Sunday, July 7, 2013

लिंबलोण उतरू कशी - सुमन कल्याणपूर



संगीतातील तज्ञ नसल्याने त्या विषयातील काही गोष्टींचे गूढ उकलत नाही. परंतु संगीतातील आनंदच इतका अवर्णननीय असतो की ह्या गोष्टींचे गूढ उकलले नाही तरी काही फरक पडत नाही. सुमन कल्याणपूर आणि लता मंगेशकर ह्यांच्या सुरेल गायनाची तुलना कशी करायची हा मला अधूनमधून पडणारा प्रश्न! परंतु एखाद्या गाण्याचा आनंद घेताना मग हा प्रश्न विसरायला होते. सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेली काही गीते मनाला एकदम भावूक बनवितात. लिंबलोण उतरू कशी हे गाणे अचानक कानी पडले. त्याचा शोध घेतला. एकटी चित्रपटातील ग. दि. माडगुळकर ह्यांनी रचिलेले आणि सुधीर फडके ह्यांनी संगीत दिलेले हे अविस्मरणीय गीत! आजच हे गाणे पहिल्यांदा ऐकले आणि अगदी मनाला भिडले. १९६८ सालचा हा चित्रपट. ४३ वर्षांनी सुद्धा आईचे आपल्या मुलावरील प्रेम, त्याच्याविषयीचा अभिमान ज्यात ओतप्रोत भरले आहे असे हे गीत आपली गोडी टिकवून आहे! आणि त्यात सुलोचना ह्यांचा अभिनय म्हणजे लाजबाब! हा चित्रपट संधी मिळाला तर मी आवर्जून पाहणार. पण बघा ना, चित्रपट पाहिला नाही तरी गीत मात्र पूर्ण आनंद देवून जाते!

एकंदरीत गीताचा मला समजलेला अर्थ असा!
आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात दिवस काढणाऱ्या आईला  साता समुद्रापलीकडे असणाऱ्या आपल्या कर्तृत्ववान मुलाची आठवण येते. त्याच्या ह्या यशाला, कर्तृत्वाला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून त्याची दृष्ट काढावी अशी तिला इच्छा होते. परंतु इतके अंतर पार करता येत नसल्याने ती इथूनच दृष्ट काढू इच्छिते आणि त्यासाठी त्याला एक क्षणभर थांबण्यास सांगते. 
आता माझ्या जीवनात केवळ तूच एक लाडका आहेस. सर्व जीवन दुःखाने भरले असता तूच तुझ्या कर्तृत्वाने, यशाने तू माझ्यासाठी सुखाची द्वारका उभारली आहेस. जगातल्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे ज्याने आपल्या खांद्यावर घेतले आहे असा तू एक समर्थ खांब आहेस. 
जिने तुझ्यासारख्या यशस्वी मुलास जन्म दिला ती आईची कूस धन्य होय, ज्यांनी तुझ्या यशोगाथा पाहिल्या, ऐकल्या ते आईचे कान आणि डोळे धन्य होय! माझा जन्म कृतार्थ झाला आणि माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. मी जे काही आयुष्यभर कष्ट सोसले त्याचे तू पांग फेडलेस!
माझा सर्व काही थकवा आता निघून गेला आहे! जे काही आयुष्य बाकी राहिले आहे ते मी ईशस्मरणात घालविन! हे माझ्या मुला, जगात कोणास लाभले नसेल असे सुख तुला लाभो हीच आता एक इच्छा!

आणि आता हे प्रत्यक्ष गीत!

लिंबलोण उतरू कशी असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला असा समर्थ खांब तू

धन्य कूस आईची, धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू

शीणभाग संपला तृप्‍त माय जीवनी
आयु उर्वरीत ते सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू

 
काळ किती झपाट्याने बदलला हेच खरे! पुढील वीस - तीस वर्षात पूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी निस्वार्थपणे वेचण्याचे भाग्य कोणत्या मातेला असेल हे देवच जाणो!
 

No comments:

Post a Comment