Tuesday, September 30, 2014

दुरावा - ४

 
मारियाने मग मावशी अल्बिनाच्या घराचा ताबा घेतला. घर बऱ्यापैकी मोठं होतं. मुख्य म्हणजे मोठा हॉल होता, त्यामुळे मावशीने बोलाविलेल्या पंचवीस तीस पाहुण्यांना कसं सांभाळायचं ह्याची चिंता करायचं कारण नव्हतं. आधी काही काळ सर्व काही शांतपणे निरखत बसलेल्या इवाने मग हळूहळू स्वयंपाकघराचा ताबा घायला सुरुवात केली. सैबेरिअन डम्पलिंग बनविण्यात तिचा हातखंडा होता. काही वेळातच डम्पलिंग मस्तपैकी आकार घेऊ लागले आणि त्यांचा खमंग सुगंध घरभर पसरला. मारियाने वेलकम ड्रिंक आणि वोडका विभागांची जबाबदारी उचलली होती. मावशी मेन कोर्सच्या मागे लागली होती. चिकन, रेड मीट ह्यांचे विविध पदार्थ आणि पास्ताच्या डिशेस ह्या मध्ये तिचा हातखंडा होता. काही वेळाने इवाला थोडी फुरसत मिळाली. तिच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. कोपऱ्यात नाराज होऊन बसलेल्या इवाकडे तिचं लक्ष गेलं. नजरेनेचं तिने इवाला शांत रहायची खुण केली.
स्वयंपाक जसा आटोक्यात आला तसा तिघीजणी गप्पा मारायला बसल्या. परंतु इवाला मात्र ह्या गप्पांत करमेना. तिने त्यांची रजा घेऊन ती बाहेर एक चक्कर मारायला गेली. संध्याकाळी कोण कोण येणार ह्यांची नावं मावशी मारियाला आठवून आठवून सांगत होती. इतक्या मावश्याजी ग्रेगरी ह्यांनी येउन मावशीची थोडी चेष्टा मस्करी केली. "आणि हो कझानवरून आलेल्या तुम्ही दोघीच नाही हो! माझा मित्र विवीयन अरीस्तोव आणि त्याची पत्नी सुद्धा येणार आहेत!" ग्रेगरी म्हणाले. "मला न सांगता तुम्ही अजून किती जणांना बोलावलं आहे, ते एकदा पूर्णपणे मला सांगायची तसदी घ्याल का?" मावशी लटक्या रागानं बोलली. ऐन वेळी पूर्वसूचना न देता ग्रेगरीने बोलविलेल्या त्याच्या पाहुण्यांना सुग्रास जेवण खाऊ घातल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे खुशीचे भाव आपल्या नजरेत सामावण्यात गेले पंचवीस वर्षे ती आनंद मिळवत आली होती."हो एलेनाला जशी काय तू ओळखतच नाही वाटत!" ग्रेगरीने तिला टोमणा मारायची संधी सोडली नाही.
बघता बघता सायंकाळ झाली. आपला वेडिंग गाऊन घालून आलेली अल्बिना अगदी सुंदर दिसत होती आणि तिच्या सोबतीला देखणा ग्रेगरी होताच. आपल्या संसारवेलीवर कधी फुल उमललं नाही ह्याचं ह्या क्षणी उफाळून येणारं दुःख बाजूला सारून सर्व पाहुण्यांच्या स्वागतात ते रंगून गेले होते. एकेक करून पाहुण्याचं आगमन होत होतं आणि मारिया, इवा दोघीजणी पाहुण्याच्या स्वागतात गढून गेल्या होत्या. बऱ्यापैकी सर्व पाहुणे आल्यावर इवा जरा फ्रेश होण्यासाठी म्हणून आत गेली. "अजून विवियन का बरं आला नाही बरं!" ग्रेगरी ह्यांनी पुटपुटायला आणि दाराची बेल वाजायला एकच वेळ साधली गेली.
"वेलकम माय डियर फ्रेंड!" आपल्या खणखणीत आवाजात ग्रेगरींनी विवियन आणि एलेनाचे स्वागत केले. विवियन आणि ग्रेगरींनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. काही क्षणांनी विवियन "एक मिनिटं हं! असे म्हणून बाहेर जाऊ लागले. "सर्जी आम्हांला सोडायला आला होता. बऱ्याच वर्षांनी इथे आलो त्यामुळे हे तुझेच घर का ह्याविषयी खात्री नव्हती म्हणून त्याला बाहेर थांबायला सांगितलं" विवियनच्या ह्या उदगारांनी ग्रेगरी आणि अल्बिनाच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजीचे भाव उमटले. ग्रेगरीने जवळजवळ बळाचा वापर करून विवियनला खुर्चीत बसवलं. आणि स्वतः सर्जीला भेटायला बाहेर गेले.
दोन तीन मिनिटात नाराजीचे पराकोटीचे भाव चेहऱ्यावर घेऊन आलेल्या सर्जीला ग्रेगरी हॉलमध्ये घेऊन आले. आपण ह्या सर्व म्हाताऱ्या मंडळीच्या कोणत्या संकटात सापडलो ह्याचा प्रचंड खेद सर्जीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सर्व म्हातारी मंडळी मोठ्या कौतुकाने सर्जीकडे पाहत होती. मारियादेखील सर्जीच्या व्यक्तिमत्वाने भारून गेली होती. परंतु सर्जी ह्या नावाचा आणि कझान शहराचा संदर्भ तिच्या मनात वेगळीच शंका निर्माण करीत होता.
इतक्यात ग्रेगरीच्या "ओह Here comes the most Beautiful Lady of the Evening" ह्या स्वरांनी सर्वांचं लक्ष हॉलच्या दुसऱ्या टोकाने प्रवेश करणाऱ्या इवाकडे गेले. नाईलाजाने सर्जीने सुद्धा मागं वळून पाहिलं आणि तो आपलं भान हरवून बसला.
पार्टी सुरु झाली होती. मंद संगीत सुरु होतं. सर्वजण ग्रेगरी आणि अल्बिनाला आणलेल्या भेटवस्तू देत होते. इवाच्या हृदयात अर्ध्या तासापूर्वी सुरु झालेली जोरदार धडधड थांबण्याचं नाव घेत नव्हती. मारियाने तर तिला नजरेनेच तू किती सुदैवी आहेस असा अभिनंदनाचा संदेश दिला होता. सर्व पाहुण्यांची भेट झाली हे पाहून ग्रेगरीने "The Floor is open for Dance" अशी घोषणा केली. "पंचवीस वर्षे झाली तरी ह्याला अल्बिना बरोबर नृत्य करायची किती घाई!" एक मित्राच्या ह्या मजेशीर उद्गारांनी सर्वत्र हास्याचे फवारे उडाले.
हुशार मारियाने अजून एका वयस्क मावशीच्या मैत्रिणीला आपल्यासोबत पाहुण्यांची सरबराई करायला घेतलं. एव्हाना मंच सर्व वयस्क जोडप्यांनी भरला होता. नृत्यात कुशल असलेल्या विवियन आणि एलेनाचाहि त्यात समावेश होता. मंद प्रकाश असला तरी त्यात नजरेचे खेळ खेळणाऱ्या त्या तरुण प्रेमी युगुलाला रंगे हात पकडण्यात अनुभवी ग्रेगरीला वेळ लागला नाही. आणि आपल्या नजरेनेच त्यानं संगीत थांबविण्याची खुण करून "आजच्या सर्वात देखण्या जोडप्याला मी आता मंचावर आमंत्रित करीत आहे" अशी घोषणा केली. आपल्या पायाखालची जमीन दुभंगून आपल्याला आत घेईल तर बरं असेच इवाला वाटून गेलं. "आपण नृत्याचे धडे घ्यायला हवे होते आणि थोडीजरी कल्पना असती तर जरा चांगले कपडे घालून असतो" असा विचार करणारा सर्जी आता पुढील प्रसंगाला कसे तोंड द्यायच ह्याचा विचार करीत होता.
चवदार जेवण, संगीत, नृत्याने भरलेल्या त्या मॉस्कोतील एका प्रेममय सायंकालची ही तर फक्त सुरुवात होती.

(क्रमशः)


 

