Thursday, July 25, 2013

तपोवन - भाग १०


दाट जंगलातील निद्राधीन झालेल्या त्या आश्रमातील शांतता सिद्धार्थच्या अश्वाच्या दूरवरून येणाऱ्या टापांच्या आवाजाने काहीशी भंगली. आश्रमापासून काही अंतरावर सिद्धार्थ अश्वावरून पायउतार झाला आणि आश्रमात प्रवेश करता झाला. आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील सेवकांनी त्याला थेट महर्षी अगस्त्यांच्या कुटीत नेले. अशा अवेळी सिद्धार्थचे आगमन महर्षींना सुद्धा आश्चर्यचकित करून गेले. सिद्धार्थने त्यांना आपल्या भेटीचे प्रयोजन सांगितले आणि सीमंतिनीची भेट घेवून देण्याची विनंती केली. सिद्धार्थचा निर्धार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. महर्षीनी क्षणभर विचार केला. आणि सिद्धार्थला तिथेच थांबण्याची आज्ञा केली. जसे ही भेट सर्वांच्या नजरेसमोर होवून देणे योग्य नव्हते तसेच योग्य नव्हते सिद्धार्थला भेटीशिवाय परत पाठविणे. महर्षीनी सेवकांना फळांचा रस आणण्यासाठी पिटाळले. आणि मिळालेल्या संधीत सर्वांच्या नजरा चुकवून सीमंतिनी कुटीत आली. महर्षी अगस्त्यनी त्या दोघांना कुटीतील एका कक्षात एकांतात बोलण्याची संधी दिली.
"सीमंतिनी, मी तुझ्याशी इथे विवाह करून तुला माझी पत्नी म्हणून घेऊन जाण्यासाठी आलो आहे", सिद्धार्थ बोलता झाला. स्थितप्रज्ञ असली म्हणून काय झालं, सीमंतिनीला आपल्या चेहऱ्यावरील लज्जेचे भाव लपवणे शक्य नव्हते. लज्जेने गुलाबी छटा पसरलेले तिचे गाल, खाली भूमीकडे झुकलेली तिची प्रणयिनीची नजर सिद्धार्थला सर्व काही सांगून गेली. आता कोणत्याही क्षणी सीमंतिनीच्या तोंडून होकार ऐकायला मिळेल अशीच सिद्धार्थची समजूत झाली. "महाराज," सीमंतिनीने बोलण्यास आरंभ केला. महाराज हा शब्द सिद्धार्थला खूपच खटकला. अशा ह्या क्षणी ह्या शब्दाचे प्रयोजन काय असा विचार येऊन सिद्धार्थ काहीसा रागावलासुद्धा. "आपण आपली जीवनसाथी म्हणून माझा विचार करता आहात, ही माझ्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ह्या राज्याचे अधिपती म्हणून असलेले आपले कर्तव्य ही अधिक महत्वाची गोष्ट आहे असे मला वाटते. शत्रूने राज्याभोवती मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशा वेळी आपण विवाहबंधनात अडकून बसलात तर आपल्या तयारीत हयगय होण्याचा धोका संभवतो. आपण शत्रूचा पराभव करून आलात की मी जरूर आपल्या प्रस्तावाचा विचार करीन".
सीमंतिनीच्या ह्या शब्दांनी सिद्धार्थच्या मनात एका क्षणात अनेक भावना निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यात अपेक्षाभंग होता आणि आश्चर्यही होते. त्याला जितके आश्चर्य वाटलं त्याच्या दहा पटीने जास्त सीमंतिनीला वाटलं होत. आपण असे काही बोललो ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस ज्याला अर्पण होण्याची आपण कामना मनी बाळगली त्या मनीच्या राजकुमाराने स्वतःहून आपणास मागणी घातली असताना आपण असे काही बोलू शकतो ह्याचेच तिला अति आश्चर्य होत होते. त्याच वेळी दुसर मन मात्र तिला तू हे योग्यच केलं असं सांगून तिची समजूत घालीत होते.
सिद्धार्थने मग तिथे जास्त वेळ घालविला नाही. पुढे सर्व काही अनिश्चितताच भरून राहिली होती. त्याने महर्षीचा निरोप घेवून राजनगरीकडे प्रस्थान केले. सिद्धार्थ आणि सीमंतिनी ह्या दोघांना बोलण्यासाठी महर्षीनी जरी एकांत दिला असला तरी त्यांचे बोलणे अजून कोणीतरी ऐकत होत.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात राजमाता शर्मिष्ठा उद्यानात फेरफटका मारण्यासाठी निघाल्या होत्या. मनावर कितीही दगड ठेवला तरी अशा काही क्षणी घातलेले सर्व बंध तुटून पडायचे. ह्याच उद्यानात महाराज अंशुमत ह्यांच्यासोबत त्यांनी किती स्वप्ने रंगविली होती. डोळ्यातील येवू पाहणाऱ्या अश्रूंना त्यांनी आता मात्र रोखले नाही. आजूबाजूला महाराजांचे अस्तित्व आहे असा राहून राहून त्यांना भास होत होता.
असाच काही वेळ उद्यानात घालवून राजमाता आपल्या दालनात परतल्या तेव्हा सेनापती त्यांची प्रतीक्षा करीत असल्याची खबर सेविकेने त्यांना दिली. सेनापतींनी त्यांना रात्रीचा सर्व वृतांत कथन केला आणि सिद्धार्थ - सीमंतिनीचे बोलणेही! प्रथम राजमातेची मुद्रा क्रुद्ध झाली. सिद्धार्थने अशी हरकत करावी ह्याचे त्यांना दुःख झाले. महर्षीच्या वागण्याचेही त्यांना आश्चर्य वाटले. परंतु ज्यावेळी सीमंतिनीचा विचार त्यांच्या मनात आला त्यावेळी मात्र त्यांना त्या कधीही न पाहिलेल्या युवतीविषयी कौतुकाची भावना दाटून आली. ज्या सुखाची ह्या भूमातेवरील असंख्य कन्या मनोकामना बाळगून आहेत ते सुख समोर उभे असताना सुद्धा जी कर्तव्याचा विचार करू शकते आणि तो विचार राजापुढे मांडू शकते, तिला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली!"

No comments:

Post a Comment