Sunday, June 29, 2014

निरंजन - एक मन उधाण वाऱ्याचे!


निरंजन मुंबईत एका बहुदेशीय (मल्टीनॅशनल) कंपनीत काम करतो. पैसे कमविण्याच्या स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या सर्व अपेक्षा त्याने पूर्ण केल्या आहेत किंबहुना बऱ्याच प्रमाणात ओलांडल्या आहेत. निरंजनचे मन मात्र सतत त्याच्याशी संवाद साधत असते. कधी ते त्याला तू हे जे काही सर्व करीत आहे ते कसे निरर्थक आहे हे जाणवून देतं तर कधी कोलमडण्याच्या मार्गावर असलेल्या निरंजनला ते दिलासा देत. तर ही ब्लॉगपोस्ट निरंजन आणि त्याच्या मनातील संवादाची!
१) कार्यालयात निरंजनकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ह्या सर्वच काही लिखित स्वरुपात नसतात. लिखित स्वरूपातील जबाबदाऱ्या सुद्धा नक्की कशा पूर्ण करायच्या ह्या विषयी कोणी नक्की सखोल मार्गदर्शन केलेलं नसतं. ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी निरंजनकडे अगदी परिपूर्णपणे त्या आटोपणे किंवा कशाबशा आटपणे हे दोन पर्याय असतात. एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास करून निरंजन ह्यातील एक पर्याय निवडतो.
लिखित स्वरुपात नसलेल्या जबाबदाऱ्या बऱ्याच वेळा दीर्घ मुदतीच्या लक्ष्यावर केंद्रित करून बनविलेल्या असतात. त्या एका दिवसातील कामाने संपविणे शक्य नसते. 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या उक्तीप्रमाणे ह्या दीर्घ मुदतीच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असते. ह्या वाटचालीसाठी मार्ग निरंजनला स्वतःच शोधायचा असतो. लिखित स्वरूपातील जबाबदाऱ्या आटोपल्या की काही काळ विसावू पाहणाऱ्या मनाला तत्काळ समजावून ह्या दीर्घ वाटचालीचा त्या दिवसात जमेल तितक मार्गक्रमण करणे आवश्यक असते.
२) निरंजन जेव्हा कार्यालयाच्या सुरु होण्याच्या वेळी तिथं येतो त्यावेळी तो आपली ई- मेल चेक करतो. घर ते कार्यालय ह्या प्रवासातील बऱ्यावाईट अनुभवांनी निरंजनचं मन काहीसं भरकटलेल असतं. त्याला समजावून निरंजन त्याचे लक्ष ई-मेल वर आणतो. दररोज शेकडोंच्या संख्येत येणाऱ्या ई मेल मधून महत्वाच्या ई मेलना शोधण्याचे काम मग त्याचा मेंदू करू लागतो. दीर्घकालीन लक्ष्यांना गाठण्यासाठी दिवसातील कार्यालयाचा हा  सुरुवातीचा काळ महत्वाचा आहे हे मन त्याला बजावत असतंच. त्यामुळे महत्वाच्या ई मेलवर कृती करून किंवा कृती करण्यासाठी टीम मधील लोकांची निवड करून निरंजन दीर्घकालीन लक्ष्याकडे वळतो. दिवसभरातील आपल्यासमोरील कामाची यादी लिखित स्वरुपात समोर ठेवण्याचा निरंजन आटोकाट प्रयत्न करीत असतो. परंतु ते नेहमीच जमतं असे नाही.
३) कार्यालयातील सर्वजण स्थिरावले की मग मीटिंगचा, दूरध्वनीवरील कॉल ह्यांचा खेळ चालू होतो. ह्या खेळात आपल्या मेंदूतील  माहिती दुसऱ्याला समजेल अशा भाषेत मांडणे, दुसऱ्यांनी मांडलेली माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविणे, ह्या सर्व प्रकारात निर्माण होणाऱ्या मनातील भावनांना सांभाळणे, काही वेळा गरज असल्यास भावनांना अतिरंजित रूप देऊन समोरच्याला योग्य संदेश देणे हे सर्व प्रकार निरंजन करत असतो.
४) मध्येच निरंजन त्याच्या बॉसला भेटतो. वर्षभरात ९९ टक्के वेळा निरंजन बॉसचे म्हणणे ऐकतो. आजचा दिवस बाकीच्या १ टक्क्यातला आहे का हा निर्णय निरंजन प्रत्येक मीटिंग मध्ये घेत असतो. दररोज जरी त्याला आजची ही बॉसबरोबरची मीटिंग त्या १ टक्क्यांतली आहे असे वाटत असले तरी त्याचे मन त्याला आणि तो मनाला समजावतो आणि खरोखर त्या टक्क्याला १ च्या वर जाऊ देत नाही.
५) असाच दिवस पुढे जात असतो. वेळ मिळताच निरंजन घरची खबरबात घेतो. साप्ताहिक सुट्टीत मुलांचा अभ्यास आपण अजून जास्त घ्यायला हवा होता असे त्याला राहून राहून वाटत राहते. पत्नीने घरात न चालणाऱ्या गोष्टींची फोनवरून दिलेली यादी त्याचा मेंदू ग्रहण करीत असतो. त्यातील एखादी धोक्याच्या पातळीच्या वर जाणारी बाब बायकोच्या स्वरातील फरकावरून तात्काळ ओळखण्याचे तंत्र एव्हाना निरंजनच्या मेंदूला अवगत झाले आहे आणि त्यामुळे असा धोका दिसताच तो निरंजनला सावध करतो आणि मग ऑफिसचे काम करीत असलेला निरंजन तत्काळ बायकोला उत्तर देतो. हा कॉल संपला की ह्या आठवड्यात आईवडिलांशी एकदा बोललंच पाहिजे असा निर्धार निरंजन करतो.
६) मग अशीच जेवणाची / नास्त्याची वेळ येते. वयानुसार निरंजन घरून डबा नेतो किंवा अगदी आरोग्यदायी आहार घेतो. आपल्या भोवताली अगदी चवदार पदार्थ खाणाऱ्या इतरांना पाहून निरंजन आपल्या गतआयुष्याची आठवण काढतो. आपल्या अजूनही न जमणाऱ्या व्यायामाच्या लक्ष्याविषयी मनातल्या मनात तो खंत व्यक्त करतो.
७) निरंजन सोशल मिडियामध्ये  सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या समवयस्क लोकांचे अपडेट वाचून स्वतःला अपराधी वाटून घेतो. निवृत्तीनंतर आपणही असेच कार्य करायचंच असा मनातल्या मनात निर्धार तो करतो.
८) दिवस संपत आलेला असतो. शेवटची पंधरा वीस मिनिटं बाकी असतात. निरंजन पुन्हा एकदा आपल्या अल्पमुदतीच्या कामाच्या यादीकडे पाहतो आणि त्यातील एक दोन कामे आटपायचा एक शेवटचा प्रयत्न करतो.
९) मग बाकी असतो तो घराचा परतीचा प्रवास! हा प्रवास किती खडतर असेल हे निरंजनच्या नशिबावर अवलंबून असतं! थकल्याभागल्या शरीरातील तितक्याच थकलेल्या मनाला सांभाळत निरंजन कसाबसा घरी पोहोचतो. मुलंतर केव्हाच झोपी गेलेली असतात. बायकोला निरंजनविषयी सहानभूती वाटत असते की तिला तिच्या समस्यांनी ग्रासल्याने ह्या सर्वाला निरंजन जबाबदार आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण झालेली असते हे एकेका दिवसावर अवलंबून असते.
१०) बाथरूम मधून फ्रेश होऊन आलेला निरंजन क्षणभर सोफ्यावर बसतो. मंद दिव्यात आपल्या सजवलेल्या घराकडे पाहत जुनी गाणी सुरु करतो. गाणं सुरु असतं - "दिल ढूँढता फिर वही फुरसत के रातदिन!"  


