Tuesday, August 5, 2014

मराठी पाऊल पडते…

 
मुंबई मराठी माणसाची राहिली नाही ही खंत अगदी हल्ली हल्ली पर्यंत काही मराठी माणसं बोलून दाखवायची. आता ते ही बोलून दाखवत नाहीत. गेल्या काही वर्षांत जे काही झालं ते आपण सर्व जाणून आहोत. एखादे शहर जेव्हा अचानक अफाट वेगाने वाढू लागतं तेव्हा विविध पातळींवर संधी निर्माण होतात. जसे की मोठ्या बँकेत, बहुदेशीय कंपनीत किंवा मोठ्या भारतीय कंपनीत नोकरी करणे अशा पांढरपेशा क्षेत्रातील संधी जशा उपलब्ध असतात तसेच अगदी किराणा मालाची दुकान टाकणे, रिक्षा चालविणे , इस्त्रीची दुकान काढणे, भाजीची दुकान उघडणे ह्याही संधी उपलब्ध असतात.
मागील काही वर्षात सरसकट बहुतांशी मराठी माणसाने पांढरपेशा क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित केले. ह्या क्षेत्रात जसे जन्मजात हुशारीला महत्त्व आहे तसेच चिकाटीला सुद्धा! बरीच मराठी बुद्धिमान माणसे आपल्या बुद्धीच्या जोरावर अगदी सर्वोच्च पदांवर जाऊन पोहोचली. परंतु सर्वसाधारण मराठी माणसांची बऱ्याच वेळा कोंडी होताना दिसते. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीचा अभाव आणि सतत डोके वर काढणारा स्वाभिमान! प्रत्येक कंपनीने स्वीकारलेलं एक धोरण, एक संस्कृती असते. एकदा का त्या कंपनीत राहायचा निर्णय घेतला की त्या धोरणाशी, त्या संस्कृतीशी सुसंगत असं वागणं, अशी विचारसरणी अंगिकारण अपेक्षित असतं. राहायचं त्या कंपनीत परंतु मनातून, बोलण्यातून त्या कंपनीच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त करायची हे योग्य नव्हे. ही वृत्ती कंपनीत पुढे जाण्यास हानिकारक ठरू शकते.  आजच लोकसत्तेत "स्वाभिम्यान" ह्या मथळ्याखाली सध्या गाजणारी बातमी वाचली. कंपनीत टिकून राहायचं असलं तर बऱ्याच वेळा स्वाभिम्यान करावा लागतो. आपला स्वाभिमान नक्कीच दाखवावा पण तो योग्य वेळ आल्यावर!
तसंच चिकाटीबाबत! जग कितीही बदलो, गरजेच्या वेळी जो माणूस हमखास उपलब्ध असतो, त्या माणसाची कदर मालक, कंपनी सदैव करणारच! ही चिकाटी, कामांच्या वेळच्या बाबतची शिस्त अंगीकारणं आवश्यक आहे.
आता दुसऱ्या प्रकारच्या संधींविषयी! वसईच्या होळीबाजारात घाऊक बाजारात भाजी विकत घेऊन त्याची किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या भैय्याने एका चांगल्या बिल्डींगमध्ये सदनिका घेतली, त्याची मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकतात हे काही वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं त्यावेळी मला आश्चर्य वाटलं होतं पण आज अजिबात वाटत नाही. आजूबाजूला नेहमी संधी उपलब्ध होत असतात, उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. मध्येच एकदा असाच मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास एकटाच वसईला जात होतो, म्हणजे बाकी सर्व आधीच शुक्रवारी गेले होते. तर वाटेत एका पोलिस अधिकाऱ्याने लिफ्ट मागितली. मी दहिसर चेकनाक्याच्याच दिशेने जात असल्याने लिफ्ट दिली. त्या पाच मिनिटात मी त्यांची आणि त्यांनी माझी चौकशी केली. त्यात त्यांनी जमिनी विकून गळ्यात सोनसाखळी मिरवणाऱ्या आणि वीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरवणाऱ्या काही समुदायाच्या मानसिकतेविषयी टीका केली. हे किती काळ टिकणार हा त्यांचा प्रश्न होता. गाडीतून उतरता उतरता "काळानुसार बदलता न येणे ही बऱ्याच मराठी माणसांची समस्या आहे" असे गंभीर विधान त्यांनी केलं.पुढे वसईपर्यंत पोहोचेपर्यंत मी बराच वेळ त्यांच्या विधानावर विचार करत होतो.
मराठी माणूस कष्टाधारित व्यवसायाकडे अजूनही कमी प्रमाणात का वळतो? तर समाजात असलेल्या तथाकथित प्रतिष्ठेला तडा जाऊ नये म्हणून असेच उत्तर बऱ्याच वेळा आपणास आढळते. भुकेने मरायची वेळ आली तरी चालेल पण ही प्रतिष्ठा महत्त्वाची अशी परिस्थिती असते. ह्यात एकंदरीत समाज सुद्धा जबाबदार आहे. अकरावीची आठवण! रुपारेल सारख्या हुशार मुलांच्या कॉलेजात शिकत असताना एके दिवशी सततच्या अभ्यासाला वैतागून मी म्हणालो, "राहून दे हा अभ्यास! मी पुढे शेती वाडी करीन!" बाजूलाच शिवाजी पार्कात राहणारा देशमुख नावाचा मित्र होता. पार्कात राहत असल्याने जीवनाविषयीच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट होत्या. तो म्हणाला, "तुझी वाडी किती मोठी आहे ते मला माहित नाही! पण कितीही मोठी असली तरी तुला शिकून जितकी चांगली बायको मिळेल तितकी वाडी करून मिळणार नाही!" त्यावेळी मला त्याचे हे विधान पटलं नाही पण आज बऱ्याच वेळा मी परिस्थिती पाहून मला त्याची आठवण येते.
अजून एक बाब, आपल्या लग्नसमारंभात आपण विविध लोकांशी भेटतो. ह्यात समाज विविध क्षेत्रातील लोकांना कशी वागणूक देतो हे ही आपण पाहतो. लबाडीने पैसा कमावून श्रीमंत झालेला माणूस जोवर अशा समारंभात कष्टाने रोजीरोटी कमावणाऱ्या माणसापेक्षा जास्त भाव खात राहील तोवर आपल्या समाजात कष्टाधारित उद्योगांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही!
असो आजच्या स्थितीत मराठी माणसापुढे काय संधी आहेत ह्याचा थोडा विचार करूयात! वाईट न वाटून घेता हे तर मानायला हवे की मुंबई शहराच्या बाबतीत - We have missed the Boat! पूर्वी देशांतर करून प्रगती साधायची संधी जशी पूर्ण पणे साधली नाही तशीच! पण जगात नेहमीच संधी असणार! अजूनही भारतात विकसित होणारी छोटी शहरे आहेत. तिथे समूहाने स्थलांतरित होण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे! कोटीचे घर मुंबईत कसे घेणार असा विचार करीत मुंबईत दुःखाने आयुष्य काढण्यापेक्षा असलेल्या पुंजीच्या आधारे आपल्यासारख्या मित्रांना एकत्र करून एखाद्या गावात जाऊन मोठी जमीन विकत घेऊन तिथे शेती वा अन्य उद्योग करणे अजूनही शक्य आहे. धोपटमार्गाने जाण्यात स्पर्धा खूप असते कारण सर्वजण त्यात उतरतात. पण वेगळ्या मार्गाने जाण्यात मात्र कमी स्पर्धेचे एक सुख असतं.
बाकी  आजच्या "स्वाभिम्यान" शीर्षकामागे थोडी चेष्टेची सर होती असे मला वाटून गेलं. पण बाकी काही असो मला मात्र हा उपलब्ध सर्व पर्यायांचा अभ्यास करून शांत डोक्याने घेतलेला निर्णय वाटला. "युद्धात जिंकले पण तहात हरले" ही म्हण बदलायची वेळ आली आहे!
शेवटी जाता जाता, मराठी माणसाचं शाब्दिक कोटी करायचं वेड मात्र जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार बुवा! शाब्दिक कोटी असली की आपलं लक्ष कसं पटकन वेधलं जात! ह्या ब्लॉगपोस्टला "स्वाभिम्यान आणि मराठी पाऊल पडते… " असे शीर्षक देण्याचा मोह मी फार कसोशीने टाळला बरं का मंडळी!

