Monday, November 4, 2013

एकवीरा देवी, महड गणपती दर्शन - भाग ३


दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास जाग आली. वाफाळलेल्या चहाने सुस्ती घालविली. आता सहलीतील मुख्य कार्यभागाची म्हणजेच देविदर्शनाची वेळ होती. १४ जणांना झोपेतून उठवून तयार करून टेम्पो ट्रेवलरमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडणे ही कठीण बाब होती. सोहम चिनुला साथीला घेवून दुपारच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी जोरदार सराव करत होता.
तरुण महिलावर्गाने तयारीसाठी बराच वेळ घेतला. तोवर आकाशात पश्चिम दिशेला काळ्या ढगांनी बरीच गर्दी केली होती. सूर्याची किरणे त्या काळ्या ढगांवर चंदेरी कडांचे विलोभनीय दृश्य निर्माण करीत होती. ह्या काळ्या ढगांचे अनेक थर आकाशात दिसत होते. मला हे ढग नेहमीच आकर्षित करतात. मी ह्या ढगांची  ब्लॅकबेरीवर अनेक सुंदर (माझ्या म्हणण्यानुसार) छायाचित्रे काढली. वेळ मिळाल्यावर मी ती ह्या पोस्टला जोडीन. आकाशात पूर्वेला अगदी विरळ इंद्रधनुष्य दिसू लागले होते. माझ्या नजरेस ते पडले मग ते मी बाकीच्या सर्वांना दाखविले. मग अधिक क्षमतेच्या कॅमेरांच्या साथीने मंडळींनी ह्या इंद्रधनुष्याला छबिबंद केले. तरुण महिलावर्गाची तयारी एव्हाना आटपत आली होती. परंतु आजूबाजूच्या नयनरम्य परिसराच्या साथीने आपली छायाचित्रे काढून घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हे फोटोसेशन काही काळ चालले. मग वडिलधाऱ्या मंडळीनी गडबड केल्यावर सर्वजण वाहनात शिरले.
बहुदा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून आम्ही निघालो. ह्या भागात काही वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता. आणि आता सूर्याची पिवळी किरणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या तयार होत आलेल्या भाताच्या पिकांवर पडून सुंदर दृश्य निर्माण झाले होते. महामार्गाच्या डाव्या बाजूला किनारा विलेज आणि इतर काही ढाबे दिसत होते. रात्रीचे जेवण ह्यातील कोणत्या ढाब्यात घ्यावे ह्याविषयी मंडळीत चर्चा सुरु झाली. थोड्या वेळाने आम्ही कार्ला लेण्याच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. अचानक १६ जणांचा समूह आलेला पाहून रिक्षावाले खुश झाले. आमच्या गटात महिलावर्ग आणि त्यातही सर्वच तरुण नसल्याने आम्हांला रिक्षांची गरज भासणार हे स्वाभाविक होते. प्रश्न इतकाच होता की सर्वांनी रिक्षा करायची की काही जणांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तपणाची परीक्षा  घेत पायीच टेकडीवर कूच करायचे हा प्रश्न होता. एकंदरीत संपूर्ण गटाची द्विधा मनःस्थिती पाहता सौरभने पुढाकार घेत चार रिक्षा ठरविल्या आणि आम्ही टेकडीवर निघालो. तीव्र चढ कूच करण्यासाठी रिक्षाला धाप लागत होती. आमच्यासमोर एका जोडप्यातील पत्नी चालकाची भूमिका बजावीत होती. चढणीच्या रस्त्यावर क्लच, ब्रेक आणि वेगसंवर्धक ह्यांचा ताळमेळ जुळून न आल्याने तिची गाडी अधूनमधून बंद पडत होती. आणि त्यामुळे मागची रहदारीची कोंडी होत होती. एकदाचं तिला ओवरटेक करून आमची रिक्षा टेकडीच्या मध्यभागी असलेल्या रिक्षातळावर जाऊन पोहोचली. ह्यापुढील मार्ग पायी कूच करायचा होता. एकंदरीत रिक्षावाल्यांच्या ह्या अनुभवाने माझी निराशा झाली. त्यांनी ५ मिनिटाच्या ह्या प्रवासाचे एका रिक्षामागे १२० रुपये घेतले. श्रद्धास्थानी येणाऱ्या भाविकांची अशी अडवणूक करणे योग्य नव्हे.