Sunday, September 28, 2014

दुरावा - ३

 
आठवडाभरच्या बँकेच्या प्रशिक्षणवर्गासाठी सर्जी रविवारी संध्याकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या हिल स्टेशनला चालला होता. इवाची आठवण तर त्यालाही यायचीच पण तो बराच व्यवहारी होता आणि त्यापेक्षाही खूप मानी होता. प्रेम आणि आत्मसन्मान ह्यात निवड करायची तर शंभरातल्या नव्वदवेळा त्याने आत्मसन्मानच निवडला असता. म्हणायला गेलं तर मेंदू आणि हृदय ह्यांच्यातल्या संघर्षाचा मामला होता. पण उरलेल्या १० वेळांचे काय? ज्या ज्या वेळी हृदयातील भावना उफाळून येत त्यावेळी सर्जी अगदी बेचैन होत असे. अगदी मॉस्को सोडून कझानला परत जायचा निर्णय सुद्धा घेत असे आणि बॅगाही भरू लागे. पण शेवटचं पाऊल उचलायच्या वेळी मात्र त्याचं डोकं नेमकं जागं होई आणि मग तो आवरतं घेई.
आतासुद्धा हिल स्टेशनच्या प्रवासात पूर्ण वेळ इवाच त्याच्या मनात होती. आणि अचानक समोरच्या बसमध्ये ती दिसताच क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आणि जेव्हा विश्वास बसला तोवर त्याच्या बसला मात्र निघायची घाई झाली होती. त्याने ताबडतोब बस ड्रायव्हरला बस बाजूला घ्यायला लावली होती. बसमधून घाईघाईने उतरल्यावर मात्र वेगाने दूर जाणारी इवाची बस पाहणेच त्याच्या नशिबी आलं. बाकी त्याच्या बसमध्ये बँकेमधील मोठे अधिकारी असल्याने त्याला भानावर येणं भाग पडलं. सर्वांच्या चमत्कारिक नजरांना तोंड देत सर्जी मुकाट्याने आपल्या सीटवर येऊन बसला.
हिल स्टेशनवर पोहोचल्यावर सर्वांनी आपल्या खोलींचा ताबा घेतला. ताजातवाना होऊन सर्जी स्वागतकक्षात आला. तिथे त्या हॉटेलातला कर्मचारी फ्रंट डेस्कवरील रिसेप्शनिस्टला एक स्कार्फ परत करीत होता. "मगाशीच जो मुलींचा गट परत गेला, त्यातल्या एकीचा हा स्कार्फ आहे. विसरून गेली ती आपल्या खोलीत!" कर्मचारी रिसेप्शनिस्टला सांगत होता. सर्जी होता तर खरा आपल्याच तंद्रीत पण अचानक त्याचं लक्ष त्या स्कार्फवरील अगदी कलात्मकरित्या कोरलेल्या E आणि S ह्या अक्षरांकडे गेलं. "अरे हा तर आपण इवाला घेऊन दिलेला स्कार्फ!" त्याच्या डोळ्यात तात्काळ उजेड पडला. अजूनही मेंदूच हृदयावर वर्चस्व राखून होता. त्याने त्या कर्मचाऱ्याला जाऊ द्यायची वाट पाहिली आणि मग हळूच तो रिसेप्शनिस्टकडे गेला. त्याची ही दुनियावेगळी विनंती रिसेप्शनिस्टने साफ धुडकावून लावली. "आमच्या नियमात हे बसत नाही; माझी नोकरी जाईल!" रिसेप्शनिस्टने नियमावलीकडे बोट दाखवलं.
पूर्ण निराश होऊन सर्जी हॉटेलबाहेर चक्कर मारायला निघाला. पुढील आठवडाभर हे प्रशिक्षण सहन करायचं म्हणजे त्याच्या अगदी जीवावर आलं होतं. थोडाफार पुढे जाताच थंडीचा बोचरेपणा त्याला अधिकाधिक जाणवू लागला आणि मग त्याने हॉटेलवर परतायचं ठरवलं. हॉटेलच्या जवळ येताच त्याचं लक्ष बाहेर पडणाऱ्या रिसेप्शनिस्टकडे गेलं. पुन्हा त्याचा राग उफाळून आला. स्वागतकक्षात येताच त्यानं पाहिलं की फ्रंट डेस्कवर कोणीच नव्हतं. संध्याकाळची वेळ असल्याने आता कोणी नवीन पर्यटक येण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळेच आपली वेळ होताच ही बया निघून गेली असावी असा त्याने कयास काढला. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला. अजूनही तिथं कोणीच नव्हतं. सर्जी पटकन फ्रंट डेस्कजवळ गेला आणि आतल्या बाजूला त्याने डोकावून पाहिलं. स्कार्फ तिथेच होता. पटकन त्याने आपल्या शर्टात तो कोंबला आणि तो तात्काळ आपल्या खोलीत जाऊन पोहोचला. आजचा दिवस अगदीच निराशेचा नव्हता तर!!
सर्जीचा आठवडा प्रशिक्षणात अगदी व्यग्र गेला. सकाळी आठ वाजता सुरु होणारे प्रशिक्षण वर्ग सायंकाळी सात वाजेपर्यंत चालायचे. ज्याची वाट पाहत होता ती शुक्रवार संध्याकाळ एकदाची आली. मॉस्कोला निघणाऱ्या बसमध्ये बसल्यावर सर्जीला बरं वाटलं. म्हटलं तर प्रशिक्षण वर्गात चांगली कामगिरी झाल्यानं तो खुशीत होताच. बस निघाली आणि थोड्याच वेळात मागच्या रविवारी इवाची आणि त्याची जिथं चुकामुक झाली तो स्पॉट आला. आजही तिथे थोडा ट्राफिक जॅम झालाच होता. हृदयाने मेंदूवर वर्चस्व मिळविण्याचा काळ सुरु झाला होता. जुनी रशियन गाणी आठवत बसच्या खिडकीमधून दिसणाऱ्या चंद्राकडे पहात सर्जी मॉस्कोचा रस्ता काटत होता. कोणाचं लक्ष नाही ह्याची खबरदारी घेत त्याने स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळला होता.
इवा आणि मारियाचा मॉस्कोला जायचा बेत तसा पक्का झाल्याने इवा तशी खुशीत होती. ह्या खुशीने सर्जीने दिलेला स्कार्फ आपण गमावला ह्याचं दुःख काहीसं कमी झालं होतं. आपल्याला मॉस्कोला सर्जी भेटेल आणि मग त्याच्याकडे आपण नवीन स्कार्फचा हट्ट धरू असा विचार करण्यात ती मग्न झाली होती.
मॉस्कोला पोहोचेस्तोवर बरीच रात्र झाली होती. एक सॅंडविच खाऊन सर्जी झोपी गेला. शनिवारी सकाळी गाढ झोपेत असतानाच दारावर वाजणाऱ्या सततच्या बेलने त्याची झोपमोड झाली. डोळे चोळतच त्याने दरवाजा उघडला तर समोर त्याचे आईबाबा होते. "तुम्ही असे अचानक कसे आलात?" सर्जीने काहीसं आश्चर्यचकित होऊन विचारलं. "अरे तुला वॉईसमेल सोडला होता तो तू ऐकला नाही वाटतं!" सर्जीच्या रूमची नजरेने तपासणी करीत त्याची आई उदगारली. सर्जीची नजर फोनकडे गेली. फोनच्या वॉईसमेल बटनावरील लाल खुण अजूनही मिणमिणत होती. "हं मी काल रात्री उशिराने आलो म्हणून बघायचं राहून गेलं!" सर्जी उत्तरला. एव्हाना आईने त्याच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला होता. स्वयंपाकघर अगदी व्यवस्थित ठेवलेलं पाहून ती मनातून अगदी खूष झाली होती!" बाकी आईवडिलांच्या भेटीचं तसं खास कारण नव्हतं. महिन्यातून एकदा ते तसे सर्जीला भेटायला येतच. आणि ह्यावेळी आईच्या मैत्रिणीकडे शनिवारी संध्याकाळी पार्टी होती. तिथेही त्यांना जायचं होतं.
मारिया आणि इवा शनिवारी सकाळीच मावशीकडे येवून थडकल्या. मावशीच्या घरी अगदी गडबडीच वातावरण पाहून मारिया अगदी चपापली. "अग आज आमच्या लग्नाचा २५ वाढदिवस म्हणून हा छोटासा समारंभ! मी तुला फोन करणारच होते आणि मग तुझाच फोन आला. मी म्हटलं मिळू दे हिला थोडासा आश्चर्याचा धक्का!" मावशीच्या ह्या स्पष्टीकरणावर मारियाकडे उत्तर नव्हतं. इवा मात्र खट्टू झाली होती. दोन्ही दिवस जर ह्या समारंभात गेले तर आपण ज्या कामासाठी आलो ते तसेच राहून जाणार असंच तिला वाटलं! परंतु आता इलाज नव्हता. सगळीकडे गडबड चालू होती. "आणि ही तुझी मैत्रीण किती सुंदर दिसतेय! नाव काय बरं हिचं?" मावशीच्या प्रश्नाने इवाचं विचारचक्र भंगल! "इवा" ती उत्तरली. "लग्न जमलं का गं पोरी तुझं!" मावशीचं प्रश्नचक्र सुरूच होतं. आता मात्र मारिया तिच्या मदतीला धावली. "हो जमलंय तिचं लग्न! उद्या तिच्या हिरोला भेटायला ती जाणार आहे!" फटकळ मारियाने उत्तर दिले. नाहीतर एव्हाना आपल्या मावशीच्या डोक्यात इवासाठी स्थळनिश्चिती झाली असेल असा कयास तिने बांधला होता.

(क्रमशः)


 

Thursday, September 25, 2014

व्यक्तिवादी दृष्टिकोन जिंकला, राज्य हरलं, रयत हरली!

 
राज्याचं व्यापक हित पाहण्याची सुवर्णसंधी सर्व पक्षांनी गमावली. कोण्या एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता नक्कीच कमी झाली आहे. निवडणुकीनंतर १४५ चा आकडा गाठण्यासाठी कोणत्या पातळीवर तडजोडी केल्या जातील ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही!

दिल्लीत गेले काही महिने राज्यसरकार अस्तित्वात नाही. महाराष्ट्र सुद्धा त्याच वाटेवर जाणार की काय? राज्याच्या व्यापक हिताची जबाबदारी घेण्यासाठी हे सारे पक्ष जबाबदार नाहीत का?
शिवसेना - आदित्य ठाकरेसारख्या नवतरुणाला भाजपासारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षासोबत वाटाघाटीला पाठून शिवसेनेने काय साधलं? आदित्यची एक नेता म्हणून प्रतिमा उंचावणं हे त्यांना अधिक महत्वाचं वाटलं काय? आता मराठी माणसाच्या भावनांना साद घालून मतदान करण्याचं आव्हान बहुदा केलं जाईल. 

भाजप - काही दिवसापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल अगदी डोळ्याआड करणं चुकीचं आहे! गोपीनाथ मुंडेजीच्या प्रगल्भपणाची उणीव नक्कीच त्यांना जाणवली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीने पूर्ण महाराष्ट्र काबीज केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मिळविलेली पकड ह्या विधानसभा निवडणुकीत घट्ट करण्याची सुवर्णसंधी ह्या दोन्ही पक्षांनी गमावली.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर बहुदा ह्या दोन घटक पक्षातील विश्वास पूर्ण मावळला आहे. आणि त्यामुळे अगदी शरद पवार आणि सोनिया गांधी ह्यांना सुद्धा वाटाघटीत भाग घेण्याची इच्छा झाली नाही.
मनसे - साधारणतः पाच वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने राज ठाकरे ह्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं. परंतु सुरुवातीच्या झंझावातानंतर मात्र त्यांची अनुपस्थितीच जाणवत राहिली.

हे पाचही पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याची क्षमता बाळगून असतील सुद्धा, पण इतक्या कमी अवधीत त्यांना ते कितपत साध्य होईल हा प्रश्न आहे. दोन दिवसात मनसे सोडून बाकीचे चारजण जवळपास अडीचशेच्या आसपास उमेदवार शोधणार आणि अर्ज भरणार! एका प्रगल्भ लोकशाही नांदत असलेल्या देशातील प्रगतीपथावरील राज्यातील हे चित्र'नक्कीच उत्साहवर्धक नाही!

मी एक सामान्य माणूस! कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीशी बांधिलकी नसलेला! (हल्ली एका तरी पक्षाला राजकीय विचारसरणी शिल्लक राहिली आहे का हा वादाचा मुद्दा! थोड्याफार प्रमाणात भाजपचा त्याला अपवाद म्हणता येईल). राज्याचं हित पाहणारं सरकार सत्तेवर यावं अशी  माझी आणि माझ्यासारख्या अनेक सामान्य लोकांची इच्छा! त्यापलीकडे राजकारणाशी आणि त्या पक्षांची माझं देणघेणं नाही! केवळ स्थिर सरकार देऊ शकणारा एक खंबीर नेता ज्याच्याकडे ह्या त्या पक्षाला भारतीय जनतेने लोकसभेत निवडून दिलं. आज महाराष्ट्राला प्रकर्षाने उणीव जाणवत आहे ती आपल्या पक्षाच्या निर्णयाचे, कारभाराचे उत्तरदायीत्व स्वतःच्या डोक्यावर घेऊन जनतेपुढे येणाऱ्या एका नेत्याची! दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवबांच्या महाराष्ट्रात एकही नेता तसा डोळ्यासमोर येत नाही. शेवटी काय बुधवारी मतदान आल्यानं लोक मतदान मोठ्या संख्येने करतील. बहुदा उमेदवाराचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून मत देतील. पण शेवटी स्थिर राज्यसरकार येण्याची शक्यता सध्यातरी धुसर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या प्रगतीच्या चित्राने निर्माण झालेला आशावाद सध्यातरी पूर्ण लयाला गेला आहे!

Tuesday, September 23, 2014

एका शहराची अदृश्य बाजू !!

 
काल परवा एका मराठी पेपरात मथळा वाचला. "मुंबईत गेल्या दोन दिवसात पाच आत्महत्या!" मुंबई शहराचं वैशिष्टय म्हणजे इथे लोक भुकेने मरत नाहीत. ज्या कोणाची हातपाय हलवायची इच्छा आणि क्षमता आहे त्याला इथे रोजगार मिळतो आणि तो माणूस रोजीरोटी कमावू शकतो. तरीही नैराश्येने ग्रासलेल्या लोकांची संख्या इथे खूप आहे. काही लोकांच्या बाबतीत ही निराशा परिसीमा गाठते आणि मग ते अशी पराकोटीची कृती करायला प्रवृत्त होतात. ह्यावरील काही मुद्दे!


