Thursday, November 7, 2013

फेसबुक, Whatsapp आणि एकाग्रता



सकाळी फेसबुकवर मित्राचे स्टेटस वाचलं. "शेवटी आई म्हणालीच, मुला बायको कमी शिकलेली असली तरी चालेल, पण फेसबुक, Whatsapp वापरणारी नको. घरी काम सुद्धा असतात!" आता ह्यात स्त्री मुक्तीवाले खवळून उठणार. "तुम्ही वापरायचं फेसबुक आणि Whatsapp, आणि आम्ही नको काय?" वगैरे वगैरे.

असो आजचा विषय प्रामुख्याने ह्या दोन गोष्टींचा मुलांच्या अभ्यास करण्याच्या आणि एकंदरीतच एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामावर आहे. दहावी, बारावी आणि पुढे व्यावसायिक परीक्षांचे एकंदरीत स्वरूप पाहता लक्षात येईल की प्रश्नपत्रिकेचा काही टक्के भाग (काही वेळचे अपवाद वगळता) हा सर्वांना सोडविता येईल असा असतो जेणेकरून पोटापाण्यापुरता अभ्यास करणारे उत्तीर्ण होवू शकतात. त्यानंतरच्या प्रश्नांची काठीण्य पातळी मग वाढत जाते. त्यांची उत्तरे देण्यासाठी विषयाचे खोलवर ज्ञान असणे आवश्यक असते. विषयाचे खोलवर ज्ञान एका दिवसात विकसित होत नाही. त्याला बरीच साधना लागते. प्रत्येक विषयात काही कठीण धडे असतात. ते धडे पूर्ण समजण्यासाठी त्यांचे खोलवर वाचन करावे लागतं. हे खोलवर वाचन करताना किमान ३ - ४ तास पूर्ण एकाग्रतेने, मनात बाकी कोणतेही विचार न आणता तो धडा वाचला पाहिजे. मागे म्हटल्याप्रमाणे काही धड्यात 'दोन ओळींच्या मध्ये सुद्धा गर्भितार्थ दडलेला असतो" हा गर्भितार्थ समजण्यासाठी विद्यार्थ्याला "ब्रह्मानंदी टाळी" लागलेली असणे आवश्यक असते. ह्यात अजून एक मुद्दा. असे अनेक विषयातील अनेक गर्भितार्थ आपल्याला त्या त्या वेळी समजलेले असतात परंतु त्याची योग्य प्रकारे नोंद ठेवून परीक्षेआधी त्याची उजळणी करणे आणि आपला मेंदू परीक्षेत हे व्यवस्थित आठवू शकेल ह्याची तयारी करणे हे ही एक कठीण तंत्र विकसित करणे आवश्यक असते.
सकाळची वेळ अभ्यासासाठी उत्तम मानली जाते कारण मनात त्यावेळी दुसरे कोणते विचार नसतात. पण आजची बहुतांशी विद्यार्थी पिढी रात्री जागून अभ्यास करते ज्यावेळी इंटरनेटचे आकर्षण सर्वात जास्त असते. भ्रमणध्वनीवर विद्यार्थ्यांनी इंटरनेट घेणे हे अभ्यासासाठी अगदी घातक आहे हे माझे कर्मठ मत. मी इतका कर्मठ की मी माझ्या भ्रमणध्वनीवर सुद्धा इंटरनेट घेतलं नाही.

सारांश असा की जर तुम्हाला अभ्यासात परिपूर्णता हवी तर विनाव्यत्यय पूर्ण एकाग्रतेने दररोज किमान ३-४ तास अभ्यास करणे आवश्यक आहे. फेसबुक, Whatsapp ह्या गोष्टी ह्या एकाग्रतेने अभ्यास करण्याच्या तुमच्या क्षमतेला बाधा पोहचवू शकतात किंबहुना पोहोचवतातच. आपली ९५ टक्क्याची आणि त्यापुढची सुद्धा क्षमता असते परंतु ही विनाव्यत्यय एकाग्रतेची अभ्यासाची सत्रे आपण जमवू न शकल्याने आपणास कमी टक्क्यावर (म्हणजे ९० वगैरे) समाधान मानावे लागू शकते. ह्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने मनन करणे आवश्यक आहे.

बाकी जीवनात प्रत्येकजण विद्यार्थीच असतो. हे इंटरनेट आपल्या जीवनाच्या परीक्षेवर कोणता परिणाम करीत आहे ह्याचा सुज्ञांनी विचार करून पाहावा!

1 comment:

  1. आदित्य, लिहित राहा ! तुझ्या लिखाणामध्ये एक जीवनानुभव आहे त्याचबरोबर एक वेगळी निरीक्षण शैली पण . ती जपून ठेवण्यासाठी व अधिकाधिक तीक्ष्ण व धारधार करण्यासाठी हा प्रपंच चालू ठेव. अनेक शुभेछ्या !

    ReplyDelete