.
. . .
. .
.
.
. .
. . .


अशाच काही मोजक्या फुरसतीच्या क्षणांनंतर निरंजनच्या मनात सुरु  होतात ते दुसऱ्या दिवशीच्या महत्वाच्या मीटिंगचे विचार!

Friday, June 27, 2014

डिस्नी जगत (लॉस अंजेलीस) २००२ - एक चित्रमय सफर


तर झालं असं! आठवड्याच्या मध्याला मोदी सरकारची बातमी ऐकली.  नरेंद्र मोदींनी वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या जुन्या फायलींची विल्हेवाट लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले अशी बातमी वाचनात आली. ही बातमी माहिती महाजालावर (इंटरनेट) वाचल्याने बातमीसोबतच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मिळाल्या. खरोखर जुन्या फायलीसोबत त्रासदायक ठरू शकणाऱ्या फायली सुद्धा नष्ट केल्या गेल्या असणार वगैरे वगैरे!
अशा नकारात्मक प्रतिक्रियांना टाळून मी बातमी पूर्ण वाचण्याचे ठरविले. मग त्यात स्वातंत्र्यकाळातील कसे जुने फोटो सापडले ह्याचा उल्लेख होता. ह्या जुन्या फोटोत आणि फायलींत  महात्मा गांधींची अंत्ययात्रा निघण्याआधीचा फोटो, महात्मा गांधींच्या निधनाची बातमी देशभर जाहीर करण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेली तातडीची बैठक, लॉर्ड माउंटबेटन ह्यांना इंग्लंडमध्ये कायमचे परत जाण्यावेळी  देण्यात आलेला ६४००० रुपयांचा स्थलांतर मोबदला ह्या सर्व महत्वाच्या बातम्यांचा समावेश होता. ह्या ६४००० हजारांची आजची किंमत किती असेल ह्याविषयी सुद्धा जोरदार चर्चा होती.


प्रत्येक घरी नित्यनेमाने रगडा निर्माण होत असतो. घरात असलेल्या अगणित वस्तूंच्या गृहिणीच्या मनात असणाऱ्या आदर्श स्थानांपासून  समजा काही वस्तूचे स्थलांतर झाले तर त्याला आपण रगडा असे ढोबळमानाने संबोधू शकतो. ह्यात काही म्हणजे किती हे जरी प्रत्येक गृहिणीवर अवलंबून असले तरी पूर्ण आयुष्यभर संसार केल्यावरसुद्धा  हे काही म्हणजे नक्की किती हे घरातील पुरुषास समजू शकेल कि नाही ह्याची मला खात्री नाही. तर असाच आमच्या घरात रगडा निर्माण झाला होता आणि हा रगडा निर्माण करण्यास मीच जबाबदार आहे ह्याची माझी मनोमन खात्री नेहमीच असते. त्यामुळे मी तसा तयारीतच होतो. परंतु नशीब जोरात होते. ह्या रगड्यात २००२ सालच्या अमेरिकतील वास्तव्यातील फोटोंचे अल्बम निघाले.   त्यामुळे वातावरण एकदम चांगले बनले.


आज शनिवारी सकाळी जरा फुरसत मिळाल्याने ह्या भेटीतील डिस्नी वर्ल्डला दिलेल्या भेटीचे काही फोटो स्कॅन करण्याची संधी मिळाली.  ते आज ह्या ब्लॉगपोस्ट मध्ये अपलोड करीत आहे. माझे बालपण वसईच्या मराठी माध्यमाच्या शाळेत गेलेलं! त्यामुळे डिस्नी वर्ल्ड ह्या प्रकाराविषयी एकंदरीत अज्ञानच!


