ब्लॉग लिहिताना आपण आपल्या समाजात सर्वांना जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे असा विचार मनात ठेवून हे लिखाण करीत असतो असा माझा गोड समज होता. होता म्हणायचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसाच्या सुट्टीत ह्या संदर्भात बरेच विचार मनात घोटाळत राहिले आणि हा समज मला वाटतो तितका योग्य नाही ह्याची जाणीव मला झाली.
बऱ्याच ब्लॉग मध्ये मी सर्वांनी साधेपणाने राहावे, आपल्या वैभवशाली संस्कृतीचा आदर करावा, निसर्गाचे रक्षण करावे, बाहेरचे तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नयेत असा उपदेश करीत असतो. ह्याने सर्वांचे भलं होईल असे मी उघडपणे म्हणत नसलो तरी तसा आव मी आणत असतो. पण हे खरोखर शक्य आहे काय? माझं लिखाण, मी सुचवलेली जीवनपद्धती केवळ ज्यांच नोकरीधंद्यात व्यवस्थित चाललंय, ज्यांना नातेवाईकांचा आधार आहे, ज्यांना तब्येतीच्या मोठ्या तक्रारी नाहीत अशा लोकांनाच लागू होते. ज्याचं नोकरीधंद्यात व्यवस्थित चाललं नाहीये, ज्यांना दररोजचा लोकलचा प्रवास झेपत नाही असे लोक माझा ब्लॉग वाचण्याची शक्यता आधीच कमी आणि वाचल्यास त्यांच्या मनात हा कागदी घोडे नाचवणारा कोण अशी भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त!
आता अशा संघर्ष करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आशा निर्माण करण्याची जबाबदारी माझी नाही म्हणून मी माझे हात झटकून घेईन. प्रश्न असा येतो की आपल्या देशात ही जबाबदारी घेतेय कोण? स्पष्ट सांगायचं झालं तर कोणीच नाही!
आपल्याकडे अप्रिय गोष्टी परखडपणे बोलण्याची पद्धत नाही. पहिली अप्रिय गोष्ट म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. पूर्वी युद्ध होतं, साथीच्या रोगांवर उपाय नव्हते त्यामुळे लोकसंख्या अचानक कमी होत असे. आज ह्या सर्व बाह्यघटकावर आपण बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण मिळविले आहे. पण ह्या सर्व लोकसंख्येला उदरनिर्वाहासाठी उद्योग, किमान पातळीवरील राहणीमान देण्याची नजीकच्या भविष्यकाळात आपल्याकडे उपाययोजनाच नाही. आता ह्यासाठी केवळ सरकारला जबाबदार ठरविणे योग्य नाही. आणि आपली तरुण लोकसंख्या ही आपली ताकद आहे असे उच्चरवात आपण कितीही सांगत असलो तरी ह्या लोकसंख्येला नोकरीसाठी योग्य बनविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
आता आपण दोन उदाहरणे पाहूयात!
१> समजा मी कमी पाऊस पडणाऱ्या भागातील मोजकी जमीन असणारा शेतकरी आहे. तर माझे जीवन सुधारण्यासाठी मी काय करू शकतो? माझ्या अकलेनुसार प्रत्येक गावात छोटी छोटी तळी निर्माण करणे आवश्यक आहे. मी माझ्यासारख्या अनेक छोट्या शेतकऱ्यांना एकत्र आणून छोटी तळी खोदीन आणि त्याच्या भोवताली सागासारखे छोटे वृक्ष लावीन. प्रश्न असा आहे की साग मला उत्पन्न देईपर्यंतच्या मधल्या काळात मला रोजीरोटी देणार कोण? ह्या प्रश्नांचे माझ्याकडे उत्तर नाही!
२> समजा मी मुंबईच्या एका खोलीत माझ्या पालकांसोबत राहणारा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. माझी बुद्धी काही विशेष नाही. मी एका साध्या कंपनीत १५ - २० हजाराची नोकरी करतो. मी मुंबईत मोठे घर घेऊ शकत नाही आणि कल्याण, विरारला भाड्याचं घर घेतलं तरी तिथून प्रवास करण्याइतपत माझी तब्येत ठीक नाही. माझ्या पालकांच्या छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी सुरु आहेत. आणि तिशीला पोहोचलो तरी माझं लग्न जमण्याची शक्यता नाही. कारण माझ्याच सारख्या परिस्थितीत वाढलेल्या मुलींची ह्या परिस्थितीत आयुष्य घालविण्याची इच्छा नाही. आता माझं भवितव्य काय आणि माझं भवितव्य उज्ज्वल बनविण्यास कोण मदत करू शकेल असे कोणी मला दृष्टीक्षेपात दिसत नाही!
ही झाली केवळ दोन प्रातिनिधिक उदाहरणे! अशी अगणित उदाहरणे आपल्या भोवती समाजात असणार! पण त्यांच्याविषयी बोलण्याची, लिहिण्याची आजच्या समाजाची आणि माझी मानसिकता नाही. आम्हांला आमच्या समाजाचं एक सुरेख चित्र रंगवायचं आहे! आमची मनःस्थिती प्रसन्न राहील अशाच गोष्टी ऐकायच्या, वाचायच्या आणि माझ्या बाबतीत लिहायच्या आहेत. कधीकाळी ज्यांच्या पहिल्या पानावर सामाजिक समस्यांच्या उत्तरांची चर्चा व्हायची त्याच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या निसर्गाच्या कुशीत दडलेल्या अलिशान सदनिकेच्या मालकीची स्वप्ने रंगवायची आहेत!
थोडक्यात सांगायचं झालं तर ढोंगीपणाची उदाहरणं शोधायची झाली तर बाहेर इतरत्र कोठे शोध घेण्याचीच गरज नाही!
No comments:
Post a Comment