Wednesday, September 10, 2014

दुरावा - १

 
 ऑफिसातील आपलं काम आटपून इवा घाईनेच निघाली. ट्रान्स सैबेरिअन रेल्वे मार्गावरील कझान शहरात तिचे वास्तव्य होते. हिवाळ्याची चाहूल लागलीच होती. इतका कडक हिवाळा कसा एकटीनेच काढायचा ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा उभा राहिला. सर्जीच्या आठवणीने आलेले डोळ्यातील अश्रू कोणाला दिसणार नाही ह्याची काळजी घेत ती किराणा मालाच्या दुकानात शिरली. ब्रेड, अंडी, दुध, मांस असे ऐवज तिने गोळा केले. आणि ती काउंटरपाशी आली. अचानक तिला आठवलं. आज शुक्रवार होता. शनिवार - रविवारची सुट्टी एकट्यानेच काढायची होती.
सर्जी असा का वागतो ह्याचं तिला त्याला भेटल्यापासून अधूनमधून वाटायचं. पण त्याचं हे वागणं तिने कधी फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्याच्या प्रेमात आकंठपणे बुडून गेल्यावर तिला सर्व काही अगदी स्वप्नातल्या सारखं वाटत राहायचं. त्याचे ते निळे भावूक डोळे, विश्वावर साम्राज्य गाजविण्याची त्याच्या बोलण्यातून प्रकट होणारी मनिषा! आपण किती भाग्यवान आहोत असेच तिला कायम वाटत राहायचं! त्याच्या वागण्यातले दोष तिला कधी फारसे जाणवले नाहीत आणि जाणवले तरी कधी फारसे खटकले नाहीत!
आपलं बिल भरून इवा आता बसमध्ये बसली होती. घरी पोहोचायला अजून अर्धा तास तर नक्की लागणार होता. रस्त्याकडेच्या वृक्षांनी आपली पान गाळून टाकायला सुरुवात केली होती. मॉस्कोला गेलेला सर्जी एकटाच कसा राहत असेल ह्याचा विचार काही वेळ तिच्या डोक्यात येत राहिला. आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून तिने त्याची बरीच आर्जवं केली होती. पण त्याच्या मनमानीपुढे तिचं काहीच चाललं नाही. अशा विचारांच्या गुंत्यात असताना आपलं घर कधी आलं हे तिला कळलं सुद्धा नाही!
यांत्रिकपणे किल्लीने तिने आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. आणलेलं सामान फ्रीजमध्ये नीटनेटक लावून ठेवलं.
 रात्रीचे जेवण कसंतरी आटपून इवा सोफ्यावर येऊन बसली. आठवणी कशा दाटून येत होत्या!
सर्जीवर तिने आपला जीव ओवाळून टाकला होता. त्याची आणि तिची ओळख अशीच कझान शहरातील सार्वजनिक बससेवेतील. एका कडाक्याच्या हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टी चालू असताना सर्वजण बसची वाट पाहत होते. आणि त्यात सर्जी आणि इवा हे दोघेही होते. सर्जी एकसारखा आपल्याकडे रोखून पाहतोय ही गोष्ट इवाला फारशी काही आवडली नव्हती. शेवटी एकदाची बस आली तेव्हा तिने सुटकेचा निःश्वास टाकला होता.  सर्जीने बसमध्ये तिच्याशी बोलायचं प्रयत्न सुद्धा केला होता. पण इवाने तो धुडकावून लावला होता. त्याच्यापासून आपला बचाव करत जेव्हा ती घरात शिरली तेव्हा कुठे तिला हायसं वाटलं होतं.
नंतर आठवडाभर सर्जी दिसला नाही, तेव्हा तिच्या मनात काहीसं अधुरेपणा जाणवायला लागला होता. पण तिने स्वतःलाच समजावलं. "तो कोण तरुण, त्याचं नाव गाव तुला माहीत नाही. अजून किती जणींशी तो असा नजरेचे खेळ खेळत असेल तुला काय माहित!" कितीही समजावयाचा प्रयत्न केला तरी त्या युवकाची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती!
