मध्यमवर्गीय पती पत्नींच्या नात्यात गेल्या काही वर्षात काही स्तित्यंतरे घडून येताना दिसत आहेत.
पतीला परमेश्वर मानणाऱ्या पत्नीची पिढी बहुदा काळाच्या पडद्याआड गेली असावी असे मला वाटतंय.
हल्ली जी सासूच्या रुपात वावरणारी पत्नींची पिढी आहे त्यांनी पतींचे आचार, विचार न पटण्याचा अनुभव प्रथम उघडपणे व्यक्त केला असावा. पण हे व्यक्त करणे ह्या पिढीने आई बहिणीजवळ चार भिंतीआड किंवा अगदी जवळच्या मैत्रिणीपर्यंत सीमित ठेवला असावा. अर्थात ह्यालाही अपवाद असतील परंतु त्यांची संख्या ह्या उदाहरणांना अपवाद म्हणण्याइतकी मर्यादित होती. थोडक्यात म्हणजे ह्या पिढीने विचारस्वातंत्र्य अनुभवलं परंतु आचारस्वातंत्र्य व्यक्त करण्यापासून त्यांना तत्कालीन वातावरणाने, प्रचलित असलेल्या एकत्रित कुटुंबपद्धतीने आणि मर्यादित आर्थिक स्वातंत्र्याने रोखले असावे.
हल्ली जी तीस चाळीशीच्या आसपासच्या वयोगटातील जोडपी आहेत त्यांच्या परिस्थितीचा विचार करूयात. ह्यातील काही नवरे हे त्यांच्या आईने जुन्या पद्धतीने जडणघडण केलेले आहेत. इतर नवऱ्यांना जुन्या पद्धतीच्या बाळकडूचा जोरदार डोस मिळाला नसावा. हीच गोष्ट ह्या पिढीतील पत्नीविषयी म्हणता येईल. अशा प्रकारे जुन्या संस्काराचे जोरदार बाळकडू मिळालेले आणि कमी प्रमाणात मिळालेले पती आणि पत्नी अशा चार शक्यता निर्माण होतात. ह्यातील दोन शक्यतांमध्ये पती पत्नीवर समान संस्कार असल्याने त्यांना ह्या मुद्द्यावर जास्त तडजोड करावी लागत नाही. हा केवळ एक मुद्दा, असे बाकीचे काही मुद्दे पाहूयात!
१> प्रत्येकाने आपल्या करीयरला कितीपत प्राधान्य द्यावे. ह्या करीयरमधल्या चिंता, कटकटी किती प्रमाणात घरी आणाव्यात ह्याचा सारासार विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे.
२> पती पत्नींची मोकळ्या वेळात एकमेकांशी असणारी भावनिक गुंतवणूक. ह्या गुंतवणुकीचे संसारातील वाटचालीनुसार बदलणारे प्रमाण.
३> कुटुंबातील साथीदाराचा बदलणारा स्वभाव. पती वयोमानानुसार जास्त कटकट करतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दोन्ही साथीदारांची संवेदनशीलता वेगवेगळी असू शकते किंबहुना असतेच.
४> मुलांची प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी आणि मुलांच्या संगोपनाविषयीच्या दोघांच्या संकल्पना
५> एकमेकांच्या नातेवाईकांबरोबर असलेल्या संबंधाचे स्वरूप आणि प्रमाण
६> आर्थिक लक्ष्याबाबत असणाऱ्या दोघांच्या संकल्पना
७> जोडप्याच्या वास्तव्याचे ठिकाण.
८> आयुष्यातील विविध गोष्टींचे किती दडपण घ्यावे आणि किती आस्वाद घ्यावा ह्या विषयीच्या पती पत्नीच्या संकल्पना.
९> दोघांच्या स्वभावातील दडलेल्या बालकाचे प्रमाण. हे दडलेलं बालक माझ्याकडे तू लक्ष दे असं सतत सांगत असतं. आपल्यातील बालकाची ही हाक कितपत मर्यादित ठेवावी आणि त्याचप्रमाणे आपल्या साथीदाराची छुपी हाक कशी ओळखावी हा मोठा कौशल्याचा मुद्दा!
असे अजून अनेक मुद्दे निघतील. पूर्वी ह्या मुद्द्यात स्त्रीवर्ग सहनशीलता दाखवायचा. आता ती सहनशीलता संपत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. कसोटी आहे पुरुषवर्गाची. स्त्रीने व्यक्त केलेला विरोध डोक्यात राख न घालता कसा हाताळायचा ही मोठी कौशल्याची गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की तिशीच्या आसपास प्रत्येकाची मते बऱ्यापैकी ठाम बनलेली असतात. परंतु त्यातही थोडेफार बदल घडवून आणणे समजूतदारपणाने शक्य असते. अशा संघर्षाच्या क्षणात कोणा एकाचे डोके ठिकाणावर आणणारी तिसरी व्यक्ती असावी
म्हटलं तर आयुष्य फार मोठे आहे, कारण आयुष्यात संघर्ष आहे. सुखाचे क्षण फार कमी येतात आणि तत्काळ निघून जातात. पण संघर्षाला फक्त दोघांनाच तोंड द्यायचं असतं. बाहेरच्या जगात एकदम चांगल्या वागणुकीचा बुरखा घालून वावरणारे लोक सदैव तसेच असतात असे नाही. जोडप्यातील दोघेही एकमेकासोबत सर्वात जास्त वेळ घालवितात त्यामुळे आपण सर्वात जास्त परीक्षण करीत असलेली व्यक्ती म्हणजे आपला जीवन साथीदार. त्याच्याविषयी थोडीतरी सहानुभूती बाळगावी!
शेवटी काय तर एकदा संसारात पडले की संसार आनंदात निभावावा !
No comments:
Post a Comment