संध्याकाळी ४ - ५ वाजता अंधार पडणे ही गोष्ट भल्या भल्या लोकांना मानवत नाही. त्यानंतर एक भली मोठी रात्र आपल्यासमोर उभी ठाकलेली असते. रात्रीच्या जेवणाखाण्याच्या वेळांचे ताळतंत्र बिघडू शकते. त्यात हे एकटेपण! म्हटलं तर ह्या एकटेपणावर उपाय होता. काही मंडळी माझ्याबरोबर येऊन राहायला तयार होती. आधीच्या परदेशीवारीमध्ये मी असा काहीजणांबरोबर राहिलो होतो. परंतु आता ह्या शेयर करण्याची सवय मोडली होती. त्यामुळे मी एकटे राहण्याचं ठरविले.
शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सलग असा खूप वेळ मिळे. अशा वेळी जर तुम्ही संगणक, टीव्ही, भ्रमणध्वनी ह्यापासून अलिप्त राहू शकलात तर मोकळ्या वेळात तुम्ही अगदी स्वतःशी मग्न होऊ शकता. ही मग्न होण्याची पातळी वेळेनुसार अधिकाधिक खोल होत जाते. ठरवलं तर तुम्ही अंतर्मनाशी खोलवर संवाद साधू शकता. माझं मन असंच आठवणीच्या हिंदोळ्यात गुरफटल जायचं.
मला घराची, घरच्या लोकांची आठवण यायची का? हो यायची. पण त्या आठवणींनी मी कासावीस व्हायचो का? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारार्थी होतं. ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. आपण इतके कसे भावनाशून्य झालोत. अजून जास्त विचार केल्यावर उत्तर सापडलं, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर जो नोकरीबाबतीत अनिश्चिततेचा काळ मी अनुभवला होता त्याने कोठेतरी माझ्यावर खोलवर परिणाम केला होता. व्यावसायिक जग क्रूर असतं. तिथं एखाद्या जागेसाठी अनेकजण तयार असतात. कष्ट करून मिळविलेलं स्थान सहजासहजी गमवू नये असा माझ्या अंतर्मनात माझ्या नकळत कोठेतरी निर्णय झाला होता. आणि त्यामुळेच मी ठामपणे असा एकटा राहिलो. १९९६ - ९७ च्या आधीचा अभ्यासू मी त्यानंतर व्यावहारिक बनलो होतो. ही तशी न जाणविण्यासारखी गोष्ट, ह्या कालावधीत मला समजली.
परदेशी राहणाऱ्या लोकांच्या भारतात फोन करण्याच्या विविध तऱ्हा असतात. काहीजण शनिवार- रविवारी फुरसतीत फोन करतात. हा फोन तास दीड तास चालतो. मग त्यात कांदे बटाट्याच्या भावापासून, गावच्या वसंतरावांच्या कुमुदच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टी चर्चिल्या जातात. माझी पद्धत थोडी वेगळी होती. मी पाचच मिनिट पण दररोज फोन करायचो. वडील जास्त बोलायचे नाहीत, बरा आहेस ना इतके विचारायचे. प्राजक्ता फोनवर बोलण्यात तशी बेताचीच. फक्त घरातील सामानाची चौकशी करायची. पण काही काळानंतर तीही थोडी एकटेपणाला कंटाळू लागली होती. ह्या फोनमध्ये आईला सर्वात जास्त रस असे. आज जेवायला काय केलंस, सालमंड, तिलापिया मासे आणले की नाही वगैरे तिच्या चौकश्या असत. सर्दी खोकला वगैरे तर झाला नाही न हा दररोजचा प्रश्न असे. मी नित्यनेमाने हा सकाळी ऑफिसात जाण्याआधी हा फोन करे.
PMP चा अभ्यास मला नेहमीच्या जगात आणून सोडे. ह्या परीक्षेसाठी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख घेतली होती. आधी अभ्यास करून मग तारीख घ्यायची की तारीख घेऊन मग अभ्यास करायचा ह्यात दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता. त्यामुळे परीक्षेचा कसोशीने अभ्यास करणे आवश्यक बनले होते. मेंदू त्यात गुंतला असला तरी मन गुंतलं होत की नाही हे माहित नाही. ह्या अभ्यासाच्या चर्चेसाठी आशिष आणि मी एकमेकांच्या घरी जात असू. डिसेंबरच्या मध्यात आम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली. आशिष इतका पद्धतशीर माणूस की तो सराव परीक्षा द्यायला सुद्धा सुट्टीच्या दिवशी ऑफिसात जायचा. एकदा तर त्याने हद्द केली. उणे १० डिग्री तापमानात तो शनिवारी रात्री ९ वाजता सराव परीक्षा देण्यासाठी ८ मैलावरील ऑफिसात जाऊन बसला. पण आशिष एक जिद्दी माणूस. आज TCS मध्ये एका मोठ्या हुद्द्यावर तो जाऊन पोहोचला आहे. डिसेंबरच्या ३० तारखेला एक दुःखद घटना घडली. माझे काका ह्या दिवशी निवर्तले. मी ज्यावेळी घरी फोन केला होता त्याच वेळी नेमकी ही घटना घडली. हा क्षण सर्वात कठीण होता. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता मी तत्काळ भारतात येऊ शकलो नाही. काकांच्या आठवणी पुढे बरेच दिवस तिथे येत राहिल्या.