रात्री मुक्कामाला आम्ही वसईच्या विकास चौधरी ह्यांच्या घरी होतो. कॅलिफोर्निआच्या एकदम प्रसन्न सकाळी आम्ही जेव्हा डिस्नी वर्ल्डमध्ये प्रवेश केला तेव्हा मी तिथल्या वातावरणाने अगदी हरखून गेलो. बालपणात ह्या प्रकारांचा अनुभव घ्यायला मिळाला नसला तरी ह्या परिसरात गेल्यावर मात्र मी वयाचे बंधन गळून पडणे म्हणजे काय असते हे अनुभवलं.


आता बारा वर्षानंतर सर्व सफरी लक्षात नाहीत. पण सुरुवातीलाच एलिस इन वंडरलॅंडची सफर होती. त्यात एलिसच्या काल्पनिक जगाला वास्तवरुपात आणण्यात आलं होतं. त्यानंतर एका कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या स्पेस माउंटनमधून एक जोरदार आगगाडी सफर होती. अशा राईडचा माझा हा पहिलाच अनुभव. ह्या राईडच्या पूर्ण कालावधीत प्राजक्ताची जोरदार बोंबाबोंब सुरु होती. त्यानंतर जसजशा अधिकाधिक राईडमध्ये आम्ही बसत होतो तसतसे थोडे नाविन्य कमी होत गेलं. दिवसा जाणवू लागलेला काहीसा उकाडा त्यात भर घालीत होता. बर्गर तत्सम प्रकारांवर जेवण आटपून आम्ही अजून गंमतजंमत अनुभवत होतो. प्राजक्ता आणि आमच्या सोबत असलेल्या केसकर कुटुंबियांचा अभ्यास तसा दांडगा असल्याने त्यांनी साधारणतः चारच्या सुमारास मला डिस्ने वर्ल्डच्या एका भागाकडे जवळजवळ खेचतच नेले. सर्व कार्टून पात्रांची आता परेड निघणार होती आणि ही परेड जिथून जाणार त्या भागाच्या आसपास मोक्याच्या जागा पटकावणे आवश्यक होते. ह्या पटकावलेल्या जागांबाबत आम्ही काहीसं समाधान आणि काही कुरबुर चालू असतानाच परेड सुरु झाली. त्याकाळी कॅमेरात रोल टाकला जात असे. मी एखादा रोल संपायला दोन तीन महिने किंवा कधी कधी पाच सहा महिने जाताना पाहिलं होत. पण पुढील पंधरा वीस मिनिटात आमचा एक रोल संपला आणि पुढचा सुरु झाला देखील! तर ह्या परेडची ही काही छायाचित्र! माझ्या एकंदरीत ह्या कार्टून पात्रांच्या अज्ञानामुळे त्यावर मी जास्त टिपणी करीत नाहीये! प्राजक्ताची थोडी मनधरणी करून तिच्याकडून त्यांची नावे मिळवून ती त्या फोटोसोबत देत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी!!





ह्या परेडच्या सुरुवातीला परीकथेतील पात्र (सिंड्रेला तत्सम प्रकार) 









हिमपरी (स्नो व्हाईट)


स्नो व्हाईटच्या सोबत असणारे सात बुटके 



पारदर्शक फुग्यात दिमाखात वावरणारी लिटील मरमेड  


समुद्री घोड्यांच्या रथावर बसून आलेली लिटील मरमेड 













रुबाबदार लायन किंग 


रंगतदार फ्लेमिंगो 



बनीज 




गुफी, प्लुटो, चीप आणि डेल 



आणि परेडच्या शेवटी आलेला बालगोपाळांचा लोकप्रिय मिकी!



दुसऱ्या दिवशी आम्ही युनिवर्सल स्टुडीओला गेलो होतो. जमला तर त्याचाही दुसरा एक ब्लॉग जमेल तेव्हा लिहीन. पण त्यातला एक फोटो स्कॅन झालाय तोही इथे देत आहे! 



बाकी कथा आणि स्थळवर्णन ह्यात बरेच भाग अर्धवट सोडले आहेत. ते नक्की पुढे केव्हातरी पूर्ण करीन! 