नंतर मग तो अचानक तिला दिसला तो कझानच्या मॉलमध्ये! इथे मात्र गर्दी नव्हती की बोचऱ्या थंडीपासून पळण्याची घाई! आपल्याला पाहिल्यावर त्या युवकाच्या नजरेत दिसलेला आनंद तिने बरोबर टिपला. त्यात नक्कीच आपुलकीची भावना होती. खरेतर तो एका दुकानात खरेदी करत होता आणि ती नुसतीच बाहेर फिरत होती. दोघं काही क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. इवा समोरच एका खुर्चीवर जाऊन बसली. त्या युवकाचं आता खरेदीतील लक्ष पूर्ण उडालं होते. पाच मिनिटे झाली आणि तो नुसताच तिथली शर्ट्स धुंडाळत बसला होता. शेवटी इवाचा संयम सुटला. ती थेट दुकानात शिरली आणि त्या युवकाच्या दिशेने चालू लागली. तो युवक काहीसा बावचळला. आपल्या हातून काही चूक वगैरे झाली काय असा उगाचच त्याला वाटून गेलं. इवा मात्र त्याच्या जवळ गेली आणि हळूच म्हणाली, "माझ्यासोबत कॉफी घ्यायला आवडेल का तुला?" ह्या प्रश्नाने मात्र त्या युवकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं! "नक्कीच! " त्याच्या ह्या उत्तराच्या वेळी त्याच्या गालावर उमटलेली खळी तिला खूप आवडून गेली.
"इवा" "सर्जी" कॉफी दुकानात खुर्चीवर स्थानापन्न होता होता दोघांनी एकमेकांशी ओळख करून घेतली. सर्जी एका बँकेत कनिष्ठ अधिकारी होता आणि पुढची परीक्षा देऊन मोठा अधिकारी बनायचं त्याचं स्वप्नं होतं. बोलणं असं बराच वेळ चालू राहिलं असतं पण इवाच लक्ष अचानक घड्याळाकडे गेलं. "मला आता निघायला हवं! हा घे माझा मोबाईल क्रमांक!" सर्जीने कॉफीचं बिल भरलं. आणि मग तो इवाला सोडत तिच्या घरापर्यंत आला. निरोपाच्या बोलण्यात खरीतर ओपचारीकता जास्त होती. पण नजरा एकमेकांच्या हृदयाचा ठाव घेत होत्या.
सर्जीच्या आठवणी मनात दाटून येत असतानाच इवाला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. पहाटे केव्हातरी तिला जाग आली. आकाश काळसर बनून राहिलं होते. पुढील दोन दिवस तिला एकटीनेच काढायचे होते. बिछान्यातून बाहेर निघायचा तिला खूप कंटाळा आला होता. अचानक तिचा फोन वाजला. समोरून मारियाचा आवाज ऐकून ती एकदम खुश झाली. कुठेतरी भटकंतीचा कार्यक्रम असल्याशिवाय मारिया फोन करणार नाही हे नक्की होते. तिचा अंदाज बरोबर होता. मारिया तिची दूरची नातलग होती. पण कॉलेजातील शिक्षणाच्या वेळी भेटलेली मारिया तिची मैत्रीण जास्त होती.
बाजूलाच असलेल्या एका हिल स्टेशनवर मैत्रिणींच्या गटाने जायचा मनसुबा मारियाने जाहीर करताच इवाने तो अगदी उचलून लावला. मारियाला हा बेत बदलायची संधी न देताच तिने तात्काळ फोन ठेवला. पुढच्या एका तासात मारिया, इवा आणि अजून १० मैत्रिणी त्या हिल स्टेशनच्या तळाच्या ठिकाणी हजर होत्या. काही वेळातच बसमध्ये हा गडबड करणारा ग्रुप बसला. आता दीड तासाचा वर जाण्यासाठी वळणावळणाचा रस्ता होता.
मारियाला एकटीला कोपऱ्याची सीट मिळाली होती. बस जशी सुरु झाली तसा मैत्रिणींचा ग्रुपसुद्धा शांत झाला होता. मारिया आपल्याच विचारचक्रात गढून गेली होती. काही दिवसांनी सर्जी इवासोबत राहायला आला. नुसतं प्रेमात पडून हवेत उडत राहणं वेगळं आणि एकत्र राहणं वेगळं ह्याची दोघांना जाणीव होत होती. म्हटलं तर दोघांना टापटीप राहण्याची सवय होती आणि सर्जीकडून अशा शिस्तीच्या वागण्याची खरतरं इवाने अपेक्षाही ठेवली नव्हती. त्यामुळे तिला हा सुखद धक्का होता. सुरुवातीला अगदी कसं स्वप्नवत सुरु राहिलं. पहिला शुक्रवार होता तो दोघांच्या एकत्र राहण्याचा! सर्जीला धक्का देण्यासाठी इवा ऑफिसातून लवकरच घरी येऊन राहिली होती. तिने घर अगदी टापटीप लावून ठेवलं. डायनिंग टेबलवर फुलं मांडून ठेवली. सर्जीला आवडणारी टर्की सॅंडविच आणि सूप बनवून ठेवलं.
सर्जी परतला तोवर सूर्य आकाशात रेंगाळत होता. सूर्याची सोनेरी किरणं दिवाणखान्यात पसरली होती. सर्जीने दार उघडलं आणि आतलं वातावरण त्याला खूप भावलं. अगदी मनापासून भावलं! त्याने आपली बॅग खाली ठेवली. आणि त्याचे डोळे इवाचा शोध घेऊ लागले. खमंग पदार्थांचा वास सुटणाऱ्या स्वयंपाकघरात तिचा पत्ता नव्हता.  बाथरूमसुद्धा कोरडंच होते. खरेतर ती बाथरूममध्ये असेल अशी सर्जीला आशाही वाटून गेली होती.
