीवर अन्न आणि प्रशासन विभाग लक्ष ठेऊ शकत नाही.
काही वेळा रुग्ण डॉक्टरची फी द्यायच्या परिस्थितीत नसतो. अशा वेळी त्यांना आम्ही Over The Counter औषधे देतो असे शेख म्हणाले.
खरेतर औषधे ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच विकली जावीत. जनतेने इन्स्पेक्टरची भूमिका बजावत दुकानात फार्मासिस्ट कोठे आहे असा प्रश्न विचारावा. ज्याचा फोटो दुकानात फार्मासिस्टलावला
आहे तो आणि विक्री करणारा हे दोघेही सारखे असल्याची पडताळणी करून घ्यावी.
आपणास प्रश्न विचारायला शिकायला हवे असे श्री. हुकरे म्हणाले.
३> सध्या भ्रमणध्वनीवर एक नवीन अँप विकसित करण्यात आले आहे. अन्न आणि प्रशासन विभागाची त्यास मान्यता आहे काय?
उत्तर
- ह्याला कायदेशीर मान्यता द्यायचा सध्यातरी विचार नाही. स्पेलिंग
लिहिण्यात रुग्णाने केलेली चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला
घेतल्याशिवाय स्वतःहून औषध घेऊ नये.
४> Bio availability and Bio equivalence - ह्या विषयीचे भारतातील स्थिती काय आहे?
उत्तर - भारतात ह्या विषयावर संशोधन सुरु आहे.
५> ब्रैंडेडऔषधे MRP लाच का विकली जातात? त्यावर सूट का मिळत नाही?
उत्तर - केमिस्ट वर्गाला ब्रैंडेडऔषधाच्या
विक्रीतून भरमसाट फायदा मिळतो हा गैरसमज आहे. केमिस्ट वर्गाला १६ - २०%
टक्के फायदा मिळतो. बाकीचा खर्च वगळल्यास हे प्रमाण अगदी नगण्य राहते.
फायद्याचा मोठा हिस्सा उत्पादन करणारी कंपनी घेते आणि म्हणून सूट देणे
केमिस्टला परवडत नाही
चिन्मयने
वसईतील एका इंग्लंडहून शिकून आलेल्या आणि तिथे सराव केलेल्या डॉक्टरचा
अनुभव सांगितला. १९६० - ७० च्या सुमारास अगदी प्रभावी असलेल्या औषधाचे
कालांतराने जेनेरिक रूप बाजारात आले आणि मग ह्या औषधाची प्रभावितता इतकी
कमी झाली की हल्ली ते बाजारात कोणास ठाऊक सुद्धा नाही. ह्या अनुभवावर आपली
प्रतिक्रिया देताना तज्ञांनी अनेक औषध कंपन्याचे फुटलेले पेव हे ह्या मागचं
कारण असू शकतं असं प्रतिपादन केले. नामांकित औषध कंपन्या अजूनही चांगली
उत्पादने निर्मित करीत असल्याचा अनुभव आहे.
६>
Anti Biotics (बहुदा प्रतिजैविक हा मराठी शब्द) औषधांचा प्रभावीपणा
कालांतराने कमी होत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांना २० वर्षाचे वगैरे
पेटंट देणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न करण्यात आला.
बाकी
शेवटी मग तज्ञांनी काही साध्या पण महत्वाच्या सूचना केल्या. आपले आजार
डॉक्टरपासून लपून ठेवू नयेत. चुकीचे औषध स्वतःहून घेतल्यास त्याचे भयंकर
दुष्परिणाम होतात त्यामुळे ते टाळावे. आपल्याला ताप वगैरे आल्यास त्याच्या
वेळेनुसार नोंदी ठेवाव्यात; योग्य औषध लिहून द्यायला डॉक्टरला मदत होते.
औषधांची वैधता कितीपर्यंत आहे हे नक्की पाहावे. चिन्मयने वसईतील डॉक्टरना
prescription कसे द्यावे ह्यासाठी एक standard form तयार केला गेला
असल्याची घोषणा करून डॉक्टरांना तो वापरण्याची विनंती केली.
शेवटी आभारप्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.