Sunday, September 14, 2014

मी whatsapp वर नाही! तुमचं काय?

 
हा लेख लिहिताना मनातील भावना थोड्याफार सौम्य स्वरुपात लिहाव्या लागतील. लेखनस्वातंत्र्य वगैरे बोलायला ठीक असलं तरी ह्यातील काही भाग आमच्या शालेय मित्रांना न आवडण्याची शक्यता असल्याने आणि त्यांना मी प्रत्येक ब्लॉगच्या लिंक्स जबरदस्तीने पाठवत असल्याने ते माझा पुढच्या भेटीच्या वेळी निषेध करण्याची दाट शक्यता आहे. आता शालेय मित्रांच्या निषेध व्यक्त करण्याच्या पद्धती आपण सर्व जाणतच असाल.
असो बऱ्याच दिवसांपासून मला ऑफिसातील काही सहकारी, नातेवाईक आणि मित्रमंडळी मी whatsapp वर नसल्याबाबत दुषणं देत असतात. ह्यात अजून एक मुद्दा आहे. माझ्या अगदी मोडकळीला आलेल्या ब्लॅकबेरीकडे पाहून हे सर्व मला एक चमत्कारिक मुद्रा देत असतात. परंतु जगातील उपभोगवादी वृत्तीला तोंड देण्यासाठी ईश्वराने माझी निवड केली आहे अशी मी माझी समजूत करून घेतल्याने मी अशा गोष्टींनी माझा मूड खराब करून घेत नाही.
लहानपणी शाळेत प्रश्न असत - "पहिल्या महायुद्धाची तात्कालिन कारणे कोणती?" "१८५७ च्या बंडाची तात्कालिन कारणे कोणती?" ह्यात तात्कालिन हा भाग महत्वाचा हे समजायला मला शालेय जीवनात काही काळ जावा लागला. परंतु संसारात मला ह्या शब्दाचा अर्थ अगदी पुरता समजला. जसे की घरात बराच वेळ धुसफूस चालू असताना भडका उडायला एखादं तात्कालीन कारण लागतं. म्हणजे बघा कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणणाऱ्या गोष्टीची दीर्घकालीन आणि तात्कालीन कारणे असतात. दीर्घकालीन कारणांमुळे एखादा माणूस, गट, राष्ट्र एक विशिष्ट कृती करण्याच्या निर्णयाप्रती येते. पण ती विशिष्ट कृती अचानकपणे करू शकत नसल्याने त्या कृतीसाठी तात्कालीन कारण लागतं.
प्रस्तावना खूप लांबली. हा ब्लॉग लिहिण्याचं तत्कालीन कारण म्हणजे काल रविवारी आमच्या बॅचने आयोजित केलेली चिंचोटी धबधब्याची सहल! हल्लीच्या प्रथेनुसार आमच्या बॅचचा सुद्धा whatsapp ग्रुप आहे. पूर्वी लोक सकाळी उठून चालायला जात, सूर्यनमस्कार घालीत पण  हल्ली whatsapp वर नवीन काय आलंय हे तपासून पाहतात, पाच-सहा ग्रुपवर शुभप्रभातचे संदेश टाकतात. मी ह्या गटात नाहीये. आम्ही सर्व १५ ऑगस्टला भेटलो होतो त्यावेळी १४ सप्टेंबर ही तारीख नक्की झाली होती. त्यावेळी काही लोकांना पितृपक्ष असल्याचं ध्यानात आलं नाही. पण ज्या क्षणी लक्षात आलं त्या क्षणी त्यांनी फोन करून आपण येऊ शकत नसल्याचं कळवलं. आणि आपल्या ह्या निर्णयामुळे बाकी लोक सहभागी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त होऊ नयेत म्हणून whatsapp वर हा निर्णय घोषित केला नाही. ही झाली प्रगल्भता!! शेवटी बरीच चर्चा झाली. लोकशाही तत्वानुसार दोन्ही बाजूच्या लोकांनी आपली मते टाकली. एक नवीन पर्याय पुढे आला आणि चर्चा त्यावर वळली. मग आलिया भटला न राहवल्यामुळे तिनेही ह्या चर्चेला भेट दिली. इतक्या सगळ्या गडबडीत एका मित्राने फोन करून जर आपण जात असू तर मी तीन कुटुंबांना आणतो अशी हमी दिली. अजून एका मुलीने फोनवर मी नक्की येत असल्याचं खात्रीपूर्वक सांगितलं. हे दोघंही शब्दाचे पक्के असल्याने मी तसा निर्धास्त झालो. पुढे बराच वेळ चर्चा चालू होती. त्यातील नकारामुळे ज्या ज्या वेळा निराश व्हायची वेळ आली त्यावेळी बरे वाटावे म्हणून ह्या दोघांना फोन करीत राहिलो. शेवटी आम्ही जाण्याचा आणि सव्वाआठ वाजता चिंचोटी नाक्यावर भेटण्याचा निर्णय घेतला. हो फोनवर हा निर्णय घेतला. आणि बरोबर सव्वा आठच्या सुमारास जवळपास १५ जणांचा गट चिंचोटी नाक्यावर हजर होता. पुढे सहल उत्तम झाली. बाकीच्या मित्रांची उणीव नक्कीच जाणवली. ते आले असते तर अजून मस्त धमाल आली असती. असो एक संस्मरणीय सहल होऊन गेली!
 whatsapp हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याचे फायदे नक्कीच आहेत. चांगली माहिती आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेयर करू शकतो. एखाद्या आणीबाणीच्या वेळी सर्वांना आपण महत्वाचे अपडेट देऊ शकतो. माझ्याकडे whatsapp नसल्याने ह्या फायद्यांपासून मी वंचित राहतो. म्हणजे वरील दोन गोष्टी साध्य करण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत पण त्यात whatsapp ची सुलभता नाही.
whatsapp चे तोटे कोणते?
१) whatsapp वर आपलं लक्ष विचलित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी, विनोद येत राहतात. ह्यापासून दूर राहण्यासाठी मनाचा निग्रह हवा जो माझ्याकडे नाही.
२) एखाद्या गोष्टीत गढून जायचं असेल तर आपणासमोर विचलित करणाऱ्या गोष्टी किमान असाव्यात, त्यामुळे विचलित करणाऱ्या गोष्टींच्या यादीत whatsapp चा समावेश करायला मी धजावत नाही.
३) आपल्याला मित्रमंडळींचा सहवास हवाहवासा वाटतो कारण बाहेरचं जग आपल्याला खूप तणाव देतं. पण ह्यातला प्राधान्यक्रम महत्वाचा! आपली कर्तव्यं पार पाडून मग मित्रमंडळीच्या सहवासात रमावे. जर तुम्ही केवळ मित्रमंडळीच्या सहवासातच सतत राहिलात तर कुठेतरी तुमच्या कर्तव्यांपासून तुमचे दुर्लक्ष होणारच! आणि हो सतत आपल्याला सांभाळून घेणाऱ्या वातावरणात राहण्याची सवय लागणं बरं नाही!
४) भ्रमणध्वनीच्या छोट्या स्क्रीनला सतत खिळून राहण्याने डोळ्यांवर काय दुष्परिणाम  होत असतील ह्या बाबतीत मी साशंक आहे.
५) एखाद्या whatsapp गटात निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी परिपक्व असायला हवी. सर्वांनी मते मांडणे योग्य पण ह्या गटात ह्या सर्व मतांचा सामूहिकपणे विचार करून निर्णय घेणारी व्यक्ती असावी. ह्या व्यक्तीने सर्व पर्यांयांचा कसा विचार करण्यात आला आणि प्रत्येक पर्यायाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करून शेवटी हा निर्णय का घेतला ह्याचं विवेचनही करावं. नाहीतर काय केवळ चर्चाच होत राहणार.
६) स्माईली आणि इतर सर्व सांकेतिक खुणा - ह्यांचा सततचा वापर एके दिवशी तुम्हांला विविध भावनांचे शब्दरूप विसरायला लावू शकतो हे लक्षात ठेवा.

