गेल्या आठवड्यात एक मित्र म्हणाला, "हल्ली बऱ्याच वेळा एकटेपणा मिळतो, आणि हल्ली हा एकटेपणा हवाहवासा झाला आहे!" एकटेपणाची कारणे अनेक! "नोकरीधंद्यानिमित्त एकट्यालाच दुसऱ्या शहरात राहायला लागणे हे मुख्य कारण!
माझे मन २००६ च्या नोव्हेंबर महिन्यात गेले. आम्ही न्यू जर्सीला वास्तव्याला होतो. आई वडील सप्टेंबर महिन्यात भेटीस आले. पत्नीने २००५ च्या हिवाळ्याचा धसका घेतला होता. आई वडिलांच्या सहा आठवड्याच्या भेटीचा शेवट जसजसा जवळ येत चालला तसं तिने माझ्या मागे तिचे आणि मुलाचे परतीचे तिकीट आरक्षित करण्याचा आग्रह सुरु केला. आणि मी तो मानलाही. आणि मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वजण भारतात परतले. त्यांना विमानतळावर सोडून घरी आल्यावर दरवाजा उघडल्यानंतरचा क्षण अजूनही लक्षात आहे! चार तासांपूर्वी अगदी भरलेलं ते घर आता भकास वाटू लागलं होतं. माझ्यासाठी अगदी रुचकर जेवण बनवून ठेवलं गेलं होतं. ते स्वतःच्या हातांनी वाढून घेताना जाणवलं की बऱ्याच दिवसांनी स्वतःने वाढून घ्यायची वेळ आली आहे. आणि उद्यापासून तर दोन्ही वेळचं जेवण स्वतःला बनवायला लागणार होतं.
मला अमेरिकेत येऊन दीड वर्षे झाली होती आणि परतायचं कधी हे नक्की ठरलं नव्हतं. व्हिसाचा तसा काही प्रश्न नसल्याने मी अजून काही वर्ष तरी राहीन असा एकंदरीत समज माझा आणि कंपनीचा होता.
हे सर्वजण गुरुवारी परतले. शुक्रवार तसा मी आरामात काढला. संध्याकाळी येऊन चिकन वगैरे बनवलं. रात्री चित्रपट पाहिले. शनिवार सुद्धा तसा कामात गेला. त्यावेळी PMP परीक्षेचे दूरध्वनीवरून शनिवारी क्लास असत. ते दहा वाजता सुरु होतं. आणि २ पर्यंत चालत. त्यावेळी स्पीकरफोन चालू करून मी जेवण वगैरे बनविले. मग जेवता जेवता लक्षात आलं. अरे आठवड्याचे कपडे धुणे बाकी आहे. हिवाळा तसा सुरु झाल्याने, त्या कॉलनीतील सामायिक धुणीघरात कपडे धुवायला जायचे म्हणजे जय्यत तयारीनिशी जावे लागे. माझ्या एका मित्राच्या शब्दात सांगायचं म्हणजे अगदी युद्धाला जावं तशी तयारी करावी लागे. जॅकेट, हातमोजे वगैरे वगैरे. आणि एकदा धुण्याच्या यंत्रात, मग वाळवण्याच्या यंत्रात आणि मग शेवटी परत आणायला अशा तीन फेऱ्या मारायला लागत. एक दोन आठवड्यात मी शनिवारचे वेळापत्रक खास बनविले. कपडे धुणे, शनिवारचा दोन वेळचा स्वयंपाक, आठवड्याची भाजी, चिकन, दुध आणि पाणी आणणे ही सर्व कामे मी PMP क्लासच्या आजूबाजूला आटपत असे. क्लासचे ज्ञान घेता घेता मग मी जेवणही आटपे.
अशाप्रकारे आठवड्याभराची माझी सर्व कामे शनिवारी दोन वाजता आटोपलेली असत. हिवाळ्यातील सूर्याची अगदी कोवळी किरणे (अगदी आपल्याकडल्या पाच वाजता सारखी) बेडरूम मध्ये आलेली असत आणि त्यात मी सर्व ब्लॅंकेट एकत्र करून दुपारची एक मस्त झोप काढत असे. जर झोप व्यवस्थित लागली तर जेव्हा साडेचारच्या आसपास जाग येई तेव्हा सूर्याने त्या दिवसापुरता निरोप घेतला असे. मग संध्याकाळचा चहा अगदी रात्रीलाच घ्यावा लागे.
समोर एक मस्त रस्ता होता आणि पुढे एक पार्क होता. हे दृश्य ऋतूमनाप्रमाणे अगदी बदलत जाई. त्याच्या ह्या दोन झलकी!
चहा घेतल्यावर आणि सोफ्यावर बसून टीव्ही सुरु केला की मला जाणवे की इथे ह्या क्षणी मी आणि माझी तनहाईच आहे. म्हणायला तसा PMP चा अभ्यास, ऑफिसचे काम आणि नेटफ्लिक्स च्या DVD असत. पण मी बऱ्याच वेळा त्या विचारचक्रात गुंतून जाई. असेच लहानपणापासूनचे क्षण डोळ्यासमोर उभे राहत. पुढे असे पाच महिने आणि त्यातील २० -२२ साप्ताहिक सुट्ट्या मी अशा माझ्या तनहाई बरोबर घालविल्या. त्याचे वर्णन पुढील भागात!
No comments:
Post a Comment