Monday, April 26, 2010
जिव्हाळ्याचे बेट
आपण आत्महत्येच्या कारणांचे विविध प्रकार बघूया
१. क्षणिक संताप - अति सवेन्दनशील अथवा अति तापट व्यक्ती क्षणिक संतापाच्या भरात ही कृती करू शकतात. परंतु या व्यक्तीदेखील आपल्या आधीच्या वागण्यातून हे संदेश देत असतात.
क्षणिक रागात अति सवेन्दनशील व्यक्ती ह्या फक्त स्वतःला संपवितात तर अति तापट व्यक्ती या स्वतःबरोबर क्षणिक रागाच्या कारणाला देखील संपवितात. अशा व्यक्ती ओळखणे आणि त्यांच्याभोवातालची परिस्थिती स्फोटक होऊ न देणे ही त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रपरिवाराची जबाबदारी आहे.
२. दीर्घकालीन कारणे
अ> आजार
ब> आर्थिक समस्या
क> घरातील, कार्यालयातील अथवा सार्वजनिक जीवनात होणारा छळ
ड> एक दुजे के लिये
यातील कारण ड हे सर्वसामान्य जनतेच्या पलीकडचे आहे! आपण प्रकार २ मधील बाकी सर्व कारणांचा उहापोह करूया.
प्रत्यक्ष दुःखापेक्षा त्याचा विचार हा अधिक क्लेशदायी असतो. मानसोपचार तज्ञ आपली दुखी परिस्थिती तर बदलू शकत नाही, तो आपल्याला या दुखी विचारांवर नियंत्रण मिळविण्यास शिकवतो.
मनाचे विकार आणि शरीराचे विकार याची तुलना होऊ शकते. शरीरात विषारी द्रव्य जमा झाली कि आपणास शारीरिक विकार होतात. हीच द्रव्य जर वेळच्या वेळी बाहेर फेकली गेली तर व्यक्ती निरोगी राहते. हेच आपल्या मनाचे आहे. आपल्या मनातील वैफल्य, नैराश्य हे नियमित पणे आपण दुसर्यांबरोबर चर्चिली तर त्यांची तीव्रता कमी होते. माझे तर असे मत आहे कि जगात सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकास काहीना काही दुःख आहे. मी एकटाच दुःखी नाही, माझ्याबरोबर बाकीचेही आहेत हे एकदा जाणवले कि त्या दुखाची तीव्रता कमी होते. आता आपल्या सुख दुःखाची चर्चा करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जिव्हाळ्याची बेटे निर्माण करणे. आपला मित्रपरिवार हे जिव्हाळ्याचे बेट होऊ शकते. आपल्या परिवाराशी सुसंवाद साधून आपण हेच साधू शकतो.
मानसोपचार तज्ञ हा शेवटचा उपाय आहे. त्याआधी सुद्धा उपाय आहेत आणि ते आपल्याच आजूबाजूला सहजपणे उपलब्ध आहेत. गरज आहे ती डोळे उघडे ठेवून बघण्याची आणि आजू बाजूला आपणच उभारलेल्या भिंती पाडण्याची!
Sunday, April 25, 2010
काही स्वप्नं
तुम्हास याविषयी काय वाटते ते लिहा. अनघाने जो आत्महत्येविषयी लेख लिहिला त्याविषयी माझी मते पुढील ब्लोग वर!
Saturday, April 24, 2010
जगू आनंदाने
२६ जानेवारीला आपल्या १९८८ च्या ब्याच च स्नेहसंमेलन झालं आणि दरवर्षी एकत्र जमण्यासाठी हि तारीख नक्कीही झाली. पण हे काय वर्षातून फक्त एकदाच भेटायचं? पण त्यासाठीच तर आपल्या ब्याच च्या मुलांनी (?) आपल्याला अधून मधून एकत्र आणण्यासाठी हा स्कूल ब्लॉग तयार केला. आदित्य नेहमी लिहितो . मीही खूप दिवसांपासून लिहूया अस ठरवत होते. पण मुलीची परीक्षा, काम ह्या मूळे राहून जायचं . खरच किती escuses घेत असतो आपण हे जाणवल आणि लिहायला घेतलं.
