सितुने पहिल्या भागाचं बरंच खोल विश्लेषण केलं होतं. सिंडीच्या वास्तवातील स्वभावाशी सुसंगत अशी तिचे प्रयोगातील वागणूक पाहून तो खुश झाला होता. प्रयोगातील बॉसचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी सितुकडे अजून पुरेशी माहिती नव्हती. त्याला ह्या विश्लेषणाची माहिती मायकलला प्रत्यक्ष भेटून द्यायची होती. परंतु प्रत्यक्ष भेटण्यासाठी मायकलकडे वेळ नसल्याने सर्व संवाद ई मेल वरच चालला होता. आणि मग मायकलला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम निघाल्याने त्याने आपल्या एका वरिष्ठ विश्वासू सहकाऱ्याकडे ह्या प्रयोगाचा कारभार सोपवला होता. तो सहकारी इस्ट कोस्ट (पूर्व किनारपट्टीवरील) न्यूयॉर्कला असल्याने त्यानेही सुरुवातीचा काही काळ ई मेल द्वारे संवाद सुरु ठेवूयात असे सितुला सुचविले. प्रयोगातील सिंडीच्या व्यक्तिमत्वाचे बॉसविषयी एकंदरीत कसे मत बनले आहे असा प्रश्न त्याने सितुला विचारला. "सध्यातरी फक्त आदर आहे बाकी काही नाही" मॉडेलच्या विश्लेषणाकडे पाहत सितुने उत्तर दिले.
पुढील काही दिवस सिंडी बराच विचार करीत होती. त्या परीक्षणाच्या कालावधीत नक्की काय घडलं हे आठवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत होती परंतु तिला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे ती बरीच बेचैन होती, आपल्या सुरक्षिततेला ह्या प्रयोगात काही धोका तर उद्भवणार नाही ना अशीही शंका तिच्या मनात येऊन गेली. परंतु इतक्या सहजासहजी हार मानणारी ती नव्हती. पुढील परीक्षणात अजून चांगला प्रयत्न करून जागृतावस्थेत राहण्याचा निर्धार तिने मनोमन केला होता. गाढ झोपेतील मनाची अवस्था आणि त्यात पडणारी / न पडणारी स्वप्ने ह्या विषयावर तिने बरेच वाचनसुद्धा केले. त्या विषयातील वाचनात तिला बराच रस वाटू लागला होता. त्यानंतर ती 'Lucid Dreams' ह्या विषयाकडे वळाली. स्वप्ने चालू असताना स्वतःला आपण स्वप्नात आहोत ह्याचे भान आणून देणे आणि मग त्यापुढे आपली स्वप्ने आपण नियंत्रणात आणणे हा विषय तिला खूप भावला. स्वप्ने नियंत्रणात आणण्याची विविध तंत्रे तिने वाचून काढली. शनिवारी रात्री जॉनला स्वप्नात आणण्याचे ठरवून ती झोपी गेली. पहाटे केव्हातरी जॉन स्वप्नात आल्यावर तिचा आनंद पराकोटीला पोहोचला. त्या खुशीतच तिने पहाटे चार वाजता जॉनला फोन लावला. अशा कारणास्तव झोप मोडल्याने जॉन जबरदस्त वैतागला. परंतु आपल्या वैतागावर कसेबसे नियंत्रण ठेवून त्याने सिंडीला झोपी जायला सांगितलं.
दुसरा आठवडा सुरु झाला. आपण स्वप्नात जॉनला आणू शकलो हे आपल्या तंत्रांच्या अंमलबजावणीचा परिणाम की निव्वळ योगायोग हे तिला समजत नव्हते. आणि स्वप्ने नियंत्रित करणे आणि ह्या परीक्षणातील आपले वागणे नियंत्रित करणे ह्या पूर्णपणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्याचेही तिला भान होते. तरीही ह्या दोन्हीही मेंदूच्या आभासावस्था असल्याने जर आपण एका अवस्थेत आपले वागणे नियंत्रित करू शकलो तर दुसऱ्यामध्ये सुद्धा करू शकू असा आत्मविश्वास ती बाळगून होती.
अजूनही सिंडीला दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं नसल्याने तिची बेचैनी काहीशी वाढली होती. तिने सहजच आपल्या ऑफिसात फोन लावला. पण वाँग किंवा दुसऱ्या कोणीही फोनवर यायला नकारच दिला. कामाचं निमित्त सांगून ते फोन घेत नव्हते. सिंडीची निराशा पराकोटीला पोहोचत होती. नशिबाने अशा परिस्थितीत तिला पुढच्या परीक्षणासाठी बोलावणं आलं.
