Sunday, August 3, 2014

ब्रायटन वास्तव्य - भाग ७

 
मी आता अमेक्सच्या Development Center च्या लोकांची टीम सोडून आता सिंटेलच्या टीममध्ये आलो होतो. मधल्या काळात श्रीकांतच्या भारतातील घरी एक दुःखद घटना घडली. त्याचा एक वर्षाचा आसपासचा पुतण्या स्वर्गवासी झाला. श्रीकांत आधीच भावूक; ह्या घटनेने तो अगदी हादरून गेला. लगेचच तो भारतात परतला. एका आठवड्याने परतलेल्या श्रीकांतकडे पाहून हाच का तो पूर्वीचा आनंदी श्रीकांत असा प्रश्न आम्हांला पडला. पुढे थोड्याच दिवसात श्रीकांत आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे सिंटेल अमेरिकेला परतला. त्याला निरोप देताना मला अगदी दुःख झाले. कामाच्या ठिकाणी एकत्र एका प्रोजेक्टवर काम करताना त्या प्रोजेक्टमधले सुःखदुःखाचे क्षण आपल्याला एकत्र आणतात. आणि परदेशात तर ही एका टीमची भावना अधिकच सुखदायी असते.  व्यावसायिक ठिकाणी काही लोकांशी फक्त कामापुरती नाळ जुळते तर काहींशी जीवाभावाचे नाते जुळते! असाच जीवाभावाचा श्रीकांत!!
मधल्या काळात हवामानात सुद्धा काही बदल होत होते. ऑगस्ट उजाडला होता आणि थंडी गायब झाली होती. आता मी जॅकेटशिवाय ऑफिसात जायचं धाडस करू शकत होतो. आता ऑफिसात हळूहळू तणावाचे वातावरण बनत चाललं होतं. खेळकर स्वभावाच्या अमेक्स सहकाऱ्यांबरोबर मस्त उन्हाळ्याच्या ३ महिन्यात २ महत्त्वाचे दोन प्रोग्रॅम लिहिणे वेगळं आणि त्यानंतर सिंटेलच्या वातावरणात प्रत्येक अप्लिकेशन मधील शेकडो प्रोग्रॅममध्ये ह्या दोन हिरो प्रोग्रॅमना बोलावून ती आज्ञावली बदलून मग तिचे व्यवस्थित परीक्षण करणे वेगळं ह्याचा मला अनुभव येत होता. सर्वसाधारणपणे भारतीय कंपन्या अशी कामे अत्यंत आक्रमक मुदतीत पूर्ण करून देण्याची हमी देऊन ही प्रोजेक्ट घेतात. ह्या मध्ये काही गृहीतक अवास्तव असतात आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणाऱ्या टीमच्या नाकी नऊ येतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काही काळ राहिल्यानंतर मग हळू हळू सर्वांना त्याची सवय होत जाते. ह्यात अजून एक फरक होता आणि तो म्हणजे आमची भारतातील टीम आता मुंबईच्या ऑफिसातून स्थलांतरित होऊन चेन्नई ऑफिसात नेण्यात आली होती. सुरुवातीला मला एका वर्कग्रुपचा चॅम्पियन बनविण्यात आलं. अमेक्सतर्फे बॉब लान्सर हे ह्या क्षेत्रात वीस वर्षाहून अधिक काळ काम केलेले तज्ञ ह्या वर्कग्रुपवर काम करीत होते. तात्त्विकदृष्ट्या त्यांना आमचं वर्कग्रुप चॅम्पियन बनणं पटलं नसलं तरी ह्यात वैयक्तिकदृष्ट्या माझा काही हात नसल्याने ते कामाच्या बाबतीत मला पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन देत होते. एकंदरीत माझे नशीबसुद्धा जोरावर होते आणि एकंदरीत प्रगती चांगली चालली होती. चेन्नईमधून काम करणारे हरी आणि त्याची टीम ह्यांची आणि माझी तार व्यवस्थित जुळली होती. परंतु काही वर्कग्रुप मध्ये मात्र अडचणी हाताबाहेर चालल्या होत्या. एकतर ते वर्कग्रुप होतेच क्लिष्ट आणि विविध घटकांतील संवाद मात्र ठीक होत नव्हता. आधीच उशिरा आलेल्या रमेशचा वर्कग्रुप मधील अडचणी अशाच  हाताबाहेर चालल्या होत्या. आमचे सिंटेलचे दोन व्यवस्थापक होते.  वल्लभाजोशुला आणि मूर्ती असे ते दोन व्यवस्थापक होते. मूर्ती हे ज्येष्ठ व्यवस्थापक असून ते प्रोग्रॅम मॅनेजरची भूमिका बजावत असत. युरो हा एक प्रोग्रॅम होता आणि त्यावर सिंटेलबरोबर इंफोसिसची टीम सुद्धा काम करीत होती. तर मूर्तींना इन्फोसिसची लोक सुद्धा आपल्या कामाच्या प्रगतीचा रिपोर्ट देत असत. त्यामुळे मूर्तींचा एकंदरीत दरारा चांगलाच होता.  तर ही जोडगोळी बऱ्याच वेळा एकत्रच फिरत असे आणि मीटिंगमध्ये आमची हजेरीसुद्धा एकत्रच घेई त्यामुळे जमेल तितके त्यांना टाळण्याकडे आमचा कल असे.