१) ह्या शहरात यशस्वी माणसाचे सतत गुणगान केलं जातं. जी माणसं खरोखर यशस्वी असतात त्यांच्यासाठी हे उत्तम! पण बाकीच्यांसाठी आयुष्यात यशस्वी होण्याचा सतत दबाब असतो. आणि यशस्वितेच्या व्याख्या शहराच्या विविध वर्तुळात बदलत असतात. एखाद्या माणसाने प्रगती करून वरच्या वर्तुळात प्रवेश केला तर तिथं यशस्वितेच्या व्याख्या अजून पुढे गेलेल्या असतात.
२) ह्या शहरात लोक बऱ्याच वेळा क्षणिक यशाचा / अपयशाचा खूप विचार करतात. परंतु आपल्याला एक मोठं आयुष्य लाभलं आहे त्या मोठ्या आयुष्याच्या संदर्भात एक महिना, एक वर्षं किंवा तीन चार वर्षं वाईट गेली तरी काही जास्त फरक पडत नाही असा विचार फार थोडे लोक करतात.
३) अंथरूण पाहून पाय पसरावे ही मराठी भाषेतील म्हण लोक लक्षात ठेवत नाहीत. आपल्याला सुरुवातीचा काही काल यश मिळालं म्हणून सतत मिळतच राहील असे नाही. आयुष्यात रिस्क तर घ्यायला हवी पण त्यासाठी आयुष्यभराची पुंजी पणाला लावणं चुकीचं! कोणत्याही उद्योगात प्रवेश करताना त्यात १०० % नुकसान झालं तरी आपल्याला डोक्यावर छप्पर आणि जेवायला वरण भात राहील इतकी तरतूद असायला हवी.
४) आयुष्यात यशस्वी झालं तरी सर्व थरातील लोकांशी संपर्क कायम ठेवावा. त्यामुळे जीवनातील अनुभवांची विविधता वाढते. मुख्य म्हणजे आपल्या जीवनातील प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. ह्या दृष्टीने गावातील लोक सुखी असतात, त्यांना दररोज बाजारात, नाक्यावर विविध थरातील लोक भेटतात. आणि हो एक मान्य करायला हवं की आपल्यासारखं दुःख दुसऱ्याला सुद्धा असलं की आपल्याला साथीदार असल्याची भावना निर्माण होऊन थोडं बरं वाटत!
५) मराठी (मातृभाषेतील) माध्यमाच्या शाळेत वातावरणात औपचारिकपणा कमी असे, हल्लीच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत वातावरण फारच औपचारिक झालं आहे आणि त्यामुळे पुढील पिढीच्या विचारात सुद्धा यांत्रिकपणा येईल की काय अशी भीती वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.
६) वैवाहिक आयुष्यातील तणाव! पूर्वीचं एकत्र कुटुंब जरी वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी अनुकूल वातावरण देत नसलं तरी एखाद्या जोडप्याच्या जीवनात तणाव निर्माण झाल्यास मात्र बाकीचे लोक संवादासाठी उपलब्ध असत. आणि बाकीच्या जोडप्यांची भांडणं सुद्धा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याने एखाद्या भांडणामुळे डोक्यात राख घालून घेऊ नये इतका धडा तर नक्कीच मिळे!
७) आजारपण! प्रदीर्घ आजारपणामुळे काही लोकांना नैराश्य येतं. ह्यातून कसं बाहेर पडायचं ह्यासाठी विविध गट उपलब्ध असतात. त्यातील लोकांशी संपर्क साधावा. आजारपण आणि पैशाची तोकडी बाजू ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मात्र स्थिती बिकट होईल हे मात्र नक्की!

आधीसुद्धा मी एकदा म्हटलं होतं. हल्ली लोकांना आपली दुःखं जगापासून लपवून ठेवण्याची सवय लागली आहे. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण काही लोकांना मात्र ह्या सत्याचा विसर पडतो आणि मग आपलंच दुःख कसं मोठं आहे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो. आणि ह्या नैराश्यपूर्ण विचाराचा वेळीच निचरा न झाल्यास बिकट परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे एकच सल्ला - आपले जीवाभावाच्या मित्रांना, नातेवाईकांना  कधी दूर जाऊ नकात! आणि हो ज्यावेळी नोकरीधंद्यातून निवृत्त व्हाल तेव्हा शक्य असेल तर आपल्या गावी जाऊन स्थायिक व्हा! ह्या शहरात निवृत्त लोकांनी आनंदाने आयुष्य घालावयाच्या पलीकडे सध्या स्थिती गेली आहे! खरतरं शीर्षक "एका शहराची निर्दयी बाजू !!" असं द्यायला हवं होतं!  

जर तुम्हांला वाचन, संगीत, नृत्य, गायन, भटकंती किंवा तत्सम छंद असेल तर तुम्ही खूप सुदैवी आहात! दुनियेत चाललेल्या वेडेपणापासून तुमच्या मनाला सुरक्षित ठेवण्याचं कवच तुम्हांला लाभलं आहे!

Saturday, September 20, 2014

ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग २

 
आज आपण दोन किंवा अधिक संख्यांचा म. सा. वि. म्हणजे महत्तम सामायिक विभाजक कसा काढायचा हे पाहूयात. खरेतर ह्यात लक्षात घेण्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे कोणतीही संख्या तिला पूर्ण भाग देऊ शकणाऱ्या संख्याच्या स्वरुपात कशी मांडली जाऊ शकते हा आहे. समजा आपल्याकडे १२० आंबे आहेत तर ते आपण २, ३, ४, ५, ६, ८, १०, १२, १५, २०, २४, ३०, ४० आणि ६० च्या गटात विभागू शकतो. आणि समजा दुसऱ्या कोणाकड १६० आंबे असतील तर तो त्या आंब्यांना २, ४, ८, १०, १६, २०, ४० आणि ८० च्या गटात विभागू शकतो. म. सा. वि. म्हणजे आपण आणि तो दुसरा माणूस ही जी आंबे विभागण्याची क्रिया करत आहोत त्यातील दोघांना सामायिक असणारा मोठ्यात मोठा गट कोणता. वरील उदाहरणाकडे पाहिलं असता ४० हा मोठ्यात मोठा दोघांना सामायिक असणारा गट असल्याचं लक्षात येतं. म्हणजेच ह्या दोघांचा म. सा. वि. ४०.

म. सा. वि. काढण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे
१> पहिली पद्धत

ह्यात ज्या संख्यांचा म. सा. वि. काढायचा आहे त्या संख्यांना त्यांच्या दोन दोन घटक संख्याच्या गुणाकाराच्या रुपात लिहायचं आणि त्या संख्येचे सर्व घटक शोधायचे. समजा आपणास ७२, १४४, ७९२ ह्या तिघांचा म. सा. वि. काढायचा आहे.
७२ = २ * ३६
      = ३ * २४
      = ४ * १८
      = ६ * १२
      = ८ * ९
 म्हणून ज्या संख्यांनी ७२ ला पूर्ण भाग जातो त्या संख्या = १, २, ३, ४, ६, ८, ९, १२, १८, २४, ३६, ७२

१४४ = २ * ७२
        = ३ *४८
      = ४ *३६
      = ६ *२४
      = ८ * १८
      = १२ *१२

 म्हणून ज्या संख्यांनी १४४ ला पूर्ण भाग जातो त्या संख्या = १, २, ३, ४, ६, ८, ९, १२, १८, २४, ३६, ७२, १४४

७९२ = २ * ३९६
        = ३ *२६४
      = ४ * १९६
      = ६ * १३२
      = ८ *९९
      = ११ * ७२
      = १२ *६६
      = १८ * ४४
      = २२ * ३६
      = २४ * ३३

 म्हणून ज्या संख्यांनी ७९२ ला पूर्ण भाग जातो त्या संख्या = १, २, ३, ४, ६, ८, ११, १२, १८, २२, २४, ३३, ३६, ४४, ६६, ७२, ९९, १३२, १९६, २६४, ३९६

आता ७२, १४४ आणि ७९२ च्या विभाजाकांची यादी पाहिली असता त्यात ७२ हा सर्वात मोठा घटक असल्याचं लक्षात येतं. म्हणून म. सा. वि. ७२
वरील पद्धतीत आपणास पाढे चांगल्या प्रकारे पाठ असणे आवश्यक आहे हे एव्हाना लक्षात आलं असेल आणि त्याच प्रमाणे विभाजकांची यादी लिहिताना प्रत्येक जोडीतला डावीकडचा विभाजक क्रमाने वाढत जात असून उजवीकडचा विभाजक कमी कमी होत असल्याचं आढळतं. आपण सर्व विभाजाकांचा यादीत समावेश केला आहे किंवा नाही ह्याची खात्री पटवून घेण्यासाठी ही शिस्त बाळगणे आवश्यक आहे. ज्या वेळी विभाजाकांच्या जोडी मधल्या क्रमांकात अजून एखादा विभाजक मिळणार नाही त्यावेळी आपण सर्व विभाजक शोधून काढले असा आनंद व्यक्त करावयास हरकत नाही. 

२) पद्धत २

ह्या पद्धतीत ज्या संख्यांचा म. सा. वि. काढायचा आहे त्या संख्यांना मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरुपात लिहायचं. आपल्या लक्षात आलंच असेल की ल. सा. वि. काढण्याची जी पहिली पद्धत आपण पाहिली तीच ही आहे. पुन्हा वरचेच उदाहरण घेऊयात.
७२ = २ * ३६
     = २ * २ * १८
     = २ * २ * २ * ९
     = २ * २ * २ * ३ * ३

१४४ = २ * ७२
      = २ *  (२ * २ * २ * ३ * ३)


७९२ = २ * ३९६
       = २ * २ * १९८
       = २ * २ * २ * ९९
       = २ * २ * २ * ३* ३*११

आता ह्या तिन्ही संख्याच्या मूळ संख्येच्या रूपातील विभाजकाची यादी पाहिली असता त्यात आपणास २ * २ * २ * ३ * ३ हा सामयिक घटक असल्याचं दिसत. म्हणून उत्तर ७२.

३) पद्धत तिसरी

 ही पद्धत केवळ दोन संख्यासाठी वापरली जाऊ शकते असं दिसतं. ह्यात आपणास जी जोडी दिली आहे त्यातील छोट्या संख्येने मोठीला भागायचं. त्यानंतर जी बाकी उरेल तिने त्या छोट्या संख्येला भागायचं. ही प्रक्रिया शून्य बाकी येईपर्यंत चालू ठेवायची आणि ज्या वेळी शुन्य बाकी येईल त्यावेळी जो विभाजक असेल तो ह्या संख्याचा म. सा. वि.  खाली चित्रात ७५, १०० आणि ६०, १३२ ह्या दोन जोड्यांचा म. सा. वि. काढून दाखविण्यात आला आहे.




  

ल. सा. वि. आणि म. सा. वि. प्रकरण इथेच संपवूयात.  जाता जाता आजच्या अभ्यासातलं एक उदाहरण!

एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक भाषेची संख्या खालीलप्रमाणे
मराठी  - ३५
इंग्लिश - २५
फ्रेंच   - १०
संस्कृत - १०
वरील माहिती वर्तुळाकार आलेखाच्या रुपात लिहा.

एकूण विद्यार्थी संख्या = ८०

मराठी भाषेची टक्केवारी = ३५ /८०
इंग्लिश भाषेची टक्केवारी = २५ /८०
फ्रेंच भाषेची टक्केवारी = १० /८०
संस्कृत भाषेची टक्केवारी = १० /८०

आता वर्तुळाच्या केंद्राभोवती ३६० अंशाचा कोन असल्याने वरील टक्केवारीला ३६० ने गुणले असता आपणास प्रत्येक भाषेसाठी किती अंश वर्तुळात द्यायचे ते समजेल.

