पावसाळा आणि विशेषतः श्रावण महिना सुरु झाला की मराठी कुटुंबात सत्यनारायणाच्या पूजेच्या हालचाली सुरु होतात. सत्यनारायण पूजेच्या सर्वांच्या मनात रम्य आठवणी असतात. आमच्या वसईच्या घरात सत्तरीच्या दशकापासून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. पावसात अगदी टवटवीत झालेल्या तुळशींपत्रांची हिरवीगार टोपली, लाल पिवळ्या फुलांची परडी आणि ताज्यातवान्या केळींनी बनवलेली सत्यनारायणाच्या पुजेची मखर! ह्या पूजेत एका ठिकाणी ऋतूकालानुसार मिळणारी फुले पाने असाही उल्लेख आहे.
पुजेची तयारी तर अगदी जोरात सुरु असते. ह्या पुजेची जी दोन तीन महत्वाची वैशिष्ट्य आहेत त्यात साजूक तुपात बनविलेला शिरा, तीर्थ, विष्णूसहस्त्रनाम आणि त्यानंतर तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणारी जवळची नातलग मंडळी ह्यांचा समावेश असतो.
लहानपणी अनु भटजी ही पूजा सांगण्यासाठी घरी यायचे. ते फार कडक होते. पूजेतील सर्व विधी अगदी नियमानुसार पार पडले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे. त्यावेळी बऱ्याच वेळा मी पूजेवर बसे आणि मग माझ्या हातून काही चूक झाल्यास (जी नेहमीच होई!!) माझ्या आजीकडे तक्रारीच्या नजरेत पाहत, "तुम्ही ह्याला पूजा काहीच कशी शिकवली नाही" असे म्हणत. ते स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वारसांनी मात्र इतका कडकपणा दाखवला नाही. बाकी मग सर्वत्र थोडक्यात पूजा सांगण्यामागे कल दिसू लागला. ह्यालाही काही सन्माननिय अपवाद आहेत. बोरिवलीला प्राजक्ताच्या कुटुंबात पूजा सांगण्यासाठी येणारे योगेश भटजी हे मात्र अगदी शास्त्रोक्त पूजा सांगतात.
ह्या पूजेत अनेक चांगल्या गोष्टी आहेत.
१) ही पूजा साधेपणाचे महत्त्व अधोरेखित करते. ह्यातील कथेत सांगितल्याप्रमाणे अगदी बिकट परिस्थितीत असतानासुद्धा एखादा माणूस ही पूजा घालू शकतो.
२) त्याचप्रमाणे एखादे व्रत घेतले असता ते न चुकता कसे पाळावे हे ही ही पूजा सांगते.
३) आपले जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी ह्या निमित्ताने आपणास भेटतात. पावसाळ्याच्या काळात लग्नसमारंभाचे प्रमाण वगैरे कमी असल्याने ही जवळची मंडळी बराच काळ न भेटू शकण्याची जी शक्यता असते ती ह्या पूजेच्या निमित्ताने कमी होते.
ब्लॉगचा हेतू हाच ! ह्या पूजेच्या निमित्ताने जुनीच व्रते आधुनिक स्वरुपात अंगीकारा!
१) ह्या पूजेच्या निमित्ताने आयुष्यात साधेपणाने जगायला शिका!
२) आपल्या व्यावसायिक व्रतांचे, जबाबदाऱ्याचे कसोशीने पालन करा. ह्यात खंड पडल्यास कसे दुष्परिणाम होऊ शकतात ह्याचा कथेतील धडा लक्षात घ्या.
३) नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांना घरी भेटा! घरच्या घरी घरगुती पदार्थ सेवन करा! त्यांच्या भेटण्याचं निमित्त करून बाहेर हॉटेलात जाऊन अरबट चरबट खाऊ नकात!
इति आदित्य कथेचा नवीन अध्याय संपूर्णम!
No comments:
Post a Comment