स्वाभिम्यान 

2 comments:

  1. लेखातले सर्व मुद्दे अगदी बरोबर आहेत. पण मराठी माणूस अत्यंत स्वार्थी आहे. त्यामुळेच तो इतरांना पुढे जाऊ देणं तर सोबत घेणंही टाळतो. कारण तूप खाल्लं तर अंगावरती दिसेलच पण माती खाल्ली तर कोणालाही कळू नये असं त्याला वाटत असतं. ब्लॉगला प्रतिक्रिया कशा द्याव्यात हे मी एक दोन पोस्ट लिहून सांगण्याचा प्रयत्न केला. पण कसलं काय ? मराठी लोकांना काहीच फरक पडत नाही. हीच मंडळी फेसबुकवर मात्र नको तिथे हाय ह्यालो आणि लाईक करत बसतात. तेच तुम्ही इंग्रजी ब्लॉगवर जाऊन पहा. तिथे बऱ्याच प्रतिक्रिया पहायला मिळतात. मी स्वतः मात्र दररोज कमीत कमीत पाच ब्लॉगला प्रतिक्रिया द्यायच्या असा नियम स्वतःला घालून घेतलाय.

    ReplyDelete
  2. विजय साहेब,
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! प्रतिक्रिया मिळाल्यावर दोन प्रकारचं समाधान मिळतं - एक म्हणजे आपली ब्लॉग पोस्ट कोणी वाचली आणि त्याहून अधिक म्हणजे त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी त्यांना ती दखलपात्र वाटली!

    पण मी एकूणच सर्व मराठी माणसांवर टीका करण्याचं मात्र टाळीन! फेसबुकवर बऱ्यापैकी ओळखीचे लोक असतात त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास किंवा लाईक करण्यास आपण लगेच तयार होतो. पण इथे मात्र अनोळखी माणसाच्या लेखास प्रतिक्रिया देण्याचा मोकळेपणा मात्र अजून आपल्याकडे यावा लागेल. पण तुम्ही जो मराठीतून प्रतिक्रिया कशा द्याव्यात हे समजाविण्याचा लेख लिहिलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन! बघुयात ह्यापुढे लोक अधिक प्रतिक्रिया देतात का!

    ReplyDelete