मराठी भाषेचा कोन = (३५ /८०) * ३६०
इंग्लिश भाषेचा कोन = (२५ /८०) * ३६०
फ्रेंच भाषेचा कोन = (१० /८०) * ३६०
संस्कृत भाषेचा कोन = (१० /८०) * ३६०

मी हा ब्लॉग लिहिता लिहिता वरील आकडेवारी करून अंश काढून कोनमापकाने वर्तुळात ती टाकण्यासाठी सोहम धडपडत आहे. मी मात्र एक्सेल वर पटकन हा आलेख काढल्याने गडी थोडा हैराण झाला!





 

Thursday, September 18, 2014

ल. सा. वि. - म. सा. वि. - भाग १

 
शालेय जीवनात ह्या दोन संक्षिप्त रूपातील संज्ञांनी आमच्या शालेय जीवनात बराच गोंधळ घातला होता.  गणिती जीवनात  लसावि आणि मसावि ही जोडगोळी धुमाकूळ घालत असताना त्याकाळी दाखविले जाणारे मराठी चित्रपट राजा गोसावी ह्यांची आठवण करून देत. आज अचानक ह्या जोडगोळीची आठवण व्हायचं कारण म्हणजे सध्या सोहमच चाललेलं HCF आणि LCM  प्रकरण!
HCF - Highest Common Facor - अर्थात मसावि - महत्तम सामायिक विभाजक
LCM - Least Common Multiple - अर्थात लसावि - लघुत्तम सामायिक विभाज्य
आमच्या काळात लसावि आणि मसावि काढण्याच्या पद्धती आता आठवत नाहीत पण आता सोहमच्या काळातील पद्धती पाहताना ज्या काही गोष्टी जाणवल्या त्याचा हा सारांश!

कोणतीही संख्येचे मूळ आणि संयुक्त संख्या असे वर्गीकरण करता येते. 
१) दोन मूळ संख्या दिल्या असता, त्यांचा लसावि म्हणजे त्यांचा गुणाकार येणार. आणि मसावि १ येणार.
२) एक मूळ आणि एक संयुक्त संख्या दिली असता सुद्धा त्यांचा लसावि म्हणजे त्यां दोघांचा गुणाकार येणार. आणि मसावि १ येणार.
म्हणजे मूळ संख्या ही बालगोपाळांची मित्र! डोक्याला जास्त ताप नाही.  फक्त त्यांना मूळ संख्या म्हणून ओळखता यायला हवे! आता डोकेदुखीच्या प्रकाराकडे वळूयात!
३)  दोन संयुक्त संख्या!
अ) लसावि
कोणतीही संयुक्त संख्या ही दोन किंवा अधिक मूळ / संयुक्त  संख्यांच्या गुणाकाराच्या रुपात मांडता येते. लसावि किंवा मसावि काढण्याच्या कोणत्याही प्रकारात हा सामायिक मुद्दा आहे.
  •  पद्धत पहिली 
 ह्या प्रकारात आपणास ज्या दोन संख्यांचा लसावि काढावयास दिला आहे त्या संख्या विविध मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरुपात कशा मांडता येतील हे पाहावे.

समजा आपणास ५० आणि ७५ चा लसावि काढण्यास सांगितला गेला आहे
५० = २ * २५
    =  २ * ५ * ५

७५  = ३ * २५
     =  ३ * ५ * ५

आता ह्या दोघांमध्ये  ५ *  ५ अर्थात २५ हा सामायिक घटक असल्याने लसावि काढताना २५ फक्त एकदाच विचारात घ्यायचा. म्हणून
 ५० आणि ७५ ह्यांचा लसावि = २ * (५*५)* ३ = १५०

समजा आपणास ५०, ७५ आणि १०० अशा तीन जोड्या दिल्या तर? खरतरं १०० ही ५० ची दुप्पट असल्याने फक्त १०० आणि ७५ चा लसावि काढला तरी काम भागेल. पण वरील पद्धत कशी वापरायची हे समजून घ्यायचं असल्याने आपण हे उदाहरण पाहूयात.

५० = २ * २५
    =  * *

७५  = ३ * २५
     =  ३ * *

१०० =  ४ * २५
      =  २ * * *

आता ह्यात ५ * ५ हा तिन्ही अंकात सामायिक आहे. आणि २ हा ५० आणि १०० मध्ये सामायिक आहे. त्यामुळे ह्या तिघांना एकदाच घ्यायचं.  म्हणून

५०, ७५ आणि १०० ह्यांचा लसावि = २ * (२*५*५)* ३ = ३००


  • पद्धत दुसरी 
 ह्या पद्धतीत सामायिक घटक शोधत त्यांनी ज्या संख्यांचा लसावि काढण्यास सांगितलं आहे त्यांना भागत राहायचं.

५        ५०   ७५  १००
५        १०   १५   २०
२          २     ३     ४       - तिन्ही मध्ये सामायिक घटक नसल्याने कोणी दोघात सामायिक आहे का ते पाहायचं
२          १     ३    २        - कोण्या दोघात सामायिक नसल्याने एकेकटा अंक १ पर्यंत भागाकार करून आणायचा
३          १     ३    १
            १     १     १     

आता डाव्या बाजूला आलेल्या आकड्यांचा गुणाकार करायचा.
म्हणून लसावि = ५*५*२*२*३ = ३००

अजून एक उदाहरण पाहूयात.
६३, १९६, ३४३

७     ६३    १९६   ३४३
७        ९      २८    ४९
९         ९        ४      ७
४         १        ४      ७  
७         १        १      ७
           १        १      १

म्हणून
६३, १९६, ३४३ चा लसावि = ७ * ७ * ७ * ९ * ४ = १२३४८

मसाविकडे पुढच्या भागात वळूयात!


 

Sunday, September 14, 2014

मी whatsapp वर नाही! तुमचं काय?

 
हा लेख लिहिताना मनातील भावना थोड्याफार सौम्य स्वरुपात लिहाव्या लागतील. लेखनस्वातंत्र्य वगैरे बोलायला ठीक असलं तरी ह्यातील काही भाग आमच्या शालेय मित्रांना न आवडण्याची शक्यता असल्याने आणि त्यांना मी प्रत्येक ब्लॉगच्या लिंक्स जबरदस्तीने पाठवत असल्याने ते माझा पुढच्या भेटीच्या वेळी निषेध करण्याची दाट शक्यता आहे. आता शालेय मित्रांच्या निषेध व्यक्त करण्याच्या पद्धती आपण सर्व जाणतच असाल.
असो बऱ्याच दिवसांपासून मला ऑफिसातील काही सहकारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी मी whatsapp वर नसल्याबाबत दुषणं देत असतात. ह्यात अजून एक मुद्दा आहे. माझ्या अगदी मोडकळीला आलेल्या ब्लॅकबेरीकडे पाहून हे सर्व मला एक चमत्कारिक मुद्रा देत असतात. परंतु जगातील उपभोगवादी वृत्तीला तोंड देण्यासाठी ईश्वराने माझी निवड केली आहे अशी मी माझी समजूत करून घेतल्याने मी अशा गोष्टींनी माझा मूड खराब करून घेत नाही.
लहानपणी शाळेत प्रश्न असत - "पहिल्या महायुद्धाची तात्कालिन कारणे कोणती?" "१८५७ च्या बंडाची तात्कालिन कारणे कोणती?" ह्यात तात्कालिन हा भाग महत्वाचा हे समजायला मला शालेय जीवनात काही काळ जावा लागला. परंतु संसारात मला ह्या शब्दाचा अर्थ अगदी पुरता समजला. जसे की घरात बराच वेळ धुसफूस चालू असताना भडका उडायला एखादं तात्कालीन कारण लागतं. म्हणजे बघा कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणणाऱ्या गोष्टीची दीर्घकालीन आणि तात्कालीन कारणे असतात. दीर्घकालीन कारणांमुळे एखादा माणूस, गट, राष्ट्र एक विशिष्ट कृती करण्याच्या निर्णयाप्रती येते. पण ती विशिष्ट कृती अचानकपणे करू शकत नसल्याने त्या कृतीसाठी तात्कालीन कारण लागतं.
प्रस्तावना खूप लांबली. हा ब्लॉग लिहिण्याचं तत्कालीन कारण म्हणजे काल रविवारी आमच्या बॅचने आयोजित केलेली चिंचोटी धबधब्याची सहल! हल्लीच्या प्रथेनुसार आमच्या बॅचचा सुद्धा whatsapp ग्रुप आहे. पूर्वी लोक सकाळी उठून चालायला जात, सूर्यनमस्कार घालीत पण  हल्ली whatsapp वर नवीन काय आलंय हे तपासून पाहतात, पाच-सहा ग्रुपवर शुभप्रभातचे संदेश टाकतात. मी ह्या गटात नाहीये. आम्ही सर्व १५ ऑगस्टला भेटलो होतो त्यावेळी १४ सप्टेंबर ही तारीख नक्की झाली होती. त्यावेळी काही लोकांना पितृपक्ष असल्याचं ध्यानात आलं नाही. पण ज्या क्षणी लक्षात आलं त्या क्षणी त्यांनी फोन करून आपण येऊ शकत नसल्याचं कळवलं. आणि आपल्या ह्या निर्णयामुळे बाकी लोक सहभागी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त होऊ नयेत म्हणून whatsapp वर हा निर्णय घोषित केला नाही. ही झाली प्रगल्भता!! शेवटी बरीच चर्चा झाली. लोकशाही तत्वानुसार दोन्ही बाजूच्या लोकांनी आपली मते टाकली. एक नवीन पर्याय पुढे आला आणि चर्चा त्यावर वळली. मग आलिया भटला न राहवल्यामुळे तिनेही ह्या चर्चेला भेट दिली. इतक्या सगळ्या गडबडीत एका मित्राने फोन करून जर आपण जात असू तर मी तीन कुटुंबांना आणतो अशी हमी दिली. अजून एका मुलीने फोनवर मी नक्की येत असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं. हे दोघंही शब्दाचे पक्के असल्याने मी तसा निर्धास्त झालो. पुढे बराच वेळ चर्चा चालू होती. त्यातील नकारामुळे ज्या ज्या वेळा निराश व्हायची वेळ आली त्यावेळी बरे वाटावे म्हणून ह्या दोघांना फोन करीत राहिलो. शेवटी आम्ही जाण्याचा आणि सव्वाआठ वाजता चिंचोटी नाक्यावर भेटण्याचा निर्णय घेतला. हो फोनवर हा निर्णय घेतला. आणि बरोबर सव्वा आठच्या सुमारास जवळपास १५ जणांचा गट चिंचोटी नाक्यावर हजर होता. पुढे सहल उत्तम झाली. बाकीच्या मित्रांची उणीव नक्कीच जाणवली. ते आले असते तर अजून मस्त धमाल आली असती. असो एक संस्मरणीय सहल होऊन गेली!
 whatsapp हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याचे फायदे नक्कीच आहेत. चांगली माहिती आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेयर करू शकतो. एखाद्या आणीबाणीच्या वेळी सर्वांना आपण महत्वाचे अपडेट देऊ शकतो. माझ्याकडे whatsapp नसल्याने ह्या फायद्यांपासून मी वंचित राहतो. म्हणजे वरील दोन गोष्टी साध्य करण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत पण त्यात whatsapp ची सुलभता नाही.
whatsapp चे तोटे कोणते?
१) whatsapp वर आपलं लक्ष विचलित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी, विनोद येत राहतात. ह्यापासून दूर राहण्यासाठी मनाचा निग्रह हवा जो माझ्याकडे नाही.
२) एखाद्या गोष्टीत गढून जायचं असेल तर आपणासमोर विचलित करणाऱ्या गोष्टी किमान असाव्यात, त्यामुळे विचलित करणाऱ्या गोष्टींच्या यादीत whatsapp चा समावेश करायला मी धजावत नाही.
३) आपल्याला मित्रमंडळींचा सहवास हवाहवासा वाटतो कारण बाहेरचं जग आपल्याला खूप तणाव देतं. पण ह्यातला प्राधान्यक्रम महत्वाचा! आपली कर्तव्यं पार पाडून मग मित्रमंडळीच्या सहवासात रमावे. जर तुम्ही केवळ मित्रमंडळीच्या सहवासातच सतत राहिलात तर कुठेतरी तुमच्या कर्तव्यांपासून तुमचे दुर्लक्ष होणारच! आणि हो सतत आपल्याला सांभाळून घेणाऱ्या वातावरणात राहण्याची सवय लागणं बरं नाही!
४) भ्रमणध्वनीच्या छोट्या स्क्रीनला सतत खिळून राहण्याने डोळ्यांवर काय दुष्परिणाम  होत असतील ह्या बाबतीत मी साशंक आहे.
५) एखाद्या whatsapp गटात निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी परिपक्व असायला हवी. सर्वांनी मते मांडणे योग्य पण ह्या गटात ह्या सर्व मतांचा सामूहिकपणे विचार करून निर्णय घेणारी व्यक्ती असावी. ह्या व्यक्तीने सर्व पर्यांयांचा कसा विचार करण्यात आला आणि प्रत्येक पर्यायाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करून शेवटी हा निर्णय का घेतला ह्याचं विवेचनही करावं. नाहीतर काय केवळ चर्चाच होत राहणार.
६) स्माईली आणि इतर सर्व सांकेतिक खुणा - ह्यांचा सततचा वापर एके दिवशी तुम्हांला विविध भावनांचे शब्दरूप विसरायला लावू शकतो हे लक्षात ठेवा.