Saturday, June 21, 2014

३ - गभा क्रचलका


दिवस असेच भराभर पुढे नव्हे मागे चालले होते. आणि मग अचानक तो बदल झाला.  क्रचलका  अचानक पाच वर्षे मागे गेले. आणि आता मात्र ह्या क्षणापासून कालचक्र सतत पुढेच जाऊ लागलं होते. हा अचानक झालेला बदल मात्र समस्त मानवजातीला अगदी मनातून घाबरवून सोडणारा होता. अनिकेत आणि साधना ह्यांच्या लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ होता तो! परंतु मनाने मात्र ते पाच वर्षे पुढेच होते.
अनिकेत आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात होता. हा स्वतःला सिद्ध करून दाखविण्याचा काळ होता. परंतु ह्या सर्व धडपडीचा अंतिम निकाल माहित असल्याने अनिकेत अगदी तटस्थपणे ह्या सर्व कालावधीकडे पाहत होता. अशाच एका फुरसतीच्या संध्याकाळी तो घरी एकटा होता. साधना माहेरी गेली होती. टीव्हीवर क्रिकेटचा सामना चालू होता. आणि अचानक त्याच्या मेंदूत थोडी खळबळ उडाली होती. आपल्याशी कोणीतरी संपर्क साधू इच्छिते आहे असा त्याला भास होऊ लागला होता. "हॅलो अनिकेत" कोणीतरी आपल्याला बोलावत आहे असे त्याला वाटू लागलं. त्याने नक्की आठवायचा प्रयत्न केला. पाच वर्षापूर्वीचा हा सामना त्याने अजून दोन अडीच तास सोफ्यावर लोळत पाहिला होता. त्याला काहीसं बरं वाटलं. म्हणजे हा जो कोणी संदेश पाठवतो आहे त्याच्याशी संवाद साधण्यासाठी अजून काही काळ होता तर त्याच्याकडे!
"हॅलो" त्याने परत उत्तर देण्यासाठी मनातल्या मनात बराच वेळ प्रयत्न केला. हा संदेश समोरच्या व्यक्तीकडे पोहोचला की नाही हे समजायला वाव नव्हता. चार पाच मिनिटे प्रयत्न करून त्याने शेवटी शांत बसण्याचे ठरविले. इतक्यात पुन्हा त्याच्या मेंदूत पुन्हा थोडी खळबळ उडाली. पुन्हा एक नवीन संदेश आला होता. "सुरेख अनिकेत! तू टेलीपथीने माझ्याशी संवाद साधू शकलास तर! गेले काही दिवस जो भयानक प्रकार मनुष्यजात अनुभवत आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही जमेल तितक्या बुद्धिमान मनुष्यांना एकत्र आणत आहोत. तुझा अनुक्रमांक आहे ई १४३७४७९" हा संदेश संपला होता. नक्की कोण अनिकेतला संदेश देत होतं हे कळण्याचा त्याला मार्ग नव्हता. हा अनुक्रमांक कागदावर लिहून ठेवण्याची कितीही इच्छा झाली तरी ते साध्य होणार नाही हे त्याला चांगलेच ठाऊक होते. आपल्या स्मरणशक्तीचा त्याला मोठा अभिमान होता. तिचा वापर करून हा क्रमांक त्याने चांगलाच लक्षात ठेवला. अरे साधनाचा पण एखादा अनुक्रमांक असेलच ना! ह्या विचाराने त्याला काहीसं बरं वाटलं. समोर क्रिकेटचा सामना संपत आला होता. ह्यानंतर त्याने पिझ्झा खाऊन ताणून दिली होती. हे त्याला आठवलं. नाईलाजाने त्याला हे सत्र संपवावं लागणार होतं. टेलीपथीच्या पुढच्या सत्रासाठी पुढील निवांत क्षणाची वाट पाहणे इतकेच त्याच्या हातात होते!


(क्रमशः)

Thursday, June 19, 2014

२ - गभा क्रचलका


केवळ आपल्यालाच स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवता येत नाही तर आपल्या भोवतीच्या सर्वांची हीच स्थिती आहे हे सर्वांनाच कळून चुकलं होतं. परंतु आपल्यासारखच सर्वांच्या मनात स्वच्छंद विचारांचं वादळ घोंघावत आहे किंवा नाही हे मात्र कळायला वाव नव्हता.
अनिकेत दिवसभर अगदी गोंधळून वावरत होता. कोणतीही कृती करायला विचार करण्याची आवश्यकता नव्हती. प्रत्येक गोष्ट आधी घडली तशीच पुन्हा घडत होती. त्यामुळे विचार करायला वेळच वेळ होता. अनिकेतचे विचारचक्र जोरात चालू होते. घटना तर भूतकाळाप्रमाणे चालल्या होत्या, पण विचार नवीन होते. त्यावेळी आपल्या मनात कोणते विचार आले होते हे आठविण्याचा तो प्रयत्न करू लागला होता.
बॉसबरोबरची त्याची मीटिंग चालू होती. नागपूरच्या इमारतीच्या संरचनेविषयी बोलणे चालू होते, अगदी तावातावाने! शेवटी आपण कितीही बरोबर असलो तर बॉस स्वतःचेच म्हणणं खरं करतो हे अनिकेतला आठवलं. त्यामुळे अनिकेतला खरं तर ह्या विवादात रस राहिला नव्हता. परंतु त्यामुळे काही त्याची विवादाची तीव्रता काही कमी होत नव्हती. एकंदरीत परिस्थितीवर अनिकेत अगतिकपणे स्वतःशीच हसला. अचानक त्याला ह्या मीटिंगच्या पहिल्या घडण्याच्या वेळी आपल्या मनात कसे विचार चालू होते हे अंधुकसं आठवू लागलं. त्यावेळी आपल्या मनात कसा जोश होता, बॉसला आपलंच म्हणणं पटवून देण्याची जिद्द होती वगैरे वगैरे. अनिकेत मनातून काहीसा दचकला. आपला मेंदू आपले आधीचे विचारसुद्धा आठवू शकत होता हे समजल्याने त्याला काहीसं बर वाटल. मीटिंग तशी अजून दोन तीन तास चालणार असल्याने अनिकेत फुरसतीत होता. मध्येच आलेल्या अल्पोपहाराचा तो आस्वाद घेत होता. ह्या कंपनीच्या कॅंटीनवाल्यांना सैंडविच ठीकपणे बनवायला कधी जमणार ह्याचा तो विचार करत होता.
गरमागरम कॉफीने त्याचं टाळक ठिकाणावर आणलं. हा जो प्रकार चालला आहे तो नक्कीच अभूतपूर्व होता. कोण्या एका अभूतपूर्व शक्तीने क्रचलका थोड्या थोड्या वेळाने उलट दिशेने फिरविण्यात यश मिळविले होते. ही जी कोणी शक्ती आहे तिने एकदमच १०० वर्षे वगैरे क्रचलका मागे नेऊन ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. ही तासातासाची मानसिक दगदग सहन करायला लागली नसती. किंवा क्रचलका एका बिंदूपासून परत उलटं फिरवलं असतं तर? परंतु सगळ्या हालचाली उलट्या दिशेने करण्याचा विचार अनिकेतला फारसा आवडला नाही. तसं पाहिलं तर ह्या अभूतपूर्व शक्तीच्या ताकदीच्या काही उणीवा अनिकेतला आताच जाणवू लागल्या होत्या. मनुष्यजातीच्या विचारशक्तीवर ह्या शक्तीला नियंत्रण आणता आलं नव्हतं. आणि मनुष्याला होणाऱ्या मनोविकारांचे काय? समजा बाकीच्यांच्या मनात सुद्धा असेच विचार चालू असतील आणि एका बिंदूनंतर समजा एखाद्या मानसिक तणावाने ग्रस्त माणसाच्या विचारातील विकारांनी त्याच्या कृतीवर नियंत्रण मिळवीले तर? ही अभूतपूर्व शक्ती ह्या परिस्थितीचा सामना करू शकेल काय?
एकंदरीत ह्या विचारचक्राने अनिकेतला बरं वाटू लागलं होत. अचानक त्याच्या मनात स्वप्नांचा विचार आला. ही स्वप्न सुद्धा आपलीच असणार होती. आणि मग त्याला अचानक टेलीपथीची आठवण झाली. मनुष्यजातीला टेलीपथीच वाचवू शकेल असंच त्याला वाटू लागलं.
चर्चा जोरात चालू होती. बॉस तावातावाने आपलं म्हणणं मांडत होता पण अनिकेतला त्याचं काहीच वाटत नव्हतं. ह्याच्यापासूनच टेलीपथी सुरु करावी असा मनात येणारा विचार त्याने प्रयत्नपूर्वक झटकून टाकला!