स्नेहसंमेलनाला लहान मुलांमधील ताण-तणाव यावर दोन शब्द बोलले. चार दिवसांपूर्वी पेपरात एक बातमी वाचली. ठाण्यातील IPH (Institute of Psychological Health) मध्ये counciler च काम करणार्र्या कविताने केलेल्या आत्महत्येविषयी. वाचून मन उद्विग्न झाल . शेवटी ताण-तणाव कोणालाच चुकले नाहीत हेच खर. अगदी दुसर्याना मार्गदर्शन करणाया सल्लागारांना सुद्धा. पण त्यावर जीव देण हा पर्याय असू शकतो ? मला नाही पटत. थोडसं बोट भाजलं तरी आपण हात चटकन मागे घेतो. मग मनाची अशी कोणती अवस्था असते जी आपल्याला जीव द्यायला भाग पाडते. एवढ टोकच frustration असताना त्यावर वेळीच औषधोपचार का केला जात नाही. याच एक कारण हे असू शकत कि मानसोपचारतज्ञाकडे फक्त वेडी माणस जातात हि लोकांची असलेली मानसिकता . जर Heart truble असेल तर लोक डॉक्टरांकडे जातात .पण मानसिक तणावासाठी लोक डॉक्टरांकडे जाण टाळतात . अशा extreme तणावासाठी औषधोपचार घ्यायला डॉक्टरांकडे जरूर जाव मनात इच्छा बाळगूनच कि ह्या तणावातून लवकर बाहेर पडेन आणि फारसं औषधांवर अवलंबून न राहता चांगल आयुष्य जगेन. शेवटी आपण किती मोठ आयुष्य जगतो त्यापेक्षा आपण ते किती चांगल आणि आनंदाने जगतो याला मी फार महत्व देते .हे सर्व झालं मोठ्या समस्यांविषयी. पण काही जणांना अडचणींचा फार बाऊ करायची सवयच असते. ते सतत अडचणीचा पाढाच वाचत असतात. छोट्या-छोट्या प्रश्नांनी गांजलेले असतात. त्यांना सांगावस वाटत छोट्या गोष्टीच काय टेन्शन घ्यायचं. देव आहेन आपली काळजी घायला. एक चांगली श्रद्धा मनाशी बाळगावी. Three ideats चित्रपटात आमीर खान ने all is well हा सांगितलेला मंत्र कित्ती छान आहे
tenstion free आयुष्य जगायला.
Wednesday, April 21, 2010
क्षण स्थिरावण्याचा
उदाहरण घ्यायचे झाले तर परदेशातून परत आल्यावर देशातील कार्यालयात सुरुवातीचा काळ! परदेशातून परत आल्यावर प्रत्येकजण हा काही काळ स्वतःला परदेशीच समाजात असतो. आता हा काळ काहीजणांच्या बाबतीत विमानतळावरून बाहेर पडल्यावर टक्सीवाल्याबरोबर झालेल्या संभाषण बरोबर संपतो, तर काहीना यासाठी बरेच महिने जावे लागतात. कार्यालयात सुद्धा सुरुवातीला काहीजणांना थोडा भाव खाण्याची इच्छा असते तर बाकीच्या मात्र या परत आलेल्याची खेचण्याची सुप्त इच्छा असते. ही अदृश्य दरी कालांतराने मिटते. काही प्रसंग मात्र ही दरी लवकर मिटवण्यासाठी मदत करतात. उदाहरण द्यायचे झाले तर एखादा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि रात्रभर थांबून सर्वाना एकत्रपणे हा प्रश्न सोडवावा लागतो. किंवा एखाद्या पार्टी मध्ये सर्वजण मिळून सहभागी होतात आणि मनाने एकत्र येतात. हे झाले एक उदाहरण!
