Thursday, June 17, 2010

BEST OF FIVE.

बंड्या तसा चांगला अभ्यासू शिस्तीचा मुलगा. सकाळी वेळच्या वेळी उठायचा, शुचिर्भूत होऊन अभ्यासाला बसायचा, नियमित पणे शाळेत जायचा. शाळेतून सुद्धा मस्तीच्या तक्रारी नसायच्या. एकंदरीत रामभाऊ आणि जानकी काकू आपल्या मुलावर बेहद्द खुश होत्या. कसा सोन्यासारखा मुलगा मिळाला आपल्याला असे एकमेकांशी खुशीत येवून बोलायचे.
पण गेल्या काही दिवसापासून बंड्याच्या वागणुकीत कमालीचा बदल दिसू लागला. तसे म्हणायला गेले तर तो अजूनही शिस्तबद्धच होता. पण मधेच एक दोन दिवस त्यातला बंडखोर जागा व्हायचा. अशा दिवशी तो उशिरा उठायचा, मस्ती करायचा. सुरुवाती सुरुवातीला रामभाऊ आणि जानकी काकूनी त्याकडे दुर्लक्ष्य केले. मुलगा म्हटला म्हणजे थोडासा व्रात्यपणा व्हायचाच असे राम भाऊंनी जानकी काकूंना म्हटलेसुद्धा. पण काही दिवसांनी मात्र त्यांचा संयम सुटला. बंड्याने रिमोट फेकून काचेचा ग्लास फोटल्यावर रामभाऊ संतापाने पेटून उठले. पण आधुनिक काळाशी सुसंगत वागण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी बंड्याला चर्चेसाठी बोलावले.
सुरुवातीला प्रस्तावना वगैरे झाल्यावर त्यांनी मूळ मुद्द्याला हात घालत बंड्या कडे त्याच्या वागणुकीचा खुलासा मागितला. बंड्या शांतपणे उठला त्याने पेपर रामभाऊ समोर धरला. पहिल्याच पानावर ठळकपणे दहावीचा निकाल लागल्याचे वृत्त होते आणि त्यात ठळकपणे लिहिले होते BEST OF FIVE. हेच तत्त्व मी आठवड्याच्या सात दिवसासाठी लावले आहे, बंड्या शांतपणे उच्चारला. रामभाऊ आणि जानकी काकू अवाक होऊन बंड्या कडे पाहत राहिले..

No comments:

Post a Comment