पुढील चढणीच्या रस्त्यात सोहमने आघाडीचे स्थान राखण्याचा हट्ट धरला. आणि बाकी सर्वांनी त्याला बरं वाटावं म्हणून  त्याला आघाडीस राहून दिलं. ह्या चढणीच्या रस्त्यावरून खालच्या भागातील वस्तीचे दिसणारं दृश्य नयनरम्य होते.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला हार. पूजेचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने होती. साधारणतः दहा मिनिटाच्या चढणीनंतर आम्ही देवळाच्या ठिकाणी पोहोचलो. कारण काही असेना पण आज गर्दी एकदम तुरळक होती. बहुदा दिवाळीचा आधीचा सप्ताह असल्याने लोक दिवाळीच्या तयारीत असतील आणि सर्वांच्याच परीक्षा अजून आटोपल्या नसतील अशी अटकळ आम्ही बांधली. सर्वजण वर येईपर्यंत आम्ही थांबलो. प्राजक्ताच्या आजीनेही जवळजवळ अर्धी चढण पार केली होती. परंतु त्यानंतर तिथल्या ओल्या रस्त्यामुळे तिने परत फिरण्याचा निर्णय घेतला. प्राजक्ताचे काका प्रदीप हे तिच्यासोबत खाली थांबले.
ओटी, फुले अशी सर्व तयारी झाल्यावर महिलावर्गाने आम्हास मंदिरात प्रवेश करण्याची संमती दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक हसतमुख माणूस ढोलक्यावर लयबद्ध नाद निर्माण करून येणाऱ्यांचे स्वागत करीत होता. अशी हसतमुख माणसे भेटली कि खूप बरं वाटतं.
दर्शनासाठी अजिबात रांग नव्हती. त्यामुळे शांतपणे डोळेभरून, मनभरून एकविरा देवीचे दर्शन घेता आलं. प्राजक्ताने ओटी भरली. देवीला साडीही भेट दिली. अशा देवळांत शांतपणे देवीचे दर्शन घेणे हा एक खास अनुभव असतो. एका अलौकिक शक्तीच्या अस्तित्वाची तिथलं शांत वातावरण आपणास जाणीव करून देतं. मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ अशी शक्ती ह्या  विश्वात आहे हे नक्की, ह्या शक्तीच्या कोणत्या रूपावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मला जिथे जिथे ह्या शक्तीच्या अस्तित्वाची अनुभूती होते तिथे मी नतमस्तक होतो. असाच अनुभव मला वसईतील बेण्यावरील आमच्या कुलदेवता आनंदीभवानी हिच्या दर्शनाने होतो. मंदिरातून पाय निघत नसला तरीही मागे जमू लागलेल्या गर्दीचे भान राखणे आवश्यक होते. आम्ही मंदिराबाहेर आलो. त्या समाधानी माणसास आम्ही थोडी रक्कम स्वखुशीने दिली. त्याने एकदम खुशीने ती स्वीकारली. माणसाने कसं असावं तर ह्या माणसासारखं!
