आपण भारतीयांना हल्ली सोहळ्याचं फार वेड लागलं आहे. सोहळ्यासाठी आपण केवळ कारण शोधत असतो. समाजातील अनेकांना आर्थिक स्थैर्य लाभलं की असं होत असावं. रविवारी संध्याकाळी पारितोषक सोहळा, मालिकांचे विशेष भाग, दिवाळीत मुख्य सणाच्या प्रथांना बाजूला सारून गाण्याचे कार्यक्रम वगैरे वगैरे! सोहळ्याची एक मुख्य गरज म्हणजे उत्सवमूर्तीचा सोहळ्यातील सहभाग! नवीन पिढी तशी हुशार, त्यांनी मागच्या पिढीतील नामवंत लोकांना उत्सवमुर्ती बनविण्याचा पायंडा पाडला. मागच्या पिढीतील नामवंतांना खरतरं ह्याची सवय नसावी. परंतु बदलत्या काळानुसार त्यांनी स्वतःला बदलून घेतलं आणि अशा सोहळ्यात सहभागी होण्याचं स्वीकारलं. ह्या नामवंत लोकांना सर वगैरे संबोधित करणे वगैरे प्रकार अगदी डोक्यात जाई पर्यंत पोहोचले. ह्यातील बरेच नामवंत खरोखर त्या त्या क्षेत्रात महान परंतु अति परिचयात अवज्ञा असा प्रकार काही प्रमाणात ह्यांच्या बाबतीत घडला. मराठी कार्यक्रमांनी तर महा ह्या शब्दाचा सर्रास वापर केला. आणि काही उदाहरणाच्या बाबतीत तो अतिशयोक्ती (गुरु) झाला.
असो, सध्या ज्या निवृत्तीसोहळ्याची धामधूम चालू आहे, त्यात काही ठिकाणी सीमारेषा ओलांडल्या जात आहेत. वर्तमानपत्रांनी बाकीच्या सर्व बातम्या दूर ठेवून नामवंताच्या आयुष्यात जे कोणी काही काळापुरता, क्षणापुरता आले त्या सर्वांच्या नामवंताबरोबरच्या आठवणींना प्रसिद्धी देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्याचा प्रत्येक डाव, त्याच्या प्रत्येक अवयवाला झालेल्या दुखापतीचे वर्णन ह्या सर्वांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरून गेले आहेत.
रिकी पोंटिंगचे उदाहरण घेऊयात. त्याला अधिकृतपणे ठरवून निवृत्त होण्याची संधी मिळाली नाही. ज्या क्षणी निवडसमितीला वाटलं हा पठ्ठ्या संघात बसत नाही त्यावेळी त्याला संघातून काढण्यात आलं. भावना आणि व्यवहार ह्याची अजिबात गल्लत नाही. आता भावना आणि व्यवहार ह्यांची आपला समाज नेहमी गल्लत करतो. त्याचे काही फायदे तर बरेच तोटे. सध्या होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची विधाने केली जातात आणि आपणास ऐकावी लागतात ते आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या ह्या गल्लतिचे दुष्परिणाम होत.
१> नामवंताच्या निवृत्तीसाठी खास मालिकेचे आयोजन करणे हे चुकीचे.
२> त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला कात्री लावणे हे ही चुकीचे.
३> नामवंताने ही कसोटी संपल्यावर अचानक निवृत्तीची घोषणा केली असती तर जी काही सध्या आर्थिक उलाढाल होत (त्यातील काळ्या पैशातील किती आणि वैध किती) ती झाली नसती.
४> शमी, कोहली, रोहित ह्यांच्या कामगिरीवर जे काही लक्ष रसिकांनी दिले असते ते टाळले गेले.
५> सामान्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचा उल्लेख टाळला गेला किंवा कमी प्रमाणात झाला.
६> ह्या सामन्यात नामवंत किती धावा करणार अथवा त्याला धोनी गोलंदाजीची संधी देणार की नाही ह्यावर नक्कीच बेटिंग होत असणार. हे ही चुकीचे!
मी नामवंताचा मनापासूनचा चाहता. पण हे लिहील्यावाचून राहविले नाही. ह्यात नामवंताचा पूर्ण दोष आहे असे नाही परंतु मला कोठेतरी हे खटकले.
माझे ऑफिसातील बॉस काही अप्रिय घटना घडली की म्हणतात "Move On Guys". आज आपल्या समाजाला हेच म्हणण्याची वेळ आली आहे. "Move On Guys". ह्या सामन्यातील रोहित, शिखर, विराटच्या फलंदाजीचा आनंद लुटुयात!