राज्याभिषेकाची धांदल पुढील दोन दिवस पुरली. तिसऱ्या दिवशी मात्र राजमाता शर्मिष्ठा ह्यांनी राजा प्रद्द्युत ह्यांना बैठकीस बोलावले. राजा सिद्धार्थ, सेनापती आणि प्रधान राजमहालाच्या खास दालनात बसून राजा प्रद्द्युत ह्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. सेवकांची चाहूल लागली आणि राजा प्रद्द्युत ह्यांचे आगमन झाले. ते एकटे नव्हते त्यांच्याबरोबर राणी आश्लेषा ह्याही होत्या. राणी आश्लेषा ह्यांची ह्या बैठकीतील उपस्थिती काहीशी अनपेक्षित आणि शिष्टाचाराला अनुसरून नव्हते. मंडळींच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आठ्या पाहून राजमातेने त्यांना नजरेनेच शांत राहण्यासाठी खुणावले. शिष्टाचाराची चैन परवडण्याची ही योग्य वेळ नव्हे हे त्या पक्के जाणून होत्या.
चर्चेस सुरुवात झाली. राजा प्रद्द्युत ह्यांच्यासमोर संधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परस्परांच्या राज्यावर आक्रमण न करणे आणि कोणा एकाच्या राज्यावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतीस धावून येणे असे ह्या संधीचे स्वरूप होते. सद्यपरिस्थिती ध्यानात घेता, राजा प्रद्द्युत ह्यांना दर वर्षी पाच सहस्त्र सुवर्णमुद्रा सुद्धा देण्यात येणार होत्या. राजा प्रद्द्युत ह्यांची खुललेली मुद्रा सर्वांच्या लक्षात सुद्धा आली. ते उत्तर देण्यास सुरुवात करणार इतक्यात राणी आश्लेषा ह्यांनी त्यांना नजरेनेच थांबविले. त्यांच्या ह्या खुणेचा अर्थ राजा प्रद्द्युत ह्यांना समजला. "हा प्रस्ताव आम्हाला मंजूर नाही", राजा प्रद्द्युत ह्यांचे हे उद्गार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देवून गेले. प्रधानांनी तरीही प्रयत्न करून पाहिला. परंतु एकंदरीत परिस्थितीत काही फरक पडला नाही.
बैठक संपली आणि मंडळी दालनातून बाहेर निघण्यासाठी निघाली. "आम्हांला तुमच्याशी काही खाजगीत बोलायचे आहे", राणी आश्लेषा राजमाता शर्मिष्ठा ह्यांना म्हणाल्या. सर्व मंडळी बाहेर पडल्याची खात्री झाल्यावर त्या राजमातेला म्हणाल्या "ह्या प्रस्तावाची गरजच काय? ह्या दोन राजघराण्यांचे नातेसंबंध जुळावेत अशीच आमची इच्छा आहे". राजमातेला हे ऐकून काहीसा धक्का बसला. सिद्धार्थचे इतक्यात विवाहाचे वय झाले नाही असेच त्याचं मत होते. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हा प्रस्ताव नक्कीच विचार करण्यासारखा होता. नवख्या सिद्धार्थला जबाबदारी पार पाडण्यासाठी एक मोठा आधार मिळणार होता. हा नातेसंबंध जुळून आला तर शत्रुघ्नसारख्या छोट्या वैऱ्याची चिंता करण्याची गरजच पडणार नव्हती. "मी, सिद्धार्थशी बोलून मग तुम्हाला कळविते", राजमातेचे उत्तर राणी आश्लेषा ह्यांना फारसे आवडले नाही. त्यांना तत्काळ होकार हवा होता.
