नेहमीच समाजातील बहुतांशी वर्ग हा स्वतःसाठी आणि पुढल्या पिढीसाठी योग्य व्यवसायाच्या शोधात असतो. ही प्रक्रिया कळत नकळत होत असते. प्रत्येक व्यवसायाच्या जशा चांगल्या बाबी असतात तशाच त्या व्यवसायाच्या अनुषंगाने येणाऱ्या कठीण बाबी सुद्धा असतात. सद्यकाळात उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायांचे पृथ्थकरण करण्याचा हा प्रयत्न!
१) डॉक्टर
२) पारंपारिक क्षेत्रातील अभियंता
३) माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता
४) वाणिज्य क्षेत्रातील व्यावसायिक
५) कला क्षेत्रातील व्यावसायिक
६) क्रीडा क्षेत्रातील व्यावसायिक
७) शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक
८) सामाजिक क्षेत्रातील व्यावसायिक
९) कृषीक्षेत्रातील व्यावसायिक
१०) पत्रकार
११) विविध कारणांनी तरुण वयात मोठी संपत्ती लाभलेले आणि उत्तम नियोजनाने त्याचा लाभ घेणारे
१२) स्वयं व्यावसायिक (ह्यात बांधकाम क्षेत्र, दुकानदार, आर्किटेक्ट वगैरे लोकांचा समावेश होतो)
१३) राजकारणी
१४) चोर दरोडेखोर
१५) अन्य
वरील उल्लेखलेल्या काही व्यावसायिकांचे सरकारी क्षेत्रात काम करणारे आणि खासगी क्षेत्रात काम करणारे असेही वर्गीकरण करता येईल.
गैरमार्गाने संपत्ती गोळा करणारे व्यवसाय सोडून बाकी सर्व व्यवसाय म्हणायला गेले तर चांगलेच, कारण ते एक कुटुंब चालविण्यासाठी आवश्यक असणारी अर्थप्राप्ती करण्यास हातभार लावत असतात. अर्थप्राप्ती सोबत कोणत्याही व्यवसायाचे बाकीचे गुणधर्म कोणते हे आता आपण पाहूयात!
१) अर्थप्राप्ती -
- अर्थप्राप्तीचे प्रमाण - काही व्यवसायात मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती करण्याच्या संधी असतात. जसे की बॉलीवूडच्या यश चोप्राच्या बॅनरखाली बनविल्या गेलेल्या चित्रपटाचा नायक बनणे. किंवा मुंबईत सद्यकाळात एक बहुमजली इमारत उभारणे!
- अर्थप्राप्तीची कमाल मर्यादा गाठण्यास लागणारा कालावधी - ज्या व्यवसायात अर्थप्राप्तीची कमाल मर्यादा किमान कालावधीत गाठली जाऊ शकते तो व्यवसाय लोकांना आवडतो.
- अर्थप्राप्तीतील सातत्य टिकण्याचा कालावधी - क्रीडा आणि अभिनय क्षेत्राला क्षणभंगुरतेचा धोका असतो. ह्या क्षेत्रातील साधारण कुवतीचे लोक वयाच्या तिशीच्या आसपास त्या क्षेत्रातून निवृत्त होतात.
- माणसाचा निवृत्तीनंतरचा कालावधी किमान असणे आवश्यक असते. माणूस जितका अधिक काल व्यवसायात मग्न राहतो तितका काळ तो शिस्तीत दिनचर्या व्यतीत करतो. एखाद्या माणसाने तिशीच्या सुमारास कोट्यावधी रुपये कमावले आणि तो निवृत्त झाला तर त्याला बेशिस्तीच्या मार्गाने न जाता उर्वरित आयुष्य व्यतीत करणे फार संयमाचे काम बनते.
२) व्यवसायाच्या निमित्ताने सहवासात येणाऱ्या लोकांचा सांस्कृतिक, शैक्षणिक दर्जा
- म्हणायला गेलं तर हल्ली हा घटक फारसा महत्वाचा मानला जात नाही. म्हणायला गेलं तर बुद्धिमान लोकांशी संपर्कात राहिल्याने जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते. जीवनावश्यक गोष्टींसाठी लागणारा पैसा कमवून झाल्यानंतर माणूस एक तर पुढील पिढीसाठी किंवा समाजसेवेसाठी पैसा कमावतो. ह्या व्यतिरिक्त उरणारा पैसा छानशौकीवर खर्च केला जातो आणि ह्या छानशौकीला मर्यादा नाहीत. बुद्धिमान लोकांचा सहवास आपणास वाचन, संगीत, प्रवास (केवळ फेसबुकवर फोटो टाकण्याच्या उद्देश्याने केलेले प्रवास वगळून!) असे चांगले छंद, सवयी विकसित करण्यास मदत करतो.
- मागच्या पिढीपेक्षा हल्लीच्या पिढीतील कुटुंबियांच्या वेळेच्या मागण्या वाढल्या आहेत. मुलांबरोबर जितका वेळ जास्त घालवू शकतो तितकं त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याची शक्यता वाढीस लागते आणि एका प्रकारे ते भावनिकदृष्ट्या स्वतःला सुरक्षित वाटून घेतात.