मुद्दा हा आहे कि प्रत्येक बदलात असे स्थिरावण्याचे क्षण येत असतात, कौशल्य यात आहे की हे क्षण ओळखता आले पाहिजेत आणि पकडता आले पाहिजेत. मागील काळ रम्य होता यात प्रश्नच नाही परंतु नवीन काळ किती रम्य बनवू शकतो हे आपल्या हाती आहे. गरज आहे ती हे क्षण पकडण्याची.
Sunday, April 18, 2010
क्लिष्टता शालेय जीवनातील आणि आयुष्यातील!
जसजसे आपण मोठे होत गेलो तसे अभ्यास, जीवन अधिकाधिक क्लिष्ट होत गेले. आता क्लिष्टपणा म्हणजे काय याचा उहापोह करण्याचा प्रयत्न आज मी करतो आहे. कोणतीही गोष्ट क्लिष्ट असते म्हणजे काय? माझे मत असे आहे की कोणतीही क्लिष्ट गोष्ट ही अनेक सोप्या गोष्टीची बनलेली असते. जर का तुम्ही या सर्व सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखू शकलात आणि त्या विविध सोप्या गोष्टीतील अवलंबिता ओळखून लक्षात ठेवू शकलात तर तुम्ही ती क्लिष्ट गोष्ट साध्य केली असे आपण म्हणू शकतो. उदाहरण द्यायचे म्हटले तर ९ - १० मध्ये भूमिती मध्ये प्रमेय आणि त्याची सिद्धता. प्रमेय कितीही क्लिष्ट असो पण सिद्धतेमधील प्रत्येक पायरी ही वैयक्तिकपणे सोपी असते.
तर मग शैक्षणिक दृष्ट्या कोणत्याही क्लिष्ट गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखून त्यातील अवलंबिता ओळखणे आणि लक्षात ठेवणे असे विधान मी करतोय.
शैक्षणिक क्लिष्ट गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी व त्यातील संबंध हे स्थिर असतात. ते एकदा लक्षात ठेवले की आयुष्यभर कायम उपयोगी पडतात. परंतु आयुष्यातील क्लिष्ट गोष्टी म्हणजेच कठीण प्रसंग मात्र इतके सोपे नसतात. ते आपल्यावर अनपेक्षितरीत्या चालून येतात आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे तुलनेने कमी वेळ असतो. अशा वेळी कामी येतो तो आपला अनुभव आणि दुसर्यांचा सल्ला (अर्थातच योग्य असेल तर!) आता आपला अनुभव आणि दुसर्याचा सल्ला यांना शालेय जीवनातील तुलना द्यायची झाली तर ती पाठ्यपुस्तकांची द्यावी लागेल. आपला अनुभव आणि दुसर्याचा सल्ला यात जीवनातील क्लिष्ट गोष्टीतील विविध सोप्या गोष्टी वैयक्तिक पणे ओळखून त्यातील अवलंबिता उपलब्ध केली असते.
मागे आपल्याच batch चे एक इ-मेल आले होते. त्यात अगदी हेच म्हटले होते
शालेय जीवनात गुरुजन आधी शिकवितात आणि मग आपली परीक्षा घेतात
पण आयुष्य मात्र आधी परीक्षा घेते आणि त्यातून आपण शिकतो
Monday, April 12, 2010
काही मजेशीर प्रसंग भाग १
१> मी इंग्लंडला गेलो ते मे महिन्यात. सूर्यास्त त्यावेळी ८:३० च्या सुमारास व्हायचा. पहिल्या आठवड्यातील दुसरा / तिसरा दिवस असेल. ऑफिस मधून आम्ही हॉटेलवर ५:३० च्या सुमारास परतायचो. अजूनही माझी झोपेची वेळ स्थानिक वेळेशी जुळली नव्हती. त्यामुळे हॉटेल रूमवर आल्या आल्या मी झोपी गेलो. साधारणता ७:०० च्या सुमारास माझे मित्र मला फोन करून आम्ही मग जेवण्यास जाणार होतो. काही वेळाने डोळ्यावर आलेल्या सूर्य किरणांमुळे माझी झोप उडाली. घड्याळात बघितले तर ८ वाजले होते. जेट lag मुळे दिशा, वेळ याचे भान नसलेला मी असा समज करून बसलो की हे दुसरया दिवशीचे सकाळचे ८ वाजले आहेत. संतापाच्या भरात मी मित्राला फोन लावून त्याच्या ३६ पिढ्यांचा उद्धार करण्यास सुरवात केली. त्यानेही थोडा वेळ माझा राग तसाच राहून देत मला अजून भडकावले. नंतर बरेच दिवस माझ्या मित्रांना ही गोष्ट मला त्रास देण्यास पुरेशी झाली.
