१> मी इंग्लंडला गेलो ते मे महिन्यात. सूर्यास्त त्यावेळी ८:३० च्या सुमारास व्हायचा. पहिल्या आठवड्यातील दुसरा / तिसरा दिवस असेल. ऑफिस मधून आम्ही हॉटेलवर ५:३० च्या सुमारास परतायचो. अजूनही माझी झोपेची वेळ स्थानिक वेळेशी जुळली नव्हती. त्यामुळे हॉटेल रूमवर आल्या आल्या मी झोपी गेलो. साधारणता ७:०० च्या सुमारास माझे मित्र मला फोन करून आम्ही मग जेवण्यास जाणार होतो. काही वेळाने डोळ्यावर आलेल्या सूर्य किरणांमुळे माझी झोप उडाली. घड्याळात बघितले तर ८ वाजले होते. जेट lag मुळे दिशा, वेळ याचे भान नसलेला मी असा समज करून बसलो की हे दुसरया दिवशीचे सकाळचे ८ वाजले आहेत. संतापाच्या भरात मी मित्राला फोन लावून त्याच्या ३६ पिढ्यांचा उद्धार करण्यास सुरवात केली. त्यानेही थोडा वेळ माझा राग तसाच राहून देत मला अजून भडकावले. नंतर बरेच दिवस माझ्या मित्रांना ही गोष्ट मला त्रास देण्यास पुरेशी झाली.
२> हॉटेलचे नाव होते 'Premier Lodge ' . या हॉटेलचा फायर अलार्म बरेच वेळा वाजायचा. नंतर आम्हाला त्याची सवय झाली आणि आम्ही खोलीबाहेर येणे सोडून दिले. परंतु पहिल्या वेळी मात्र माझ्यावर मजेशीर प्रसंग ओढवला. अलार्म झाला ती वेळ होती पहाटे २:३० वाजताची. खोलीत heater असल्याने टी-shirt आणि shorts मध्ये झोपलेला मी अलार्मच्या आवाजाने उठलो आणि तसाच रूमची चावी घेवून खाली उतरलो. मे महिना असला म्हणून काय झाले हा मे महिना इंग्लंडचा होता. बाहेरील तापमान बहुदा ४ - ५ degree सेल्शिअस असावे. पहिल्या दोन तीन मिनिटातच माझी जी थंडीने दात खीळ बसली ती पुढील अर्धा तास फायर अलार्म वाजेपर्यंत कायम राहिली. या अनुभवानंतर मात्र मी फायर अलार्म ऐकून रूम बाहेर येणे सोडून दिले.
३> या हॉटेलमध्ये सिंटेल या कंपनीचे आम्ही सुमारे ४० कर्मचारी एकत्र राहत असू. दर शुक्रवारी आम्हाला हॉटेलच्या बुकिंगचे नुतनीकरण करावे लागत असे. कधी कधी वीकेंडच्या नादात काहीजण हे नुतनीकरण करण्यास विसरून जात. आणि हॉटेलचे कर्मचारीदेखील परत आम्हाला न विचारता ती खोली दुसर्यास देवून टाकत. असेच एकदा माझा मित्र नुतनीकरण करण्यास विसरला. शनिवारी आम्ही दिवसभर भटकत बसलो. संध्याकाळी तो त्याच्या खोलीत शिरताच त्याला खोलीत दोन आंग्ल युवती बसलेल्या दिसल्या. त्यानंतरचा गोंधळ निस्तरताना बरीच धमाल आली.
