Friday, November 22, 2013

मन वढाय वढाय! - भाग ३


आयुष्यात बरेच क्षण येतात ज्यावेळी आपल्याला उपलब्ध पर्यायातील एक पर्याय निवडावा लागतो. आपण आपल्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे, वडिलधाऱ्या माणसांच्या सल्ल्याने आणि कधी काही अज्ञात शक्तीने प्रभावित केलेल्या मनाच्या आधारे त्या वेळी हा निर्णय घेतो.  ह्या बिंदुपासून जाणारे दोन्ही / अनेक मार्ग अगदी वेगवेगळ्या दिशेला जाणारे असतात. मनात विचार येतोच की जर आपण त्यावेळी दुसरा एखादा मार्ग निवडला असता तर आयुष्य कोठे गेलं असतं? मागे वळून पाहता आयुष्यातील असे अनेक बिंदू मला ह्या दिवसात आठवत.
१> बारावीला गणित, रसायन आणि भौतिक विषयात २८१ गुण मिळाल्यावर मुंबईत (VJTI /SPCE) स्थापत्य शाखेत प्रवेश घ्यायचा की खाजगी कॉलेजात संगणक शाखेला प्रवेश घ्यायचा की सांगलीला वालचंद कॉलेजात प्रवेश घ्यायचा.  
२> १९९५ साली स्थापत्य शाखेतील पदवी घेतल्यावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं की व्यवस्थापन शिक्षण घ्यायचं?
३> १९९७ साली स्थापत्य क्षेत्रात ८ महिन्यात तीन नोकऱ्या बदलल्यावर अचानक एका मित्राने फोन केल्यावर सहज म्हणून सिंटेलमध्ये मुलाखत देऊन निवड झाल्यावर ज्या क्षेत्रात शिकताना  ६-७ वर्षे घालविली त्याला अचानक सोडावे की त्याचाच ध्यास धरावा
४> २००० साली इंग्लंडात तीन महिन्यासाठी म्हणून गेल्यावर आठ महिने झाले तरी परतण्याची लक्षणे नाहीत. कंपनीचा आणि क्लायंटचा तिथेच राहण्याचा आग्रह. अशा वेळी घराची आठवण आली म्हणून परत येण्याचा निर्णय, परत आल्यावर ३ दिवसात कंपनीचा पुन्हा परत येण्याचा आग्रह परंतु त्यावेळात लग्न जमल्याने आणि वाग्दत्त वधूच्या मी परत जाऊ नये ह्या मताचा आदर करून परत न जाण्याचा निर्णय. आणि मग बरोबरीचा मित्र तिथेच अनेक वर्षे राहून स्थिरस्थावर झाला हे आठवून मनात उठणारे भावनांचा कल्लोळ!
५> असेच पुढे परदेशवास्तव्याची संधी आली म्हणून पत्नीचा नोकरी सोडण्याचा निर्णय 
६> केवळ मित्रांकडून माहित पडलं म्हणून बदललेल्या दोन नोकऱ्या!
असे हे काही सांगण्यासारखे मुद्दे आणि तसेच काही इतर! हे सर्व विचार माझ्या मनात अधूनमधून येत राहत.
त्या कालावधीत मी जुने (म्हणजे अगदी जुने नव्हे!) हिंदी चित्रपट आवर्जून पाहत असे! त्यातील उमराव जान च्या गाण्यांनी माझ्यावर त्या दिवसात फार प्रभाव टाकला! "तमाम उम्र का हिसाब माँगती हैं जिंदगी!" हे एकदा मी असेच मित्रमंडळीत बोलून दाखवले तेव्हा "क्या अभी अस्सी साल के बूढे हो गये हो क्या" असे खास मित्र राम म्हणाला!

