आधुनिक जीवनशैली आपण सर्वजण जमेल तशी स्वीकारतो. ही जीवनशैली कशी असावी ह्याविषयी लिखित स्वरुपात कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या कानी पडेल, आपल्या भोवतालचा मित्र, नातेवाईक परिवार जसा वागेल त्यावरून आपण आधुनिक जीवनशैलीचा निष्कर्ष काढतो. आता आपण म्हणजे बहुतेकांच्या बाबतीत नवरा बायको आणि एक - दोन मुले असा परिवार होतो. सध्या मध्यमवयीन वर्गात मोडणार्यांचे आई-वडील सत्तरीपलीकडे पोहोचले असल्याने ते आधुनिक जीवनसरणीच्या फंदात पोहोचत नाहीत. नवरा बायको ह्यांचे आधुनिक जीवनशैली ह्या विस्तृत शीर्षकाअंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारांविषयी एकमत होण्याची शक्यता कमी असते. एकंदरीत हल्ली मतभेद असले तरी सामंजस्य वाढल्याने तोडगा काढला जातो.
असाच आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणजे उन्हाळी सहल! वसईत वाढलेल्या बऱ्याच जणांना घरीच मे महिन्यातील सुट्टी घालवावयास आवडते. त्यात मीही समाविष्ट आहे. साधारणतः १५ वर्षांपूर्वीच्या कालावधीपर्यंत मला वडील - काका आणि समाजातील वरिष्ठ वर्गाकडून 'आमच्या वेळी' ह्या दोन शब्दांनी सुरु होणाऱ्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळायच्या. मधल्या काही कालावधीनंतर आता मी बऱ्याच वेळी मुलाला अशा काही गोष्टी सांगतो. त्यात काहीसे पूर्वीच्या पिढीच्या गोष्टींची पुनोरोक्ती असते. जसे की आंबे गोळा करणे, विहिरीत पोहोणे (मी हा प्रकार खूप कमी केला), क्रिकेट, गोळेवाल्याकडून १० पैशातील गोळा असे अनेक प्रकार. वसईतील बरीच माणसे मोठी झाली तरी आपले बालपण टिकवून ठेवतात आणि योग्य संधी मिळाली की ते बाहेर काढतात. एकंदरीत ह्या सर्व प्रस्तावनेवर मला फारशी बाहेर जाण्याची इच्छा नव्हती हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच. तरीही आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून आणि मे महिन्यात काय केले ह्याचे उत्तर असावे म्हणून आम्ही मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मिळालेल्या सुट्टीत सापुतार्याला जायचे ठरविले.
वसईहून आम्ही स्वतःची गाडी घेवून जाण्याचे ठरविले. मुंबई- आग्रा महामार्गाद्वारे नाशिक आणि तेथून सापुतारा असा एक मार्ग होता. परंतु नशिबाने माझ्या मेव्हण्याच्या सासुरवाडीच्या लोकांनी आम्हाला वापिहून सापुतार्याचा मार्ग सुचविला. एकंदरीत हे अंतर सुद्धा पहिल्या मार्गाच्या आसपासच होत होते. एकूण अंतर २७५ किमी झाले. सोमवारी सकाळी आम्ही साडेपाचच्या सुमारास वसई गावातून निघालो. मध्ये गाडीला काही प्रश्न उद्भवल्यास मला त्या विषयात ओ कि ठो माहित नसल्याने आम्ही सोबतीला ड्रायव्हर घेण्याचे ठरविले होते. सकाळी पाचला निघण्याचे ठरविले असताना प्रथम कुटुंबाने १५ मिनिटे आणि मग ड्रायव्हरने अजून अर्धा तास विलंब केला. माझ्या कार्यालयात माझे एक बॉस आहेत. ते कधीच आपला पारा चढून देत नाहीत. त्यांचे स्मरण करून मी शांत राहण्यात यश मिळविले.