Wednesday, June 18, 2014

१ - गभा क्रचलका


अनिकेत काहीसा आश्चर्यचकित होऊन घड्याळाकडे पाहत राहिला. आताच मगाशी दहा वाजून गेल्याचे त्याला चांगले आठवत होते. परंतु आता घड्याळ अचानक आठ वाजताची वेळ दाखवत होते. ऑफिसात बसून चहा पीत असणारे आपण आता पुन्हा आंघोळीच्या तयारीला कसे लागलो आहोत हे त्याला समजत नव्हते. अजून हैराण करणारी गोष्ट म्हणजे मनात विचार काहीही चालू असोत, त्याच्या हातून कृती मात्र आधी जशा घडल्या तशाच होत होत्या. आंघोळ आटपून जसे बाहेर पडण्याची वेळ आली तशी त्याची छाती धडधडू लागली. साडेआठ वाजता आपली पत्नी साधनाशी झालेला वाद त्याला चांगलाच आठवत होता. कसेही करून हा वाद कसा टाळता येईल ह्याचा तो विचार करू लागला होता. परंतु कृतीवर नियंत्रण आणण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते.
अनिकेतच नव्हे तर सर्व मनुष्यजातीत (किंबहुना त्यांच्या मनात) प्रचंड खळबळ माजून राहिली होती. प्रत्येक एका तासानंतर घड्याळ दोन तास मागे जाई. एक तासाच्या घटना घडत आणि पुन्हा दोन तास पाठी! पृथ्वीचे  मार्गक्रमण कसे बदलले जात आहे ह्याही विषयी कोणालाच समजत नव्हते. आणि मुख्य म्हणजे एकाही पंचेन्द्रियावर कोणाही माणसाचे नियंत्रण नव्हते. मनातील विचार कोणाला बोलून, लिहून सांगायचे तोही मार्ग नव्हता.
भूतकाळातील सर्व घटना पुन्हा अनुभवणं हा कधी सुखद तरी कधी दुःखद अनुभव होत होता. परंतु ह्यात एकच गोष्ट घडणार होती आणि ती म्हणजे भूतकाळातील माणसे परत वावरताना दिसणार होती. ह्या अतिशय विचित्र प्रकाराला सुरुवात होऊन केवळ तीन तास झाले होते पण भूतकाळातील घटना यांत्रिकपणे पुन्हा अनुभवणाऱ्या अखिल मनुष्यजातीची मने अगदी हादरून गेली होती.  


(क्रमशः)

Saturday, June 14, 2014

सामाजिक जीवनातील मध्यमवर्गीयांचा सहभाग!


