वनराजाने मनुष्यांवर आक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ होती. आश्रमातील वातावरणात त्यामुळे थोडी खळबळ माजली होती. सीमंतिनीची चांगलीच हजेरी घेण्यात आली. सिद्धार्थ होता म्हणून वेळ निभावून गेली असे सर्वांचेच म्हणणे पडले.
इथे महाराज अंशुमताना काळजीने घेरून टाकले होते. दक्षिण सीमेवरील राजा शत्रुघ्न ह्याने सैन्याची जमवाजमव चालविली आहे अशा बातम्या हेरांनी आणल्या होत्या. शत्रुघ्न आणि अंशुमत ह्यांचे पूर्वापार वैर होते. काही काळापूर्वी अंशुमत ह्यांनी शत्रुघ्नचा पराभव केला होता. हा पराभव शत्रुघ्नच्या बराच जिव्हारी लागला होता. अंशुमत ह्याचे सामर्थ्य तसे जास्त होते, परंतु सुडाच्या भावनेने पेटलेला शत्रुघ्न आपल्याला बराच त्रासदायक ठरू शकतो ह्याची त्यांना जाणीव होती. आणि त्यातच युद्ध सुरु झाल्यास सिद्धार्थला परत बोलवा अशी भुणभुण शर्मिष्ठा ह्यांनी त्यांच्या मागे लावली होती.
राजा शत्रुघ्नचे हेर सर्वत्र पोहोचले होते. सिद्धार्थला आश्रमात ठेवण्यात आले आहे ही बातमीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. अगस्त्य महर्षींचा आश्रम तसा जंगलाच्या आतल्या भागात होता आणि तिथे जायच्या एकमेव रस्त्यावर अंशुमत राजाचे विश्वासू सैनिक पहारा ठेवून असायचे.
सीमंतिनीचा दिनक्रम ठरलेला असायचा. आपल्या मातेबरोबर पित्याची सर्व तयारी करून द्यावी. आश्रमातील पाकशाळेवर लक्ष ठेवून द्यायचे. आश्रमातील उद्यानाची सुद्धा तिने सुंदर काळजी घेतली होती. सर्व काही गोष्टी जागच्या जागी, वेळीच करण्यात तिची ख्याती होती. परंतु त्या घटनेनंतर तिचे लक्ष विचलित झाले होते. ती अधिकाधिक लक्ष आपल्या सख्यांबरोबर घालवू लागली होती.
भारद्वाज आणि त्यांचा शिष्यगण पठणानंतर अध्ययनकक्षातून बाहेर येत होता. अध्ययनकक्षातील चर्चा अजूनही चालूच होती. अचानक भारद्वाजांची मुद्रा गंभीर झाली. उद्यानातील सुकलेल्या लता पाहून ते गंभीर झाले. 'सीमंतिनी!' त्यांची ही क्रुद्ध स्वरातील हाक ऐकून वातावरण अचानक शांत झाले. सीमंतिनी धावतच बाहेर आली. पित्याची सुकलेल्या उद्यानावरील नजर तिला सर्व काही सांगून गेली. आणि तिथून निघताना शिष्यगणात असलेल्या सिद्धार्थाकडे पाहून तिला धरणीमाता दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल असे वाटून गेले.
No comments:
Post a Comment