- ह्या मुद्द्याच्या बाबतीत आधुनिक काळातील खेळाडू, अभिनेते ह्यांची परिस्थिती काहीशी बिकट असते. वर्षातील बरेचसे महिने त्यांना कुटुंबापासून दूर परगावी, परदेशी राहावं लागतं. खेळाडूंची कामगिरी तर करोडो लोक प्रत्यक्ष पाहत असतात. जो माणूस चार लोकांसमोर उभं राहून दोन शब्द बोलू शकणार नाही तोच माणूस ह्या लोकांच्या कामगिरीवर येथेच्छ टीका करण्यास मोकळा असतो! आणि दीर्घकालीन दौऱ्यावर पत्नीला सोबत घेऊन जायचा उदारपणा काही क्रीडासंस्थांनी दाखविला तरी ज्यांना मुले आहेत त्यांना सोबत घेऊन जाणे शक्य नसते.
- काही क्षेत्रात भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणारे अनेक सहकारी असतात. अशा सहकाऱ्यांबरोबर काम करताना एखाद्या व्यक्तीला इच्छा नसताना भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्यासाठी दडपण आणलं जाऊ शकते. हीच गोष्ट हल्ली आढळून येणाऱ्या काही खेळांच्या व्यावसायिक साखळ्यांची!
- चोर, दरोडेखोर ह्यांच्या व्यवसायाचा पाया अनैतिकतेवरच उभारला असल्याने त्यांच्याविषयी न बोललेलं बर!
- एखाद्या व्यवसायात तुम्हांला प्रतिस्पर्धी बनू शकण्यासाठी बाह्य जनतेला किती मेहनत घ्यावी लागते हा महत्वाचा घटक आहे. तुम्ही टीव्हीवरील एखाद्या मालिकेत काम करत असाल तर तुमचे रूप आणि काही प्रमाणात नाटकी अभिनय करण्याची तुमची क्षमता हे तुमचे भांडवल असते. परंतु हेच भांडवल असणारे असंख्य लोक बाहेर उपलब्ध असल्याने तुम्ही स्वतःला फारसे सुरक्षित वाटून घेऊ शकत नाही. हीच गोष्ट झाली IPL सारख्या स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असणारे लाखो युवक असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या स्पर्धेत यशस्वी होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे ह्याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
- ह्या उलट तुम्ही एखाद्या क्षेत्रात Ph.D केली असेल तर त्या क्षेत्रात तुम्हांला किमान स्पर्धा असते.
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे लोक सतत संगणकासमोर बसतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. व्यायाम कमी झाल्याने तंदुरुस्ती कमी पातळीवर येते. जेवणाखाण्याच्या वेळेचा ताल राहत नाही.
- डॉक्टर पेशातील लोकांना विविध रोगांनी ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात यावे लागल्याने त्यांना स्वतःला ह्या व्याधींना बळी पडण्याची शक्यता वाढीस लागते.
- अभिनय क्षेत्रातील लोकांना जागरण, सतत परगावी प्रवास, बाहेरील खाणे अशा समस्यांचा मुकाबला करावा लागतो.
- अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठाल्या पैशाच्या उलाढाली, निर्णय घ्यावे लागल्याने ते तणावाचे बळी पडू शकतात.
- बांधकाम, हॉटेल व्यावसायिक ह्यांना खंडणीबहाद्दर लोकांचे दूरध्वनी आल्यास त्यांनाही तणाव येऊ शकतो.
- हा घटक सर्वांसाठी महत्वाचा नसल्याने काही जण ह्याची पर्वा करीत नाहीत. परंतु क्रीडा (विशेष करून क्रिकेट), अभिनय क्षेत्रातील खास नैपुण्य प्राप्त केलेल्या लोकांना सामाजिक जीवनात खास स्थान प्राप्त होते.
खरतरं वर उल्लेखलेल्या १४ - १५ व्यवसायांचं ह्या ७ गुणधर्मांवर मुल्यमापन करण्याचा माझा विचार होता. पण वेळेअभावी हे शक्य होईल असे दिसत नाही.
सारांश असा - दुरून डोंगर साजरे! एखादा व्यवसाय लांबून कितीही झगमगता वाटत असला तरी त्याच्याही समस्या असतातच! वैध मार्गाने केलेला वयाच्या ५८ वर्षापर्यंत अर्थाजनाची ग्वाही देणारा कोणताही व्यवसाय उत्तमच! पैशापलीकडे पाहण्याची परिपक्वता आपल्या समाजाने दाखविणे इष्ट होय!
मराठी पुस्तके वाचायची आहेत ?
ReplyDeleteतुमच्या शहरात मिळत नाहीत ?
मग भेट द्या की मराठीबोली.कॉम (www.marathiboli.com)
सर्व पुस्तकांवर १०% सवलत .
ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ.