Tuesday, September 23, 2014

एका शहराची अदृश्य बाजू !!

 
काल परवा एका मराठी पेपरात मथळा वाचला. "मुंबईत गेल्या दोन दिवसात पाच आत्महत्या!" मुंबई शहराचं वैशिष्टय म्हणजे इथे लोक भुकेने मरत नाहीत. ज्या कोणाची हातपाय हलवायची इच्छा आणि क्षमता आहे त्याला इथे रोजगार मिळतो आणि तो माणूस रोजीरोटी कमावू शकतो. तरीही नैराश्येने ग्रासलेल्या लोकांची संख्या इथे खूप आहे. काही लोकांच्या बाबतीत ही निराशा परिसीमा गाठते आणि मग ते अशी पराकोटीची कृती करायला प्रवृत्त होतात. ह्यावरील काही मुद्दे!


१) ह्या शहरात यशस्वी माणसाचे सतत गुणगान केलं जातं. जी माणसं खरोखर यशस्वी असतात त्यांच्यासाठी हे उत्तम! पण बाकीच्यांसाठी आयुष्यात यशस्वी होण्याचा सतत दबाब असतो. आणि यशस्वितेच्या व्याख्या शहराच्या विविध वर्तुळात बदलत असतात. एखाद्या माणसाने प्रगती करून वरच्या वर्तुळात प्रवेश केला तर तिथं यशस्वितेच्या व्याख्या अजून पुढे गेलेल्या असतात.
२) ह्या शहरात लोक बऱ्याच वेळा क्षणिक यशाचा / अपयशाचा खूप विचार करतात. परंतु आपल्याला एक मोठं आयुष्य लाभलं आहे त्या मोठ्या आयुष्याच्या संदर्भात एक महिना, एक वर्षं किंवा तीन चार वर्षं वाईट गेली तरी काही जास्त फरक पडत नाही असा विचार फार थोडे लोक करतात.
३) अंथरूण पाहून पाय पसरावे ही मराठी भाषेतील म्हण लोक लक्षात ठेवत नाहीत. आपल्याला सुरुवातीचा काही काल यश मिळालं म्हणून सतत मिळतच राहील असे नाही. आयुष्यात रिस्क तर घ्यायला हवी पण त्यासाठी आयुष्यभराची पुंजी पणाला लावणं चुकीचं! कोणत्याही उद्योगात प्रवेश करताना त्यात १०० % नुकसान झालं तरी आपल्याला डोक्यावर छप्पर आणि जेवायला वरण भात राहील इतकी तरतूद असायला हवी.
४) आयुष्यात यशस्वी झालं तरी सर्व थरातील लोकांशी संपर्क कायम ठेवावा. त्यामुळे जीवनातील अनुभवांची विविधता वाढते. मुख्य म्हणजे आपल्या जीवनातील प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. ह्या दृष्टीने गावातील लोक सुखी असतात, त्यांना दररोज बाजारात, नाक्यावर विविध थरातील लोक भेटतात. आणि हो एक मान्य करायला हवं की आपल्यासारखं दुःख दुसऱ्याला सुद्धा असलं की आपल्याला साथीदार असल्याची भावना निर्माण होऊन थोडं बरं वाटत!
५) मराठी (मातृभाषेतील) माध्यमाच्या शाळेत वातावरणात औपचारिकपणा कमी असे, हल्लीच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत वातावरण फारच औपचारिक झालं आहे आणि त्यामुळे पुढील पिढीच्या विचारात सुद्धा यांत्रिकपणा येईल की काय अशी भीती वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.
६) वैवाहिक आयुष्यातील तणाव! पूर्वीचं एकत्र कुटुंब जरी वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी अनुकूल वातावरण देत नसलं तरी एखाद्या जोडप्याच्या जीवनात तणाव निर्माण झाल्यास मात्र बाकीचे लोक संवादासाठी उपलब्ध असत. आणि बाकीच्या जोडप्यांची भांडणं सुद्धा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याने एखाद्या भांडणामुळे डोक्यात राख घालून घेऊ नये इतका धडा तर नक्कीच मिळे!
७) आजारपण! प्रदीर्घ आजारपणामुळे काही लोकांना नैराश्य येतं. ह्यातून कसं बाहेर पडायचं ह्यासाठी विविध गट उपलब्ध असतात. त्यातील लोकांशी संपर्क साधावा. आजारपण आणि पैशाची तोकडी बाजू ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मात्र स्थिती बिकट होईल हे मात्र नक्की!

आधीसुद्धा मी एकदा म्हटलं होतं. हल्ली लोकांना आपली दुःखं जगापासून लपवून ठेवण्याची सवय लागली आहे. त्यात काही चुकीचं आहे असं नाही. पण काही लोकांना मात्र ह्या सत्याचा विसर पडतो आणि मग आपलंच दुःख कसं मोठं आहे असा विचार त्यांच्या मनात येऊ लागतो. आणि ह्या नैराश्यपूर्ण विचाराचा वेळीच निचरा न झाल्यास बिकट परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे एकच सल्ला - आपले जीवाभावाच्या मित्रांना, नातेवाईकांना  कधी दूर जाऊ नकात! आणि हो ज्यावेळी नोकरीधंद्यातून निवृत्त व्हाल तेव्हा शक्य असेल तर आपल्या गावी जाऊन स्थायिक व्हा! ह्या शहरात निवृत्त लोकांनी आनंदाने आयुष्य घालावयाच्या पलीकडे सध्या स्थिती गेली आहे! खरतरं शीर्षक "एका शहराची निर्दयी बाजू !!" असं द्यायला हवं होतं!  

जर तुम्हांला वाचन, संगीत, नृत्य, गायन, भटकंती किंवा तत्सम छंद असेल तर तुम्ही खूप सुदैवी आहात! दुनियेत चाललेल्या वेडेपणापासून तुमच्या मनाला सुरक्षित ठेवण्याचं कवच तुम्हांला लाभलं आहे!

No comments:

Post a Comment