शेवटी तंत्रज्ञानाचा वापर कोठवर करायचा ह्याबाबत  प्रत्येकाने एक सीमारेषा आखायला हवी! काहींनी ही फेसबुकच्या आधीच आखून घेतली. मी ती फेसबुक आणि whatsappच्या मध्ये आखली. उद्या काय whatsapp च्या पुढे कायतरी नक्कीच येईल. प्रत्येकाला कोठेतरी थांबायला हवेच! आपल्या मानवी भावनांना ज्या क्षणी तंत्रज्ञान वेसण घालत ह्याची आपणास जाणीव होईल तिथं थांबावं अशी माझी सूचना!

असो माझ्या शालेय गटातील  whatsapp वर खूप सक्रिय असणाऱ्या मित्रांपैकी कोणी वेळ काढून ह्या ब्लॉगपोस्ट ला उत्तर दिलं तर मी धन्य होईन !

Thursday, September 11, 2014

दुरावा - २

 
पहिला बर्फ इतका जोराचा असेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. आकाशातून भुरभुरत येणारा बर्फ जसा बोडक्या सुचीपर्णी वृक्षांवर, घरांच्या उतरत्या छपरांवर पडत होता तसाच तो इवाच्या सोनेरी केसांवर सुद्धा अडकून तिचं सौंदर्य खुलवत होता. तिचं सौंदर्य खुलविण्यासाठी जणू काही त्या हिमकणांची तिच्या केसांच्या दिशेने येण्याची स्पर्धाच सुरु होती. हा हिमवर्षाव पुढे बराच वेळ सुरु राहिला. मध्येच कोणाला तरी पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांची आठवण झाली. मग ह्या सर्व खोडकर युवतींचा मोर्चा हॉटेलच्या भोजनालयाकडे वळला. एक वृद्ध जोडपं हे भोजनालय चालवत होतं. कलकलाट करणाऱ्या ह्या गटाने भोजनालयात प्रवेश केला. पहिलं पाऊल टाकणारी अँना अचानक थांबली. खुणेनेच तिने बाकी सर्वांना गप्प राहण्यास सांगितलं.
हळूच सर्वजण आतमध्ये डोकावले. डायनिंग टेबलवर सर्व जेवण व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. आणि ते आयुष्याच्या सायंकाळी पोहोचलेले ते दोघं मात्र खिडकीतून पडणारा हिमवर्षाव टक लावून पाहत होते. त्या वृद्ध स्त्रीच्या नकळत त्या आजोबांनी तिचे हात हातात घेतले. आजींनी आपली नजर आजोबांकडे वळविली. तिच्या डोळ्यातील अश्रू इतक्या दुरून सुद्धा ह्या सर्वांना दिसले. इतक्यात धांदरट मारियाने आपल्या हातातील सेलफोन खाली पाडला. आजोबा आजींचं लक्ष आता इथे गेले. अपराधीपणाची ह्या गटाची भावना आजींच्या चेहऱ्यावरील लज्जा पाहून काही प्रमाणात कमी झाली.
जणू काही झालंच नाही असं दाखवत आजोबा पुढे झाले. "या मुलींनो, माझ्या प्रिय पत्नी वोल्गाने बनविलेल्या रुचकर जेवणाचा आनंद लुटा!" एकमेकांकडे छुप्या नजरांनी पाहत सर्वजणी स्थानापन्न झाल्या. सर्वांनी जेवण वाढून घेतल्यावर आजोबांनी बाजूलाच बसलेल्या वोल्गाकडे एक प्रेमपूर्ण कटाक्ष टाकला. "मुलींनो,  वोल्गा ज्यावेळी मला प्रथम ४२ वर्षांपूर्वी भेटली तेव्हासुद्धा असाच पहिला बर्फ पडू लागला होता! त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी पहिला बर्फ एकत्र पाहण्याचा नेम ठेवला आहे! देवकृपेने आतापर्यंत तो पाळण्यात आम्हांला यश आलं आहे!" वोल्गाच्या डोळ्यात बहुदा अश्रूधारांनी न जुमानता प्रवेश केला असावा. तिने बळेच सर्वांना सूप वाढायचं नाटक करत जागेवरून उठायचा बहाणा शोधला. "मात्र एक गोष्ट कायम आहे पहा! दरवर्षी बर्फ पडू लागला की ही फार हळवी होऊन जाते!" आजोबांनी आपली बडबड चालूच ठेवली होती. वोल्गा आजीबाई एक क्षणभर थांबल्या, "दरवर्षी जेव्हा पहिल्यांदा हिमवर्षाव होतो तेव्हा आमच्यापैकी कोणावरही एकट्याने हा हिमवर्षाव पाहण्याची वेळ ईश्वराने येऊ नये, हीच प्रार्थना मी करते! आणि म्हणूनच मी अशी हळवी होते! इतका कडक हिवाळा एकट्याने काढण्याची वेळ कोण्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये! पण ही गोष्ट कठोर पुरुषांना कशी कळणार!" एका झटक्यात वोल्गाने आपलं मनोगत मुलींसमोर उलगडून टाकलं. आपण हिच्यासोबत इतकी वर्षं काढली पण हिने आपल्यासमोर ही भावना कधीच बोलून दाखवली नाही. आणि आपणही हिला कधी समजू शकलो नाही. काहीशा अपराधीभावनेने आजोबा विक्टर शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिले. मुलींच्या संगतीत वोल्गा आजीबाई मात्र खूप खुलल्या होत्या. आपलं हरवलेलं तरुणपण ह्या मुलींच्या रुपानं शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. विक्टर मोठ्या कौतुकाने तिला न्याहाळत होते.
इतक्या सगळ्या कल्लोळात इवाकडे कोणाचं फारसं लक्ष गेलंच नाही. "इतका कडक हिवाळा एकट्याने काढण्याची वेळ कोण्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये!" आजीबाईच हे वाक्य राहून राहून तिच्या मनात घोळत होतं. जेवणं आटपली तशी इवा पळतच आपल्या खोलीत गेली. "शनिवारी इतक्या लवकर उठण्याची मला सवय नाही त्यामुळे आता मला कोणी उठवू नका!" तिने सर्वांना बजावून ठेवलं होतं. आपल्या खोलीत शिरून तिनं कडी लावून घेतली. आणि मग बिछान्यात तिने स्वतःला झोकून दिलं आणि सर्जीच्या आठवणींचं दुःख एकटीनं उगाळून पिण्यासाठी ती सज्ज झाली. सर्जीच्या आणि आपल्या सर्व भेटींचा चलतचित्रपट तिने किती वेळा आपल्या डोळ्यासमोरून नेला असेल ते मोजण्याच्या पलीकडे होते. आपल्या भ्रमणध्वनिवरील सर्जीचा क्रमांक फिरविण्याच्या मोहापासून इतके दिवस तिने स्वतःला दूर ठेवलं होतं. पण ह्या क्षणी ती खूप हळवी झाली होती. तिचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हत आणि शेवटी न राहवून तिने सर्जीचा क्रमांक फिरविला. "हा क्रमांक अस्तित्वात नाही" ह्या संदेशाने तिला एक मोठा धक्का बसला. कझान शहरातला क्रमांक मॉस्कोमध्ये चालणार कि नाही ह्याचा विचार करण्याइतपत ती भानावर नव्हती. सर्जीशी संपर्काचा एकमेव दुवा आता तुटला होता. तिच्या मनात अनेक शंका कुशंकांनी गर्दी केली होती.
सायंकाळी सर्वजणी तशा शांतशांतच होत्या. बराच वेळ इवा आपल्या खोलीबाहेर येत नाही म्हणून शेवटी मारिया तिला भेटायला खोलीत आली. तीन चार वेळा बेल वाजविल्यानंतर इवाने शेवटी दरवाजा उघडला. आपले रडून रडून सुजलेले डोळे लपविण्याचा तिने प्रयत्न सुद्धा केला नाही. तिचं हे रूप मारियासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. तिने लगेचच इवाला जवळ घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. "वेडूबाई, असा अवतार करून घ्यायला झालं तरी काय?" इवाने आपलं दुःख बाहेर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. पण शेवटी मारियाच्या निग्रहापुढं तिचा नाईलाज झाला. नाही म्हणायला सर्जी आणि तिची मैत्री मारियाला माहित होती. पण प्रकरण इतकं गंभीर असेल ह्याची मारियाला कल्पना नव्हती. पुढील अर्धा तास मारिया इवाच्या तोंडून "सर्जी पुराण" ऐकत होती.
"माझी मावशी मॉस्कोत राहते. आपण पुढच्या शनिवारी तिथे जाऊयात!" कधीही हार न मानणाऱ्या मारियाचा सल्ला ऐकण्यापलीकडे इवाकडे दुसरा मार्ग तरी होता कुठे! प्रवास वगळून मिळणाऱ्या एका दिवसात सर्जीला शोधण्यासाठी जणू काही मॉस्को हे १०० घरांच्या वस्तीचं छोटस गावच होतं!
मारियाशी बोलून इवा आता बऱ्यापैकी सावरली होती. सायंकाळ सर्वांनी पारंपारिक रशियन गाणी ऐकण्यात आणि त्यावरील नृत्यात व्यतीत केला. रविवारी सकाळी सावकाश उठलेल्या ह्या सर्वांनी वोल्गा आजींना त्यांच्या नास्त्याच्या तयारीत हातभार लावला. "तुमची मुलं, नातवंडे कोठे असतात!" बोलता बोलता मारियाने त्यांना प्रश्न केला. वोल्गा आजीबाईचं एका नदीच्या नावावरून ठेवलेलं नाव अगदी सार्थक होतं. त्या नदीचं पाणी जणूकाही त्यांच्या डोळ्यात दाटून राहिलं होतं. मारियाच्या ह्या प्रश्नानं त्या बांध घातलेल्या पाण्याला पुन्हा मोकळीक मिळाली.  "ते सर्व अमेरिकेला स्थायिक झालेत! गेले पाच वर्षे त्यांना आम्हांला भेट देण्यास फुरसत मिळाली नाही!" वेळीच मागून आलेल्या विक्टर आजोबांनी वोल्गा आजींना थोपटत उत्तर दिलं.
दुपारी परतीचा प्रवासाची बस आली. पुन्हा परत भेट देण्याचं आश्वासन देत गट बसमध्ये बसला. उतरणीच्या रस्त्यावरून मनमोहक दृश्य बघण्यात इवा गढून गेली होती. बस मध्येच थांबली होती. रस्त्याच्या एका अरुंद ठिकाणी समोरून बस आल्याने दोन्ही ड्रायव्हर एकमेकाला वाट करून देण्यात गुंतले होते. अगदी बस सुरु व्हायच्या वेळी इवाचं लक्ष समोरच्या बसकडे गेले. तिचा सर्जी त्या बसमधून तिच्याकडे टक लावून पाहत होता आणि तिचं लक्ष कधी आपल्याकडे वळेल ह्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होता. इवाचं लक्ष त्याच्याकडे जाताच ती ताड्कन आपल्या सीटवरून उठली. पण उशीर झाला होता. दोन्ही बस सुटल्या होत्या. एकंदरीत प्रकार लक्षात आलेल्या मारियाने ड्रायव्हरला बस थांबविण्याची विनंती केली. आधीच अडून गेलेल्या ट्राफिकमुळे मागे लागून लागलेल्या बसच्या रांगेकडे बोट दाखवत ड्रायव्हरने स्पष्ट नकार देत बस भरधाव वेगाने उतरणीच्या रस्त्यावर मोकाट सोडली. आताशा वोल्गा नदी पूर्ण जोमाने इवाच्या डोळ्यात उतरली होती.

