सिंडी आपली ह्या आव्हानात्मक प्रोजेक्टसाठी निवड झाल्याने अगदी खुशीत होती. तिला एका आठवड्यातच कॅलिफोर्निआतील दुसऱ्या एका ठिकाणी ह्यासाठी हजर व्हायचं होते. जवळजवळ सहा महिन्याचे हे प्रोजेक्ट तिथूनच पार पाडायचं होते. तिचा खास मित्र जॉन ह्यामुळे बराच नाराज होता.
सितुने आपलं पूर्णपणे विकसित केलेलं मॉडेल मायकलच्या स्वाधीन केलं. मायकलने ह्या भेटीत त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ही सर्व माहिती गोपनीय राहणे फार महत्त्वाचे होते. करारामध्ये तसे खास कलमसुद्धा होते. मायकल आता एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर बिझी होणार होता. त्यामुळे त्याची भेट घेणे आता सितुला कठीण होणार होते. ई-मेल हेच केवळ संपर्काचे मध्यम राहणार होते. ह्या परिस्थितीवर सितु काही फारसा खुश नव्हता. परंतु आपण काहीसे विकलो गेलो आहोत हे त्याला कळून चुकले होते.
सिंडी रविवारी रात्री त्या ठिकाणच्या हॉटेलात जाऊन उतरली. एकंदरीत उत्सुकतेने तिच्या मनावर कब्जा केला होता. सकाळी ती दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. हे ही अत्याधुनिक हॉटेल होते. ते ऑफिस म्हणजे सुद्धा एक अलिशान सुट होता. त्याच्या दर्शनी भागात स्वागतासाठी एक स्त्री हजर होती. सिंडीचे तिने स्वागत केले. ऑफिसचे हे रूप पाहून सिंडी निराश झाली आणि काहीशी चिंतीतही! त्या स्वागतकक्षातील स्त्रीशिवाय माणसाचा तिथे मागमूस नव्हता. आपल्या फिंगरप्रिंटच्या आधारे सिंडीने आतल्या भागात प्रवेश केला. "वेलकम सिंडी!" ह्या स्वागतपर शब्दाने सिंडी अगदी दचकली. घाबरघुबर होऊन तिने त्या दालनाच्या सर्व भागावर नजर फिरवली. पण तिथल्या मंद प्रकाशामुळे तिला फारसं काही दिसत नव्हतं. 'तू तयार असशील तर आपले स्थान ग्रहण करू शकतेस!" पुन्हा एकदा आवाज आला. एव्हाना तिची नजर अंधाराला सरावली असल्याने तिने आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर तिथे असलेले दोन छोटे स्पीकर तिला दिसले. आता ती काहीशी धिटावली होती. एका मोठ्या स्क्रीनपुढे तिचे बसण्याचे आसन होते. तिने पाण्याचा एक घोट घेऊन स्थानग्रहण केले. तिला तिचे फिंगरप्रिंट समोरच्या टेबलवर उमटविण्याचा संदेश पुन्हा ह्या स्पीकरने दिला. तिने बोटठसे उमटविताच स्क्रीन उजळून निघाली. "वेलकम सिंडी!" स्क्रीनवर अक्षरे उमटली. "सारखं सारखं वेलकम काय चाललंय, कामाचं बोला!" आपला हा विचार तिने मनातच दाबून ठेवला. ह्या पुढील सूचना आता स्क्रीनवर येऊ लागल्या होत्या. सिंडीला एक विशिष्ट प्रकारचा गॉगल घालायची आणि हेडफोन लावायची सूचना देण्यात आली होती. हे सत्र सतत तीन तास चालणार होते आणि त्या अवधीसाठी सिंडी तयार असल्याचा होकार स्क्रीनने तिच्याकडून घेतला. एव्हाना त्या कक्षात मंद संगीत सुरु झाले होते. गॉगल आणि हेडसेट घालून सज्ज झालेल्या सिंडीला तयार असल्यास समोरच्या कीबोर्डवरील इंटर बटण दाबण्याची सूचना स्क्रीनवरून आली. मनाचा हिय्या करून सिंडीने इंटर बटण दाबलं. सर्वप्रथम तिच्याभोवती सर्वत्र एक तारांचं कवच आलं. हे परीक्षण संपेपर्यंत हे कवच निघणार नाही हे ती समजून चुकली. हळूहळू तिला ह्या सर्व प्रकारात रस वाटू लागला होता! तिला अजून एक सौम्य झटका बसला आणि हेडसेटमधून हळूहळू मंद गूढ संगीत येऊ लागलं. गॉगलवर तिला हळूहळू अतिशय वेगाने पुढेमागे सरकणाऱ्या प्रतिमा दिसू लागल्या. हा सर्व प्रकार सिंडीचे भान हरपेपर्यंत चालला.
सिंडी आता एका कार्यालयात होती. तिच्या समोर एका महत्वाच्या प्रोजेक्टचे काम होते. सिंडी आपले सर्व कौशल्य पणाला लावून ह्या प्रोजेक्टची डेडलाईन पुरी करण्याचा प्रयत्न करीत होती. इतक्यात प्रोजेक्ट लीड धावतपळत सर्व टीमला बोलवायला आला. कंपनीचा मालक ह्या टीमला भेटण्यासाठी आला होता. सर्वजण धावतपळत त्याला भेटण्यास एका रुममध्ये गेले. कंपनीच्या मालकाने सर्व टीमची आतापर्यंतच्या केलेल्या कामाबद्दल स्तुती केली. आणि मग त्याने एका विशिष्ट भागाच्या संरचनेबद्दल (Design) खोलात जाऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. योगायोगाने म्हणा की काय पण सिंडीने ह्या भागावर काम केले होते. बॉसच्या पहिल्याच प्रश्नाला सिंडीने आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिलं. का कोणास ठाऊक, परंतु बॉसकडून त्याचे प्रत्युत्तर येण्यास थोडा वेळ लागला. ही चर्चा पुढे बराच वेळ रंगत गेली. मध्ये मध्ये बॉसचा प्रतिसाद धीम्या गतीने यायचा. हा भाग सोडला तर सिंडीने ह्या चर्चेचा मनापासून आनंद लुटला. आपल्या हुशारीचा खरोखर इथे वापर होतोय असे तिला वाटू लागले होते.
सिंडी पुन्हा भानावर आली. मंद प्रकाशातील तो कक्ष पाहून ती काहीशी अचंबित झाली होती. तिचे डोके काहीसं जड झालं होतं. दुपारचे दोन वाजून गेले होते. "तुमचे आजचे आणि किंबहुना ह्या आठवड्याचे काम संपलं आहे! पुढील कामाच्या दिवसाच्या माहितीसाठी तुम्हांला संपर्क केला जाईल!" मंद प्रकाशातील आवाजाचे हे बोलणे तिच्या कानाने टिपले.
सितुला बराच डेटा परीक्षणासाठी मिळाला होता. परीक्षणाचा पहिला टप्प्याचे तो कसे विश्लेषण करतो ह्यावर पुढच्या सर्व प्रयोगाचे भवितव्य ठरणार होतं!
No comments:
Post a Comment