शेवटी काही आणायला बाहेर गेली असेल ही असा विचार करून तो काहीसा उदास होऊन गॅलरीत आला. गॅलरीतून खालच्या रस्त्याचं दृश्य तो पाहत असताना अचानक त्याच्या डोळ्यांवर इवाचे कोमल हात आले. ही पडद्याआड दडली असेल हे आपणास सुचलं कसं नाही ह्याचा त्याला पश्चाताप झाला. इवाने त्याला तसंच हळुवारपणे ओढत आत आणलं. सर्जीने काहीच प्रतिकार केला नाही. आणि मग सोफ्यावर सर्जीला तसंच बसवून आणि डोळे न उघडण्याची ताकीद देऊन ती समोरून त्याच्या समोरून आली. आठवणी कशा निष्ठुर असतात इवा मनाशीच विचार करीत होती.
हिल स्टेशनवर पोचल्यावर सर्वजणी एकदम खूष होऊन गेल्या. वातावरणात अगदी गारवा व्यापून राहिला होता. समोरच्या पर्वतराजीवर डेरेदार सुचीपर्णी वृक्ष अगदी गर्दी करून उभे राहिले होते. सर्वांनी आपापल्या खोलींचा ताबा घेतला. मारिया आणि इवा ह्यांनी अर्थातच एक खोली घेतली होती. खोलीत बॅग ठेवून मारिया अशीच तडक बाहेरच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी पळाली. "येते, मी थोड्या वेळात!" असे म्हणत इवाने थोडा वेळ मागून घेतला. "ही थंडगार हवा, हा इतका सुंदर देखावा, तू असा जवळी हवा!" असे गुणगुणत राहावं असेच तिला वाटत होतं.
सर्जी आणि आपल्यात असा दुरावा का निर्माण व्हावा ह्याचा विचार करून करून ती थकून गेली होती. सुरुवातीचे दिवस सरले तरी त्यांचे एकमेकांवरील प्रेम काही कमी झाले नव्हते. पण एव्हाना सर्जी अगदी जबाबदारीने वागायला लागला होता. इवाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे असे त्याने पूर्णपणे मनावर घेतलं होतं आणि त्यामुळे आपल्या करियरचा तो अगदी गांभीर्याने विचार करायला लागला होता. "तू माझ्यासाठी आकाशातील चंद्र आणला नाही तरी चालेल! ह्या रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात सुद्धा मी तुझ्यासोबत अगदी सुखाने राहीन!" इवाने त्याला समजावयाचा खूप खूप प्रयत्न करून पाहिला. पण सर्जी ऐकण्याच्या पलीकडे होता. "आयुष्य खूप मोठं आहे! प्रेमाचे संदर्भ सतत बदलत राहणार! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा ह्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा तुला ऊब देण्याची ताकद माझ्याकडे हवी!" सर्जी सतत तिला म्हणत राहायचा. "अरे, पण हे क्षण, हा काळ परत थोडाच आपल्याला मिळणार आहे? तुझं करियर तू नंतर सुद्धा बनवू शकशील!" इवाने खूप खूप आर्जवं करून पाहिली. परंतु काही उपयोग झाला नव्हता. आणि एके दिवशी बँकेच्या एका परीक्षेत उत्तीर्ण होऊन बँकेचा व्यवस्थापक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मॉस्कोला निघून गेला देखील!
"सहा महिन्यात मी परत येईन!" ह्या त्याच्या आश्वासनावर इवाचा पूर्ण भरवसा असला तरी तिला भोवतालची परिस्थिती आपल्याला बदलवणार नाही ह्याची मात्र शाश्वती नव्हती.
"अग इवा, बघ बघ बर्फवृष्टी सुरु झाली!" मारियाच्या आवाजाने इवा भानावर आली. खरंच की! आकाशातून पिंजून काढलेल्या कापसासारखा बर्फ वाऱ्यावर हेलेकावे घेत जमिनीवर येत होता. जमिनीवर विसावण्याची बर्फाला अजिबात घाई नव्हती! आपल्या मनातील स्पंदनासारखाच हा बर्फ आहे! एका विशिष्ट दिशेत प्रवास करण्याऐवजी त्यालाही हेलकावे घ्यायला आवडतं. माझ्या मनाच्या स्पंदनाच्या राजा, सर्जी - कुठे आहेस तू! व्याकूळ हरिणीसारखी इवा म्हणाली. मैत्रिणींचा कल्लोळ वाढला होता. आता बाहेर जाण्याशिवाय तिच्याकडे पर्याय उरला नव्हता! 

(क्रमशः)

No comments:

Post a Comment