आपण काही काळ मागे जाऊयात. स्वातंत्र्यापूर्वी बहुतांशी लोक आर्थिकदृष्ट्या गरिबीत होते. आपल्या घरचा कारभार सांभाळणे हीच मोठी कसरत असे. त्यामुळे समाजकारणात त्यांनी जरी भाग घेतला नसला तरी आपल्या गावातील, परिसरातील लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. ही मदत करणे हे आपले कर्तव्य आहे ही भावना होती आणि त्यामुळे ह्या बदल्यात प्रसिद्धी वगैरे मिळावी अशी अजिबात अपेक्षा नसे.
पुढे स्वातंत्र्य वगैरे मिळाले. लोकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, मध्यमवर्ग मोठ्या संख्येने शिक्षकी पेशात उतरला. अपत्यसंख्या २-३ वर मर्यादित झाली. वर्तमानपत्र वाचण्याचे, समाजात वावरण्याचे प्रमाण वाढले आणि एक सामाजिक जाणीव बऱ्याच जणांमध्ये निर्माण झाली. आपल्या परीने मध्यमवर्ग समाजकारणात भाग घेऊ लागला. महिलावर्गाला सांसारिक जबाबदारीमुळे हे फारसे शक्य झाले नाही. मध्यमवर्गीयांच्या ह्या समाजकारणाला एकदम मोठी व्यापक दिशा वगैरे नव्हती. स्थानिक भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हेच बऱ्याच वेळा लक्ष असे.
ह्या कालावधीत समाजाच्या मानसिकेत हळूहळू बदल होत चालला होता. समाजातील वैयक्तिक स्थान ही महत्वाची गोष्ट बनत चालली होती. उद्योगाची मानसिकता नसलेल्या काही वर्गांनी समाजातील आपले स्थान उंचाविण्यासाठी शिक्षणाची कास धरली. स्वानंदासाठी, कर्तव्यपूर्तीसाठी समाजकारण ही भावना एव्हाना कमी होऊ लागली होऊ लागली होती. ह्या वातावरणात वाढणाऱ्या पिढीचा एकंदरीत समाजकारणाविषयी भ्रमनिरासच झाला होता. आपण आपला स्वार्थ पाहावा आणि गप्प राहावे ही भावना मूळ धरू लागली होती.
ही मानसिकता काही काळ टिकली. आणि मग पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाचा काळ आला. केवळ शिक्षणाने समाजात मान मिळण्याचे दिवस सरले होते. शैक्षणिक यशाला नोकरीधंद्यातील यशाची जोड देणे आवश्यक बनले होते. ते ही ह्या वर्गाने प्रयत्नपूर्वक साध्य केले. मग आता आजूबाजूला समाजाकडे पाहण्याची वेळ आली. अरेच्चा हे काय झालं? कमी शिकलेल्या लोकांनी सामाजिक जीवनावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षित वर्गाला आता शैक्षणिक जीवनातील यशाची किल्ली मिळाली असल्याचा ग्रह झाला असल्याने आता आपण काही वेळ समाजकारणासाठी देऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. परंतु समाजकारणात पूर्ण झोकून देण्यासाठी एकतर वेळ नव्हता किंवा त्या क्षेत्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी जमवून घेण्याची जी क्षमता असावी लागते ती सर्वांकडे नव्हती. त्यामुळे बऱ्याच जणांसाठी समाजकारणातील हा सहभाग सोशल मिडियापुरता मर्यादित राहिला. काही खरोखर बुद्धिमान लोकांनी व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांशी जुळवून घेण्याची तयारी आणि क्षमता दाखविली. सध्यातरी अशा लोकांचा समाजकारणात वावर सुरु झालेला दिसत आहे.
पुढे नक्की काय होणार हे आजच सांगणे काहीसे कठीण आहे. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वावर असलेला सुशिक्षित वर्ग नक्कीच ह्या निवडणुकीतील एकाच पक्षाला मिळालेल्या बहुमताला कारणीभूत ठरला असे मानण्यास वाव आहे. पुढेसुद्धा हा वर्ग निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव दाखवेल असे मला वाटतं. परंतु ह्या वर्गातील लोक सक्रिय समाजकारण आणि पुढे सक्रिय राजकारण असा टप्पा गाठतील का? केवळ सुशिक्षित आणि जमलं असेल तितकं समाजकारण ह्या मुद्द्यावर एखाद्या उमेदवारास निवडणुकीत यश मिळू शकेल काय?  भारतीय राजकारण पुढे कोणती दिशा घेईल हे बरेचसे ह्या मुद्द्यावर अवलंबून असणार आहे!


(तळटीप - कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क आपल्याला ह्या देशात आहे. लिहिताना सुद्धा बऱ्यापैकी हा हक्क असतो परंतु सार्वजनिक माध्यमात लिहिताना कोणत्या विषयावर कोणत्या मर्यादेत लिहायचे ह्याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. नाहीतर अनिष्ट परिणाम उद्भवू शकतात. ही प्रस्तावना अशासाठी की आजचा जो विषय आहे त्यावर खरेतर अधिकारवाणीने बोलण्याचा माझी पात्रता बहुदा नाही. तरी सुद्धा!!!


आणि हो असाच थोडा ह्याच विषयावरील लेख मी आधी लिहिला होता! )

Thursday, June 5, 2014

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड - भाग ७


आज सहलीचा सातवा दिवस! ३१० किमी प्रवासाची नकोशी जाणीव मनात दडी धरून होती. सकाळी लवकर उठून, बॅगा वगैरे भरून आम्ही चंदीगडच्या प्रवासासाठी निघालो. काही वेळातच वैष्णो माता देवीचे (सुप्रसिद्ध वैष्णोदेवीचे नव्हे)  मंदिर आलं. हे मंदिर एका मध्यम उंचीच्या डोंगरात वसलेलं आहे. ह्या मंदिराचं नाव आधी केव्हा ऐकलं नव्हतं. परंतु विविध उंचीवर असलेल्या देवांच्या अनेक मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटलं. सर्व देवांचे दर्शन घेण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावं लागतं. पण हे सर्व बंदिस्त असल्याने फारसा त्रास जाणवला नाही. 
प्रत्येक मूर्तीभोवतालच नक्षीकाम मनाला थक्क करून सोडणारं होतं. त्यावरील कलाकुसर इतकी सूक्ष्म होती की हे इतक्या प्रमाणातील नक्षीकाम करायला किती वेळ लागला असेल ह्याचा विचार करणे सुद्धा कठीण होतं. पूर्वीची लोक विविध रूपांत तपस्या करीत. पाठांतर, संगीत, चित्रकला, शिल्पकला ह्या सर्व माध्यमातून वर्षोनवर्षे आपली कलाकुसर घडवीत. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ही माध्यमे असावीत असे कधी कधी वाटून जातं. अशा ठिकाणच्या वातावरणात का कोणास ठाऊक एक प्रकारची गूढ शांतता असते असे मला वाटतं. ईश्वराचं वास्तव्य काही प्रमाणात आपल्या मनात कुठेतरी दडलं असणार, ह्या कलाकारांनी बहुदा त्या अंतर्मनातील ईश्वराला साद देण्याचा कलामाध्यमातून प्रयत्न केला असणार. 
ह्या मंदिराच्या परिसरात छायाचित्रणास सक्त मनाई होती. तिथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. आणि मग शनीची एक वेगळी मूर्ती होती. शनिवारच्या दिवशी शनीला तेलाभिषेक करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. ह्या मंदिराच्या जवळून नदीचा खळखळ आवाज करणारा प्रवाह होता. 
आज बसमध्ये लेज आणि फ्रुटी ह्यांचं प्रवाशी मंडळींना वाटप करण्यात आलं. त्यामुळे बच्चेमंडळी तर खुश झालीच पणआई बाबालोक सुद्धा खुश झाले. स्वतःची अशी फ्रुटी आपल्या लहानपणी फार कमी वेळा मिळाली असेल आणि आता मोठेपणा (वयाचा!) आपली स्वतःची फ्रुटी असावी असा विचार मनात बहुदा आणून देत नाही. पण ह्यापुढे संधी मिळाल्यास महिन्यातून एकदा तरी शांतपणे फ्रुटी प्यावी आणि लेज वगैरे खाऊन घ्यावेत असा निर्धार करण्याचा विचार मनात डोकावला. 

