सिद्धार्थचे आजवर सीमंतिनीकडे कधी लक्ष गेले नव्हते अगदी तिला सिंहाच्या तावडीतून सोडवून आणताना सुद्धा! पण आज आपल्या पित्याच्या क्रोधाने दुःखित झालेल्या सीमंतिनीला पाहून सिद्धार्थला वाईट वाटले. सिद्धार्थ क्षणभर तिच्याकडे पाहतच राहीला. श्वेतांबरा सीमंतिनीचे पिंगट केस हिवाळ्यातील शीतल वाऱ्यावर भुरभुरत होते. ह्या केसांच्या आडोश्याला आपले अश्रू लपविण्याचा त्या हरिणाक्षीचा प्रयत्न विफल ठरला होता. अचानक त्या दुःखमय डोळ्यांची आणि सिद्धार्थच्या आश्वासक नजरेची भेट झाली.
हळूहळू हिवाळा सरत आला होता. वसंत ऋतूच्या आगमनासाठी आश्रमात संगीत, नृत्य. नाट्य आणि साहित्य ह्यांच्या विविध कार्यक्रमाची तयारी जोमाने सुरु होती. सीमंतिनी आणि तिच्या सख्यांनी मिळून एका नृत्याचा कार्यक्रम बसविला होता. सिद्धार्थ मात्र आपल्या ध्येयावर अढळ निष्ठा ठेवून होता. महर्षी अगस्त्यशी त्याची वारंवार चर्चा होई. आपली आक्रमकता कायम राखून योग्य वेळी आश्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करावा ह्या निष्कर्षापर्यंत तो येऊन पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या मनातील ह्या बाबतीतील वादळ काहीसे शमत चालले होते. परंतु आता एक नवीनच वादळ त्याच्या मनात निर्माण होत होते. सीमंतिनी! आश्रमात तिचे सिद्धार्थला वारंवार दर्शन होई. तिच्या विविध मुद्रा त्याला भावत होत्या. नृत्यसरावात मुख्य भूमिका अगदी सराईतपणे निभावणारी सीमंतिनी, एकदा - फक्त एकदाच उद्यानाच्या वृक्षवल्लींकडे दुर्लक्ष झालेला ओरडा अगदी मनाला लावून घेतलेली सीमंतिनी!, त्यानंतर उद्यानाचा जणू काही कायापालटच झाला होता, सर्व हरितसंपदा मोठ्या जोमाने बहरली होती. फुलांचा राजा गुलाबाची तर अनेक प्रकारची रोपे मोठ्या रुबाबात सर्वत्र बहरली होती. सीमंतिनीचा आश्रमातील वावर अगदी आत्मविश्वासपूर्व होता. जरी तिला शिष्यगणांबरोबर ज्ञानोपासना करण्याची संधी मिळाली नसली तरी पित्याच्या मुखाद्वारे येणारे ज्ञानाचे बोल ती आपल्या मनात पूर्णपणे साठवून ठेवीत असे.
आज शिष्यगणांची जरा धावपळच सुरु होती. सर्व आश्रम जरी वसंतोत्सवाच्या तयारीत मग्न असला तरी शिष्यगणाची आज तत्वज्ञानावर वादविवाद स्पर्धा होती. सर्व शिष्य अध्ययनकक्षात येऊन भारद्वाजांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत थांबले होते. परंतु भारद्वाजांची तब्येत आज काही ठीक नव्हती. त्यांनी तसा निरोप घेऊन सीमंतिनीस अध्ययनकक्षात पाठविले. ज्येष्ठताक्रमातील द्वितीय क्रमांकाच्या गुरुंनी हा निरोप स्वीकारला. ते परीक्षा तर घेवू शकणार होते, परंतु त्यांना सहायकाची गरज लागणार होती. जाण्यासाठी त्यांच्या परवानगीची वाट पाहत असलेल्या सीमंतिनीकडे त्याचं लक्ष गेले. 'सीमंतिनी, तू माझी मदत करशील? ते विचारते झाले. द्विधा मनःस्थितीत असलेल्या सीमंतिनीने नजरेच्या एका कोपऱ्यातून सिद्धार्थकडे नजर टाकली. त्याच्या नजरेतील अस्पष्टसा होकार तिला पूर्ण कळला. 'हो, गुरुवर्य', आपले हे उत्तर आपणच दिले का ह्याचा प्रश्न सीमंतिनीला पडला.
मनुष्याचे कर्तव्य आणि त्यापासून त्याला रोखणारा मोह असाच काहीसा चर्चेचा विषय होता. सर्व शिष्य साधारणतः एकाच प्रकारचे विचार मांडीत होते. मनावर नियंत्रण ठेवून कर्तव्य पार पाडावे असा एकंदरीत त्यांच्या विचाराचा कल होता. इतका वेळ शांत असलेला सिद्धार्थ अचानक बोलता झाला, 'कर्तव्याची व्याख्या ठरविली कोणी?, केवळ आपल्या आधीच्या काळात जन्मले म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितलेली कर्तव्याची व्याख्या जशीच्या तशी स्वीकारून आपण आपल्या विकासाच्या सीमा संकुचित करीत आहोत!' त्याच्या तोंडून सीमा हा शब्द ऐकताच सीमंतिनी काहीशी सुखावली. जणू काही त्याने तिचेच नाव घेतले होते. गुरु काहीसे बावरले. शिष्यगणाकडून असला काही प्रश्न विचारला जाईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती. त्यांची विचारग्रस्त मुद्रा सीमंतिनीच्या लक्षात आली. सहायकाला आता धावून जाणे भाग होते. 'कर्तव्याची व्याख्या काही अखंड कायम राहणार नाही. ह्या भूतलावर जसे विद्वान जन्माला येतील ते आपापल्या मतिनुसर ह्या कर्तव्याच्या व्याख्येत सुधारणा करतील. ज्याचे विचार काळाच्या, जनमानसाच्या परीक्षणाच्या कसोटीवर पारखून निघतील तेच विचार कायम टिकतील!' सीमंतिनीच्या मुखातील हे उद्गार ऐकून तिच्यासकट सर्व अध्ययनकक्ष आश्चर्यचकित झाला. ह्या सौंदर्यवतीला बुद्धीची सुद्धा देणगी लाभली आहे तर! सिद्धार्थ विचार करता झाला.