Thursday, September 4, 2014

कलियुग म्हणजे काय हो भाऊ?

 

बंड्या हा सद्यकालीन बालक आणि रामभाऊ हे त्याला जीवनबोध देणारे मार्गदर्शक!

बंड्या - "काय करावे हे समजत नाही! जीवनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत, ह्यातून कोणता मार्ग काढावा हेच कळत नाही!"
रामभाऊ - "इतके शुद्ध आणि उच्च दर्जाचे मराठी तुझ्या वयाच्या बालकाच्या तोंडून ऐकून मला अगदी गहिवरून आले आहे! माझ्या मनात आनंद उचंबळून आला आहे! परंतु मनातील भावनांना दूर ठेवून तुझ्या मनातील संभ्रमांना दूर करण्याचे माझे आद्य कर्तव्य निभावण्यासाठी मी बांधील आहे!"

बंड्या - "माझ्या प्रती सहानभुती व्यक्त करण्याचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे! परंतु तुमच्या ह्या विधानातून माझ्या मनात अजून काही संभ्रम निर्माण झाले आहेत"

रामभाऊ - "केवळ चर्चा, वाचन करून प्रत्यक्ष कृती न करण्याची जी चूक काही समकालीन समाज करीत आहेत त्याची पुनरावृत्ती करता आपण थेट मूळ मुद्द्याकडे येऊयात! तुझा मूळ संभ्रम काय आहे?"

बंड्या - "कलियुग म्हणजे काय हो भाऊ?"

बंड्याच्या ह्या प्रश्नाने रामभाऊसारखे अनेक पावसाळे पाहिलेले गृहस्थ सुद्धा गोंधळून जातात. त्यांना मूर्च्छा येऊन ते काही काळ बेशुद्ध होतात. आपल्या ह्या प्रश्नाने त्यांची ही अवस्था झाली हे पाहून बंड्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. पण आपले कर्तव्य विसरण्याची तो चूक न करता त्यांच्या तोंडावर तो पाणी शिंपडतो. रामभाऊ तात्काळ जागे होतात. आपला स्थितप्रज्ञपणाचा दावा एका प्रश्नाने कोलमडून पडावा ह्याचा झालेला खेद बाजूला सारत ते बंड्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सज्ज होतात.

रामभाऊ - "अखिल मनुष्यजातीच्या समजुतीप्रमाणे चार युगे! सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. एका युगातून दुसऱ्या युगातील प्रवास कोणत्या एका विशिष्ट वेळी न होता ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आपण सध्या कलियुगात आहोत! "

बंड्या - "ह्यातील प्रत्येक युगाची वैशिष्ट्य सांगण्याची कृपा आपण कराल काय?"

ह्या प्रश्नाने रामभाऊचा चेहरा खुलून उठतो. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी एक पात्र पाणी पिऊन येतो असे सांगून ते दोन मिनिटात स्वयंपाकघरात जाऊन येतात.

रामभाऊ - "सर्वप्रथम सत्ययुग अवतरले, ह्या काळातील लोक सत्यवचनी, पापभीरु होते. चोऱ्या वगैरे होत नसत! असं म्हटलं जात की ह्या काळात देवांचं पृथ्वीवर वास्तव्य होते!"

बंड्याच्या चेहऱ्यावरील बदलते भाव रामभाऊ तात्काळ ओळखतात.

रामभाऊ - "तुझ्या मनात ह्या क्षणी विविध भावना उत्पन्न झाल्या आहेत! सर्वप्रथम मी आधीचा इतिहास न सांगता थेट कलीयुगाकडे वळावे अशी तुझी इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे मी दोन मिनिटांत आत माझ्या भ्रमणध्वनीवर सर्व युगांवर गुगल सर्च केला अशी शंका तुझ्या मनी उत्पन्न झाली आहे!"

आपल्या मनातील भावना रामभाऊनी अचूक ओळखल्या हे पाहून बंड्या खजील होतो.

रामभाऊ - "ह्यामध्ये तुझा काही दोष नाही! ही कलियुगाची किमया आहे. कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी समजून न घेता केवळ गरजेपुरता माहिती मिळवण्याची वृत्ती सद्यजनात निर्माण झाली आहे! त्याचबरोबर आपल्या सभोवतालच्या लोकांवरचा आपला विश्वास कमी होत चालला आहे!"