सावंत ह्यांनी मग झालेला विलंब भरून काढण्याचा निर्धार केला आणि गाडी जोरदार वेगाने पळविली. विरार, केळवा, पालघर हे सर्व फाटे आम्ही वेगाने पार केले. गेल्या एक महिन्यापर्यंत मी रेनबो FM वाहिनी सकाळी ऐकत असे. ह्या वाहिनीवर सुमधुर गाण्यासोबत सुरेख निवेदनही ऐकावयास मिळते. पण त्यांनी गाण्यांचे वैविध्य राखण्याच्या नादात काहीशी सकाळच्या वेळेत न बसणारी गाणी ऐकावावयास सुरुवात केली आणि त्याचवेळी ओये फिल्मी असे काहीसे टपोरी नाव असणाऱ्या वाहिनीने सुरेख गाणी ऐकावावयास सुरुवात केली. ओयेचा प्रोब्लेम एकच, म्हणजे दोन अतिसुंदर गाण्यामध्ये कावकाव करणारे त्यांचे निवेदक. तरीही त्या सुंदर गाण्यांपायी मी त्यांना झेलतो. सावंत तसे माहितगार, डहाणुच्या महालक्ष्मी देवळाचा पुजारी कसा मध्यरात्री जावून डोंगरमाथ्यावर झेंडा रोवतो ह्याची सुरस कहाणी त्यांनी आम्हाला सांगितली. त्या गोष्टीने सोहम त्यांचा चाहता बनला. गाडी किमान १०० चा वेग राखून होती. बघता बघता गाडीने गुजरातमध्ये प्रवेश केला. मग आमचे लक्ष वापी कधी येते आणि सापुताराचे वळण कधी घ्यायचे ह्याकडे लागले. अनुभवी सावंत ह्यांनी एक वळण निवडून हेच सापुताराचे वळण असावे हे घोषित केले. स्मार्टफोन वरील दिशादर्शक यंत्रणा काही वेळ काम करीत नव्हती आणि बाकीचा वेळ गोंधळवून टाकणाऱ्या सूचना देत होती. ते वळण घेताच एका हॉटेलात आम्ही थांबलो आणि हे योग्य वळण असल्याची खात्री करून घेतली. आमच्या कुटुंबाने (सुविद्य पत्नी माझे ब्लॉग चुकुनही वाचत नसल्याने तिला कुटुंब म्हणून संबोधण्याचे धाडस मी करीत आहे), सकाळी उठून बनविलेली बटाटा सुकी भाजी, स्लाईस ब्रेड आणि बटर मिळून रुचकर SANDWITCH चा नास्ता आम्ही केला आणि गुजरातेतील पहिला चहा घेतला. एव्हाना सकाळचे साडेसात वाजले होते. २७५ किमीच्या एकूण टप्प्यापैकी आम्ही १२८ किमी अंतर पार केले होते.
थोडेसे अंतर सरळ जावून मग डावे वळण घ्यायचे होते. तोवर जरा रहदारीचा रस्ता होता. मग ते वळण घेतल्यावर थोडासा गुंतागुंतीचा रस्ता आला, माझ्या हिंदीतील प्रश्नांना फारशी उत्साहवर्धक उत्तरे मिळत नाहीत हे पाहून सावंत पुढे सरसावले आणि त्यांनी आपल्या गुजराथी भाषासामर्थ्याचे प्रदर्शन करण्यास सुरवात केली. त्यांना नक्कीच चांगला प्रतिसाद मिळाला आणि नानापोंडा पर्यंत सरळ जायचे असे आम्हास सांगण्यात आले. नानापोंडाच्या आधी मोठापोंडा हे गाव होते. सोहमला पोंडा हा शब्द खूप आवडला. हा रस्ता एकेरी लेनचा होता. परंतु रस्त्याची स्थिती अतिउत्तम होती. रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वृक्षांची लागवड केली गेली होती. आपल्याला आपल्या देशातील चांगल्या गोष्टींची स्तुती करण्याची सवय नाही. एकंदरीत वसई ते सापुतारा ह्या प्रवासात अतिउत्तम रस्ते अनुभवयास मिळाले मग ते राष्ट्रीय महामार्ग असोत की राज्य महामार्ग!