(क्रमशः)

Wednesday, September 10, 2014

दुरावा - १

 
 ऑफिसातील आपलं काम आटपून इवा घाईनेच निघाली. ट्रान्स सैबेरिअन रेल्वे मार्गावरील कझान शहरात तिचे वास्तव्य होते. हिवाळ्याची चाहूल लागलीच होती. इतका कडक हिवाळा कसा एकटीनेच काढायचा ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा उभा राहिला. सर्जीच्या आठवणीने आलेले डोळ्यातील अश्रू कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घेत ती किराणा मालाच्या दुकानात शिरली. ब्रेड, अंडी, दुध, मांस असे ऐवज तिने गोळा केले. आणि ती काउंटरपाशी आली. अचानक तिला आठवलं. आज शुक्रवार होता. शनिवार - रविवारची सुट्टी एकट्यानेच काढायची होती.
सर्जी असा का वागतो ह्याचं तिला त्याला भेटल्यापासून अधूनमधून वाटायचं. पण त्याचं हे वागणं तिने कधी फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्याच्या प्रेमात आकंठपणे बुडून गेल्यावर तिला सर्व काही अगदी स्वप्नातल्या सारखं वाटत राहायचं. त्याचे ते निळे भावूक डोळे, विश्वावर साम्राज्य गाजविण्याची त्याच्या बोलण्यातून प्रकट होणारी मनिषा! आपण किती भाग्यवान आहोत असेच तिला कायम वाटत राहायचं! त्याच्या वागण्यातले दोष तिला कधी फारसे जाणवले नाहीत आणि जाणवले तरी कधी फारसे खटकले नाहीत!
आपलं बिल भरून इवा आता बसमध्ये बसली होती. घरी पोहोचायला अजून अर्धा तास तर नक्की लागणार होता. रस्त्याकडेच्या वृक्षांनी आपली पान गाळून टाकायला सुरुवात केली होती. मॉस्कोला गेलेला सर्जी एकटाच कसा राहत असेल ह्याचा विचार काही वेळ तिच्या डोक्यात येत राहिला. आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून तिने त्याची बरीच आर्जवं केली होती. पण त्याच्या मनमानीपुढे तिचं काहीच चाललं नाही. अशा विचारांच्या गुंत्यात असताना आपलं घर कधी आलं हे तिला कळलं सुद्धा नाही!
यांत्रिकपणे किल्लीने तिने आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. आणलेलं सामान फ्रीजमध्ये नीटनेटक लावून ठेवलं.
 रात्रीचे जेवण कसंतरी आटपून इवा सोफ्यावर येऊन बसली. आठवणी कशा दाटून येत होत्या!
सर्जीवर तिने आपला जीव ओवाळून टाकला होता. त्याची आणि तिची ओळख अशीच कझान शहरातील सार्वजनिक बससेवेतील. एका कडाक्याच्या हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी चालू असताना सर्वजण बसची वाट पाहत होते. आणि त्यात सर्जी आणि इवा हे दोघेही होते. सर्जी एकसारखा आपल्याकडे रोखून पाहतोय ही गोष्ट इवाला फारशी काही आवडली नव्हती. शेवटी एकदाची बस आली तेव्हा तिने सुटकेचा निःश्वास टाकला होता.  सर्जीने बसमध्ये तिच्याशी बोलायचं प्रयत्न सुद्धा केला होता. पण इवाने तो धुडकावून लावला होता. त्याच्यापासून आपला बचाव करत जेव्हा ती घरात शिरली तेव्हा कुठे तिला हायसं वाटलं होतं.
नंतर आठवडाभर सर्जी दिसला नाही, तेव्हा तिच्या मनात काहीसं अधुरेपणा जाणवायला लागला होता. पण तिने स्वतःलाच समजावलं. "तो कोण तरुण, त्याचं नाव गाव तुला माहीत नाही. अजून किती जणींशी तो असा नजरेचे खेळ खेळत असेल तुला काय माहित!" कितीही समजावयाचा प्रयत्न केला तरी त्या युवकाची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती!
नंतर मग तो अचानक तिला दिसला तो कझानच्या मॉलमध्ये! इथे मात्र गर्दी नव्हती की बोचऱ्या थंडीपासून पळण्याची घाई! आपल्याला पाहिल्यावर त्या युवकाच्या नजरेत दिसलेला आनंद तिने बरोबर टिपला. त्यात नक्कीच आपुलकीची भावना होती. खरेतर तो एका दुकानात खरेदी करत होता आणि ती नुसतीच बाहेर फिरत होती. दोघं काही क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. इवा समोरच एका खुर्चीवर जाऊन बसली. त्या युवकाचं आता खरेदीतील लक्ष पूर्ण उडालं होते. पाच मिनिटे झाली आणि तो नुसताच तिथली शर्ट्स धुंडाळत बसला होता. शेवटी इवाचा संयम सुटला. ती थेट दुकानात शिरली आणि त्या युवकाच्या दिशेने चालू लागली. तो युवक काहीसा बावचळला. आपल्या हातून काही चूक वगैरे झाली काय असा उगाचच त्याला वाटून गेलं. इवा मात्र त्याच्या जवळ गेली आणि हळूच म्हणाली, "माझ्यासोबत कॉफी घ्यायला आवडेल का तुला?" ह्या प्रश्नाने मात्र त्या युवकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं! "नक्कीच! " त्याच्या ह्या उत्तराच्या वेळी त्याच्या गालावर उमटलेली खळी तिला खूप आवडून गेली.
"इवा" "सर्जी" कॉफी दुकानात खुर्चीवर स्थानापन्न होता होता दोघांनी एकमेकांशी ओळख करून घेतली. सर्जी एका बँकेत कनिष्ठ अधिकारी होता आणि पुढची परीक्षा देऊन मोठा अधिकारी बनायचं त्याचं स्वप्नं होतं. बोलणं असं बराच वेळ चालू राहिलं असतं पण इवाच लक्ष अचानक घड्याळाकडे गेलं. "मला आता निघायला हवं! हा घे माझा मोबाईल क्रमांक!" सर्जीने कॉफीचं बिल भरलं. आणि मग तो इवाला सोडत तिच्या घरापर्यंत आला. निरोपाच्या बोलण्यात खरीतर ओपचारीकता जास्त होती. पण नजरा एकमेकांच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.
सर्जीच्या आठवणी मनात दाटून येत असतानाच इवाला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. पहाटे केव्हातरी तिला जाग आली. आकाश काळसर बनून राहिलं होते. पुढील दोन दिवस तिला एकटीनेच काढायचे होते. बिछान्यातून बाहेर निघायचा तिला खूप कंटाळा आला होता. अचानक तिचा फोन वाजला. समोरून मारियाचा आवाज ऐकून ती एकदम खुश झाली. कुठेतरी भटकंतीचा कार्यक्रम असल्याशिवाय मारिया फोन करणार नाही हे नक्की होते. तिचा अंदाज बरोबर होता. मारिया तिची दूरची नातलग होती. पण कॉलेजातील शिक्षणाच्या वेळी भेटलेली मारिया तिची मैत्रीण जास्त होती.
बाजूलाच असलेल्या एका हिल स्टेशनवर मैत्रिणींच्या गटाने जायचा मनसुबा मारियाने जाहीर करताच इवाने तो अगदी उचलून लावला. मारियाला हा बेत बदलायची संधी न देताच तिने तात्काळ फोन ठेवला. पुढच्या एका तासात मारिया, इवा आणि अजून १० मैत्रिणी त्या हिल स्टेशनच्या तळाच्या ठिकाणी हजर होत्या. काही वेळातच बसमध्ये हा गडबड करणारा ग्रुप बसला. आता दीड तासाचा वर जाण्यासाठी वळणावळणाचा रस्ता होता.
मारियाला एकटीला कोपऱ्याची सीट मिळाली होती. बस जशी सुरु झाली तसा मैत्रिणींचा ग्रुपसुद्धा शांत झाला होता. मारिया आपल्याच विचारचक्रात गढून गेली होती. काही दिवसांनी सर्जी इवासोबत राहायला आला. नुसतं प्रेमात पडून हवेत उडत राहणं वेगळं आणि एकत्र राहणं वेगळं ह्याची दोघांना जाणीव होत होती. म्हटलं तर दोघांना टापटीप राहण्याची सवय होती आणि सर्जीकडून अशा शिस्तीच्या वागण्याची खरतरं इवाने अपेक्षाही ठेवली नव्हती. त्यामुळे तिला हा सुखद धक्का होता. सुरुवातीला अगदी कसं स्वप्नवत सुरु राहिलं. पहिला शुक्रवार होता तो दोघांच्या एकत्र राहण्याचा! सर्जीला धक्का देण्यासाठी इवा ऑफिसातून लवकरच घरी येऊन राहिली होती. तिने घर अगदी टापटीप लावून ठेवलं. डायनिंग टेबलवर फुलं मांडून ठेवली. सर्जीला आवडणारी टर्की सॅंडविच आणि सूप बनवून ठेवलं.
सर्जी परतला तोवर सूर्य आकाशात रेंगाळत होता. सूर्याची सोनेरी किरणं दिवाणखान्यात पसरली होती. सर्जीने दार उघडलं आणि आतलं वातावरण त्याला खूप भावलं. अगदी मनापासून भावलं! त्याने आपली बॅग खाली ठेवली. आणि त्याचे डोळे इवाचा शोध घेऊ लागले. खमंग पदार्थांचा वास सुटणाऱ्या स्वयंपाकघरात तिचा पत्ता नव्हता.  बाथरूमसुद्धा कोरडंच होते. खरेतर ती बाथरूममध्ये असेल अशी सर्जीला आशाही वाटून गेली होती.
शेवटी काही आणायला बाहेर गेली असेल ही असा विचार करून तो काहीसा उदास होऊन गॅलरीत आला. गॅलरीतून खालच्या रस्त्याचं दृश्य तो पाहत असताना अचानक त्याच्या डोळ्यांवर इवाचे कोमल हात आले. ही पडद्याआड दडली असेल हे आपणास सुचलं कसं नाही ह्याचा त्याला पश्चाताप झाला. इवाने त्याला तसंच हळुवारपणे ओढत आत आणलं. सर्जीने काहीच प्रतिकार केला नाही. आणि मग सोफ्यावर सर्जीला तसंच बसवून आणि डोळे न उघडण्याची ताकीद देऊन ती समोरून त्याच्या समोरून आली. आठवणी कशा निष्ठुर असतात इवा मनाशीच विचार करीत होती.
हिल स्टेशनवर पोचल्यावर सर्वजणी एकदम खूष होऊन गेल्या. वातावरणात अगदी गारवा व्यापून राहिला होता. समोरच्या पर्वतराजीवर डेरेदार सुचीपर्णी वृक्ष अगदी गर्दी करून उभे राहिले होते. सर्वांनी आपापल्या खोलींचा ताबा घेतला. मारिया आणि इवा ह्यांनी अर्थातच एक खोली घेतली होती. खोलीत बॅग ठेवून मारिया अशीच तडक बाहेरच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी पळाली. "येते, मी थोड्या वेळात!" असे म्हणत इवाने थोडा वेळ मागून घेतला. "ही थंडगार हवा, हा इतका सुंदर देखावा, तू असा जवळी हवा!" असे गुणगुणत राहावं असेच तिला वाटत होतं.
सर्जी आणि आपल्यात असा दुरावा का निर्माण व्हावा ह्याचा विचार करून करून ती थकून गेली होती. सुरुवातीचे दिवस सरले तरी त्यांचे एकमेकांवरील प्रेम काही कमी झाले नव्हते. पण एव्हाना सर्जी अगदी जबाबदारीने वागायला लागला होता. इवाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे असे त्याने पूर्णपणे मनावर घेतलं होतं आणि त्यामुळे आपल्या करियरचा तो अगदी गांभीर्याने विचार करायला लागला होता. "तू माझ्यासाठी आकाशातील चंद्र आणला नाही तरी चालेल! ह्या रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात सुद्धा मी तुझ्यासोबत अगदी सुखाने राहीन!" इवाने त्याला समजावयाचा खूप खूप प्रयत्न करून पाहिला. पण सर्जी ऐकण्याच्या पलीकडे होता. "आयुष्य खूप मोठं आहे! प्रेमाचे संदर्भ सतत बदलत राहणार! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा ह्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा तुला ऊब देण्याची ताकद माझ्याकडे हवी!" सर्जी सतत तिला म्हणत राहायचा. "अरे, पण हे क्षण, हा काळ परत थोडाच आपल्याला मिळणार आहे? तुझं करियर तू नंतर सुद्धा बनवू शकशील!" इवाने खूप खूप आर्जवं करून पाहिली. परंतु काही उपयोग झाला नव्हता. आणि एके दिवशी बँकेच्या एका परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँकेचा व्यवस्थापक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मॉस्कोला निघून गेला देखील!
"सहा महिन्यात मी परत येईन!" ह्या त्याच्या आश्वासनावर इवाचा पूर्ण भरवसा असला तरी तिला भोवतालची परिस्थिती आपल्याला बदलवणार नाही ह्याची मात्र शाश्वती नव्हती.
"अग इवा, बघ बघ बर्फवृष्टी सुरु झाली!" मारियाच्या आवाजाने इवा भानावर आली. खरंच की! आकाशातून पिंजून काढलेल्या कापसासारखा बर्फ वाऱ्यावर हेलेकावे घेत जमिनीवर येत होता. जमिनीवर विसावण्याची बर्फाला अजिबात घाई नव्हती! आपल्या मनातील स्पंदनासारखाच हा बर्फ आहे! एका विशिष्ट दिशेत प्रवास करण्याऐवजी त्यालाही हेलकावे घ्यायला आवडतं. माझ्या मनाच्या स्पंदनाच्या राजा, सर्जी - कुठे आहेस तू! व्याकूळ हरिणीसारखी इवा म्हणाली. मैत्रिणींचा कल्लोळ वाढला होता. आता बाहेर जाण्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरला नव्हता! 