पुन्हा एक फोटोसेशन झालं. उतरणीचा मार्ग सोपा होता. आजीसोबत थांबलेल्या प्रदीपकाकांनी आम्ही परतताच वरती दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सोबतीला स्वप्नील होताच. तोवर बाकी सर्वांनी रिक्षा करून परतीचा मार्ग पत्करला. बसमध्ये डासांनी धुमाकूळ घातला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी समोरच्या दुकानातून कॉईल घेण्यात आली. बाकी रिक्षातून उतरल्यावर बाहेर उभ्या असलेल्या सासूबाईच्या पायाच्या कडेवरून सुरु झालेल्या रिक्षाचे चाक गेले होते त्यामुळे त्या वेदनेत होत्या. १४ जण आता डोंगरावरून परतीच्या रस्त्याकडे वाट पाहत बसले होते. काही वेळातच काका आणि स्वप्निल ह्यांच्या परिचित आकृत्या उतरणीच्या मार्गावरून येताना दिसल्या आणि बसमध्ये थोडा कलकलाट झाला. आपल्याकडे सर्वांचे लक्ष असणार ह्याची त्या दोघांना जाणीव होतीच. त्यामुळे त्या संधीचा फायदा उठवीत त्यांनी त्या उतरणीच्या रस्त्यावर आपल्या नृत्यकौशल्याची थोडी झलक दाखविली. बसमधील सर्वांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली आणि "पुन्हा एकदा" अशी मागणी केली. शेवटीच्या टप्प्यात आल्यावर त्या दोघांनी पुन्हा एकदा त्या पदलालित्याची झलक दाखविली.
आता पोटोबाची सोय करणे भाग होते. बसमध्ये दोन गट होते. एक गट किनाराच्या बाजूने होता तर दुसरा दुसऱ्या एका हॉटेलच्या बाजूने! शेवटी किनाऱ्याचा विजय झाला आणि टेम्पो ट्रेवलर किनाऱ्याच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश करता झाला. प्रवेशद्वारापाशी उंट, घोडे होते. थोडं आत गेल्यावर गीरच्या प्रसिद्ध गाईचे दुध मिळेल असा बोर्ड लावण्यात आला होता. त्या गाईचा गोठा थोडा पुढे होता. मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त भाग राखून ठेवण्यात आला होता. इतक्या विस्तृत परिसराच्या मध्यभागी एक गझल गायक आपल्या साथीदारांसमवेत आपल्या सुरेल आवाजात दर्दभऱ्या गझल गात होता. सर्व परिसरात मंद प्रकाशयोजना करण्यात आली होती. एकंदरीत वातावरण सुंदर होते. लहान मुले उंट, घोड्यावरून रपेट घेत होती. आम्ही आधी जी बसण्याची जागा स्वीकारली होती तिथे सोहमला काहीसा वेगळा दर्प आल्याने आम्हांला जागबदल करावा लागला. शनिवार असल्याने मी शाकाहारी पर्याय स्वीकारला, बहुमत मांसाहारी पर्याय स्वीकारलेल्या गटाचे होते. त्यातसुद्धा चिकनचे स्टार्टर आल्यावर शाकाहारी गटातील दोघांनी न राहवून पक्षांतर केले. त्यामुळे आम्ही अगदीच अल्पमतात आलो. जेवण चांगले होते. मी शाकाहारी असलो तरी त्यावर आडवा हात मारला. बच्चेमंडळी एव्हाना पेंगुळायला लागली होती.
मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतल्यावर बाकीच्या दोन बंगल्यात पाहुणेमंडळींचे आगमन झाल्याचे आढळून आले आणि त्यामुळे आमची थोडी निराशा झाली. नाहीतर त्या बंगल्यावर कब्जा करण्याची सुप्त इच्छा आम्ही मनी बाळगून होतो. पुढील पंधरा वीस मिनिटात मंडळी घरच्या कपड्यात स्थिरस्थावर झाली. एव्हाना रात्रीचे दहा सव्वादहा झाले होते. विश्रामस्थानी परतताच बच्चेमंडळीची झोप उडाली होती आणि ती पूर्ण सक्रिय झाली होती. सोहमची सौरभला उनो ह्या पत्त्यांच्या खेळात हरविण्याची सुप्त इच्छा सायंकाळपासून जागृत झाली होती. त्या दोघांच्या एकमेकाला पराभूत करण्याच्या ललकारी बराच वेळ सुरु होत्या. त्यांना आता प्रत्यक्ष खेळाचे रूप लाभले. बाजूला श्राव्या आणि स्वप्निल पत्त्यांचा नियम नसलेला मुक्त खेळ खेळत होते. थोड्याच वेळात श्राव्याचे लक्ष दुसरीकडे खेचण्यात आम्ही यश मिळविले आणि पत्त्यांवर आणि बसण्याच्या जागेवर कब्जा मिळविला. आणि मग माझा आवडता खेळ मेंढीकोट सुरु झाला. सुरुवातीला मी आणि स्वप्निल विरुद्ध प्राजक्ता आणि प्रांजली असे संघरचना होती. कट हुकुम ह्या पद्धतीने हुकुम ठरविण्यात येणार होता. मेंढीकोट ह्या खेळात आपल्या साथीदाराला खाणाखुणा करणे, पकडले  न जाता लबाडी करणे ह्यावर तुमचा विजय अवलंबून असतो. ह्यातील काही तंत्रे अशी.

