Saturday, June 12, 2010

बाल कथा

माझ्या मुलाला तो २-३ वर्षांचा असे पर्यंत गोष्ट सांगताना मी हुल्लम हाहाहा, हैम्मी हाहाहा आणि चौनी चाचाचा अशी तीन राक्षस पात्रे निर्माण केली होती. या तीन पात्रांच्या पहिल्या गोष्टीतला हा भाग पहिला!

अभिजित रानडे न्यू जर्सी येथील आपल्या वास्तव्यातील शेवटचे काही दिवस एकदम मजेत घालवत होता. आज एका जवळच्याच जंगलात फेरफटका मारून मग आवराआवरीच्या मागे लागण्याचा त्याचा बेत होता. समवयस्क मित्र गोळा करून सर्व जण एकदाचे जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले. आपल्या कार पार्किंग मध्ये ठेवून जंगलात पायी शिरतानाचा त्यांचा उत्साह एखाद्या बालकाला लाजवेल असाच होता. अभिजित त्यांचा म्होरक्या असल्याने तो पुढे पुढे जात होता. अचानक आपले मित्र बरेच मागे पडल्याची त्याला जाणीव झाली. तरीही बेफिकीरीने तो तसाच पुढे जात राहिला. अचानक पायवाट संपून एक अंधारी गुहा त्याच्यासमोर उभी ठाकली. भीती हा शब्द माहित नसलेल्या अभिजितने त्या गुहेत पाऊल टाकले तशी तिथली वटवाघळे फड फडा उडून दुसर्या ठिकाणी विसावली. पुढे जाण्याचा रस्ता मात्र अभिजीतला दिसेनासा झाल्याने त्याने परत फिरण्याचे ठरवले. परत येताना गुहेत एका खड्ड्यात अभिजित पाय घसरून पडला त्यावेळी तेथील बरीच माती मात्र त्याच्या बुटाला आणि सर्वांगाला लागली. परत मित्रांना भेटल्यावर त्यांना आपल्या शौर्याचे वर्णन करताना अभिजीतला सहलीचे सार्थक झाल्याचे वाटले. घरी परतल्यावर ती बुटे त्याने तशीच आपल्या सामानात भरून टाकली. अमेरीकॅतील राक्षस हैमीहाहाहा (Hamihahaha) याच्या गुहेतील माती आपण स्वदेशी घेवून जात आहोत याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.अभिजीतचे गाव तारापूर जवळील चिंचणी! आपला लाडका मुलगा दोन वर्षांनी परत येणार याचा कोण आनंद त्याच्या आई वडिलांना झाला होता. आपल्या घराची साफसफाई करताना आपल्या घराजवळील पडक्या वाड्याच्या बाहेरील अंगण देखील त्यांनी आपल्या नोकरांकडून साफ करून घेतला होता. या पडक्या वाड्यात काही अमानवी शक्तींचे वास्तव्य असल्याची वदंता होती परंतु सुशिक्षित रानडे कुटुंबीयांनी मात्र त्याकडे कधीच लक्ष्य दिले नव्हते. अभिजीतचे विमान वेळेवर सहार विमानतळावर उतरले. कस्टमचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर येताच आपल्या आईवडिलांचे दर्शन होताच अभिजीतला साता जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले. गाडी मुंबईबाहेर पडताच अभिजीतला आपल्या गावाचे वेध लागले. आपण हैमीहाहाहा (Hamihahaha) याच्या गुहेतील माती हुल्लम हाहाहा च्या पडक्या वाड्याजवळ नेवून चारशे वर्षापूर्वीच्या तीन सैतानांच्या वैराला उजाळा देत आहोत याची त्याला थोडीच कल्पना होती!