या हॉटेलच्या खोल्यांची दारे swipe कार्डने उघडत आणि कडी नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. एके दिवशी रात्री मी झोपण्याचा प्रयत्न करत असताना दाराशी खुडबुड एकू आली. की होल मधून मी बघितले तर एक मद्यपी ही खोली आपलीच समजून त्याचे कार्ड swipe करण्याचा प्रयत्न करीत होता. मी रिसेप्शनला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तिथे कोणी उपलब्ध नव्हते. शेवटी माझी गाडी 'भीमरूपी महारुद्रा' वर आली. सुदैवाने काही वेळाने त्या मद्यपीने आपले प्रयत्न सोडून दिले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
४> ऑफिसमध्ये मी आणि श्रीकांत Development Centre मध्ये काम करीत असू. या ग्रुपमध्ये बाकीचे सर्व लोक इंग्लिश होते. श्रीकांत त्यांना आपल्या पाककौशाल्याविषयी बढाया मारीत असे. एके दिवशी डॉमनिक नावाच्या आमच्या सह-कर्मचाऱ्याने श्रीकांतला त्याच्या घरी येवून सर्वांसाठी स्वयंपाक करण्याचे खुले आव्हान दिले. आम्ही सर्व मिळून १२ जण होतो. श्रीकांतने ते आव्हान स्वीकारले. ही गोष्ट होती शुक्रवारची. संध्याकाळी हॉटेलच्या खोलीवर परत येताच श्रीकांतने सर्व कंपूला मदतीसाठी पाचारण केले. चिकन, कोलंबी, बटाटा आमटी असा बेत ठरला. रात्रीच सर्वांनी मिळून चिकनला मसाला लावून ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी १० वाजता आम्ही टक्सी करून हा सर्व कच्चा माल घेवून डॉमनिकच्या घरी पोहोचलो. डॉमनिकचे तीन मजली भव्य घर होते. मागच्या बाजूला प्रशस्त मोकळी जागा होती. श्रीकांतने तिथे पोहोचताच स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि तीन पदार्थ एकदम शिजवायला घेतले. एका इंग्लिश घरात एका वेळी तीन तीन भारतीय पदार्थांचा घमघमाट पसरविण्याचे श्रेय निर्विवाद्पने श्रीकांतला जाते. माझे पाककौशल्य लक्ष्यात घेता माझ्यावर भात शिजवण्याची जबाबदारी देण्यात आली. जिमी नावाच्या सहकाऱ्याने पापड भाजण्याचे काम केले. साधारणपणे २ वाजता सर्व जेवण तयार झाले. भातही उत्तम शिजला. एका इंग्लिश घरात उत्तम भात शिजवण्याचा पराक्रम माझ्या नावावर नोंदला गेला. जेवण एकदम स्वादिष्ट झाले होते. डॉमनिकच्या पत्नीने आणि दोन्ही मुलांनी सुद्धा जेवणाचा आस्वाद घेतला. मागील बाजूला असणाऱ्या बागेत हा जेवणाचा कार्यक्रम ४ वाजेपर्यंत रंगला. डॉमनिकच्या पत्नीने आधीच एक अट घातली होती. घरातील सर्व पसारा निघताना आवरून ठेवण्याची. त्या आश्वासनाला जागून आम्ही सर्वांनी पसारा आटोपला. राहिलेले चिकन, कोलंबी हॉटेलवरील भुकेलेल्या सहकार्यांना घेवून जाण्याची आमची जबर इच्छा डॉमनिकच्या बायकोने हाणून पडली. मुलांना हे पदार्थ खूप आवडले आहेत ते मी ठेवून घेते असे सांगून ती मोकळी झाली. पुढील कित्येक दिवस या जेवणाच्या आठवणी आम्ही CONFERENCE रुममध्ये चर्चिल्या.
५> या DEVELOPMENT CENTER च्या TEAM बिल्डिंगच्या कार्यक्रमासाठी Goodwood येथील अश्वशर्यतीला जाण्याचे ठरले. त्या दिवशी सकाळी टीवीवर एका कार्यक्रमात या शर्यतीतील एका रेसमध्ये एक डार्क हॉर्स (छुपा रुस्तुम) असल्याचं सांगण्यात आले. ही बातमी मी ऑफिसमध्ये येवून सांगताच सर्वांनी मला वेड्यात काढले. श्रीकांतने मात्र माझ्यावर विश्वास ठेवून या घोड्यावर ५ पौंड लावले. हा खरोखरच डार्क हॉर्स असल्याने त्यावर बऱ्याच कमी लोकांनी पैसे लावले. आणि तो घोडा जिंकला. श्रीकांतला त्याच्या ५ पौंडाचे ५६ पौंड मिळाले. मी मात्र माझ्यावरच चिडलो. त्याचा राग म्हणून मी पुढील शर्यतीवर ५ पौंड लावले. तो घोडा हरला. अजून रागावून मी पुढील शर्यतीवर ५ पौंड लावले. तोही घोडा हरला. माझा तिळपापड झाला. मी त्यापुढील शर्यतीवर १० पौंड लावले. आणि तोही घोडा हरला! माझी सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली आणि मी पुढील शर्यतीवर पैसे लावले नाहीत. थोड्या वेळाने श्रीकांत भेटला. तो ही जिंकलेले ५६ पौंड गमावून बसला होता. मी थोडा शांत झालो. ती संध्याकाळ आम्ही अरुण्डेल किल्ल्याजवळ अरुण्डेल नदीकाठी BARBEQUE चा आस्वाद घेण्यात घालवली. मी मात्र श्रावणी गुरुवार असल्याने बटाटे, गाजर यावरच समाधान मानले.
No comments:
Post a Comment