Sunday, June 1, 2014

एकवार पंखावरून फिरो तुझा हात! - चित्रपट वरदक्षिणा




सुंदर चालीने ह्या गाण्याकडे लक्ष वेधले गेले. सुधीर फडके ह्यांच्या सुमधुर आवाजाने ह्या गाण्याची गोडी अधिक वाढली. रमेश आणि सीमा देव ह्यांचा सुरेख अभिनय! चित्रपटाची कथा आधी माहित नसल्यामुळे मी काहीसा संभ्रमात पडलो होतो. तरण्याबांड रमेश देवला अगदी आयुष्याची संध्याकाळ असल्याप्रमाणे हे गाणे गावयास का वाटावे हे मला समजत नव्हते. तेव्हा यु ट्यूबवर शोधून वरदक्षिणा हा चित्रपट पाहिला, तो हे गाणे चित्रपटात येईपर्यंत!


ह्या चित्रपटात एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी! ग. दि. माडगूळकरांची पटकथा, संवाद आणि गीतरचना. गायक साक्षात सुधीर फडके. त्यामुळे चित्रपटात कथानकाच्या संदर्भानेच गाणी येतात असे नाही. एखादे सुंदर गाणे चित्रपटात आणण्यासाठी काही वेळा ओढूनताणून प्रसंगनिर्मिती केल्यासारखी वाटते.


रमेश देव ह्यांचे सीमावर असलेले बहुदा अव्यक्त प्रेम! सीमाच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे रमेश ह्यांचे तिच्याघरी सतत येणे जाणे. सीमा ह्यांचे वडील हुंड्याच्या अडचणीमुळे तिचे लवकर लग्न करू शकत नाहीत. एकंदरीत तीन कन्यांमधील  सीमा ही दुसरी कन्या. रमेश देव हे आपल्या मनातील भावना लपवून ठेवून सीमाचे लग्न जमविण्यासाठी जमेल तशी मदत करीत असतात. अशाच एका निमित्ताने त्यांचे हैद्राबादला जाणे होते. तिथे लग्नाचे काम तर होत नाही पण त्या परिचितांच्या वयोवृद्ध आईच्या मनातील भावना बोलावून दाखविणारे हे गीत! ती साईबाबांची परमभक्त त्यामुळे प्रथम साईबाबाच्या प्रतिमेवर कॅमेरा फिरतो आणि साईबाबांचा संदर्भ समोर ठेवून गाईलेलं हे गीत!


एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात



ह्या दुनियेत सदैव भ्रमण करणाऱ्या माझी आता शेवटची घटका जवळ आली आहे. आता माझ्या पंखावरून तुझ्या मायेचा हात फिरावा हीच एक इच्छा बाकी राहिली आहे. माझा शेवट तुझ्याच पायाशी व्हावा ही इच्छा!

 धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात



आता पक्षाची उपमा दिलीच आहे तर ती पूर्णपणे निभावावी म्हणून संपूर्ण जमिनीसोबत निळ्या आकाशाचा, उन्हा चांदण्याचा संदर्भ!

वने, माळराने, राई
ठायीठायी केले स्‍नेही
तुझ्याविना नव्हते कोणी आत अंतरात



सर्व वनात, माळरानात फिरलो, सर्वत्र मित्र बनविले. हे सगळे खरे असले तरी मी मनाने मात्र तुझ्याजवळच होतो. तुझ्यावाचून माझ्या मनात कोणी नव्हतं.

फुलारून पंखे कोणी
तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत



मोर (इथे जनांतील रूपवंत हा अर्थ अभिप्रेत असावा) आपला फुलारा पसरवून तुझ्यासमोर नाचले. काही भाग्यवंत तर तुझ्या अगदी मनगटावर येऊन बसले.

मुका बावरा मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात



माझ्याजवळ खास असे रूप नाही. मी पडलो मुका, बावळा. अशा सामान्यरूप धारण करणाऱ्या माझ्याकडे तुझे कसे लक्ष जाणार? असे मलिन रूप घेऊन तुझ्या मंदिरात येण्याचेसुद्धा मला धाडस होत नाही. पण माझ्या मनीची इच्छा मात्र एकच आणि ती म्हणजे


एकवार पंखावरून फिरो तुझा हात!


गीत लक्षात राहिलं ते बाबूजींच्या सुमधुर आवाजामुळे आणि गाण्याच्या चित्रीकरणातील साधेपणामुळे! ५२ वर्षापूर्वीचा हा चित्रपट पण गाणं कसं अगदी मनाला भिडून जाणारं! बहुदा अशी मनाला भिडून जाणारी गाणी रचिण्याचा मनुष्याला ईश्वराने दिलेल्या  देणगीचा वाटा बऱ्याच आधी संपून गेला असावा आणि आता उरली ती 'ये दुनिया पितल दी!"

No comments:

Post a Comment