२> हॉटेलचे नाव होते 'Premier Lodge ' . या हॉटेलचा फायर अलार्म बरेच वेळा वाजायचा. नंतर आम्हाला त्याची सवय झाली आणि आम्ही खोलीबाहेर येणे सोडून दिले. परंतु पहिल्या वेळी मात्र माझ्यावर मजेशीर प्रसंग ओढवला. अलार्म झाला ती वेळ होती पहाटे २:३० वाजताची. खोलीत heater असल्याने टी-shirt आणि shorts मध्ये झोपलेला मी अलार्मच्या आवाजाने उठलो आणि तसाच रूमची चावी घेवून खाली उतरलो. मे महिना असला म्हणून काय झाले हा मे महिना इंग्लंडचा होता. बाहेरील तापमान बहुदा ४ - ५ degree सेल्शिअस असावे. पहिल्या दोन तीन मिनिटातच माझी जी थंडीने दात खीळ बसली ती पुढील अर्धा तास फायर अलार्म वाजेपर्यंत कायम राहिली. या अनुभवानंतर मात्र मी फायर अलार्म ऐकून रूम बाहेर येणे सोडून दिले.
३> या हॉटेलमध्ये सिंटेल या कंपनीचे आम्ही सुमारे ४० कर्मचारी एकत्र राहत असू. दर शुक्रवारी आम्हाला हॉटेलच्या बुकिंगचे नुतनीकरण करावे लागत असे. कधी कधी वीकेंडच्या नादात काहीजण हे नुतनीकरण करण्यास विसरून जात. आणि हॉटेलचे कर्मचारीदेखील परत आम्हाला न विचारता ती खोली दुसर्यास देवून टाकत. असेच एकदा माझा मित्र नुतनीकरण करण्यास विसरला. शनिवारी आम्ही दिवसभर भटकत बसलो. संध्याकाळी तो त्याच्या खोलीत शिरताच त्याला खोलीत दोन आंग्ल युवती बसलेल्या दिसल्या. त्यानंतरचा गोंधळ निस्तरताना बरीच धमाल आली.