शेवटी तंत्रज्ञानाचा वापर कोठवर करायचा ह्याबाबत  प्रत्येकाने एक सीमारेषा आखायला हवी! काहींनी ही फेसबुकच्या आधीच आखून घेतली. मी ती फेसबुक आणि whatsappच्या मध्ये आखली. उद्या काय whatsapp च्या पुढे कायतरी नक्कीच येईल. प्रत्येकाला कोठेतरी थांबायला हवेच! आपल्या मानवी भावनांना ज्या क्षणी तंत्रज्ञान वेसण घालत ह्याची आपणास जाणीव होईल तिथं थांबावं अशी माझी सूचना!

असो माझ्या शालेय गटातील  whatsapp वर खूप सक्रिय असणाऱ्या मित्रांपैकी कोणी वेळ काढून ह्या ब्लॉगपोस्ट ला उत्तर दिलं तर मी धन्य होईन !

6 comments:

  1. धन्यवाद विजयजी! आपल्यासारखं कोणी आहे ही भावना केव्हाही सुखदायक असते

    ReplyDelete
  2. khup chaan, whatsappvar mazya shaleya group var paste karin :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!! त्यावर काही खास प्रतिक्रिया आल्यास नक्की कळवा !

      Delete
  3. व्यसनांपासून दूर रहावे यामध्ये या गोष्टींचा समावेश व्हायला हवा. मी whatsapp वर आहे पण कोणत्याही ग्रुप मध्ये नाही. परदेशात असल्याने सासर, माहेरच्यांशी संपर्कात रहाण्यासाठी whatsapp अतिशय उपयुक्त आहे. अर्थात कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही किती आणि कसा करता ह्यावरच सारं अवलंबून.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! तुम्ही जसा मनाचा निग्रह दाखवता आहात तसाच सर्वांनी दाखवावयास हवा!
      माझ्या एका मित्राच्या आईचं अमेरिकेतून परत येताना युरोपात कनेक्टिंग फ्लाईट चुकलं असता त्याने भारतातून आणि त्याच्या बहिणीनं अमेरिकेतून ह्याच whatsapp च्या साथीनं दुसरं विमान पकडून देण्यास मदत केली.
      माझ्या सिमला भेटीत मला भेटलेले नाशिकचे कुलकर्णी त्यांच्या व्यवसायात whatsapp कसं झटापट काम करायला उपयुक्त आहे हे आनंदून सांगत होते

      हा माझा मित्र आणि नाशिकचे कुलकर्णी हे दोघेही आपल्याप्रमाणे फक्त आपल्या कामासाठी whatsapp चा वापर करतात. ह्या ब्लॉग पोस्टच्या निमित्ताने अशी चांगली उदाहरणे सर्वांसमोर येणं किती चांगलं!

      Delete