Thursday, September 11, 2014

दुरावा - २

 
पहिला बर्फ इतका जोराचा असेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. आकाशातून भुरभुरत येणारा बर्फ जसा बोडक्या सुचीपर्णी वृक्षांवर, घरांच्या उतरत्या छपरांवर पडत होता तसाच तो इवाच्या सोनेरी केसांवर सुद्धा अडकून तिचं सौंदर्य खुलवत होता. तिचं सौंदर्य खुलविण्यासाठी जणू काही त्या हिमकणांची तिच्या केसांच्या दिशेने येण्याची स्पर्धाच सुरु होती. हा हिमवर्षाव पुढे बराच वेळ सुरु राहिला. मध्येच कोणाला तरी पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांची आठवण झाली. मग ह्या सर्व खोडकर युवतींचा मोर्चा हॉटेलच्या भोजनालयाकडे वळला. एक वृद्ध जोडपं हे भोजनालय चालवत होतं. कलकलाट करणाऱ्या ह्या गटाने भोजनालयात प्रवेश केला. पहिलं पाऊल टाकणारी अँना अचानक थांबली. खुणेनेच तिने बाकी सर्वांना गप्प राहण्यास सांगितलं.
हळूच सर्वजण आतमध्ये डोकावले. डायनिंग टेबलवर सर्व जेवण व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. आणि ते आयुष्याच्या सायंकाळी पोहोचलेले ते दोघं मात्र खिडकीतून पडणारा हिमवर्षाव टक लावून पाहत होते. त्या वृद्ध स्त्रीच्या नकळत त्या आजोबांनी तिचे हात हातात घेतले. आजींनी आपली नजर आजोबांकडे वळविली. तिच्या डोळ्यातील अश्रू इतक्या दुरून सुद्धा ह्या सर्वांना दिसले. इतक्यात धांदरट मारियाने आपल्या हातातील सेलफोन खाली पाडला. आजोबा आजींचं लक्ष आता इथे गेले. अपराधीपणाची ह्या गटाची भावना आजींच्या चेहऱ्यावरील लज्जा पाहून काही प्रमाणात कमी झाली.
जणू काही झालंच नाही असं दाखवत आजोबा पुढे झाले. "या मुलींनो, माझ्या प्रिय पत्नी वोल्गाने बनविलेल्या रुचकर जेवणाचा आनंद लुटा!" एकमेकांकडे छुप्या नजरांनी पाहत सर्वजणी स्थानापन्न झाल्या. सर्वांनी जेवण वाढून घेतल्यावर आजोबांनी बाजूलाच बसलेल्या वोल्गाकडे एक प्रेमपूर्ण कटाक्ष टाकला. "मुलींनो,  वोल्गा ज्यावेळी मला प्रथम ४२ वर्षांपूर्वी भेटली तेव्हासुद्धा असाच पहिला बर्फ पडू लागला होता! त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी पहिला बर्फ एकत्र पाहण्याचा नेम ठेवला आहे! देवकृपेने आतापर्यंत तो पाळण्यात आम्हांला यश आलं आहे!" वोल्गाच्या डोळ्यात बहुदा अश्रूधारांनी न जुमानता प्रवेश केला असावा. तिने बळेच सर्वांना सूप वाढायचं नाटक करत जागेवरून उठायचा बहाणा शोधला. "मात्र एक गोष्ट कायम आहे पहा! दरवर्षी बर्फ पडू लागला की ही फार हळवी होऊन जाते!" आजोबांनी आपली बडबड चालूच ठेवली होती. वोल्गा आजीबाई एक क्षणभर थांबल्या, "दरवर्षी जेव्हा पहिल्यांदा हिमवर्षाव होतो तेव्हा आमच्यापैकी कोणावरही एकट्याने हा हिमवर्षाव पाहण्याची वेळ ईश्वराने येऊ नये, हीच प्रार्थना मी करते! आणि म्हणूनच मी अशी हळवी होते! इतका कडक हिवाळा एकट्याने काढण्याची वेळ कोण्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये! पण ही गोष्ट कठोर पुरुषांना कशी कळणार!" एका झटक्यात वोल्गाने आपलं मनोगत मुलींसमोर उलगडून टाकलं. आपण हिच्यासोबत इतकी वर्षं काढली पण हिने आपल्यासमोर ही भावना कधीच बोलून दाखवली नाही. आणि आपणही हिला कधी समजू शकलो नाही. काहीशा अपराधीभावनेने आजोबा विक्टर शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहिले. मुलींच्या संगतीत वोल्गा आजीबाई मात्र खूप खुलल्या होत्या. आपलं हरवलेलं तरुणपण ह्या मुलींच्या रुपानं शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. विक्टर मोठ्या कौतुकाने तिला न्याहाळत होते.
