Thursday, April 24, 2014

वेळेचा सदुपयोग करण्याचे काही मार्ग!

मध्यंतरी अचानक एक गोष्ट ध्यानात आली. "वेळ मिळत नाही" अशी तक्रार बऱ्याच वेळा माझ्यासारखी पामरे करीत असतात. यशस्वी माणसांच्या तोंडी अशी वाक्ये सहसा ऐकू येत नाहीत. त्याचे विश्लेषण केल्यावर माझ्या बुद्धीनुसार काढलेले हे निष्कर्ष!
१> आपल्यासमोर असलेल्या कामांची यादी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या उतरत्या क्रमाने तयार असावी. ह्यातील पहिली तीन-चार  कामे झाल्यास समाधान मानावे. उरलेली कामे न झाल्यास चिंताग्रस्त होऊ नये. आधुनिक जगाचा एक नियम ध्यानात ठेवावा - जन स्वतःच्या समस्यांनी आधीच ग्रासलेले असतात त्यांना दुसऱ्यांच्या समस्या ऐकायला शक्यतो आवडत नाही.
२> महत्वाची कामे करताना आपली मनःस्थिती चांगली ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. वर्षाच्या शेवटी आपल्या कामगिरीचे चांगली, सुमार, वाईट असे जे वर्गीकरण होत असते ते आपल्या प्रत्येक क्षणाच्या, दिवसाच्या कामगिरीचे केलेले एकत्रीकरण असते. चांगली मनःस्थिती ठेवून कामे झटपट आणि चांगल्या प्रकारे संपविल्यास अधिक वेळ उपलब्ध असल्याची भावना निर्माण होते.
३> ह्या मुद्द्यावर माझे आणि हल्लीच्या जनांचे मतभेद होऊ शकतात. पण सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्या कामास सुरुवात केल्यास क्रमांक २ बऱ्याच वेळा आपोआप साध्य  होतो.
४> मर्यादित आहार ठेवल्यास मेंदू तरतरीत राहतो. आणि त्याचबरोबर घरातील गृहिणीचा स्वयंपाकघरातील वेळ मर्यादित राहिल्यास घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.
५> शक्य असल्यास आपल्या कार्यस्थळाच्या जवळ निवास असावे. ही गोष्ट साध्य करणे बऱ्याच वेळा कठीण असते. अशा वेळी अगदी सकाळच्या कमी गर्दीच्या वेळात ऑफिसात पोहोचण्याचा प्रयत्न करावा. अर्धा तास लवकर निघून जर आपल्या प्रवासाला अर्धा तास कमी वेळ लागत असेल तर आपण एक तास अधिक निर्माण करीत आहोत हे ध्यानात ठेवावे. कमी गर्दीच्या वेळी रस्त्यावरील अडाणी लोकांशी गाठ पडण्याची शक्यता कमी असल्याने  क्रमांक २ साध्य होतो. त्याचबरोबर कार्यालयाच्या नियोजित वेळेच्या अर्धा- एक तास आधी पोहोचल्यास स्वतःची कामे करण्यासाठी अगदी विना- व्यत्यय वेळ मिळतो जो बराच फायदेशीर ठरतो. कार्यालयात लवकर पोहोचलो आता मित्राला फोन लावूयात असे विचार मनात येऊन देऊ नयेत.
६> जर आपण खरोखर मग्न आहोत अशी आपली समजूत असल्यास सामाजिक समारंभात आपला सहभाग मोजका ठेवावा. केवळ बायकोच्या बाजूच्या समारंभाला अनुपस्थित न राहता त्याच प्रमाणात आपल्या बाजूचे समारंभ सुद्धा टाळावेत. घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.
७> आपल्या बायकोची आणि आपल्या बॉसची मानसिकता समजून घेण्यात योग्य वेळ घालवावा. ह्यातही बायकोची जास्त! एकदा का विवाहबंधनात पडायचे ठरविले की बायकोस खुश ठेवण्याचे तंत्र अवगत करणे क्रमप्राप्त ठरते. जेणेकरून नसते मनःस्ताप कमी होतात . परंतु कितीही प्रयत्न केला तरी अगदी अनपेक्षित कारणावरून हे प्रसंग उद्भवतातच! त्यावेळी मनातल्या मनात तरी स्वतःला दोष न द्यावा.
८> इतक्या मोठ्या आयुष्यात छोट्या मोठ्या चुका होतच राहतात. आबा आठवले असतील तुम्हांला! त्यामुळे ह्या चुकांमुळे विचलित होऊ नये. फक्त एकच गोष्ट - एकदा झालेली चूक पुन्हा करू नकोस असे मनाला बजावावे!
९> दुनियेची पर्वा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करावी. लोकानुनयासाठी आपण किती गोष्टी करतो ह्याचे विश्लेषण करून त्या गोष्टी मर्यादित ठेवाव्यात. दुनियेला आपल्याकडे लक्ष देण्यापलीकडे सुद्धा बाकीचे उद्योग असतात हे ध्यानात ठेवावे.
१०> केबलवरील मालिका, IPL ह्या सारख्या वेळकाढू आणि मती भ्रष्ट करणाऱ्या गोष्टींपासून कटाक्षाने दूर राहावे. 


यादी लांबतच जाईल! पण ह्या लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे - महत्वाचे मुद्दे वरीलप्रमाणे, बाकीचे इतर मुद्दे लिहिण्यात मी वेळ घालवीत नाही!

No comments:

Post a Comment