Wednesday, July 3, 2013

तपोवन - भाग ६


पहाटेची प्रसन्न वेळ होती. महाराज अंशुमत ह्यांची निद्रा पक्षांच्या मधुर किलबिलाटाने खंडित झाली. शयनगृहातील गवाक्षातून बाहेर दिसणाऱ्या ह्या प्रसन्न वातावरणाचा महाराज आनंद घेत असताना अचानक त्यांना बाहेर काहीशी गडबड ऐकू आली. महाराज तात्काळ बाहेर आले. अमात्य, सेनापती आणि खाशी मंडळी एकत्र जमली होती  काही वेळापूर्वीच खबर आली होती. शत्रुघ्न राजाने दक्षिण सीमेवरून हल्ला केला होता आणि तो राज्यात बराच खोलवर घुसला होता.
महाराजांनी सेनापतीबरोबर विचारविनिमय तत्काळ आटपला. आणि लगेचच खुद्द महाराज अंशुमत, सेनापती आणि सेना दक्षिण दिशेने कूच करू लागली. सेनापतींनी पाठविलेले निरोप एव्हाना राज्याच्या दुसऱ्या भागात असलेल्या सैन्यापर्यंत सुद्धा पोहोचले होते. इतर भागातील वीरसैनिक सुद्धा दक्षिण सीमेवर येवू लागले होते. खासे अश्वदल वाऱ्याशी स्पर्धा करीत पुढे चालले होते. महाराजांच्या डोळ्यातून युद्धज्वर ओतप्रोत भरला होता. मार्गातील प्रजा आपल्या पराक्रमी राजाचे हे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवीत होती.
मध्यान्हीपर्यंत सेनेने बरीच मजल मारली होती. मनात शत्रूचा तत्काळ विनाश करण्याची तीव्र इच्छा असली तरी पोटातील भुकेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. मार्गातील वनात मिळणाऱ्या फळांवर भूक भागवून आणि दाट जंगलात वाहणाऱ्या सरितेचे मधुर पाणी प्राशन करून सेना पुढे निघाली. तोवर नैऋत्य दिशेने आलेले गजदल सेनेला येवून मिळाले त्यामुळे सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले.
थोडे अंतर पुढे गेल्यावर धुळीचा मोठा लोळ आणि अश्व, गज ह्यांच्या चीत्काराचे आवाज ऐकू येवू लागले. महाराजाच्या अंगात नवीन स्फुरण शिरले. आपला रथ थेट त्या दिशेने घुसविण्याची त्यांनी आज्ञा दिली. सेनापतींनी त्यांना रोखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. रणांगणावरील परिस्थिती माहित नसताना महाराजांनी स्वतः थेट शिरू नये असे त्यांचे म्हणणे होते. परंतु महाराजांच्या अंगी समरज्वर पुरेपूर उतरला होता. सेनापतींचे म्हणणे धुडकावून लावून ते रणांगणात प्रवेश करते झाले. सेनापतींनी सद्य परिस्थितीत उपलब्ध उत्तम पर्याय म्हणून स्वतः आणि निष्णात योद्ध्यांचे कडे महाराजांभोवती निर्माण केले.
महाराजांची आधीची तुटपुंजी सेना शत्रूशी लढता लढता मेटाकुटीस आली होती. संख्येने शत्रू बराच प्रबळ होता. परंतु दस्तुरखुद्द महाराजांचे रणांगणात आगमन होताच सर्वांनाच नवा जोश आला. महाराजांनी शत्रूच्या आघाडीच्या फळीवर बाणांचा जोरदार वर्षाव केला. महाराजांच्या भात्यातील बाणांचे वैविध्य आणि वेगाचा मुकाबला करणे शत्रूला कठीण जावू लागले. महाराजांची सेना कौतुकाने आपल्या राजाचा हा पराक्रम पाहत होती. महाराजांच्या ह्या मर्दुमकीने शत्रूची आघाडीची फळी विस्कळीत झाली. त्यात निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवीत महाराज आणि खासे दल आत शिरले.
अचानक झालेल्या ह्या करारी हल्ल्याने शत्रुघ्न राजा अवाक झाला होता. अंगी कुटिलता असली तरी उसने शौर्य तो आणू शकत नव्हता. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेवून पलायन करण्याची तयारी त्याने केली आणि रथ मागे घेण्याचा आदेश दिला. शत्रुघ्नाचा परतीच्या दिशेने निघालेला ध्वजधारी रथ पाहून महाराज अंशुमत खवळले. त्यांनी भर रणांगणातून रथ शत्रुघ्नच्या दिशेने घुसविला. महाराजांचे बाण शत्रुघ्नच्या रथाला भेदून जाऊ लागले. ह्या सर्व गोंधळात महाराजांभोवतीचे सरंक्षक कवच काहीसे विभागले गेले. शत्रुघ्नचा सेनापतीने ही संधी साधली आणि त्या कपटी माणसाने युद्धातील सर्व नियम धुडकावून महाराजांच्या मस्तकाच्या दिशेने बाण सोडला. सर्व लक्ष शत्रुघ्नकडे एकवटलेल्या महाराजांच्या नजरेने आपल्या दिशेने येणाऱ्या बाणाला टिपले तोवर  खूप उशीर झाला होता. आणि …. एक महान योद्धा कपटी सेनापतीच्या बाणाने धारातीर्थी पडला!!
अचानक युद्धाचे फासे पलटले. महाराज धारातीर्थी पडले हे पाहताच त्यांची सेना एकदम बावरली. सेनापतींना सुद्धा हा मोठा धक्का होता. परंतु अशा परिस्थितीत आपल्यालाच धीराने वागले पाहिजे हे ते चांगले जाणून होते. आपल्या भावनांचा लगेचच ताबा घेवून त्यांनी आक्रमण चालूच ठेवले. 'महाराजांचा जय असो' अशी जोराने गर्जना करून ते शत्रुघ्नाच्या दिशेने चालून गेले. आता मात्र सेना मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडली. आता मात्र शत्रुघ्न आणि सेनेचे उरलेसुरले अवसान गळून पडले. ज्यांना जमेल त्यांनी आपला जीव वाचवत काढता पाय घेतला. शत्रू दिसेनासा झाल्यावर मात्र सेनापतींनी आपल्या भावनांचे बंध मोकळे केले आणि मोठ्याने हंबरडा फोडला.
महाराजाच्या वीरगतीची बातमी एका कधी न भरून येणाऱ्या आघातासारखी राजवाड्यात पोहोचली. आणि ही बातमी घेवून ज्यावेळी दूत आश्रमात पोहोचला तेव्हा महर्षी अगस्त्यसारखा स्थितप्रज्ञ योगीसुद्धा सुन्न होवून बसला.

 

No comments:

Post a Comment