(क्रमशः)

Saturday, September 6, 2014

व्यवसायगाथा!

 
नेहमीच समाजातील बहुतांशी वर्ग हा स्वतःसाठी आणि पुढल्या पिढीसाठी योग्य व्यवसायाच्या शोधात असतो. ही प्रक्रिया कळत नकळत होत असते. प्रत्येक व्यवसायाच्या जशा चांगल्या बाबी असतात तशाच त्या व्यवसायाच्या अनुषंगाने येणाऱ्या कठीण बाबी सुद्धा असतात. सद्यकाळात उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायांचे पृथ्थकरण करण्याचा हा प्रयत्न!

१) डॉक्टर
२) पारंपारिक क्षेत्रातील अभियंता
३) माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता
४) वाणिज्य क्षेत्रातील व्यावसायिक
५) कला क्षेत्रातील व्यावसायिक
६) क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक

७) शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक
८) सामाजिक क्षेत्रातील व्यावसायिक

९) कृषीक्षेत्रातील व्यावसायिक
१०) पत्रकार
११) विविध कारणांनी तरुण वयात मोठी संपत्ती लाभलेले आणि उत्तम नियोजनाने त्याचा लाभ घेणारे
१२) स्वयं व्यावसायिक (ह्यात बांधकाम क्षेत्र, दुकानदार, आर्किटेक्ट वगैरे लोकांचा समावेश होतो)
१३) राजकारणी
१४) चोर दरोडेखोर
१५) अन्य

वरील उल्लेखलेल्या काही व्यावसायिकांचे सरकारी क्षेत्रात काम करणारे आणि खासगी क्षेत्रात काम करणारे असेही वर्गीकरण करता येईल.

गैरमार्गाने संपत्ती गोळा करणारे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय म्हणायला गेले तर चांगलेच, कारण ते एक कुटुंब चालविण्यासाठी आवश्यक असणारी अर्थप्राप्ती करण्यास हातभार लावत असतात. अर्थप्राप्ती सोबत कोणत्याही व्यवसायाचे बाकीचे गुणधर्म कोणते हे आता आपण पाहूयात!

१) अर्थप्राप्ती -
  • अर्थप्राप्तीचे प्रमाण - काही व्यवसायात मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती करण्याच्या संधी असतात. जसे की बॉलीवूडच्या यश चोप्राच्या बॅनरखाली बनविल्या गेलेल्या चित्रपटाचा नायक बनणे.  किंवा मुंबईत सद्यकाळात एक बहुमजली इमारत उभारणे!
         अर्थात ज्या व्यवसायात अर्थप्राप्तीच्या अधिक संधी तो व्यवसाय अधिक चांगला मानण्याची सद्य जनांची प्रवृत्ती आढळून येते.  ह्याच कारणामुळे शेतीक्षेत्राकडे लोकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

  • अर्थप्राप्तीची कमाल मर्यादा गाठण्यास लागणारा कालावधी - ज्या व्यवसायात अर्थप्राप्तीची कमाल मर्यादा किमान कालावधीत गाठली जाऊ शकते तो व्यवसाय लोकांना आवडतो.

  • अर्थप्राप्तीतील सातत्य टिकण्याचा कालावधी - क्रीडा आणि अभिनय क्षेत्राला क्षणभंगुरतेचा धोका असतो. ह्या क्षेत्रातील साधारण कुवतीचे लोक वयाच्या तिशीच्या आसपास त्या क्षेत्रातून निवृत्त होतात. 

  • माणसाचा निवृत्तीनंतरचा कालावधी किमान असणे आवश्यक असते. माणूस जितका अधिक काल व्यवसायात मग्न राहतो तितका काळ तो शिस्तीत दिनचर्या व्यतीत करतो.  एखाद्या माणसाने तिशीच्या सुमारास कोट्यावधी रुपये कमावले आणि तो निवृत्त झाला तर त्याला बेशिस्तीच्या मार्गाने न जाता उर्वरित आयुष्य व्यतीत करणे फार संयमाचे काम बनते. 

२) व्यवसायाच्या निमित्ताने सहवासात येणाऱ्या लोकांचा सांस्कृतिक, शैक्षणिक दर्जा
  •  म्हणायला गेलं तर हल्ली हा घटक फारसा महत्वाचा मानला जात नाही.  म्हणायला गेलं तर बुद्धिमान लोकांशी संपर्कात राहिल्याने जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते. जीवनावश्यक गोष्टींसाठी लागणारा पैसा कमवून झाल्यानंतर माणूस एक तर पुढील पिढीसाठी  किंवा समाजसेवेसाठी पैसा कमावतो. ह्या व्यतिरिक्त उरणारा पैसा छानशौकीवर खर्च केला जातो आणि ह्या छानशौकीला मर्यादा नाहीत. बुद्धिमान लोकांचा सहवास आपणास वाचन, संगीत, प्रवास (केवळ फेसबुकवर फोटो टाकण्याच्या उद्देश्याने केलेले प्रवास वगळून!) असे चांगले छंद, सवयी विकसित करण्यास मदत करतो. 
 ३) कुटुंबाला वेळ देऊ शकण्याची क्षमता
  • मागच्या पिढीपेक्षा हल्लीच्या पिढीतील कुटुंबियांच्या वेळेच्या मागण्या वाढल्या आहेत. मुलांबरोबर जितका वेळ जास्त घालवू शकतो तितकं त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याची शक्यता वाढीस लागते आणि एका प्रकारे ते भावनिकदृष्ट्या स्वतःला सुरक्षित वाटून घेतात. 
  • ह्या मुद्द्याच्या बाबतीत आधुनिक काळातील खेळाडू, अभिनेते ह्यांची परिस्थिती काहीशी बिकट असते. वर्षातील बरेचसे महिने त्यांना कुटुंबापासून दूर परगावी, परदेशी राहावं लागतं. खेळाडूंची कामगिरी तर करोडो लोक प्रत्यक्ष पाहत असतात. जो माणूस चार लोकांसमोर उभं राहून दोन शब्द बोलू शकणार नाही तोच माणूस ह्या लोकांच्या कामगिरीवर येथेच्छ टीका करण्यास मोकळा असतो! आणि दीर्घकालीन दौऱ्यावर पत्नीला सोबत घेऊन जायचा उदारपणा काही क्रीडासंस्थांनी दाखविला तरी ज्यांना मुले आहेत त्यांना सोबत घेऊन जाणे शक्य नसते.
 ४) व्यवसायात चंचू प्रवेश करणारा अनैतिक मार्गांचा धोका
  • काही क्षेत्रात  भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणारे अनेक सहकारी असतात. अशा सहकाऱ्यांबरोबर काम करताना एखाद्या व्यक्तीला इच्छा नसताना भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्यासाठी दडपण आणलं जाऊ शकते.  हीच गोष्ट हल्ली आढळून येणाऱ्या काही खेळांच्या व्यावसायिक साखळ्यांची!
  • चोर, दरोडेखोर ह्यांच्या व्यवसायाचा पाया अनैतिकतेवरच उभारला असल्याने त्यांच्याविषयी न बोललेलं बर!
 ५) व्यवसायातील स्पर्धेचे प्रमाण
  • एखाद्या व्यवसायात तुम्हांला प्रतिस्पर्धी बनू शकण्यासाठी बाह्य जनतेला किती मेहनत घ्यावी लागते हा महत्वाचा घटक आहे. तुम्ही टीव्हीवरील एखाद्या मालिकेत काम करत असाल तर तुमचे रूप आणि काही प्रमाणात नाटकी अभिनय करण्याची तुमची क्षमता हे तुमचे भांडवल असते. परंतु हेच भांडवल असणारे असंख्य लोक बाहेर उपलब्ध असल्याने तुम्ही स्वतःला फारसे सुरक्षित वाटून घेऊ शकत नाही. हीच गोष्ट झाली IPL सारख्या स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे लाखो युवक असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या स्पर्धेत यशस्वी होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे ह्याचं भान ठेवणं आवश्यक आहे. 
  • ह्या उलट तुम्ही एखाद्या क्षेत्रात Ph.D केली असेल तर त्या क्षेत्रात तुम्हांला किमान स्पर्धा असते.
 ६) व्यवसायातील आरोग्याला धोकादायक ठरणारे घटक
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे लोक सतत संगणकासमोर बसतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. व्यायाम कमी झाल्याने तंदुरुस्ती कमी पातळीवर येते. जेवणाखाण्याच्या वेळेचा ताल राहत नाही. 
  • डॉक्टर पेशातील लोकांना विविध रोगांनी ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात यावे लागल्याने त्यांना स्वतःला ह्या व्याधींना बळी पडण्याची शक्यता वाढीस लागते. 
  • अभिनय क्षेत्रातील लोकांना जागरण, सतत परगावी प्रवास, बाहेरील खाणे अशा समस्यांचा मुकाबला करावा लागतो. 
  • अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठाल्या पैशाच्या उलाढाली, निर्णय घ्यावे लागल्याने ते तणावाचे बळी पडू शकतात. 
  • बांधकाम, हॉटेल व्यावसायिक ह्यांना खंडणीबहाद्दर लोकांचे दूरध्वनी आल्यास त्यांनाही तणाव येऊ शकतो. 
७) व्यावसायिक पेशानुसार ठरविलं जाणारं सामाजिक स्थान (मुख्यतः समारंभातील)
  • हा घटक सर्वांसाठी महत्वाचा नसल्याने काही जण ह्याची पर्वा करीत नाहीत. परंतु क्रीडा (विशेष करून क्रिकेट), अभिनय क्षेत्रातील खास नैपुण्य प्राप्त केलेल्या लोकांना सामाजिक जीवनात खास स्थान प्राप्त होते.