इतक्या सगळ्या कल्लोळात इवाकडे कोणाचं फारसं लक्ष गेलंच नाही. "इतका कडक हिवाळा एकट्याने काढण्याची वेळ कोण्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये!" आजीबाईच हे वाक्य राहून राहून तिच्या मनात घोळत होतं. जेवणं आटपली तशी इवा पळतच आपल्या खोलीत गेली. "शनिवारी इतक्या लवकर उठण्याची मला सवय नाही त्यामुळे आता मला कोणी उठवू नका!" तिने सर्वांना बजावून ठेवलं होतं. आपल्या खोलीत शिरून तिनं कडी लावून घेतली. आणि मग बिछान्यात तिने स्वतःला झोकून दिलं आणि सर्जीच्या आठवणींचं दुःख एकटीनं उगाळून पिण्यासाठी ती सज्ज झाली. सर्जीच्या आणि आपल्या सर्व भेटींचा चलतचित्रपट तिने किती वेळा आपल्या डोळ्यासमोरून नेला असेल ते मोजण्याच्या पलीकडे होते. आपल्या भ्रमणध्वनिवरील सर्जीचा क्रमांक फिरविण्याच्या मोहापासून इतके दिवस तिने स्वतःला दूर ठेवलं होतं. पण ह्या क्षणी ती खूप हळवी झाली होती. तिचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हत आणि शेवटी न राहवून तिने सर्जीचा क्रमांक फिरविला. "हा क्रमांक अस्तित्वात नाही" ह्या संदेशाने तिला एक मोठा धक्का बसला. कझान शहरातला क्रमांक मॉस्कोमध्ये चालणार कि नाही ह्याचा विचार करण्याइतपत ती भानावर नव्हती. सर्जीशी संपर्काचा एकमेव दुवा आता तुटला होता. तिच्या मनात अनेक शंका कुशंकांनी गर्दी केली होती.
सायंकाळी सर्वजणी तशा शांतशांतच होत्या. बराच वेळ इवा आपल्या खोलीबाहेर येत नाही म्हणून शेवटी मारिया तिला भेटायला खोलीत आली. तीन चार वेळा बेल वाजविल्यानंतर इवाने शेवटी दरवाजा उघडला. आपले रडून रडून सुजलेले डोळे लपविण्याचा तिने प्रयत्न सुद्धा केला नाही. तिचं हे रूप मारियासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. तिने लगेचच इवाला जवळ घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. "वेडूबाई, असा अवतार करून घ्यायला झालं तरी काय?" इवाने आपलं दुःख बाहेर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. पण शेवटी मारियाच्या निग्रहापुढं तिचा नाईलाज झाला. नाही म्हणायला सर्जी आणि तिची मैत्री मारियाला माहित होती. पण प्रकरण इतकं गंभीर असेल ह्याची मारियाला कल्पना नव्हती. पुढील अर्धा तास मारिया इवाच्या तोंडून "सर्जी पुराण" ऐकत होती.
"माझी मावशी मॉस्कोत राहते. आपण पुढच्या शनिवारी तिथे जाऊयात!" कधीही हार न मानणाऱ्या मारियाचा सल्ला ऐकण्यापलीकडे इवाकडे दुसरा मार्ग तरी होता कुठे! प्रवास वगळून मिळणाऱ्या एका दिवसात सर्जीला शोधण्यासाठी जणू काही मॉस्को हे १०० घरांच्या वस्तीचं छोटस गावच होतं!
मारियाशी बोलून इवा आता बऱ्यापैकी सावरली होती. सायंकाळ सर्वांनी पारंपारिक रशियन गाणी ऐकण्यात आणि त्यावरील नृत्यात व्यतीत केला. रविवारी सकाळी सावकाश उठलेल्या ह्या सर्वांनी वोल्गा आजींना त्यांच्या नास्त्याच्या तयारीत हातभार लावला. "तुमची मुलं, नातवंडे कोठे असतात!" बोलता बोलता मारियाने त्यांना प्रश्न केला. वोल्गा आजीबाईचं एका नदीच्या नावावरून ठेवलेलं नाव अगदी सार्थक होतं. त्या नदीचं पाणी जणूकाही त्यांच्या डोळ्यात दाटून राहिलं होतं. मारियाच्या ह्या प्रश्नानं त्या बांध घातलेल्या पाण्याला पुन्हा मोकळीक मिळाली.  "ते सर्व अमेरिकेला स्थायिक झालेत! गेले पाच वर्षे त्यांना आम्हांला भेट देण्यास फुरसत मिळाली नाही!" वेळीच मागून आलेल्या विक्टर आजोबांनी वोल्गा आजींना थोपटत उत्तर दिलं.
दुपारी परतीचा प्रवासाची बस आली. पुन्हा परत भेट देण्याचं आश्वासन देत गट बसमध्ये बसला. उतरणीच्या रस्त्यावरून मनमोहक दृश्य बघण्यात इवा गढून गेली होती. बस मध्येच थांबली होती. रस्त्याच्या एका अरुंद ठिकाणी समोरून बस आल्याने दोन्ही ड्रायव्हर एकमेकाला वाट करून देण्यात गुंतले होते. अगदी बस सुरु व्हायच्या वेळी इवाचं लक्ष समोरच्या बसकडे गेले. तिचा सर्जी त्या बसमधून तिच्याकडे टक लावून पाहत होता आणि तिचं लक्ष कधी आपल्याकडे वळेल ह्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होता. इवाचं लक्ष त्याच्याकडे जाताच ती ताड्कन आपल्या सीटवरून उठली. पण उशीर झाला होता. दोन्ही बस सुटल्या होत्या. एकंदरीत प्रकार लक्षात आलेल्या मारियाने ड्रायव्हरला बस थांबविण्याची विनंती केली. आधीच अडून गेलेल्या ट्राफिकमुळे मागे लागून लागलेल्या बसच्या रांगेकडे बोट दाखवत ड्रायव्हरने स्पष्ट नकार देत बस भरधाव वेगाने उतरणीच्या रस्त्यावर मोकाट सोडली. आताशा वोल्गा नदी पूर्ण जोमाने इवाच्या डोळ्यात उतरली होती.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment