बघता बघता ब्रायटन आठवणींची ही शृंखला आठव्या भागापर्यंत पोहोचली. "आला भाग आठवा! अजुनी आठवणी आठवा!!" असे गंमतीने म्हणावसं वाटतं. सुरुवातीच्या भागात सर्व आठवणी महिन्याच्या क्रमाने देण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र सर्व सरमिसळ होत आहे.
मधल्या काळात आम्ही लंडन आणि स्कॉटलंड अशा दोन भेटी दिल्या. पैकी लंडन भेट एका दिवसाची तर स्कॉटलंड भेट तीन दिवसाची होती. लंडन हे रेल्वेने एक - सव्वा तासाच्या अंतरावर होते. जून महिन्याच्या एका शनिवारी सिंटेलचा सहा सात जणांचा गट लंडनला जाण्यासाठी निघाला. कुपनरूपातील तिकीट चुंबकीय पट्टीतून फिरविल्यावर उघडणारा दांडा पाहून आम्हांला काहीसं अप्रूप वाटलं होतं हे आता कबूल करायला हरकत नसावी. शांत ब्रायटन मध्ये वास्तव्याची सवय झाल्याने लंडन आम्हांला बरेच गजबजलेले वाटत होते. सर्वप्रथम आमची पावले मादाम तुसा ह्या प्रसिद्ध संग्रहालयाकडे वळाली. ह्या संग्रहालयात जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मेणाच्या प्रतिमा बनवून ठेवल्या आहेत. ह्या इतक्या हुबेहूब असतात कि प्रत्यक्ष व्यक्ती सुद्धा ह्या मेणाच्या प्रतिमेजवळ तशाच वेषात उभी राहिली, तर प्रत्यक्ष व्यक्ती कोणती आणि प्रतिमा कोणती असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. ह्या संग्रहालयाचे तिकीट दहा बारा पौंडाच्या आसपास होते. ह्याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे आमच्या गटातील एकाने हे तिकीट काढून आत येण्याऐवजी बाहेर थांबणं पसंत केलं. आमच्यातील काही जणांनी त्याची अरसिक, कंजूष म्हणून टर उडवली पण त्याची सुद्धा स्वतःची बाजू होती असे मला वाटून गेलं. आधी म्हटल्याप्रमाणे परदेशवारीमागे प्रत्येकाचे विविध उद्देश असतात. पै पै वाचविण्याचा काहींचा हेतू असेल तर त्याने असा निर्णय घेण्यात काही चूक नाही असे माझं मत पडलं. पुढे तोच मला नंतर एकदा म्हणाला, "आपण ही सर्व ठिकाणं आयुष्यात बघू असे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, वाईट एकाच गोष्टीचं की ज्यांच्यामुळे आज आपण इथवर आहोत, त्या आईवडिलांना मी हे काही दाखवू शकत नाही!" मादाम तुसामध्ये न येण्याच्या त्याच्या निर्णयाचा अजून एक पैलू मला जाणवला.
बाकी मग लंडन ब्रिज, टॉवर ब्रिज हे सुद्धा पाहिले. लंडन ब्रिज फारसा मोठा नसून टॉवर ब्रिज हा मोठा आहे अशी सामान्य ज्ञानात भर पडली. ह्या ब्रिजच्या विविध कप्प्यात जाऊन आम्ही तिथल्या मार्गदर्शक लोकांनी दिलेली माहिती ऐकली. थेम्स नदीतून जाणाऱ्या मोठाल्या बोटींना वाट करून देण्यासाठी हा ब्रिज मधून उघडला जातो हे ऐकून आम्ही अचंबा व्यक्त केला.
बाकी थेम्सचं पाणी जवळून पाहिल्यावर ते बरेचसं गढूळ असल्याचं जाणवलं. मग पावलं लंडनच्या दुसऱ्या भागांकडे वळली. बिग बेन ह्या प्रसिद्ध घड्याळाच दर्शन घडलं. लंडन आयची तिकीट ऐन वेळी सुद्धा मिळतील हा आमचा आत्मविश्वास किती चुकीचा होता हे आम्हांला तिथे जाऊन कळलं. त्या नंतर १० डाउनिंग स्ट्रीट ह्या ब्रिटीश पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बाहेरून एक फेरी मारली. मग ब्रिटीश सम्राट आणि सम्राज्ञीचे अधिकृत निवासस्थान असलेल्या बकिंगहम राजवाड्याला भेट दिली. तिथला प्रसिद्ध 'चेंज ऑफ गार्डस' हा पहारेकऱ्याच्या अदलाबदलीचा कार्यक्रम पाहिला. ह्या सर्व कार्यक्रमात हे पहारेकरी हालचालींची इतकी काटेकोरता दाखवितात की ह्यांच्या जागी यंत्रमानव आणले तरी ते ह्याहून अधिक अचूकता आणू शकणार नाहीत असे वाटून गेलं.
बाकी ह्या प्रासादाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप हिरवळ होती आणि प्रेमी युगुलांचे प्रेम ऊतू चाललं होतं. सार्वजनिक ठिकाणच्या प्रेमप्रदर्शनाच्या बाबतीत मग त्या मानाने अमेरिका परवडली असे नंतर अमेरिका भेटीत मला वाटून गेलं. रात्री उशिरा ब्रायटन मध्ये परतल्यावर आपल्या गावी परतल्याचा आनंद झाला. एक भारतीय धाटणीच उपहारगृह पाहून आम्ही त्यात शिरलो. ऑर्डर वगैरे दिल्यावर मालक पाकिस्तानी असल्याचं कळून चुकलं. पण फारसं काही वाटून न घेता आम्ही जेवणावर आडवा हात मारला.
नंतर एकदा दुसऱ्या एका पाकिस्तानी उपहारगृहात एक आव्हानपूर्ण जेवण असल्याची बातमी आमच्या गटापर्यंत येउन पोहोचली. जेवण अगदी मसालेदार असणार होतं. जे कोणी सात पौंड किंमत असणार हे जेवण पूर्ण संपवू शकणार होतं त्याला ते फुकटात मिळणार होतं. आमच्यातील प्रफुल्ल आणि बहुदा श्रीकांत ह्यांनी हे आव्हान स्वीकारण्याच ठरविलं. त्यांचा हा पराक्रम बघण्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्यांच्या सोबत एका रात्री ह्या हॉटेलात गेलो. जिभेवर कमीत कमी वेळ घास ठेवत तो थेट पोटात ढकलल्यास फारसा त्रास होणार नाही असे प्रफुल्लचे धोरण होते. बऱ्याच नाट्यमय प्रसंगानंतर आणि ह्या दोघांच्या अनेक बाथरूम भेटीनंतर हे आव्हान यशस्वीरित्या ह्या दोघांनी संपवलं! त्यानंतर मात्र दोन दिवस हे दोघं पोटदुखीने बेजार होते हे सांगायला नकोच!