सिद्धार्थ आपल्या दालनात विचारमग्न होऊन बसला होता. इतक्या सर्व धावपळीत सीमंतिनीचा सवडीने विचार करण्याची फुरसत त्याला जरी मिळाली नसली तरी तिचा चेहरा कायम त्याच्या नजरेसमोर तरळत असे. आज बऱ्याच दिवसांनी काहीशी सवड मिळाल्याने तो तिच्या आठवणीत मग्न झाला होता. विरहाचे दुःख काय असते हे ज्याला अनुभव येतो त्यालाच समजत. इतक्यात द्वारातून राजमातेला येताना पाहून तो काहीसा दचकला. एका क्षणात त्याने स्वतःला सावरले आणि तो राजमातेजवळ बसला. महाराज अंशुमत ह्यांच्या मृत्युनंतर मायलेकांना एकांतात एकत्र येण्याची संधी फारच कमी मिळत असे. राजमातेने सिद्धार्थच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सिद्धार्थला काहीस गहिवरून आले. परंतु आता असे भावनाविवश होऊन चालणार नव्हते. राज्यकारभाराच्या घडीविषयी राजमातेने काही सल्ले सिद्धार्थला दिले. नंतर शत्रुघ्नचा विषय काढता काढता तिने गाडी हळूच राणी आश्लेषा ह्यांच्या प्रस्तावाकडे वळविली. सिद्धार्थला हे एकदम अनपेक्षित होते. एरव्ही संयमी असणाऱ्या सिद्धार्थची मुद्रा काहीशी रागीट झाली. पण लगेच त्याने स्वतःला सावरले. "मला ह्या विवाहबंधनात पडायचं नाहीय!" सिद्धार्थ म्हणाला.
दुपारच्या भोजनानंतर राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्यांनी आपल्या राज्याकडे प्रस्थान केलं. एकंदरीत त्यांचा पाठींबा सिद्धार्थच्या निर्णयावर अवलंबून होता. वातावरणातील अनिश्चितता राजमातेला असह्य होत होती. त्यांनी पुन्हा एकदा जेष्ठ मंडळींची बैठक बोलावली. सिद्धार्थने ही बैठक टाळण्याची राजमातेकडून परवानगी मिळविली होती. राणी आश्लेषा ह्यांचा प्रस्ताव ह्या बैठकीत सांगावा कि नाही ह्याविषयी राजमातेची द्विधा मनःस्थिती होती. शेवटी त्यांनी न राहवून हा प्रस्ताव मंडळीसमोर मांडला. आणि सिद्धार्थचे उत्तरही! मंडळींना एकंदरीत धक्काच बसला. पंडित न राहवून म्हणाले "क्षमा असावी राजमाता! एकंदरीत सैन्याची जय्यत तयारी करणेच इष्ट होईल!" बैठक मग त्या तयारीला लागली. बैठक संपताच सेनापतींनी राजमातेची एकांतात भेट घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या सेनानायकाने आश्रमात ऐकलेला सीमंतिनी आणि सिद्धार्थ ह्यातील संवाद सेनापतींना सांगितला होता. हे रहस्य उघड करण्याची हीच वेळ आहे हे जाणून घेवून सेनापतींनी थोडक्यात हे सारे राजमातेला सांगितले. राजमातेसाठी आजच्या दिवसातील हा अजून एक धक्का होता.
निशेने राजनगरीवर आपला अंमल बसविला होता. राजमहालातील भोजने केव्हाच आटोपली होती. काही वेळाने सर्वजण निद्राधीन झाले. आणि मग एकदम गुप्तपणे राजबिंडा सिद्धार्थ घोड्यावर स्वार होऊन राजमहालाबाहेर पडला. त्याचा मार्ग अगदी ठरला होता. आणि निर्धारही पक्का होता. परंतु आपल्या मागावर घोडेस्वारांचे एक पथक आहे ह्याची मात्र त्याला जाणीव नव्हती. सेनापतींनी सांगितलेल्या बातमीनंतर त्याच्यावर पाळत ठेवण्याची खबरदारी राजमातेने घेतली होती. परंतु त्याचा आजच उपयोग होईल ह्याची मात्र त्यांना कल्पना नव्हती.
No comments:
Post a Comment