Monday, April 14, 2014

Cool… अनुकूल की प्रतिकूल !


इंग्लिशमध्ये 'aging gracefully' असा एक शब्दप्रयोग आहे. वयोमानपरत्वे शरीरात आणि मनोभूमिकेत होणारे बदल परिपक्वतेने स्वीकारून त्यानुसार आपलं वागणं बदलणं आणि योग्य अशा कार्यामध्ये आपले मन गुंतवून घेणं असा काहीसा त्याचा ढोबळमानाने अर्थ घेतला जाऊ शकतो.
हल्लीच्या इंटरनेटच्या युगात ह्या संकल्पनेच्या काहीसं विरुद्ध असं वागणं पाहायला मिळतं. चाळीशी- पन्नाशीला पोहोचलेले पालक आपल्या पाल्यांसोबत तरुणाईच्या सर्व कुल क्रियांमध्ये सहभागी होत असताना दिसत आहेत. पाल्यांनाही हेच हवे असते. दिसणं, वागणं ह्या सर्वांमध्ये पालकांनी आपल्यासोबत असावे असे त्यांना वाटत राहत आणि त्यामुळे पालकसुद्धा बऱ्याच वेळा त्यांचा हट्ट पुरा करतात.
ह्या लोकी जीवनाची गंभीर बाजू कोणाला चुकली नाही. जन्मलेल्या प्रत्येकासमोर काही ना काही समस्या, क्लिष्ट कामे असतात. काही जण शांत वेळ मिळताच ह्या समस्यांवर विचार करतात. केवळ विचार करून समस्या सुटण्याची शक्यता कमी असते. विचारासोबत कृतीची सुद्धा आवश्यकता असते! परंतु विचार केल्यानं आपलं मन समस्यांचा, क्लिष्ट कामांचा विविध बाजूनं विचार करतं आणि त्यातून एखादा चांगला विचार, मार्ग निघू शकतो.
ह्या कुल बनण्याच्या प्रयत्नात आपण ही विचार करण्याची, मननाची बाजू गमावून बसलो आहोत. आपण स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा आणि आपलं कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे काही काळापुरते आपल्याला बरं वाटतं देखील! काहीजण आपल्या समस्यांचा विचार काही वेळापुरता का होईना पण दूर सारण्यासाठी ह्या तंत्राचा वापर करतात.
आजच्या ह्या छोटेखानी लेखाच सार एकच! कुल बनण्याच्या प्रयत्नात पालक म्हणून असलेल्या मुख्य जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होऊन देऊ नये. आयुष्यातील क्लिष्ट कामं, समस्या, जमेल तितका परोपकार, सामाजिक कार्य ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या करून तुम्हांला भले लाईक मिळणार नाहीत पण तुम्ही आपल्या पाल्यांसमोर काही आदर्श ठेवाल! नाहीतर गंभीरतेचे शून्य प्रमाण घेऊन वावरणाऱ्या पालकांना डोळ्यासमोर ठेवून मोठे होणाऱ्या आजच्या पाल्यांचे भवितव्य मोठे कठीण आहे. 

No comments:

Post a Comment