असे म्हटले जाते की आपण योग्य जागी योग्य वेळी असावयास हवे. तसे झाल्यास आपणास भरपूर लाभ होऊ शकतो. त्यात अजून एक वाक्य आपणास जोडता येईल आणि ते म्हणजे आपण योग्य जागी योग्य वेळी आहोत हे आपणास ओळखता आले पाहिजे. हल्ली नोकरीत सर्वचजण खूप मेहनत करताना दिसतात परंतु बढतीच्या संधी मात्र मर्यादित असल्याने त्यातील काही जणांनाच पुढे जाण्याची संधी मिळते. त्यामुळे आपण जर महत्त्वाकांक्षी असाल तर आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी मेहनत करतो आहोत हे तपासून घेणे आवश्यक आहे. आता आपण जर महत्त्वाकांक्षी नसाल किंवा दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर जैसे ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीवर विश्वास ठेवत असाल तर मात्र प्रश्नच नाही.
अल्पसंतुष्ट चांगले कि वाईट असा बर्याच वेळा प्रश्न विचारला जातो. पूर्वीच्या काळी ज्यावेळी वादविवाद स्पर्धा होत असत त्यावेळी हा विषय देखील वादविवाद स्पर्धेसाठी ठेवला जायचा. व्यावसायिक ठिकाणी बढती घेताना हा मुद्दा अप्रत्यक्षपणे पुढे येतो. अमेरिकेत एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे लोक आपल्याला आवडणारे काम आयुष्यभर करण्याची मनीषा बाळगतात. मला programming करायला आवडते मग मी आयुष्यभर तेच करणार.
याच्या उलट परिस्थिती आपल्याकडे जाणवते ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात! लोक ३-४ वर्षे आज्ञावली लिहिण्याचे काम करतात मग त्यांना व्यवस्थापक बनण्याचे वेध लागतात. तसेच कंपनीलाही त्यांना व्यवस्थापक बनविण्याचे वेध लागतात. आता लोक ज्यावेळी व्यवस्थापक बनू इच्छितात त्यावेळी महत्त्वाकांक्षा हा एक पैलू असतो आणि त्याबरोबर बर्याच वेळा सध्याच्या भूमिकेतून पलायन करण्याची इच्छा देखील असू शकते. आपल्याला या भूमिकेत सर्वोच्च स्थान मिळत नाही आहे आणि नवीन येणारे लोक आपल्याला आव्हान देत आहेत असे एकदा जाणवले की मग कागदोपत्री असलेल्या आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढचे पद ग्रहण करण्याचा मोह त्यांना होतो. यात एकाच तोटा होतो आणि तो म्हणजे आपल्याकडे बर्याच वेळा बृहस्पती (अर्थात Subject Matter Expert) लोकांची कमतरता जाणवते. अमेरिकेतला व्यवस्थापक हा व्यवस्थापनाबरोबर वेळ पडल्यास स्वतः आज्ञावलीशी खेळू शकतो आणि त्यामुळेच तो आदरास पात्र असतो. आपण मात्र केवळ खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपाठी लागून बढती मिळवणे हेच ध्येय ठरवतो आणि बर्याच वेळा कार्यालयात दुसर्यांचा आणि स्वतःचा देखील आदर घालवून बसतो. काही वर्षांनी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. आता हा कर्मचारी आज्ञावली पूर्णपणे विसरलेला असतो आणि त्याचा अनुभव (काम केलेली वर्षे हा एकमेव मापदंड लावून) बघता भारतीय मापनानुसार तो वरिष्ठ व्यवस्थापक बनला पाहिजे अशी कंपनीची अपेक्षा असते. परंतु वरिष्ठ व्यवस्थापक बनविण्याच्या वेळी भारतीय कंपनी एकदम कडक धोरण अनुसरते आणि केवळ काही लोकच पुढे जाऊ शकतात. मग बर्याच जणांची अवस्था मात्र तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे राहिले अशी होते.
या सर्व प्रकारात एकच धडा शिकणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे तुम्हाला स्वतःला ओळखता आले पाहिजे. स्वतःची क्षमता, स्वतःचा कल कोणत्या गोष्टीत आहे हे ओळखता आले पाहिजे आणि त्यानुसार नियोजन केले पाहिजे. एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्या व्यवसायात पडणे हा सुद्धा एक पर्याय असू शकतो. पण त्यासाठी सुद्धा पूर्वतयारी आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आजच्या युगात बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता हा एक अत्यंत आवश्यक गुणधर्म बनला आहे.
No comments:
Post a Comment