जिया खानने आत्महत्या केली. जगाने काही क्षण हळहळ व्यक्त केली आणि मग प्रत्येकजण आपल्या मार्गाला लागला. पोलिसांनी सुरज पांचोलीची चौकशी सुरु केली आहे.
आता थेट सखोल विश्लेषण! बालक जन्माला येत त्यावेळी भावनांची क्लिष्टता किमान असते. मध्यमवर्गीय आणि वरील आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या बालकांच्या बाबतीत; भूक लागली कि रडून लक्ष वेधून घेणे , पोट भरले कि लाड करून घेता घेता नाव नवीन गोष्टी शिकणे आणि मग झोपून जाणे. ह्या किमान भावनांची काळजी घेण्यास बरेचजण उपलब्ध असतात. वयानुसार भावना क्लिष्ट होत जातात. दुःख, आनंद, असूया, अभिमान, मत्सर, प्रेम अशा सर्व भावना मनात डोकावतात. ह्या भावना कशा हाताळायच्या ह्याचे थेट प्रशिक्षण कधीच मिळत नाही. आई वडिलांशी असलेले नाते विशीच्या आसपास मैत्रीच्या रुपात परिवर्तीत व्हायला हवे. परंतु फार थोड्य़ा लोकांच्या बाबतीत असे घडते. बरेचजण ह्या बाबतीत आपले मित्र आणि जीवनातील अनुभव ह्यावर अवलंबून राहतात. भावना हाताळायची परिपक्वता हळूहळू येत जाते. सामान्य लोकांच्या बाबतीत ही परिपक्वता विकसित होण्याचा वेग आणि भावनांचा मारा होण्याचा वेग जवळपास सारख्या वेगाने जात असतो. आणि आजूबाजूची मंडळीसुद्धा सारख्याच परिस्थितीतून जात असल्याने आपण एका समूहाचे घटक असल्याची भावना असते. त्यामुळे ताण सहन करता येतो.
चित्रपटसृष्टीतील परिस्थिती काहीशी वेगळी असते. इथे नशीब हा मोठा घटक असतो. हजारो लोक यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. त्यातील काही सुदैवी प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्यातील काहींना आपणास खरोखर का यश मिळाले हे काही प्रमाणात समजले असते आणि त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता कमी प्रमाणात असते. पण काही जण केवळ सुदैवी असतात, पहिल्या फटक्यात यश तर मिळते परंतु हे टिकविण्यासाठी नक्की काय करायचे ह्याची जाणीव नसते. आणि यशाच्या प्रकाशझोताची चढलेली झिंग अनुभवताना अचानक जीवन विदारक सत्य त्यांच्यासमोर फेकते. आर्थिक जबाबदाऱ्या अंगावर येतात. अशा वेळी संयमी कुटुंब, भावना समजून घेणारा साथीदार आवश्यक असतात. ह्या बाबतीत सुदैवी नसल्यास मग मन जे कोणी प्रथम संपर्कात येईल अशा माणसाकडे ओढले जाते.आणि मग अगदी टोकाच्या परिस्थितीत असला प्रकार घडू शकतो. त्यात मर्यादा नको तेव्हा ओलांडल्या कि नाती अजून क्लिष्ट होत जातात.
आयुष्य दीर्घकालीन आहे. मनाचे संतुलन ह्या इतक्या दीर्घकाळापर्यंत टिकले पाहिजे. यश काही सतत मिळणार नाही. परंतु मला यश कशासाठी हवंय हा प्रश्न ह्या लहान वयात यशस्वी झालेल्या लोकांनी स्वतःला विचारला पाहिजे. केवळ प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी जर यश हवे असेल तर मग कठीण आहे. हल्ली सुखी राहायचे असेल तर स्वतःचे मन संतुलित ठेवण्यासाठी स्वतःकडेच उपाय असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला बरे वाटून घेण्यासाठी लोकांचे सतत लक्ष लागत असेल किवा स्तुती लागत असेल तर मग थोडा प्रॉब्लेम आहे.
मला मुग्धा, कार्तिकी, रोहित, प्रथमेश, आर्या, केतकी ह्यांचा विचार येतो. त्यांना प्रसिद्धी बालवयात मिळाली. पण पूर्ण आयुष्य बाकी आहे आणि ज्या क्षेत्रात मोठी साधना लागते अशा क्षेत्रात ते आहेत. त्यांनी योग्य शिक्षण घेवून पुढील दहा पंधरा वर्षे संगीत साधनेत घालवावीत ही माझी इच्छा. परंतु हा तर ज्याचा त्याचा प्रश्न!
शाहरुक, आमीर मध्ये मध्ये चांगले तत्वज्ञान देतात. शाहरुक जिया खानच्या दुर्दैवी घटनेनंतर बोलला 'प्रेमापेक्षा आयुष्याचा जास्त आदर करा!' अगदी योग्य आहे ते!
No comments:
Post a Comment