सिंडी दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ऑफिसात पोहोचली. प्रयोगाचा दुसरा टप्पा सुरु झाला होता. पुन्हा गॉगल आणि हेडफोन! मग इंटर बटण आणि मग संरक्षक कवच; त्यानंतर सौम्य झटका, मंद गूढ संगीत आणि झपाट्याने सरकणाऱ्या रंगबेरंगी प्रतिमा! पहिल्या वेळेपेक्षा आपली जागृतावस्था अधिक वेळ कायम ठेवण्यात सिंडीने यश मिळविले. पण जोपर्यंत आपण निद्रितावस्थेत जात नाहीत तोपर्यंत संगीत आणि प्रतिमांचा खेळ चालू राहणार हे ही ती समजून चुकली. मग तिने निद्रितावस्थेत जाण्याचं सोंग आणण्याचा प्रयत्न केला. ते सोंग आणि खरोखरीची निद्रीतावस्था ह्याच्या सीमारेषेवर असताना दुसरा टप्पा सुरु झाला.
प्रोजेक्ट लीड सिंडीला भेटण्यास आला होता. तो एकदम खुशीत होता. कंपनीचा मालक एकंदरीत प्रोजेक्टच्या प्रगतीवर आणि सिंडीच्या हुशारीवर खुश होता. एकंदरीत सर्व टीमचे भविष्य उज्ज्वल दिसत होते. कंपनीच्या मालकाने प्रोजेक्ट लीड आणि सिंडीला चर्चेसाठी मुख्य कार्यालयात बोलावले होते. दुपारी ३ वाजता ही मीटिंग ठरली होती. सिंडीने ह्या मीटिंगसाठी तयारी चालू केली आणि चर्चेसाठीच्या मुद्द्यांची नोंद काढून ठेवली. अचानक तिचे घड्याळाकडे लक्ष गेले. दीड वाजला होता. ती दचकली, तिने झटपट सैंडविच खाऊन आपले दुपारचे भोजन आटपून घेतलं. सव्वादोनला निघायचं होतं. अचानक टीमलीडचा फोन आला, त्याला एक तातडीच्या प्रॉब्लेमवर काम करावं लागणार होतं आणि तो येऊ शकत नव्हता. सिंडी आता एकदम तणावाखाली आली. तिला कंपनीच्या मालकाबरोबरची मीटिंग एकटीला सांभाळावी लागणार होती. सव्वादोनला कॅब आली आणि सिंडी निघाली.
कंपनीचे मुख्य कार्यालय अगदी आलिशान होते. स्वागतकक्षात सिंडी पोहोचली तेव्हा पावणेतीनच वाजले होते. तिथल्या स्त्रीने सिंडीला थांबण्यास सांगितलं आणि शीतपेये ऑफर केली. शीतपेयाचे घोट घेता घेता आणि कार्यालयाचे सुंदर रूप न्याहाळताना तीन कसे वाजले हे सिंडीला कळलेच नाही. आणि मग तिला बॉसचे बोलावणं आलं. बॉसच्या केबीनच्या भव्यदिव्यतेने सिंडीचे डोळे दिपून गेले. परंतु आता चर्चेस सुरुवात झाली होती आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. बॉस एकदम आता खोलात शिरला होता. ह्या संकल्पित संरचेनेविषयी तो अगदी बारीकसारीक तपशीलवार प्रश्न विचारू लागला होता. एका प्रश्नावर सिंडी अडखळली आणि त्या क्षणी तिला हा प्रयोग चालू आहे ह्याची जाणीव झाली. जागृतावस्थेतील सिंडीला ह्या प्रश्नाचे उत्तर माहित होते आणि ते तिने झटकन दिले. पण तिची ही जागृतावस्था केवळ क्षणभर टिकली. पुढील चर्चा मात्र सुरेख झाली. बॉसच्या चेहऱ्यावर खुशी ओसंडून वाहत होती. "आपण एकदा कॉफी पिण्यास बाहेर जाऊयात" बॉसच्या ह्या निमंत्रणाने ही मीटिंग संपली. आणि प्रयोगचा दुसरा टप्पाही!
घरी परतल्यावर सिंडी बराच विचार करीत होती. त्या प्रयोगातील जागृतावस्थेतील त्या एका क्षणावर ती खूप खुश होती. तिच्या इतक्या मेहनतीला यश मिळाले होते. अचानक तिला बॉसने घातलेला टाय आठवला. असाच टाय आपण कोठेतरी पाहिला आहे असे तिला राहून राहून वाटत होते. नक्की कोठे हे आठविण्याचा प्रयत्न करता करता तिचा डोळा लागला.
No comments:
Post a Comment