या हॉटेलच्या खोल्यांची दारे swipe कार्डने उघडत आणि कडी नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. एके दिवशी रात्री मी झोपण्याचा प्रयत्न करत असताना दाराशी खुडबुड एकू आली. की होल मधून मी बघितले तर एक मद्यपी ही खोली आपलीच समजून त्याचे कार्ड swipe करण्याचा प्रयत्न करीत होता. मी रिसेप्शनला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तिथे कोणी उपलब्ध नव्हते. शेवटी माझी गाडी 'भीमरूपी महारुद्रा' वर आली. सुदैवाने काही वेळाने त्या मद्यपीने आपले प्रयत्न सोडून दिले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
४> ऑफिसमध्ये मी आणि श्रीकांत Development Centre मध्ये काम करीत असू. या ग्रुपमध्ये बाकीचे सर्व लोक इंग्लिश होते. श्रीकांत त्यांना आपल्या पाककौशाल्याविषयी बढाया मारीत असे. एके दिवशी डॉमनिक नावाच्या आमच्या सह-कर्मचाऱ्याने श्रीकांतला त्याच्या घरी येवून सर्वांसाठी स्वयंपाक करण्याचे खुले आव्हान दिले. आम्ही सर्व मिळून १२ जण होतो. श्रीकांतने ते आव्हान स्वीकारले. ही गोष्ट होती शुक्रवारची. संध्याकाळी हॉटेलच्या खोलीवर परत येताच श्रीकांतने सर्व कंपूला मदतीसाठी पाचारण केले. चिकन, कोलंबी, बटाटा आमटी असा बेत ठरला. रात्रीच सर्वांनी मिळून चिकनला मसाला लावून ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही टक्सी करून हा सर्व कच्चा माल घेवून डॉमनिकच्या घरी पोहोचलो. डॉमनिकचे तीन मजली भव्य घर होते. मागच्या बाजूला प्रशस्त मोकळी जागा होती. श्रीकांतने तिथे पोहोचताच स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि तीन पदार्थ एकदम शिजवायला घेतले. एका इंग्लिश घरात एका वेळी तीन तीन भारतीय पदार्थांचा घमघमाट पसरविण्याचे श्रेय निर्विवाद्पने श्रीकांतला जाते. माझे पाककौशल्य लक्ष्यात घेता माझ्यावर भात शिजवण्याची जबाबदारी देण्यात आली. जिमी नावाच्या सहकाऱ्याने पापड भाजण्याचे काम केले. साधारणपणे २ वाजता सर्व जेवण तयार झाले. भातही उत्तम शिजला. एका इंग्लिश घरात उत्तम भात शिजवण्याचा पराक्रम माझ्या नावावर नोंदला गेला. जेवण एकदम स्वादिष्ट झाले होते. डॉमनिकच्या पत्नीने आणि दोन्ही मुलांनी सुद्धा जेवणाचा आस्वाद घेतला. मागील बाजूला असणाऱ्या बागेत हा जेवणाचा कार्यक्रम ४ वाजेपर्यंत रंगला. डॉमनिकच्या पत्नीने आधीच एक अट घातली होती. घरातील सर्व पसारा निघताना आवरून ठेवण्याची. त्या आश्वासनाला जागून आम्ही सर्वांनी पसारा आटोपला. राहिलेले चिकन, कोलंबी हॉटेलवरील भुकेलेल्या सहकार्यांना घेवून जाण्याची आमची जबर इच्छा डॉमनिकच्या बायकोने हाणून पडली. मुलांना हे पदार्थ खूप आवडले आहेत ते मी ठेवून घेते असे सांगून ती मोकळी झाली. पुढील कित्येक दिवस या जेवणाच्या आठवणी आम्ही CONFERENCE रुममध्ये चर्चिल्या.
५> या DEVELOPMENT CENTER च्या TEAM बिल्डिंगच्या कार्यक्रमासाठी Goodwood येथील अश्वशर्यतीला जाण्याचे ठरले. त्या दिवशी सकाळी टीवीवर एका कार्यक्रमात या शर्यतीतील एका रेसमध्ये एक डार्क हॉर्स (छुपा रुस्तुम) असल्याचं सांगण्यात आले. ही बातमी मी ऑफिसमध्ये येवून सांगताच सर्वांनी मला वेड्यात काढले. श्रीकांतने मात्र माझ्यावर विश्वास ठेवून या घोड्यावर ५ पौंड लावले. हा खरोखरच डार्क हॉर्स असल्याने त्यावर बऱ्याच कमी लोकांनी पैसे लावले. आणि तो घोडा जिंकला. श्रीकांतला त्याच्या ५ पौंडाचे ५६ पौंड मिळाले. मी मात्र माझ्यावरच चिडलो. त्याचा राग म्हणून मी पुढील शर्यतीवर ५ पौंड लावले. तो घोडा हरला. अजून रागावून मी पुढील शर्यतीवर ५ पौंड लावले. तोही घोडा हरला. माझा तिळपापड झाला. मी त्यापुढील शर्यतीवर १० पौंड लावले. आणि तोही घोडा हरला! माझी सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली आणि मी पुढील शर्यतीवर पैसे लावले नाहीत. थोड्या वेळाने श्रीकांत भेटला. तो ही जिंकलेले ५६ पौंड गमावून बसला होता. मी थोडा शांत झालो. ती संध्याकाळ आम्ही अरुण्डेल किल्ल्याजवळ अरुण्डेल नदीकाठी BARBEQUE चा आस्वाद घेण्यात घालवली. मी मात्र श्रावणी गुरुवार असल्याने बटाटे, गाजर यावरच समाधान मानले.