आता आपल्याला रामभाऊचे बोलणं निमूटपणे ऐकल्याशिवाय पर्याय नाही हे समजून बंड्या मस्तपैकी आसन ठोकतो.

रामभाऊ - "मी फारसा मागे जात नाही! काही काळापूर्वी सामाजिक जीवनात शिकलेल्या लोकांचे प्रभुत्व होते. शिक्षणाचा प्रसार सर्व समाजात न झाल्याने विशिष्ट समाजाने हे प्रभुत्व राखलं. काही समाज कष्टकरी होता, कष्टाच्या मार्गाने जी काही भाकरी मिळेल ती खाऊन समाधान मानण्याची समंजस वृत्ती त्यांच्यात होती. परंतु काही न शिकलेल्या लोकांना इतके कष्ट करणे मान्य नव्हते आणि त्यामुळे ते चोरी, दरोडे इत्यादी मार्गाचा अवलंब करीत! सुशिक्षित लोकांना ह्या दरोडेखोर लोकांचे अति भय वाटत असे! त्यामुळे ते आपल्या लहान मुलांना वगैरे अशा लोकांपासून दूर राहण्याचा उपदेश करीत! चित्ररुपात अशा दरोडेखोर लोकांच्या प्रतिमा उभ्या करीत! "


रामभाऊचे इतके बोलणं एकाग्रतेने ऐकणं बंड्याच्या कुवतीपलीकडे होते. तरीदेखील पंधरा सेकंदात "कसं काय" वरील थिल्लर विनोदावर नजर फिरवून तो परत रामभाऊच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला.

रामभाऊ - "कलियुग म्हणजे कली ह्या दैत्याच राज्य! आता कली कोणत्या जुन्यापुराण्या राक्षसाच्या रुपात आपणासमोर उभा ठाकत नाही! सुशिक्षित लोकांनी आपल्या अशा वाईट प्रतिमा निर्माण केल्याने कली काहीसा वैतागला. आपण केवळ रात्रीच्या वेळी दुष्कर्मे करण्यास बाहेर पडतो असा समज त्या लोकांनी निर्माण करणे हा आपला घोर अपमान मानून घेऊन त्याने काळानुसार बदलण्याचं ठरविलं! त्यामुळे हल्लीचा चोर जंगलात झाडामागे कुऱ्हाड वगैरे घेऊन लपून बसत नाही! तो सुशिक्षित आहे. तो दिवसाढवळ्या बुद्धी वापरून चोरी करतो! आणि चांगल्या लोकांना त्रास देतो!"

बंड्या अजूनच गोंधळून जातो.
बंड्या - " मग आधुनिक काळात सज्जन आणि दुर्जन ह्यात सीमारेषा कोणती! "

रामभाऊ - "लाखमोलाचा प्रश्न विचारलास तू! हल्ली पूर्ण सज्जन असा कोणी राहिला नाही. कलीने तथाकथित सज्जनांच्या मनात सुद्धा प्रवेश केला आहे. त्यामुळे जशी संधी मिळेल तशी दुष्कृत्ये ते ही करतात!"

बंड्या - "मग पुढे काय होणार?"

रामभाऊ - " कलियुगाच्या पुढे कोणते युग येणार हे मला माहित नाही! आता ते गुगलवर नाही म्हणून मला माहित नाही असे तुला वाटल्यास मी तुला दोषी धरणार नाही! दोन शक्यता आहेत.
१) एक तर सज्जन लोक काळानुसार अधिक जागृत होऊन आपल्या बुद्धीची धार वाढवून मनात शिरलेल्या कलीचा नाश करतील आणि पृथ्वीवर पुन्हा सत्ययुग अवतरेल! 
२) सज्जन लोकांच्या बुद्धीचा पूर्ण ताबा कली घेईल आणि पृथ्वीवर पूर्ण अनागोंदी माजेल आणि शेवटी पृथ्वीचा विनाश होईल!"

ज्ञानाच्या इतक्या मोठ्या डोसाने गार पडलेला बंड्या आपला मूड सुधारण्यासाठी तात्काळ पिझ्झा आणि कोकची ऑर्डर देऊन पुन्हा भ्रमणध्वनीवर इंटरनेट वापरण्यात मग्न होतो!
 

No comments:

Post a Comment