गेले काही महिने मी जमेल तशी मीना प्रभूंची प्रवासवर्णनाची पुस्तके वाचतोय, दक्षिणरंग, इजिप्तायन, मेक्सिकोपर्व ह्या पुस्तकातील त्यांनी फारशा ज्ञात नसलेल्या प्रदेशात केलेल्या धाडशी प्रवासाचे वर्णन माझ्या आणि कुटुंबाच्या मनावर फार प्रभाव करून बसलंय. गुजरातच्या ह्या ग्रामीण भागात प्रवास करताना आम्ही काहीसा चाकोरीबाहेरचा प्रवास करतोय अशी माझी भावना होत होती. अशाच एखाद्या शहरी जीवनापासून दूर गावात जाऊन वास्तव्य करण्याचा मनात दडलेला विचार मग अशा वेळी उफाळून बाहेर निघतो. असा प्रवास अनुभवताना नानापोंडा मागे गेले, मग धरमपूर, लकडमल,मालनपाडा, खानपूर, नवसारी, तकरबारी, अंकला, वंजारवाडी, कावदेज, लीमझार, गंगपूर, मिन्धाबरी, जमालीया, वनारसी, महुवास, आंबावडी, वासोंदा NATIONAL पार्क, खाम्भला, सदरदेवी अशा नयनरम्य गावांतून प्रवास करीत आम्ही डांग जिल्ह्यात प्रवेश केला. एव्हाना थोडीफार चढण सुरु झाली होती.
सापुतारा आणि महाबळेश्वर अथवा माथेरान अशी तुलना हिरवाईच्या बाबतीत होवू शकत नाही. हे ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष बघून खात्री झाली. वासोंदाच्या आसपास थोडीफार झाडी दिसली खरी. सापुतारा येण्यास ३ - ४ किमी बाकी राहिले असताना खरी चढण सुरु झाली. आणि पत्नीला चढणीचा थोडाफार त्रास होवू लागल्याने आम्ही ५ मिनटे थांबलो. मग पुन्हा प्रवास सुरु झाला. सापुतारा गावात प्रवेश करताना आम्ही प्रवेश फी भरली.
सापुतारा गाव तसे छोटेसे. मुख्य चौकात आम्ही हॉटेल चित्रकुटची चौकशी केली तर आम्हास समोरचा रस्ता दाखविण्यात आला. त्या रस्त्यावर थोडे पुढे जाताच हॉटेलसाठी दोन खुणा होत्या. एक खालच्या दिशेने आणि दुसरी वरच्या दिशेने. आम्ही खालच्या दिशेने जावून गाडी पार्क केली. एव्हाना सव्वा अकरा झाले होते. स्वागतकक्षात जावून आम्ही रूमची चौकशी केली. आमची रूम वरच्या पातळीवर होती. आम्ही पुन्हा गाडी वळवून वरच्या पातळीवरील पार्किंग झोनमध्ये ठेवली. तोवर आमचे सामान खोलीत घेवून जाण्यासाठी कर्मचारीवर्ग हजर झाला होता.
हॉटेलचा परिसर एकदम निसर्गरम्य बनविण्यात आला आहे. हिरवीगार झाडे, हिरवळ (दुर्वा), खेळण्यासाठी हॉल अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रुमच्या समोरील वऱ्हांड्यातून समोरील डोंगरांचे आणि त्यात सामावलेल्या सरोवराचे नयनरम्य दर्शन होत होते. वॉश वगैरे घेवून झाल्यावर सोहम आमच्या मनातील प्रश्न विचारता झाला, 'बाबा जेवण कधी मिळणार?' आम्हाला आता १२ वाजेपर्यंत वाट पाहणे भाग होते!
No comments:
Post a Comment