Friday, July 5, 2013

तपोवन - भाग ७


महर्षी अगस्त्य ह्यांनी सिद्धार्थला कुटीत बोलावले. 'बाळ, तुला एक दुःखद बातमी सांगायची आहे मला! महाराज अंशुमत ह्यांना रणांगणावर वीरगती प्राप्त झाली, तुला तत्काळ राजधानीसाठी प्रयाण करावे लागणार आहे.' अगस्त्य ह्यांनी मोजक्या शब्दात ही बातमी सिद्धार्थला सांगून टाकली. सिद्धार्थच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. पित्याच्या अकस्मात वियोगाचे मणांमणाचे ओझे त्याच्या मनावर दाटले. त्याच वेळी आपल्यावर येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही त्याला झाली. डोळ्यांत येऊ पाहणाऱ्या अश्रूंना त्याने मोकळी वाट करून दिली. आता भूतलावर फार कमी लोक होते ज्यांच्यासमोर आपले अश्रू बाहेर येऊ देण्याची मुभा त्याला होती.
आश्रमावर दुःखाची छाया पसरली होती. आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूचे दुःख तर होतेच आणि त्याचबरोबर सर्वांचा लाडका सिद्धार्थ आश्रम सोडून जाणार त्याचेही दुःख होते. सीमंतिनीची भिरभिरती नजर सिद्धार्थचा शोध घेत होती. सिद्धार्थला घेवून जाण्यासाठी खास रथ आणि सैनिकाचे एक खासे पथक आले होते.
काही केले तरी सिद्धार्थ भावी राजा होता. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्याच्यात कोठेतरी दडली होती ती आता प्रकट झाली होती. त्याने काही क्षणातच आपले अश्रू आवरले आणि महर्षींचा आशीर्वाद घेतला. 'तुझ्यासमोर उभा असलेला आव्हानांचा पर्वत पार करण्याची क्षमता तू बाळगून आहेस, स्वतःवर विश्वास ठेव, यशस्वी भव!' महर्षी उद्गारले. महर्षी आणि सिद्धार्थ बाहेर आले तोवर सिद्धार्थचा रथ तयार होता. सर्व आश्रमवासी निरोप देण्यासाठी रांगेने उभे होते. एका क्षणात सर्व नाती बदलली होती. आता आपल्या भावी राजाला निरोप देणारी ही प्रजा असे चित्र होते. सर्वांचा निरोप घेत घेत सिद्धार्थ सीमंतिनीपाशी आला. एका नुकत्याच उमलू लागलेल्या नात्यात मोठे वादळ आले होते. 'मी तुमची वाट पाहीन' केवळ सिद्धार्थला ऐकू जाईल असा आटोकाट प्रयत्न करीत सीमंतिनी पुटपुटली. त्या दोघांतील शब्दाद्वारे झालेला हा पहिलाच संवाद होता. आणि अशा ह्या पहिल्याच संवादात आयुष्यभराची साथ निभावण्याचे आश्वासन देणारे हे शब्द उद्गारण्याचे धारिष्ट्य आपल्यात कोठून आले हे सीमंतिनीला काही कळले नाही. सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला. परंतु आपल्या मनीचा भाव बोलून दाखविण्याची हे वेळ नव्हती. केवळ नजरेतून आश्वासन देण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. सीमंतिनीचे वाक्य आणि सिद्धार्थची आश्वासक नजर केवळ त्या दोघातच राहिली नव्हती. सिद्धार्थच्या मागून येणाऱ्या, एका सेनानायकाने हे एक मोठे गुपित टिपले होते.
मध्यरात्रीच्या आसपास सिद्धार्थचे राजमहालात आगमन झाले. महाराज अंशुमत ह्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रजेचा महापूर लोटला होता. सिद्धार्थचे आगमन होताच त्याला थेट तिथेच नेण्यात आले. सिद्धार्थची धीरगंभीर मुद्रा पाहून प्रजेला धीर आला. पित्याच्या निष्प्राण देहाजवळ उभ्या असलेल्या सिद्धार्थने मनोमनी हा सर्व भार सांभाळण्याचे बळ देण्याचा आशीर्वाद मागितला. आपल्या बालपणापासून आपल्याला जपणाऱ्या आणि आपले सर्व हट्ट पुरविणाऱ्या आपल्या लाडक्या पित्याची असंख्य रूपे सिद्धार्थच्या डोळ्यासमोर तरळून गेली. आपला पिता जरी शरीराने आपल्याला ह्यापुढे दिसणार नसला तरी अदृश्यपणे आपल्या आसपासच असेल अशी समजूत करून सिद्धार्थ आपल्या शोकव्याकूळ मातेची भेट घेण्यासाठी निघाला.
दुसऱ्या दिवशी महाराज अंशुमत ह्यांना अंतिम निरोप देण्यात आला. प्रजेला दुःख अनावर झाले होते. त्यानंतर शोकाचा पंधरवडा आला. सेनापतीना शोक करण्याची सुद्धा संधी नव्हती. आता कुठेच काही उणीव ठेवून चालणार नव्हते. त्यांनी सर्व सीमेवर सेनेचा चोख बंदोबस्त ठेवण्याची तजवीज केली होती. प्रधानांनी राज्यकारभार सुरळीत चालेल ह्याची तजवीज केली होती.
शोकाचा कालावधी संपल्यावर राजपुरोहित, प्रधान, सेनापती, महर्षी आणि शर्मिष्ठा ह्यांची एक बैठक झाली. राज्याला जास्त काळ राजाशिवाय ठेवून चालणार नव्हते. येणाऱ्या शुक्लपक्षातील एक शुभमुहूर्त सिद्धार्थच्या राज्याभिषेकासाठी निवडण्यात आला. बैठकीत ह्या राज्याभिषेकाच्या सर्व तयारीची आखणी करण्यात आली. सिद्धार्थला अजून काही प्रशिक्षणाची गरज असल्यास तेही देण्याची तजवीज करण्यात आली.
एकंदरीत दुःखाचे वातावरण आधी कर्तव्यभावनेकडे आणि त्यानंतर काहीशा उत्सुकतेच्या दिशेने बदलू लागले होते. राजमहालातील वर्दळ आता वेगाने वाढू लागली होती. अशा वातावरणात एके दिवशी सकाळी मुख्य हेरांचे राजमहालात आगमन झाले. शत्रुघ्नच्या नवीन कटाची त्यांनी बातमी आणली होती. महाराज अंशुमत ह्यांनी आतापर्यंत सर्व शत्रूंना आपल्या धाकात ठेवले होते. अशा सर्व पराभूत राजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न शत्रुघ्नने चालविला होता. आणि दुर्दैवाने त्यात त्याला यशही मिळत चालले होते. आतापर्यंत पाच राजे ह्या कुटील आघाडीत सामील झाले होते आणि आता शत्रुघ्न राजा प्रद्युतला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. आतापर्यंतच्या पाच राजांविषयी काही काळजी करण्याचे कारण नव्हते परंतु प्रद्युत सामर्थ्यवान राजा होता. त्याला ह्या कुटील कारस्थानात सामील होवून देण्याआधी हालचाल करणे आवश्यक होते आणि त्यामुळेच मुख्य हेर तातडीने राजधानीत हजर झाले होते.  

No comments:

Post a Comment