बाकी परतीचा प्रवास बऱ्याच भागापर्यंत सिमल्याहून येतानाच्या मार्गाचाच होता. त्या प्रवासाची ही काही चित्रे!
















दोन डोंगराच्या मधून आपली वाट शोधणारी ही नदी मला खूप भावली! मार्गात अनेक संकटे आली तरी त्यातून आपला मार्ग शोधावा असा सल्ला देण्याचा दृष्ट विचार सुद्धा त्यावेळी माझ्या मनात आला नव्हता. भोवतालच्या निसर्गाचा परिणाम असावा! पण आज मात्र तो विचार माझ्या मनात आला. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव; बाकी काय!




पुन्हा एकदा पायऱ्यापायऱ्यांची शेती! मला इथे आपले एक छोटे घर असावे असे राहून राहून वाटत होते. 



नदीची अनेक नयनरम्य वळणे टिपण्याचा हा प्रयत्न!












बाकी बसमध्ये अमेय आणि मंडळी खाद्यपदार्थांच्या नावाच्या भेंड्या खेळत होते. नाचणीचे सत्व, ठेचा, थालीपीठ वगैरे प्रकारापासून सुरु झालेली गाडी आधी लाल भात आणि मग बदकाचे मटण वगैरे प्रकारावर येऊन पोहोचली तेव्हा मग मंडळी वैतागली आणि मग आपसूक गाण्यावर वळली.

काही का असेना पण प्रवासीमंडळी आज विचारात गढली होती. इतके दिवस, महिने जिची उत्सुकतेने वाट पाहिली, ती सहल जवळजवळ संपली होती. मनाला एक नवीन उत्साहाचं भरतं आलं होतं. वर्षभर तणावाचे, नैराश्याचे अनेक प्रसंग येतात. हयावर मात करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी तंत्रे असतात. अशा सहलीतील अनुभवलेले मनमोकळे क्षण आपल्या मनाला सर्व बंधनातून मुक्त करून आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता देतात. हे जग, आपलं आयुष्य एक मोठं विस्तृत पसरलेलं अंतराळ आहे. शहरात आपण जे आयुष्य जगतो ते ह्या विस्तृत पसाऱ्याचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे ह्या छोट्या भागाचं फारसं दडपण घेऊ नये ही दृष्टी, हा विचार मनात निर्माण करण्याची क्षमता पर्यटनामुळे आपल्यास लाभावयास हवी. उत्साहाचं भरलेलं हे लोणचं वर्षभरात जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा बाहेर काढावं!



प्रवास चालूच होता. जेवणाचं ठिकाण हॉटेल वैली व्यू साडेअकरा वाजताच आलं त्यामुळे लवकर भोजन करणे क्रमप्राप्त होते. सव्वा बाराच्या उन्हात पुन्हा त्या बसमध्ये बसणे अगदी जीवावर आले होते. परंतु नाईलाज होता.



वाटेत ऋषी धवनचे गाव मंडी लागलं. त्यानंतर हळूहळू प्रदेश रुक्ष होत चालला होता. आणि मग एका वळणावर सिमल्याचा रस्ता सुटून आम्ही बिलासपुरच्या मार्गे लागलो. कुलकर्णी ह्यांना बिलासपूर विषयी, हे शहर कसे असेल ह्याविषयी  जरा उत्सुकता होती. परंतु एकंदरीत त्या गावाने त्यांची निराशा केली. आता बर्यापैकी खाली उतरल्याने आजूबाजूची झाडी सुद्धा वेगळी दिसत होती. विशेष म्हणजे आंब्यांची झाडे सुद्धा होती. त्यांना आताशा कैऱ्या लागल्या होत्या. एक दीर्घ प्रवास सुरु होता. आता पुन्हा चढ लागला होता. उंच पर्वतांना वळसा घालून जावं लागत होत. अशा दोन उंच डोंगराना जोडणारे पूल बांधल्यास ह्या प्रदेशातून प्रवास करणाऱ्या असंख्य मालवाहू ट्रक, प्रवासी बसेस ह्यांचा वेळ आणि इंधन ह्यात खूपच बचत होईल असा प्रस्ताव कुलकर्णी ह्यांनी मांडला. एक पर्यावरणाची हानी हा भाग सोडला तर त्यांच्या ह्या प्रस्तावात मला खूपच तथ्य वाटलं. ह्या प्रस्तावाच्या अनुकूल / प्रतिकूल बाबींचा (Feasibility Study) अभ्यास करण्यासाठी सरकारने एक शीघ्र समिती नेमावी अशी मागणी मी इथे करीत आहे. 


महामार्गाचा हा भाग (जवळजवळ ४० किमी) खराब असल्याने प्रवासास जास्तच वेळ लागत होता. साडेतीन - चारच्या सुमारास एका सुमार धाब्यावर चहापानासाठी आम्ही थांबलो. वीणा वर्ल्डवाल्यांनी नेहमीप्रमाणे गल्ल्याचा ताबा घेतला. पुन्हा बसमध्ये बसलो. आता अमेयने चित्रपटांच्या नावांच्या भेंड्या सुरु केल्या. The Last of the Mohicans, The Two Days in Valley, Last Samurai अशा नावांचा मी त्याच्यावर मारा केल्यावर बिचारा हतबल झाला. चेहऱ्यावर कसनुसं हसू आणत ही नावे स्वीकारण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आमच्या गटातील बाकी मंडळींनी सुद्धा चांगली कामगिरी बजावल्याने भेंडी चढायची राहिली. 