७ जानेवारीला PMP परीक्षा होती. परीक्षेचे ठिकाण १०-१२ मैलावर होते. शिस्तबद्ध आशिषने आपण हे ठिकाण आदल्या दिवशी बघून येवूयात असे सुचविले. मी चालकाची भूमिका बजावत त्या गावी पोहोचलो. नकाशानुसार ते ठिकाण अगदी जवळ असूनसुद्धा आम्ही त्याच्याभोवती घिरट्या घालत बसलो होतो. शेवटी ते ठिकाण मिळाले. आदल्या दिवशी ठिकाण बघून येण्याचा निर्णय योग्यच होता म्हणायचा! ह्या मागचे तत्व दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाता जाता आशिष म्हणाला. परीक्षेच्या दिवशीच्या सर्व घटना तुम्हाला आधीपासून डोळ्यासमोर आणता आल्या पाहिजेत. जसे की मी पाचला उठणार, सातला घराबाहेर निघणार हा रस्ता घेणार. ह्या सर्व प्रकारात परीक्षाकेंद्राची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असली की बराच फायदा होतो. मी ह्या वर्गात बसणार, पाठ केलेली सूत्र कच्च्या कागदावर लिहून काढणार वगैरे वगैरे. आयुष्यात सर्वांनाच सदैव इतकं पद्धतशीर बनता येत नाही पण ज्याची इच्छा असेल त्याने जमेल तितकं बनाव! त्या दिवशी सकाळी सुरु झालेला जोरदार पाऊस आम्ही कल्पिलेल्या चित्रात नव्हता. अमेरिका झाली म्हणून काय झालं, पावसामुळे वाहतूक तिथेही मंदगती होणारच! "ह्यासाठीच आपण अर्धा तास आधी निघालोत", आजूबाजूच्या वाहनावर करडी नजर ठेवणारा आशिष मला म्हणाला.
ही संगणकावर घेतली जाणारी परीक्षा होती. आम्ही वेळेआधी पोहोचलो होतो पण आम्हाला लगेचच परीक्षा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. २०० गुणाच्या चार तासाच्या ह्या बहुपर्यायी उत्तरांच्या परीक्षेत मध्ये सलग ४०-५० प्रश्न मला गोंधळवून टाकणारे होते. ह्यातील प्रत्येक प्रश्नाची दोन दोन उत्तर मला बरोबर वाटत होती. त्यामुळे मी संभ्रमावस्थेत पडलो होतो. चार तासाला वीस मिनटे वगैरे बाकी असताना माझी नजर आशिषकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. पट्ठ्याने बहुदा परीक्षा पास केली तर! मी कयास बांधला. परीक्षेचा निर्णय तत्काळ मिळत असे. मी पुन्हा सर्व उत्तरं तपासून शेवटी 'सबमिट' कळ दाबली. निर्णय येईपर्यंतची ती दोन मिनिटे अगदी मला अनादी काळासारखी वाटली. शेवटी संगणकराजाने गोड बातमी दिली. मीही उत्तीर्ण झालो होतो. परीक्षा संपल्याचा आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद एकदम देणारी ही परीक्षा मग मला खूप आवडून गेली.
आता मात्र वेळ खायला उठला होता. सोहम असताना आम्ही बाजूच्या पार्कात सदैव जात असू.
मग मी तिथे जाण्यास सुरुवात केली. सोहमबरोबर तिथल्या तळ्यात खरेतर परवानगी नसताना आम्ही तिथल्या बदकांना ब्रेड वगैरे खायला देत असू.
मी एकटा गेल्यावर सुद्धा ही बदके मोठ्या आशेने माझ्याकडे येत.
वसईचा होळीवरचा आशय हा ही माझ्या अगदी जवळ राहायचा. आमचे एकमेकांकडे येणेजाणे असे. त्याचाही मोठा मित्र परिवार होता. आशय मोठा दर्दी माणूस, मूडमध्ये असला की भरपूर खाद्यपदार्थ आणून मित्रमंडळींना बोलावयाचा. जेवणानंतर भरपूर चर्चा होई. अशाच एका चर्चेत विषय निघाला, "मोकळ्या वेळात आपण काय करतो?" हे प्रत्येकाने सांगायचं होतं. माझीवेळ येताच मी म्हणालो, "मला आयुष्यातील प्रवासाकडे मागे वळून पाहायला आवडतं. कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घेतले, त्यावेळी दुसरे कोणते पर्याय उपलब्ध होते, त्यातील दुसरा एखादा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं" वगैरे वगैरे! मंडळी क्षणभर स्तब्ध झाली!
असो आज थोडे विषयांतर झाल्याने हा भाग इथे संपू शकला नाही. पुढील भागात शीर्षकाला न्याय देत नक्की हा अध्याय पूर्ण करीन!
No comments:
Post a Comment