चिंचणी गावातील आपल्या घराजवळ पोहोचताच अभिजीतचा आनंद गगनात मावेनासा झाला. गाडी घराजवळ थांबताच टुणदिशी उडी मारून तो गाडीबाहेर पडला. आई बाबा नको नको म्हणत असताना देखील त्याने घाईघाईने बैगा वरून खाली खेचल्या. त्या घाईगडबडीत त्याचे बूट असलेली bag उघडली जाऊन बूट बाजूलाच असलेल्या वाड्यात जाऊन पडले. (अतिशयोक्ती)! अशा प्रकारे दोन सैतानाच्या संपर्कात आलेल्या मात्या एकमेकांना मिळाल्या. सुप्तावस्थेत गेलेल्या त्या दोन सैतानाना जाग आली. सर्वजण घरात शिरले. तो पर्यंत आजूबाजूच्या वातावरणात बदल होऊ लागला. सूक्ष्म रुपात प्रकट झालेले ते दोन सैतान क्षणाक्षणाला आकाराने मोठे होऊ लागले. झाडावर झोपलेले पक्षी, गोठ्यातल्या गाई म्हशी जागृत होऊन किलबिलाट करू लागले, हंबरू लागले. रानडे कुटुंबीय बाहेरचे दृश्य बघून थबकून गेले. गावकरी सुद्धा या आवाजाने जागे होऊन आजूबाजूला जमा झाले. आता पर्यंत पूर्ण रुपात आलेले ते दोन सैतान एकमेकाला भिडले. त्या दोघांची डोकी वरच्या ढगांना टेकली होती. (अतिशयोक्ती)! त्या दोघांच्या पायाखाली सापडून ५ लोक कामी आला (संदर्भ पानिपत युद्धाची वर्णने). समोरच्याच घरात हुआंग वान्ग हा आपला मित्र समीर राऊत कडे राहायला आला होता. (अतिशयोक्ती)! रात्री लवकर झोप लागत नसल्यामुळे तो आपल्या भ्रमणध्वनीवर चीन मधल्या आपल्या आजीशी बोलत होता. समोरचे दृश्य पाहून अवाक झालेला हुआंग आपल्या आजीला हे सर्व काही वर्णन करता झाला. आजीला आपल्या लहानपणी ऐकलेली तीन सैतानांची गोष्ट आठवली. फोनवर बोलता बोलता लगेचच ती शेजारीच राहणाऱ्या कुटील बाबा कडे धावली. कुटील बाबाने ही गोष्ट ऐकताच एक मंत्र म्हंटला. लगेचच तेथे तिसरा सैतान चौनीचाचा प्रकट झाला. आजीला हुआंग राहत असलेल्या गावाचे नाव विचारून लगेचच तो आकाशमार्गे चिंचणी गावाकडे प्रस्थान करता झाला. हिमालयावरून उड्डाण करताना कमी झालेल्या बर्फाची पातळी बघून त्याने जागतिक पर्यावरणाविषयी मनातल्या मनात चिंता प्रकट केली. चिंचणी गावात पोहोचताच त्याने वेगाने landing केले. त्याला बघताच बाकीचे दोन सैतान स्तब्ध झाले. चौनीचाचाने त्या दोघांना चारशे वर्षापूर्वी झालेल्या तहाची आठवण करून दिली. त्या आठवणीने ते दोघ शांत झाले. एकमेकांना मिठी मारून परत सुप्त रुपात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु योग्य मंत्र न आठवल्यामुळे ते सुप्त रुपात जाऊ शकले नाहीत. दुसरा एक मंत्र त्यांना आठवला आणि त्यां तिघांचे रुपांतर साध्या माणसांत झाले. त्यांचे रुपांतर जरी माणसांत झाले असले तरी त्यांच्या शक्ती मात्र कायम राहिल्या. त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते आपल्या शक्तींचा वापर चांगल्या कामासाठी करू लागले. त्यांच्या या चांगल्या कामांच्या गोष्टी पुढील काही भागात आपणास वाचावयास मिळतील. या सैतानांचा चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास देखील एका भागात नमूद केला जाईल.
गोष्ट छोट्यांसाठी असली तरी काही प्रश्न मोठ्यांसाठी
१> ही गोष्ट आपणास रूपकात्मक वाटते का? वाटल्यास या तीन सैतानांची तुलना कोणत्या तीन महाशाक्तींशी करण्याचा मोह आपणास होतो का?

No comments:

Post a Comment