महर्षींचे राजदरबारी अचानक आगमन होताच सर्वांचीच धांदल उडाली. प्रधान प्रसंगावधान दाखवून पुढे सरसावले आणि त्यांनी महर्षींना सन्मानपूर्व त्यांच्या आसनाकडे नेले. महर्षींचा क्रोध काही शांत झाला नव्हता. नजरेनेच त्यांनी प्रधानांना महाराज कोठे आहेत अशी विचारणा केली. 'महाराजांचे आगमन आता होईलच', आपल्या स्वरात जमेल तितकी आश्वासकता आणण्याचा प्रयत्न करीत प्रधान उत्तरले. प्रधानांचे नशीब बलवत्तर होते. महर्षींचा क्रोध वाढण्याच्या आतच महाराज राजदरबारी प्रवेशते झाले. महाराजांनी महर्षींना विनम्र होवून प्रणाम केला. तोवर दासींनी थंडगार पेयाचा चषक महर्षींना आणून दिलाच होता. त्यामुळे महर्षीचा राग काहीसा निवळला होता.
'आम्ही अजूनही राजपुत्र सिद्धार्थच्या आश्रमातील आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत, ही प्रतीक्षा किती काळ चालू राहणार हाच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येथवर इतका दीर्घ प्रवास करून आलो आहोत' महर्षीनी थेट विषयाला हात घातला. महाराजांना एकंदरीत अंदाज आलाच होता. त्यांची स्थिती बिकट झाली होती. महाराज्ञी शर्मिष्ठा सिद्धार्थच्या आश्रमातील वास्तव्याच्या एकदम विरोधात होत्या. सिद्धार्थसारख्या तारुण्य ओतप्रोत भरलेल्या शूर राजकुमारास आश्रमात पाठवून त्याच्या मनात संभ्रम निर्माण होण्याच्या आपल्या मनातील शंकेस प्रत्यक्षात उतरलेले पाहण्यास त्या अजिबात तयार नव्हत्या. कधी एकदा विशीत पोहोचलेला सिद्धार्थ आपली मर्दुमकी रणांगणात दाखवून आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो हे पाहण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते.
महाराजांच्या मनातील हे विचारचक्र महर्षींच्या तीक्ष्ण नजरेने भेदले. 'विलंबाबद्दल क्षमस्व, महर्षी - येत्या पौर्णिमेला आम्ही स्वतः राजपुत्र सिद्धार्थला घेवून आपल्या आश्रमात दाखल होऊ' महाराज उत्तरले. आपण हे उत्तर कसल्या आधारावर देत आहोत हे त्यांचेच त्यांना माहित नव्हते. अगस्त्य महर्षी अंशुमत महाराजांच्या ह्या उत्तरावर एकदम खुश झाले. मग महर्षी आणि महाराजांची राजकक्षातील चर्चा बराच काळ सुरु होती.
आश्रमात भावी राजास काही काळ प्रशिक्षणासाठी पाठविण्याची महाराज ह्यांच्या राजघराण्याची अनेक पिढ्या चालत आलेली परंपरा होती. सिद्धार्थनेसुद्धा ह्या परंपरेने जावे अशी अपेक्षा महाराजांनी करावी ह्यात वावगे असे काहीच नव्हते. पुढील सात आठ दिवस महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांना मनविण्यात महाराजांनी घालविले. सिद्धार्थ आश्रमात राहून परत आला की साम्राज्यविस्ताराची एक जंगी मोहीम काढायची असे आश्वासन घेवूनच महाराज्ञी शर्मिष्ठेने आपली परवानगी दिली.
सिद्धार्थने युद्धकलेत बरेच नैपुण्य संपादन केले होते. त्याचे हे कौशल्य अलौकिक आहे ह्याची ग्वाही जाणकार देत होते. सिद्धार्थ बराच समंजस होता. आश्रमात जाण्याची आपल्या पित्याची आज्ञा त्याने तत्काळ स्वीकारली.
मग तो दिवस उजाडला. समारंभपूर्वक अंशुमत महाराज आणि राजपुत्र सिद्धार्थ एका सजविलेल्या रथातून महर्षींच्या आश्रमाकडे निघाले. सर्व प्रजाजन आपल्या सद्य आणि भावी सम्राटाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते आणि ह्या रथावर पुष्पवृष्टी करीत होते.
रथाने आता नगर सोडले होते आणि घनदाट वनराईत प्रवेश केला होता. सूर्याच्या किरणांना भूमीवर पोहोचण्याची क्वचितच संधी मिळत होती. वन्य प्राण्यांचेही दर्शन अधून मधून होत होते. एकंदरीत सिद्धार्थला हे वातावरण खूपच भावले होते.
No comments:
Post a Comment