खरतरं वर उल्लेखलेल्या १४ - १५ व्यवसायांचं ह्या ७ गुणधर्मांवर मुल्यमापन करण्याचा माझा विचार होता. पण वेळेअभावी हे शक्य होईल असे दिसत नाही. 

सारांश असा - दुरून डोंगर साजरे! एखादा व्यवसाय लांबून कितीही झगमगता वाटत असला तरी त्याच्याही समस्या असतातच! वैध मार्गाने केलेला वयाच्या ५८ वर्षापर्यंत अर्थाजनाची ग्वाही देणारा कोणताही व्यवसाय उत्तमच! पैशापलीकडे पाहण्याची परिपक्वता आपल्या समाजाने दाखविणे इष्ट होय!




Thursday, September 4, 2014

कलियुग म्हणजे काय हो भाऊ?

 

बंड्या हा सद्यकालीन बालक आणि रामभाऊ हे त्याला जीवनबोध देणारे मार्गदर्शक!

बंड्या - "काय करावे हे समजत नाही! जीवनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत, ह्यातून कोणता मार्ग काढावा हेच कळत नाही!"
रामभाऊ - "इतके शुद्ध आणि उच्च दर्जाचे मराठी तुझ्या वयाच्या बालकाच्या तोंडून ऐकून मला अगदी गहिवरून आले आहे! माझ्या मनात आनंद उचंबळून आला आहे! परंतु मनातील भावनांना दूर ठेवून तुझ्या मनातील संभ्रमांना दूर करण्याचे माझे आद्य कर्तव्य निभावण्यासाठी मी बांधील आहे!"

बंड्या - "माझ्या प्रती सहानभुती व्यक्त करण्याचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे! परंतु तुमच्या ह्या विधानातून माझ्या मनात अजून काही संभ्रम निर्माण झाले आहेत"

रामभाऊ - "केवळ चर्चा, वाचन करून प्रत्यक्ष कृती न करण्याची जी चूक काही समकालीन समाज करीत आहेत त्याची पुनरावृत्ती करता आपण थेट मूळ मुद्द्याकडे येऊयात! तुझा मूळ संभ्रम काय आहे?"

बंड्या - "कलियुग म्हणजे काय हो भाऊ?"

बंड्याच्या ह्या प्रश्नाने रामभाऊसारखे अनेक पावसाळे पाहिलेले गृहस्थ सुद्धा गोंधळून जातात. त्यांना मूर्च्छा येऊन ते काही काळ बेशुद्ध होतात. आपल्या ह्या प्रश्नाने त्यांची ही अवस्था झाली हे पाहून बंड्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. पण आपले कर्तव्य विसरण्याची तो चूक न करता त्यांच्या तोंडावर तो पाणी शिंपडतो. रामभाऊ तात्काळ जागे होतात. आपला स्थितप्रज्ञपणाचा दावा एका प्रश्नाने कोलमडून पडावा ह्याचा झालेला खेद बाजूला सारत ते बंड्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज होतात.

रामभाऊ - "अखिल मनुष्यजातीच्या समजुतीप्रमाणे चार युगे! सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. एका युगातून दुसऱ्या युगातील प्रवास कोणत्या एका विशिष्ट वेळी न होता ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण सध्या कलियुगात आहोत! "

बंड्या - "ह्यातील प्रत्येक युगाची वैशिष्ट्य सांगण्याची कृपा आपण कराल काय?"

ह्या प्रश्नाने रामभाऊचा चेहरा खुलून उठतो. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी एक पात्र पाणी पिऊन येतो असे सांगून ते दोन मिनिटात स्वयंपाकघरात जाऊन येतात.

रामभाऊ - "सर्वप्रथम सत्ययुग अवतरले, ह्या काळातील लोक सत्यवचनी, पापभीरु होते. चोऱ्या वगैरे होत नसत! असं म्हटलं जात की ह्या काळात देवांचं पृथ्वीवर वास्तव्य होते!"

बंड्याच्या चेहऱ्यावरील बदलते भाव रामभाऊ तात्काळ ओळखतात.

रामभाऊ - "तुझ्या मनात ह्या क्षणी विविध भावना उत्पन्न झाल्या आहेत! सर्वप्रथम मी आधीचा इतिहास न सांगता थेट कलीयुगाकडे वळावे अशी तुझी इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे मी दोन मिनिटांत आत माझ्या भ्रमणध्वनीवर सर्व युगांवर गुगल सर्च केला अशी शंका तुझ्या मनी उत्पन्न झाली आहे!"

आपल्या मनातील भावना रामभाऊनी अचूक ओळखल्या हे पाहून बंड्या खजील होतो.

रामभाऊ - "ह्यामध्ये तुझा काही दोष नाही! ही कलियुगाची किमया आहे. कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी समजून न घेता केवळ गरजेपुरता माहिती मिळवण्याची वृत्ती सद्यजनात निर्माण झाली आहे! त्याचबरोबर आपल्या सभोवतालच्या लोकांवरचा आपला विश्वास कमी होत चालला आहे!"

आता आपल्याला रामभाऊचे बोलणं निमूटपणे ऐकल्याशिवाय पर्याय नाही हे समजून बंड्या मस्तपैकी आसन ठोकतो.

रामभाऊ - "मी फारसा मागे जात नाही! काही काळापूर्वी सामाजिक जीवनात शिकलेल्या लोकांचे प्रभुत्व होते. शिक्षणाचा प्रसार सर्व समाजात न झाल्याने विशिष्ट समाजाने हे प्रभुत्व राखलं. काही समाज कष्टकरी होता, कष्टाच्या मार्गाने जी काही भाकरी मिळेल ती खाऊन समाधान मानण्याची समंजस वृत्ती त्यांच्यात होती. परंतु काही न शिकलेल्या लोकांना इतके कष्ट करणे मान्य नव्हते आणि त्यामुळे ते चोरी, दरोडे इत्यादी मार्गाचा अवलंब करीत! सुशिक्षित लोकांना ह्या दरोडेखोर लोकांचे अति भय वाटत असे! त्यामुळे ते आपल्या लहान मुलांना वगैरे अशा लोकांपासून दूर राहण्याचा उपदेश करीत! चित्ररुपात अशा दरोडेखोर लोकांच्या प्रतिमा उभ्या करीत! "


रामभाऊचे इतके बोलणं एकाग्रतेने ऐकणं बंड्याच्या कुवतीपलीकडे होते. तरीदेखील पंधरा सेकंदात "कसं काय" वरील थिल्लर विनोदावर नजर फिरवून तो परत रामभाऊच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला.

रामभाऊ - "कलियुग म्हणजे कली ह्या दैत्याच राज्य! आता कली कोणत्या जुन्यापुराण्या राक्षसाच्या रुपात आपणासमोर उभा ठाकत नाही! सुशिक्षित लोकांनी आपल्या अशा वाईट प्रतिमा निर्माण केल्याने कली काहीसा वैतागला. आपण केवळ रात्रीच्या वेळी दुष्कर्मे करण्यास बाहेर पडतो असा समज त्या लोकांनी निर्माण करणे हा आपला घोर अपमान मानून घेऊन त्याने काळानुसार बदलण्याचं ठरविलं! त्यामुळे हल्लीचा चोर जंगलात झाडामागे कुऱ्हाड वगैरे घेऊन लपून बसत नाही! तो सुशिक्षित आहे. तो दिवसाढवळ्या बुद्धी वापरून चोरी करतो! आणि चांगल्या लोकांना त्रास देतो!"

बंड्या अजूनच गोंधळून जातो.
बंड्या - " मग आधुनिक काळात सज्जन आणि दुर्जन ह्यात सीमारेषा कोणती! "

रामभाऊ - "लाखमोलाचा प्रश्न विचारलास तू! हल्ली पूर्ण सज्जन असा कोणी राहिला नाही. कलीने तथाकथित सज्जनांच्या मनात सुद्धा प्रवेश केला आहे. त्यामुळे जशी संधी मिळेल तशी दुष्कृत्ये ते ही करतात!"

बंड्या - "मग पुढे काय होणार?"

रामभाऊ - " कलियुगाच्या पुढे कोणते युग येणार हे मला माहित नाही! आता ते गुगलवर नाही म्हणून मला माहित नाही असे तुला वाटल्यास मी तुला दोषी धरणार नाही! दोन शक्यता आहेत.
१) एक तर सज्जन लोक काळानुसार अधिक जागृत होऊन आपल्या बुद्धीची धार वाढवून मनात शिरलेल्या कलीचा नाश करतील आणि पृथ्वीवर पुन्हा सत्ययुग अवतरेल! 
२) सज्जन लोकांच्या बुद्धीचा पूर्ण ताबा कली घेईल आणि पृथ्वीवर पूर्ण अनागोंदी माजेल आणि शेवटी पृथ्वीचा विनाश होईल!"

ज्ञानाच्या इतक्या मोठ्या डोसाने गार पडलेला बंड्या आपला मूड सुधारण्यासाठी तात्काळ पिझ्झा आणि कोकची ऑर्डर देऊन पुन्हा भ्रमणध्वनीवर इंटरनेट वापरण्यात मग्न होतो!