तर झालं असं! आठवड्याच्या मध्याला मोदी सरकारची बातमी ऐकली. नरेंद्र मोदींनी वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या जुन्या फायलींची विल्हेवाट लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले अशी बातमी वाचनात आली. ही बातमी माहिती महाजालावर (इंटरनेट) वाचल्याने बातमीसोबतच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मिळाल्या. खरोखर जुन्या फायलीसोबत त्रासदायक ठरू शकणाऱ्या फायली सुद्धा नष्ट केल्या गेल्या असणार वगैरे वगैरे!
अशा नकारात्मक प्रतिक्रियांना टाळून मी बातमी पूर्ण वाचण्याचे ठरविले. मग त्यात स्वातंत्र्यकाळातील कसे जुने फोटो सापडले ह्याचा उल्लेख होता. ह्या जुन्या फोटोत आणि फायलींत महात्मा गांधींची अंत्ययात्रा निघण्याआधीचा फोटो, महात्मा गांधींच्या निधनाची बातमी देशभर जाहीर करण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेली तातडीची बैठक, लॉर्ड माउंटबेटन ह्यांना इंग्लंडमध्ये कायमचे परत जाण्यावेळी देण्यात आलेला ६४००० रुपयांचा स्थलांतर मोबदला ह्या सर्व महत्वाच्या बातम्यांचा समावेश होता. ह्या ६४००० हजारांची आजची किंमत किती असेल ह्याविषयी सुद्धा जोरदार चर्चा होती.
प्रत्येक घरी नित्यनेमाने रगडा निर्माण होत असतो. घरात असलेल्या अगणित वस्तूंच्या गृहिणीच्या मनात असणाऱ्या आदर्श स्थानांपासून समजा काही वस्तूचे स्थलांतर झाले तर त्याला आपण रगडा असे ढोबळमानाने संबोधू शकतो. ह्यात काही म्हणजे किती हे जरी प्रत्येक गृहिणीवर अवलंबून असले तरी पूर्ण आयुष्यभर संसार केल्यावरसुद्धा हे काही म्हणजे नक्की किती हे घरातील पुरुषास समजू शकेल कि नाही ह्याची मला खात्री नाही. तर असाच आमच्या घरात रगडा निर्माण झाला होता आणि हा रगडा निर्माण करण्यास मीच जबाबदार आहे ह्याची माझी मनोमन खात्री नेहमीच असते. त्यामुळे मी तसा तयारीतच होतो. परंतु नशीब जोरात होते. ह्या रगड्यात २००२ सालच्या अमेरिकतील वास्तव्यातील फोटोंचे अल्बम निघाले. त्यामुळे वातावरण एकदम चांगले बनले.
आज शनिवारी सकाळी जरा फुरसत मिळाल्याने ह्या भेटीतील डिस्नी वर्ल्डला दिलेल्या भेटीचे काही फोटो स्कॅन करण्याची संधी मिळाली. ते आज ह्या ब्लॉगपोस्ट मध्ये अपलोड करीत आहे. माझे बालपण वसईच्या मराठी माध्यमाच्या शाळेत गेलेलं! त्यामुळे डिस्नी वर्ल्ड ह्या प्रकाराविषयी एकंदरीत अज्ञानच!
रात्री मुक्कामाला आम्ही वसईच्या विकास चौधरी ह्यांच्या घरी होतो. कॅलिफोर्निआच्या एकदम प्रसन्न सकाळी आम्ही जेव्हा डिस्नी वर्ल्डमध्ये प्रवेश केला तेव्हा मी तिथल्या वातावरणाने अगदी हरखून गेलो. बालपणात ह्या प्रकारांचा अनुभव घ्यायला मिळाला नसला तरी ह्या परिसरात गेल्यावर मात्र मी वयाचे बंधन गळून पडणे म्हणजे काय असते हे अनुभवलं.
आता बारा वर्षानंतर सर्व सफरी लक्षात नाहीत. पण सुरुवातीलाच एलिस इन वंडरलॅंडची सफर होती. त्यात एलिसच्या काल्पनिक जगाला वास्तवरुपात आणण्यात आलं होतं. त्यानंतर एका कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या स्पेस माउंटनमधून एक जोरदार आगगाडी सफर होती. अशा राईडचा माझा हा पहिलाच अनुभव. ह्या राईडच्या पूर्ण कालावधीत प्राजक्ताची जोरदार बोंबाबोंब सुरु होती. त्यानंतर जसजशा अधिकाधिक राईडमध्ये आम्ही बसत होतो तसतसे थोडे नाविन्य कमी होत गेलं. दिवसा जाणवू लागलेला काहीसा उकाडा त्यात भर घालीत होता. बर्गर तत्सम प्रकारांवर जेवण आटपून आम्ही अजून गंमतजंमत अनुभवत होतो. प्राजक्ता आणि आमच्या सोबत असलेल्या केसकर कुटुंबियांचा अभ्यास तसा दांडगा असल्याने त्यांनी साधारणतः चारच्या सुमारास मला डिस्ने वर्ल्डच्या एका भागाकडे जवळजवळ खेचतच नेले. सर्व कार्टून पात्रांची आता परेड निघणार होती आणि ही परेड जिथून जाणार त्या भागाच्या आसपास मोक्याच्या जागा पटकावणे आवश्यक होते. ह्या पटकावलेल्या जागांबाबत आम्ही काहीसं समाधान आणि काही कुरबुर चालू असतानाच परेड सुरु झाली. त्याकाळी कॅमेरात रोल टाकला जात असे. मी एखादा रोल संपायला दोन तीन महिने किंवा कधी कधी पाच सहा महिने जाताना पाहिलं होत. पण पुढील पंधरा वीस मिनिटात आमचा एक रोल संपला आणि पुढचा सुरु झाला देखील! तर ह्या परेडची ही काही छायाचित्र! माझ्या एकंदरीत ह्या कार्टून पात्रांच्या अज्ञानामुळे त्यावर मी जास्त टिपणी करीत नाहीये! प्राजक्ताची थोडी मनधरणी करून तिच्याकडून त्यांची नावे मिळवून ती त्या फोटोसोबत देत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी!!
ह्या परेडच्या सुरुवातीला परीकथेतील पात्र (सिंड्रेला तत्सम प्रकार)
हिमपरी (स्नो व्हाईट)
स्नो व्हाईटच्या सोबत असणारे सात बुटके
पारदर्शक फुग्यात दिमाखात वावरणारी लिटील मरमेड
समुद्री घोड्यांच्या रथावर बसून आलेली लिटील मरमेड
रुबाबदार लायन किंग
रंगतदार फ्लेमिंगो
बनीज
गुफी, प्लुटो, चीप आणि डेल
आणि परेडच्या शेवटी आलेला बालगोपाळांचा लोकप्रिय मिकी!
दुसऱ्या दिवशी आम्ही युनिवर्सल स्टुडीओला गेलो होतो. जमला तर त्याचाही दुसरा एक ब्लॉग जमेल तेव्हा लिहीन. पण त्यातला एक फोटो स्कॅन झालाय तोही इथे देत आहे!
बाकी कथा आणि स्थळवर्णन ह्यात बरेच भाग अर्धवट सोडले आहेत. ते नक्की पुढे केव्हातरी पूर्ण करीन!
No comments apart from the fact that this is a Marathi blog!!
ReplyDelete