१> लपवून हुकुम करण्याची पद्धत अवलंबली असल्यास, ज्याने हुकुम लपविला आहे तो हळूच पायाच्या हालचालीने आपल्या साथीदारास पत्ता दाखवितो. मग तो समोरचा साथीदार कान, नाक, जीभ ह्यांच्या मदतीने हुकुम लपविलेल्या व्यक्तीस हुकुम सांगतो.
२> समजा तुमच्याकडे एका प्रकारचे (किल, बदाम, इस्पिक किंवा चौकट) ह्यातील एकच पान आणि तेही मेंढी असल्यास तिचे भवितव्य साथीदाराकडे असलेल्या एक्क्यावर किंवा त्याने हुकुम फोडण्यावर अवलंबून असते. अशा ते सुद्धा तुम्हांला खुणेने त्याला सांगता आले पाहिजे. बऱ्याच वेळा मेंढी जाऊ नये म्हणून आपण कट नसताना सुद्धा कट असल्याचा भाव आणून हुकुम फोडावा किंवा नवीन हुकुम करावा. पुढे प्रतिस्पर्धी जर आपल्यावर खास लक्ष ठेवून असेल तर शेवटचे एक दोन हात बाकी असताना आता सर्व मेंढ्या संपल्या असे म्हणून तो डाव संपवावा.
प्रांजली आता पूर्ण फॉर्ममध्ये आली होती. किलवर हुकुम प्राजक्ताला सांगण्यासाठी तिने अचानक 'फुलाफुलांच्या घालून माळा' हे गाणे म्हणण्यास प्रारंभ केला. नियमाचे उल्लंघन होतेय हे सांगून आम्ही हा डाव फोक्स (ह्या शब्दाची  व्युत्पत्ति कशी झाली  असावी हा संशोधनाचा विषय!) केला. तिने अजून एक गाणे किलवर ह्या हुकुमासाठी वापरले ते आता आठवत नाही. त्यानंतर सौरभ आणि अर्पिता सहभागी झाले. आता तीन महिला विरुध्द तीन पुरुष अशी संघरचना  झाल्याने शाब्दिक चकमकींना जोर चढला होता. मध्येच सौरभनेही 'मी असा कसा, मी असा कसा' असे गीत गात चौकट हुकुमाचा संकेत करण्याचा  अयशस्वी प्रयत्न  करीत डाव फोक्स करून घेतला. मध्यंतरीच्या काळात महिला वर्गावर दोन कोट चढविण्यात आले होते आणि बराच वेळाने त्यांनी आमच्यावर कसाबसा एक कोट चढविला. बाजूला झोपलेले अरुण काका आपल्या अधूनमधून घोरण्याच्या आवाजाने ह्या शाब्दिक चकमकींना  उत्तम पार्श्वसंगीत देत होते. शेवटी साडेबाराच्या सुमारास दोन्ही संघांनी एकमेकांच्या फसवणुकीला कंटाळून हा खेळ संपविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे पुरुषवर्गाने हा सामना २ -१ असा जिंकला. महिला संघातील कोणी हा ब्लॉग वाचून २-१ ह्या गुणसंख्येविषयी शंका उत्पन्न करणारी कॉमेंट टाकल्यास वाचकांनी त्या कडे दुर्लक्ष करावे!
(क्रमशः)

No comments:

Post a Comment