Sunday, April 11, 2010
जन्म मृत्यू आणि आत्मवृत्त
आज मी विषयांतर करायच्या मूडमध्ये आहे. वास्तूच्या आत्म्याकडून मी आपले मृत्युनंतर काय होत असेल या विषयाकडे वळतोय. मला मृत्यू ही संकल्पना आवडत नाही. प्रत्येक माणूस हा एक मोठी गाथा आहे. इतक्या वर्षात प्रत्येकाला किती अनुभव येतात, माणूस किती अनुभवसमृद्ध बनतो आणि हे सारे काही एका क्षणात नाहीसे होणार, हा विचारच मला आवडत नाही . तरीपण आपण तार्कीकदृष्ट्या मृत्युनंतर आपले काय होत असेल या विषयीच्या पर्यायानच विचार karuya
सर्व काही संपते. १९४० साली आपण नव्हतो आणि २०८० साली आपण नसणार. या विचारानुसार आत्मा हा प्रकार अस्तित्वात नाही.
आपण हे एका मोठ्या आत्म्याचे (अनंत) भाग आहोत. या मोठ्या आत्म्याचा काही अंश प्रत्येक जीवात टाकला जातो आणि आपण आपल्या भूतलावरील वास्तव्यात या आत्म्याला घेवून वावरतो. मृत्युनंतर हा अंश परत मूळच्या मोठ्या आत्म्यात (अनंतात) विलीन होतो.या विचारानुसार पुर्नजन्म शक्य आहे. परंतु परत येताना मात्र आपणास आत्मा म्हणून अनंताचा कोणताही हिस्सा परत मिळू शकतो. आता हा हिस्सा मागच्या जन्मीच्या हिस्स्यापेक्षा वेगळा असण्याची शक्यताच जास्त असते. परंतु जर हा हिस्सा मागील जन्मापेक्षा वेगळा नसेल तर मग मात्र आपणास मागच्या जन्मातील काही भाग आठवू शकतो
पर्याय दोन पुढे नेवून, आपण किती वेळा या मृत्यू - जन्माच्या फेर्यात अडकणार आहोत हे मात्र कोण ठरवणार? आपणास मिळालेला अनंताचा भाग (आत्मा) आपण किती corrupt करतो यावर ते अवलंबून असणार. ही संकल्पना पाप पुण्याशी निगडीत झाली
प्रश्न आहे कि हे सर्व कोणी संरचीले? जो कोणी या विश्वाचा निर्माता आहे तो तरी सर्व जाणून आहे काय?
विषय मोठा गहन आहे. पुन्हा कधी तरी यावर लिहीन
Friday, April 9, 2010
बालपण आमचे आणि त्यांचे
तर मग आज बोलूया आपल्या बालपणाविषयी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या बालपणाविषयी. आपले बालपण संस्मरणीय क्षणांनी भरलेले गेले. त्यासाठी कोणास काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. वातावरणच तसे होते. मराठी माध्यमाची कौटुंबिक वातावरणातील शाळा, गावातील ओळखणारे बहुतांशी लोक यामुळे अनोळखी लोकांशी येणारा कमीत कमी संबंध! क्रिकेट, पोहणे, आंबे पाडणे यात संपून जाणारया सुट्ट्या. बाल्यावास्थ्तेत असणारे दूरदर्शन यामुळे बराचसा काल हा जिवंत लोकांशी बोलण्या चालण्यात जायचा.