आता पाकिस्तानचा विषय निघाला आहे तर एक अजून एक आठवण! सिंटेलच्या टीममध्ये परत शिरल्यानंतर आम्ही लॅंचेस्टर हाउस मध्ये होते. ह्याच्या दुसऱ्या मजल्याच्या एका बाजूला आम्ही सर्व आज्ञावली लिहिणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला अमेक्सचं कॉल सेंटर होतं. आमच्या सिंटेलच्या टीममध्ये टोनी रॉबर्ट्स हा इंग्लिश नागरिक सुद्धा होता. कॉल सेंटर मधील सुंदर ब्रिटीश तरुणी ह्या टोनीच्या मैत्रिणी असल्याने आम्ही टोनीचा काही प्रमाणात हेवा करत असू! ह्या कॉल सेंटरला जगभरातून अमेक्सच्या क्रेडिट कार्डधारकांचे फोन येत असत. त्यातील काहीना इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्याने बहुदा ह्या लोकांकडे दुभाषी असे. असेच एकदा हा दुभाषी नव्हता, त्यामुळे एका सुंदर ब्रिटीश युवतीला पाकिस्तानातून एका ग्राहकाचा फोन आल्यावर तिची तारांबळ उडाली. ती धावतच टोनीकडे मदतीला आली. टोनीने तिचे बोलणे ऐकून घेतलं आणि आमच्याकडे नजर वळविली. ती युवती टोनीच्या डेस्कवर आल्याने आमच्या नजरा लपूनलपून त्याच दिशेने होत्या हे सांगणे न लगे! टोनीने क्षणभर आम्हां सर्वांकडे पाहिलं आणि मग तो आमच्या दिशेने येऊ लागला. तो ज्यावेळी त्या युवतीसोबत येउन माझ्या डेस्कवर थांबला त्यावेळी बाकीच्या सर्वांचा हिरमोड झाला. मग मी आणि ती युवती तिच्या डेस्कवर गेलो. आम्ही त्या पाकिस्तानी ग्राहकाला फोन लावला, त्याचं उर्दू बोलणं समजून घेत त्याची बिल भरण्याविषयीची तक्रार मी ऐकून घेतली. आणि दुभाष्याच काम करीत पुढील मार्ग आखला. अशा प्रकारे एका ब्रिटीश युवतीबरोबर ५० -६० पावलं चालणं आणि कराचीतल्या (बहुदा) एका ग्राहकाशी फोनवरून बोलणं असा आंतरराष्ट्रीय नागरिकत्वाचा अनुभव मी घेतला! बाकी नंतर टोनी मला धन्यवाद द्यायला आल्यावर, "Aditya should thank you" असे सांगायला आमची मित्रमंडळी विसरली नाहीत.
पुढे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एका सोमवारी सुट्टी होती. त्यावेळी मंडळींनी स्कॉटलंड भेटीचा कार्यक्रम आखला. वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी म्हणून आम्ही शुक्रवारी सायंकाळीच ब्रायटनवरून निघालो. आमच्या रूम पार्टनरनी दूरदृष्टीने थोडी खिचडी करून ठेवली. ती खाऊन आम्ही लंडनला निघणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. स्कॉटलंडला जाणारी बस लंडनच्या बस डेपोमधून सुटणार होती. आम्ही काहीसे आधीच पोहोचलो. बाकीच्या लोकांनी जेवण न केल्याने ती मंडळी आमच्यावर बॅगा सांभाळण्याची जबाबदारी सोपवून उदरभरण्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेली. इतक्या साऱ्या बॅगा आणि आम्ही दोघे तिघे जणच असल्याने आम्ही काहीसे धास्तावलो होतो. अचानक एका कोपऱ्यात आम्हांला गडबड ऐकू आली. एका भुरट्या चोराने एका महिलेची बॅग उचलून तो पळू लागला होता. त्या महिलेसोबत अजून एक महिलाच होती. त्यामुळे आपला कोणी पाठलाग करणार नाही अशी त्याची समजूत होती. पण त्याची ही समजूत चुकीची होती. त्या महिलेने अगदी पी. टी. उषाच्या वेगाने त्या चोराचा पाठलाग केला. एका क्षणी ती आपल्याला पकडणार अशी जाणीव झाल्यावर त्या चोराने बॅग टाकून देऊन तो पळून गेला. हे एक मिनिटभर चाललेलं थरारनाट्य पाहून आम्ही चकित झालो. त्या चोराने आमच्यातील एखादी बॅग पळविली असती तर आम्ही त्याचा इतक्या वेगाने नक्कीच पाठलाग करू शकलो नसतो!
(क्रमशः)
No comments:
Post a Comment