मराठी भाषेत म्हटले आहे, "तलवारीच्या वाराने झालेली जखम एक वेळ भरून निघेल, पण शब्दाच्या वाराने झालेली जखम भरून निघणार नाही!". एखाद्या व्यक्तीच्या प्रगल्भतेची पातळी मोजण्याचे विविध मापदंड आहेत. त्यापैकी ती व्यक्ती एखाद्या सुखाची, दुःखाची अथवा संतापाची परिसीमा गाठू शकेल अशा प्रसंगास कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देते हा एक मापदंड असू शकतो.
हल्लीच्या व्यावसायिक जगात एखाद्या उच्चपदीय व्यक्तीस आपल्या भावनांवर बरेच नियंत्रण ठेवावं लागतं. दीर्घकालीन ध्येये साध्य करायची असतात. छोट्या मोठ्या प्रत्येक प्रसंगात विजयीवीर होणे आवश्यक नसतं! आपली मती, ऊर्जा खरोखर महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवायची असते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगात संयत प्रतिक्रिया देणे आवश्यक असते. नाहीतर एखाद्या गावातील "त्याला मी असा कापला (म्हणजे शब्दांनी!)" अशी प्रतिक्रिया देणाऱ्या एखाद्या बढाईखोरात आणि ह्या व्यावसायिकात काही फरक उरणार नाही!
आता ही संयत प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया कशी असते? प्रत्येक घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात तात्काळ आनंद, दुःख किंवा संताप अशी प्रतिक्रिया उमटते. पण अशा वेळी आपल्या मनात एक गाळणी असावी लागते. अशी गाळणी जी मनातील खऱ्या प्रतिक्रियेतील समोरच्या व्यक्तीच्या, प्रसंगाच्या दृष्टीने असणारा अनावश्यक भाग बाजूला काढून उरलेला उचित भाग आपली प्रतिक्रिया म्हणून व्यक्त करते. ह्यात एक फायदा होतो आणि तो म्हणजे पुढील काही काळ ह्या प्रसंगाच्या ज्या त्रासदायक स्मृती आपल्या भोवती रेंगाळू शकतात त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आता एक मात्र खरे की १०० टक्के वेळा संयत प्रतिक्रिया देणे गरजेचे नाही. समोरचा माणूस अगदीच नाठाळ असेल तर क्वचितच रौद्र रूप धारण करणे सुद्धा आवश्यक असते. सतत संयमी प्रतिक्रिया द्यायला लागलात तर तुमचा नरसिंह राव किंवा सध्याचा धोनी होण्यास फारसा वेळ लागणार नाही!!
सारांश काय? संयत प्रतिक्रिया देणारा व्यावसायिक जगातील माणूस बऱ्याच वेळा त्या विभागाच्या, कंपनीच्या सुरुळीत कामगिरीचं उत्तरदायित्व आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतो. आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा असंच आहे! "एक घाव दोन तुकडे" अशा वृत्तीने दररोज जगण्यापेक्षा सुखी संसाराच्या जबाबदारीचं उत्तरदायित्व घेत संयमी प्रतिक्रिया देणे केव्हाही चांगलंच!
एक प्रश्न - संयमी आणि संयत ह्यातला फरक काय? की मी संयत ह्या शब्दाचा चुकीचा वापर केला?
बाकी शेवटी जाता जाता मला कीर्तनकार म्हणणाऱ्या माझ्या मित्राची आठवण झाली. मागच्या काही ब्लॉग पोस्ट्स खरोखर एखाद्या कीर्तनकाराच्या प्रवचनासारख्या झाल्या आहेत!
No comments:
Post a Comment