मग अचानक रस्ता सुधारला. महामार्ग सुरु झाला. पंजाब आलं होते. ह्याच सुमारास धुळीचे मोठे वादळ सुरु झाले. त्यामुळे एकदम बदल झाल्यासारखं वाटत होते. पंजाबातील कालवे, गव्हाची शेती, केवळ लाकडासाठी पैदास केलेले वृक्ष ह्यांची सुंदर दृश्ये बसमधून दिसत होती. ह्या वृक्षांची नावे कोणाला माहित असल्यास जरूर सांगा! 



कालव्याचे विहंगम दृश्य!



पंजाबला गव्हाचे कोठार म्हणतात ह्या लहानपणी शिकलेल्या वाक्याची प्रचीती देणारी दृश्ये! 










पंजाब खरोखर खूप समृद्ध आहे ह्याची केवळ बसमधील पंजाबच्या दर्शनाने खात्री पटत होती. परंतु ह्याच पंजाबातील तरुण पिढी व्यसनी पदार्थांच्या अधीन होत चालली आहे ह्याच्या बातम्या वाचून फार दुःख होत होते. समृद्धी कशी पचवावी ह्यावर आता भारतात धडे घ्यावे लागतील अशीच लक्षणे दिसू लागली आहेत. 


चंडीगड शहरातील रस्ते प्रशस्त होते. एका ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला मोर दिसल्यावर आतापर्यंत शांत असलेल्या बसमध्ये थोडे चैतन्य पसरलं. हॉटेल आता १० -१५ मिनिटात येईल असे अमेय गेले दीड सांगत होता! शेवटी एकदाचे ते हॉटेल आले. चार तारांकित असलेले हे हॉटेल निर्विवादपणे आतापर्यंतच्या ह्या प्रवासातील सर्वोत्तम हॉटेल होते. त्याची ही काही दृश्ये! 












 कुलकर्णी ह्यांच्या आईवडिलांनी त्यांनी पंजाबातील लस्सी पिण्यास सांगितल होते. परंतु हॉटेलवर उशिरा पोहोचल्याने ती मनिषा पूर्ण झाली नाही. 

रात्रीचे जेवणही ह्या हॉटेलला साजेसे होते. ह्या वर्षात पहिल्यांदा शनिवारी चिकन खाण्याचा मोह आवरला नाही! शनैश्वरा, माफ करा! सकाळचा नास्ताही वैविध्यपूर्ण होता. सर्वांनी एकमेकांच्या संपर्कमाहितीची देवाणघेवाण केली. मी सर्वांना जबरदस्तीने ब्लॉगचा पत्ता दिला. हिट संख्या वाढायला नको का? आणि हे सहप्रवासी नक्कीच ह्या ब्लॉगशी अधिक जवळून समजून घेतील!

विमानतळपाच मिनिटातच आला. इथेच हा प्रवास सुरु झाला होता. इतक्या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात आम्हाला अगदी सुखरूप आणणाऱ्या ड्रायव्हरचे आम्ही मनापासून आभार मानले. माझ्या जुन्यापुराण्या ब्लॅकबेरीत त्याचा फोटोही काढला.  


आदित्य, अमेय मंडळींचा आम्ही भावूक निरोप घेतला. हिमाचल कितीही सुंदर असलं तरी आता आपली मुंबई आम्हांला साद देत होती. पण ह्या मंडळींना मात्र 'Show Must Go On!' ह्या उक्तीनुसार एका नवीन सहलीला जावे लागणार होत. आदित्याची तर तेरा दिवसाची लगेचच सहल होती. त्यांच्या निग्रही मनोवृत्तीचे कौतुक करावे तितके थोडे!

विमानात सुद्धा जवळजवळ बससारखंच वाटत होतं! उड्डाणाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया करण्याचा मोह कसाबसा आवरला! विमानाने उड्डाण केलं. सोहमशी मांडवली करून खिडकीची जागा पटकावली. मध्येच ढगाळ वातावरण लागलं. त्यानंतर मात्र आकाश स्वच्छ झाले. अशाच आकाशातील ही ढगांची रांग!






विमानातले अल्पोपहार करता करता मुंबई कधी जवळ आलं ते समजलं सुद्धा नाही! मुंबई विमानतळाजवळील ही टेकडी! 






गो एयर विमान आमच्या मनातील त्याच्या प्रतिमेनुसार वेळेआधीच दहा मिनिटे मुंबईला उतरले! आणि बाहेर आल्यावर सातव्या मिनिटाला सामान हातात पडले / खेचून काढले. पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतला. प्री पेड टॅक्सीत बसलो. पहिल्याच सिग्नलला लागलेलं हे मुंबईतील दुर्मिळ हिरवं दृश्य!




टॅक्सी भरधाव वेगाने धावत होती. अशीच आठवण निघाली. आमच्या कंपनीतील एका पार्टीत प्रत्येकाने अमेरिकेतील आणि भारतातील किती राज्ये बघितली ह्याची चर्चा चालू होती. फक्त दोघांचा अपवाद वगळता आम्ही दहा जणांनी बघितलेल्या अमेरिकेतील  राज्यांची संख्या जास्त निघाली. आज मी भारतातील राज्यांच्या संख्येत तीनाची भर घातली ह्याचा सार्थ अभिमान मला वाटला. 

दुसऱ्या दिवशीची सकाळ! नऊ वाजले तरी सोहम बिछान्यातून लवकर उठत नव्हता. प्राजक्ता जवळ जाऊन ओरडली, "वीणा वर्ल्ड, वीणा वर्ल्ड!" पाचव्या मिनिटाला गडी दात वगैरे घासून हॉलमध्ये येउन बसला एका सांग्रसंगीत नास्त्याच्या अपेक्षेने!

(समाप्त)
आजचा भाग थोडा आटोपता घेतला. आपल्याला ही शृंखला आवडली असल्यास प्रतिक्रिया द्या. नवीन हुरूप येईल!

आधीच्या भागांच्या लिंक्स