सिद्धार्थ आणि अंशुमत ह्यांच्या रथाचे आश्रमात यथोचित स्वागत झाले. महर्षी अगस्त्य आणि शिष्यपरिवाराने महाराज अंशुमताना पुष्पमाला दिल्या. स्वागत स्वीकारून आणि घटकाभर आश्रमात थांबून महाराज परतीच्या प्रवासासाठी निघाले. एकदा रथात बसल्यावर त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे दुःखी झालेली सिद्धार्थची मुद्रा महर्षींच्या नजरेतून सुटली नाही.
एका मोठ्या पर्वतराजीच्या पायथ्याशी आश्रम वसविला होता. पर्वतातून खळखळत वाहत येणारी नदी आश्रमाचे सौदर्य खुलवीत होती. आजूबाजूच्या दाट वन्य वृक्ष आणि जीवसृष्टीमध्ये हा आश्रम अगदी कसा चपलखपणे बसला होता.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सिद्धार्थचा दिनक्रम सुरु झाला. थंडगार पाण्याने स्नान करणे त्याला जरा कठीणच गेले. त्यानंतर अगस्त्य महर्षींच्या जेष्ठ शिष्यगणांपैकी एकाने नवशिष्यांना अध्ययनकक्षात नेले. दिवसभर बऱ्यापैकी असाच क्रम सुरु राहिला. अध्ययन, आश्रमातील कामात हातभार लावणे, प्रार्थना, बौद्धिक चर्चा ह्यात दिवस कसा गेला हे सिद्धार्थला कळले सुद्धा नाही. सायंकाळी सर्वांना मोकळ्या मैदानात सोडण्यात आले तेव्हा कुठे सिद्धार्थ जरा खुश झाला.
तरुण सिद्धार्थ समंजस होता. ही दिनचर्या त्याच्या आवडीची नव्हती तरीही त्याने कधीच कुरबुर केली नाही. महालातील सुखदायी जीवनातून आश्रमातील खडतर जीवनाचा प्रवास स्वीकारण्याचा त्याने मनापासून प्रयत्न चालू ठेवला. परंतु मनातील वादळांना काही तो थोपवू शकत नव्हता. ही मनातील खळबळ कोणास बोलून दाखवावी हे त्याला समजत नव्हते.
मग एक दिवशी त्याला अचानक ही संधी मिळाली. सायंकाळी सिद्धार्थ शांतपणे एका डेरेदार वृक्षाखाली बसून समोरच खेळणाऱ्या सशांच्या पिल्लांच्या जोडीकडे पाहत बसला होता. महर्षी अचानक कधी मागे उभे राहिले हे त्याला कळलेच नाही. 'कसा आहे बाळ सिद्धार्थ!' महर्षी विचारते झाले. 'सर्व काही ठीक आहे, महर्षी' सिद्धार्थ उत्तरला. 'परंतु तुझ्या मुद्रेवरून तुझ्या मनात काही विचार चालू आहेत असे जाणवते' महर्षी म्हणाले. सिद्धार्थने क्षणभर विचार केला. 'काही चुकीचे बोललो तर माफ करा महर्षी' सिद्धार्थ म्हणाला. महर्षींच्या नजरेच्या संमतीने तो बोलता झाला 'एका बलवान साम्राज्याच्या भावी सम्राटाने आश्रमात राहून हे वेद, कला, शास्त्र ह्यातील प्रशिक्षण घेण्याचे प्रयोजन काय हे मला अजूनही पूर्णपणे समजत नाहीय' महर्षींच्या चेहऱ्यावरील काहीशी खुश झालेली मुद्रा पाहून सिद्धार्थने आपले बोलणे पुढे चालू ठेवलं. 'सम्राटाने कसे आक्रमक असावे, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याची मनीषा सदैव त्याच्या मनात असावी. बाकी कोणत्याही क्षेत्रात त्याला सल्ला लागला तर दरबारातील मंडळी आहेतच! ह्या प्रशिक्षणाने जर सम्राटाने आपली आक्रमक मानसिकता गमावली तर मात्र मोठे नुकसान होईल' सिद्धार्थने आपल्या मनातील खळबळ एका दमात बोलून दाखविली आणि त्याला काहीसं बर वाटल.
महर्षी प्रसन्न झाले. 'सिद्धार्थ, खर आहे तुझे म्हणणे. सम्राट कसा आक्रमकच असावा! पण हे राज्य निर्माण करणार ते कोणासाठी? प्रजेसाठी ना? सम्राटाला प्रजेच्या भावनांची जाणीव असावी. त्याला आपल्या दरबारी मंडळींची पारख करता यावी. त्याला स्वतःच्या मनातील भावनांना सांभाळता यावे. मनात येणाऱ्या भावना, विचार ह्यावर कोणाचेच नियंत्रण नसत, तसे ते सम्राटाचेही नसणार. परंतु सम्राटाला मनात आलेल्या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. प्रत्यक्ष कृती करताना त्याला आपल्या कृतीवर लाखो लोकांचे लक्ष असणार आहे, त्यातील बरेच लोक आपल्या कृतीचे अनुकरण करणार आहेत ह्याची जाणीव असावी. एका अर्थाने पुढील एक दोन पिढीचा मार्ग तू आखून देणार आहेस. मी कोणी विद्वान नव्हे. मी आहे केवळ एक साधन, परंपरेने चालत आलेलं ज्ञान, प्रजेपर्यंत पोहोचावे ह्यासाठी आखून दिलेल्या साखळीतील मी आहे एक दुवा! जोवर ही साखळी जमेल तोवर टिकवावी, त्यानंतर पुढे कसे काय घडेल ते प्रत्येक माणसाच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून राहील! इतके बोलून महर्षी आपल्या कुटीच्या दिशेने चालू लागले. महर्षींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि त्यामागे दिसणाऱ्या मावळत्या सूर्यबिंबाकडे सिद्धार्थ बराच वेळ टक लावून पाहत होता.
No comments:
Post a Comment