Wednesday, July 10, 2013

तपोवन - भाग ८



राज्याभिषेकाच्या धावपळीत हे नवीनच प्रकरण उद्भवले होते. राजा प्रद्द्युतला कसे आपल्या बाजूला वळवावे ह्यासाठी सुकाणू (हा आधुनिक मराठी राजकारणातील शब्द इथे चपलख बसत नाही हे मान्य!) समितीची लगोलग बैठक बोलावण्यात आली. राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांचे काही काळापूर्वी घनिष्ट संबंध होते. परंतु मधल्या काळात काही गैरसमजामुळे ह्या संबंधात थोडा तणाव आला होता. आता हे गैरसमज दूर करणे आवश्यक होते. राजा प्रद्द्युत ह्यांना सिद्धार्थच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्याचे ठरविण्यात आले. राजा प्रद्द्युत राजनगरीत आल्यावर त्यांच्याशी विस्तृत चर्चा करून त्यांना आपल्या बाजूने वळवावे असा निर्णय घेण्यात आला. लगेचच मध्यान्हीच्या सुमारास शाही नजराणा घेवून एक खास पथक राजा प्रद्द्युतच्या राजधानीकडे निघाले सुद्धा!
राजा प्रद्द्युत भोवती शत्रुघ्न आणि कंपूने आपले जाळे विणण्यास सुरुवात केलीच होती. परंतु राजा प्रद्द्युत काही फारसा अनुकूल प्रतिसाद देत नव्हता. शेवटी शत्रुघ्नने आपला हुकुमी एक्का बाहेर काढला होता. अंशुमतच्या साम्राज्याचा पाडाव करण्यात यश आल्यास त्यातील तीन चतुर्थांश साम्राज्य राजा प्रद्द्युतच्या राज्यात सामील करण्यात येईल असा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव अगदीच फलदायी होता आणि राजा प्रद्द्युतला तो नाकारणे कठीण वाटू लागले होते. आपल्या राज्याचा इतका विस्तार झाल्यास आपल्यास महाराज ही उपाधी मिळण्यास काहीच विलंब लागणार नाही ह्याची त्यांना खात्री वाटू लागली. मनीची सुप्त इच्छा पूर्ण होण्याची संधी अशी अचानक उभी ठाकल्यामुळे ती स्वीकारावी असेच त्यांना मनोमन वाटू लागले होते.
'राजे, महाराज अंशुमतच्या नगरीतून एका पथकाचे आगमन झाले आहे.', दासीच्या ह्या उद्गाराने राजा प्रद्द्युत ह्यांचे विचारचक्र खंडित झाले. पथकाचे यथोचित स्वागत करण्यात आले. काही वेळाने राजा प्रद्द्युत आणि आणि पथकाची भेट झाली. पंडित मंदार ह्यांनी राजा प्रद्द्युत आणि महाराज अंशुमत ह्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यातील काही भेटींच्या वेळी पंडितही हजर होते. त्यामुळे त्यांनी वर्णन केलेल्या आठवणींनी राजा प्रद्द्युत जुन्या काळात पोहोचले. त्यानंतर भेट देण्यात आलेला एक मौल्यवान हिरेजडीत हार राजांच्या कलाकार मन सुखावून गेला. इतक्या सर्व आनंदी वातावरणात राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे  निमंत्रण स्वीकारणे ही केवळ औपचारिकता राहिली होती. ती राजा प्रद्द्युत ह्यांनी लगेचच पार पाडली.
काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरे! महिन्यापूर्वी शोकाकुल झालेल्या राजनगरीत आज अगदी उत्साहाचे वातावरण होते. महाराज्ञी शर्मिष्ठा ह्यांनी सर्व भावना बाजूला ठेवून ह्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात कुठलीच कमतरता राहणार नाही ह्याची जातीने दखल घेतली होती. राजमहालावर सुगंधी फुलांची तोरणे लावण्यात आली होती. रात्रीच्या वेळी सर्व राजमहाल सुरेख दिव्यांनी उजळून निघाला होता. नगरीतील सर्व रस्ते सुशोभित करण्यात आले होते. संगीत, नृत्याचे कार्यक्रम दोन दिवस आधीच सुरु झाले होते. सर्व प्रजेने सुद्धा नववस्त्रे परिधान केली होती. घरांवर तोरणे लावली होती. ह्या समारंभाचे मुख्य आकर्षणबिंदू असलेला सिद्धार्थ मात्र काहीसा निर्मोह वृत्तीने ह्या सर्व धावपळीकडे पाहत होता. राजा प्रद्द्युत आपल्या राणी आणि खास मंडळीसमवेत राजनगरीत आगमन करिता झाला. त्याच्या स्वागतात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नव्हती.
राज्याभिषेकाचा सोहळा अगदी दृष्ट लागण्याजोगा झाला. राजबिंड्या सिद्धार्थला राज्याभिषेक होताना पाहून महाराज्ञी शर्मिष्ठाच नव्हे तर सर्व प्रजेच्याच डोळ्यात एकाच वेळी आनंदाश्रू आणि दुःखाश्रू उभे राहिले. साम्राज्याला अधिपती मिळाला होता. महर्षी अगस्त्यसुद्धा ह्या सोहळ्यास हजर होते. अजून एक मन राजनगरीत होते आणि बऱ्याच अंतरावर अडकलेल्या कायेतून ते सिद्धार्थच्या सुखी भवितव्याची प्रार्थना करीत होते. राजा प्रद्द्युत आणि राणी आश्लेषा ह्या समारंभात अगदी गुंगून गेले होते. दोघांच्या मनात एकच विचार घोळत होता आणि तो बोलून दाखविण्याच्या संधीची ते दोघे वाट पाहत होते. शेवटी एकदाची संधी मिळताच राणी आश्लेषा बोलत्या झाल्या, " राजकुमारी कालिंदी ह्या साम्राज्याची राणी बनावी अशी मनोमन इच्छा माझ्या मनी उत्पन्न झाली आहे!"

 

No comments:

Post a Comment