आजची बालमंडळी मात्र काहीशा वेगळ्या वातावरणात वाढत आहे. त्यांच्या पालकांचा म्हणजेच आपला जनसंपर्क बर्याच टक्क्यांनी कमी झाला आहे. नातेवाईकांचे येणे जाणे बरेच कमी झाले आहे. दूरदर्शन, संगणक यांनी त्यांचा बराच वेळ व्यापून टाकला आहे. नैसर्गिक माध्यमातून आलेले आनंदाचे क्षण त्यांच्यासाठी बरेच कमी झाले आहेत. त्यांचा आनंद Mcdonald , Pizza Hut , Tom & Jerry यांनी व्यापलेला आहे. आजच्या वातावरणाचा या बाल पिढीवर कसा परिणाम होत आहे, ते ज्या वेळी मोठे होतील त्यावेळी त्यांची भावनिक सक्षमता किती असणार याचा आपणास अजिबात अंदाज नाही.
यात आपली जबाबदारी काय? तर त्यांना नैसर्गिक आनंदाचे क्षण देणे. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याबरोबर समुद्रकिनारी जाऊन वाळूचा किल्ला बांधा. त्यांना असे क्षण द्या जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहतील. बंध बांधा संस्मरणीय क्षणाचे आणि बनवा त्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम!
Thursday, April 1, 2010
More Fundas - Warning heavy dose
समजा आपल्या वरीष्टाबरोबर एखाद्या गंभीर समस्येविषयी मूळ कारण शोधण्याची (root cause analysis ) बैठक सुरु आहे. त्यावेळी मात्र आपणास प्रकार १ स्वीकारावा लागेल. थोडक्यात सांगायचे झाले तर जोपर्यंत आपणाकडे असलेल्या ज्ञान - अज्ञान विषयी आपणास जाणीव आहे तोपर्यंत सर्व काही आपण निभाऊन नेऊ शकतो.
अभियांत्रिकीची परीक्षा ही एक मोठी कसोटी असते. तुम्ही कितीही scholar असा किंवा तुम्ही कितीही अभ्यास केलेला असो, प्रत्येक विषयामध्ये पास होणे हे प्रथम उदिष्ट असते. ४ तासाच्या परीक्षेत पहिले २ - २ १/२ तास हे केवळ ४० गुण मिळवून ठेवण्यासाठी राखून ठेवावे लागतात. आणि त्यासाठी तुम्ही प्रथम कोणते प्रश्न निवडता हे फार महत्वाचे ठरते. ह्या कालावधीमध्ये आपला आत्मविश्वास शाबूत राखणे हे महत्वाचे काम तुम्हाला बजावावे लागते. जर तुमचा आत्मविश्वास २ तासानंतर शाबूत असेल तर तुम्ही अर्ध्याहून अधिक लढाई जिंकलेली असते त्यानंतरचा राहिलेला वेळ हा तुम्ही राहिलेल्या प्रश्नांसाठी देऊ शकता. हे प्रश्न असे असतात जे तुम्ही बहुधा प्रथमच सोडवीत असता परंतु जर त्या क्षणी तुम्ही स्वतःविषयी चांगले वाटून घेत असाल तर तुम्ही या अपरिचित प्रश्नांना सहजतेने सामोरे जाऊ शकता.
आजच्या जगात खूप वेळा ही परिस्थिती आपणासमोर येते. आपल्या स्वतःलाच आपणास motivate करण्याची गरज असते. आणि लक्षात ठेवा आजच्या युगात जो कोणी स्वतःला सदैव motivate (उत्साहित) ठेवू शकतो तोच या युगात टिकू शकतो. व्यक्ती एकच आहे पण ती स्वतःच्या ९०% क्षमतेने काम करू शकते की ३०% क्षमतेने यावरच तिचे यश अवलंबून आहे