तर विविध वर्कग्रुपमधील अडचणीमुळे अमेक्सने काहीशी तक्रार ह्या दोघांकडे केली होती. त्यामुळे एका शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता आम्हा सर्व तथाकथित चॅम्पियनलोकांना छोट्याने एका बैठकीच्या खोलीत कोंबले. आणि सर्वांना आलेल्या अडचणीवर खोलवर चर्चा करण्यास सुरुवात केली. हे तंत्र योग्य असले तरी तरी शुक्रवारी संध्याकाळी मीटिंग बोलावणे हे मानवी अधिकारावर गदा आणण्यासारखंच होतं. ज्यांचे वर्कग्रूप अडचणीत होते त्यांना ही चर्चा अगदी त्रासदायक होत होती. त्यांनी उपलब्ध माहिती व्यवस्थितपणे वापरली की नाही ह्याची शहानिशा इथे होत होती. अशा चर्चेच्या सुरुवातीला "Nothing Personal About it" असे म्हणण्याची पद्धत असते. म्हणजे चुका झाल्या तर त्याची चर्चा सभेत करायची जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होऊन ते अशा चुका करणार नाहीत. परंतु ज्यावेळी आपण केलेल्या चुका चारचौघात चर्चिल्या जातात त्यावेळी बरेचजण शरमेने चुर होतात. आणि एखाद्या वाक्याचा विपर्यास होऊन मग सगळं काही वैयक्तिक होऊन जातं. असेच ह्या मीटिंगमध्ये झालं. आणि आधीच तणावात असलेल्या एकाच्या डोळ्यात चक्क पाणी तरळलं. मग एकंदरीत परिस्थिती पाहून मीटिंग आटोपती घेण्यात आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. जेवण वगैरे बनविण्याची इच्छा नसल्याने आम्ही बाहेर हॉटेलचा जेवणासाठी आधार घेतला.
मूर्तींना अमेक्सच्या वरिष्ठ व्यवस्थापक मंडळींना प्रगतीचा आढावा द्यावा लागत असे.  माझी सुरुवातीला प्रगती चांगली झाली असली तरी शेवट करण्यात मात्र थोड्या तांत्रिक अडचणी येत होत्या. ह्या वर्कग्रुप मधील काही प्रोग्रॅमचे बरीच वर्षे टेस्टिंग केले गेलं नसल्याने योग्य डेटा मिळविण्यास अडचणी येत होत्या. असेच एकदा मूर्तींना दुपारी तीनची अगदी महत्वाची मीटिंग होती. त्या आधी ह्या प्रोग्रॅमचे टेस्टिंगपूर्ण झालं असतं तर एक महत्त्वाचा मैलाचा दगड (milestone) पूर्ण झाला असता. त्यामुळे सकाळी येतानाच माझ्या डेस्कजवळून जाताजाता, "आदित्य, हे सर्व प्रोग्रॅम दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता किती टक्के आहे?" असा गहन प्रश्न मला केला. बहुदा त्यांना शंभर किंवा एकशेदहा टक्के असे उत्तर अपेक्षित होते. पण ह्या अडचणींनी मी ही वैतागलेलो होतो. क्षणभर विचार करून त्यांना मी "७४ टक्के" असे उत्तर दिले. ह्या अनपेक्षित उत्तराने ते काहीसे दचकले. परंतु जो माणूस असे अतरंगी उत्तर देऊ शकतो तो त्याहून खतरनाक असे त्या ७४ टक्केच का ह्या प्रश्नाचे उत्तरही देऊ शकतो अशी मनोमन खात्री पटल्याने त्यांनी काहीसा विचित्र चेहरा केला आणि ते तेथून निघून गेले.
 नंतर मला DD ह्या अजून एका वर्कग्रुपचा चॅम्पियनबनविण्यात आलं. "घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं" अशी एकंदरीत माझी परिस्थिती झाली. मग मला हळू हळू सकाळी लवकर सात वाजता ऑफिसात जाणे, शनिवारी सुद्धा ऑफिसला जाणे अशा प्रकारांना सुरुवात करावी लागली!

माझ्या आवडत्या Development Center च्या टीम बरोबरचं हे छायाचित्र!


(क्रमशः)
 

No comments:

Post a Comment