Thanksgiving च्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीनंतर सुरु होणारी हॉलिडे सीजन ची गाणी माझी आवडती बनून राहिली होती. 'Let it snow', 'Feliz Navidad' 'Rudolph the red nose reindeer' "walking around Christmas tree" आणि अशी अनेक! संगीताचं एक विशेष असतं, ते भाषेच्या पलीकडे मानवी मनांना जोडण्याचं काम करत. ह्या ऐकलेल्या वाक्यावर मुंबई वसईत कधी विश्वास बसला नसता पण तिथे एकट राहताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र पक्का बसला. 

अजून एक विचार यायचा तो म्हणजे पुढच्या आयुष्यात नोकरी कितपर्यंत करायची? बारावीचे भौतिक आणि गणित ह्या विषयांच्या शिकवण्या सुरु करायच्या  असे माझे फार जुने स्वप्न आहे. त्याची मी सतत रंगीत तालीम त्या दिवसात करीत असे.

शालेय कालावधी तर माझ्या आयुष्याचा न विसरण्यासारखा भाग! त्यातील आठवणी मला बऱ्याच वेळा आठवायच्या.

ह्या कालावधीत असंच कधीतरी मार्चमध्ये कायमचं परत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग घर रिकामी करण्याची प्रचंड धावपळ सुरु झाली. बर्फाळ वातावरणात घरातील वस्तू एकतर मित्रांना द्यायच्या किंवा मुख्य कचरा पेटीजवळ नेऊन ठेवायच्या ह्या प्रकारात बरीच धावपळ होत होती. मग हळू हळू माझे मनन कमी होत गेले. राम आणि कंपूशी जास्त मैत्री होऊ लागली. राम चिकन मस्त बनवायचा आणि १५-२० जणांना घरी जेवायला बोलवायचा त्याचा आवडता छंद होता. मी ही ह्या कालावधीत ठीक जेवण बनवायला शिकलो इतके की भारतातून कोणी परत आलं किंवा परतायला लागलं तर त्यांना सहकुटुंब जेवायला बोलवण्याइतका आत्मविश्वास बळावला! आधी कुकरला डाळीच्या शिट्ट्या घेऊन मग मोठ्या पातेल्यात फरसबी, वाटाणे आणि तत्सम भाज्या आणि हाताला लागतील ते मसाले टाकून मी बनवीत असणारा तथाकथित सांबार सर्व कंपूत प्रसिद्ध झाला होता. शेवटी मग एप्रिलच्या २ तारखेला हा एकांतवास संपवून मी भारतात परतलो!

मागे वळून पाहता ह्या कालावधीने मला बरेच काही शिकविले. मुख्य म्हणजे माणसाची किंमत मला अजून जास्त कळली! कोणाशीही आपले अगदी काही परफेक्ट जमत नाही पण जमवून कसे घ्यायचं हे समजलं. आपण बाहेरच्या माणसांशी किती जमवून घेतो पण मग जवळच्या लोकांशी ह्यातील थोड तरी सामंजस्य दाखवायला आपल्याला कठीण का जात? तसच घराच्या जेवणाला आपण बऱ्याच वेळा नावं ठेवतो पण हे साधे जेवण सुद्धा ताटात येण्यासाठी सुद्धा बरीच मेहनत असते हे पुन्हा एकदा जाणवलं! तरी नशीब ब्लॉग लिखाणाच खुळ त्यावेळी माझ्या मनात त्याकाळी नव्हत! नाहीतर तुमच काही खर नव्हत बर का मंडळी!

आता काहीशी पुनरोक्ती चित्रांच्या बाबतीत. खिडकीतून घेतलेल्या त्या रस्त्याची ही तीन वेगवेगळी रूपं !




असो ह्या तीन भागात शीर्षकापासून मी काहीसा भरकटलो! मनातील वादळापेक्षा बाकीचे अनुभवच जास्त ओळी' खाऊन गेले! होत असं कधी कधी!



 

2 comments:

  1. नमस्कार सर,
    खूपच सुंदर लेख/ अनुभव ,
    आपण आपले लेख अधिकाधिक मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी www.marathiblogs.in या संकेतस्थळावर लेखाची लिंक पोस्ट करू शकता.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete