मागील लेखात एका मुद्द्याचा उल्लेख करायचा राहून गेला. आज्ञावली लिहिण्याच्या पलीकडे काही संधी उपलब्ध असतात. Business Analyst - BA (व्यावसायिक पृथ्थकरण करणारे) आणि Quality Analyst QA (नवनिर्मित आज्ञावलीवर विविध चाचण्यांची तपासणी करून पाहणारे) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः Y2K खूळ ओसरल्यानंतर ह्या पर्यायांची खोलवर जाणीव भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरली.
BA वर्गातील व्यावसायिक एखाद्या प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याकडून त्यांच्या व्यावसायिक गरजा समजावून घेवून त्या योग्य भाषेत आज्ञावली लिह्णाऱ्या गटापर्यंत पोहोचवितात. ह्या वर्गाला जशी प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याच्या खऱ्या गरजांची जाणीव असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ही गरज पूर्ण करण्यासाठी विकसित कराव्या लागणाऱ्या आज्ञावलीसाठी येऊ शकणार्या अडचणींचे भान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन वेगळ्या गटांशी समन्वय साधण्यासाठी ह्या वर्गाकडे अत्यंत उत्कृष्ट असे लिखित आणि मौखिक संभाषणकौशल्य असणे आवश्यक आहे. आणि व्यावसायिक संकल्पनांची सखोल जाणीवसुद्धा! हल्ली काही आज्ञावली विकसित करणारे व्यावसायिक एक पळवाट म्हणून ह्या मार्गाचा विचार करू इच्छितात त्यांनी ह्या पर्यायासाठी लागणारे गुणधर्म आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
QA गटातील व्यावसायिक नव्याने विकसित केलेल्या अज्ञावालीवर विविध चाचण्यांचा मारा करून त्यातील दोष हुडकून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. ह्यात नव्याने विकसित केलेली आज्ञावली आधीपासून अस्तित्वात असलेल्या FUNCTIONALITY वर काही विपरीत परिणाम तर करीत नाही ना आणि नव्याने दिलेल्या गरजा पूर्णपणे समाधानकारकरीत्या पार पाडत आहे की नाही ह्या दोन प्रकारांच्या चाचण्यांचा समावेश होतो. ह्या ही पर्यायाकडे वळु पाहणाऱ्या व्यावसायिकानी दीर्घकाळ केवळ चाचण्यांचे परीक्षण करण्याचा संयम आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे परीक्षण करावे. ह्यात MANUAL (प्रत्येक सूचना माणसाद्वारे अमलात आणून) आणि AUTOMATED (सूचनांना एका स्वयंचलित आज्ञावलीद्वारे अमलात आणणे) असे दोन प्रकार पडतात.
अजून एक थोडासा कमी प्रमाणात आढळणारा वर्ग म्हणजे DBA (माहिती भांडाराचा पहारेकरी). हा वर्ग PRODUCTION वातावरणात अस्तिस्वात असलेल्या माहिती भांडारात काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा त्यातून माहिती हुडकून FRONT END ला पोहोचविण्यात विलंब होत असल्यास तत्काळ सक्रीय होवून लीलया समस्येचे मूळ कारण शोधून काढतो. त्याच प्रमाणे माहिती भांडाराच्या संरचनेत बदल होत असल्यास नवीन संरचना कशी प्रतिसादासाठी लागणाऱ्या अवधीच्या बाबतीत कशी उत्कृष्ट राहील ह्याची काळजी घेतो.
ह्या सर्व गटांवर लक्ष ठेवणारा एक PM (व्यवस्थापक) असतो. प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्यांनी दिलेल्या सर्व गरजा त्यांच्या मूळ रुपात प्रोजेक्टच्या संपूर्ण कालावधीत कशा टिकून राहतील, नव्याने निर्माण झालेल्या गरजांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा अंदाज घेवून त्यासाठी पुन्हा नव्याने नियोजन करणे, प्रोजेक्टमध्ये निर्माण होवू शकणार्या संभाव्य धोक्यांना आधीपासून ओळखून त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय ओळखून ठेवणे, त्याचप्रमाणे QA गटाने शोधून काढलेले दोष कसे योग्य प्रकारे वेळीच निस्तरले जात आहेत ह्याची खात्री करून घेणे ह्या सर्व गोष्टींसाठी हा इसम जबाबदार असतो. हा इसम मनुष्यबळाचा अंदाज आणि प्रत्यक्षातील वापर, QA ने हुडकून काढलेले दोष अशी सर्व आकडेवारी आलेखाच्या रुपात जगासमोर मांडण्याचे इतर गटांना न आवडणारे काम करतो. त्यामुळे बाकीच्या गटांत उगाचच अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि ते ह्या माणसास टाळू लागतात.
एकंदरीत आज थोडे विषयांतर झाले. पुढील भागात परत आज्ञावली निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांच्या पुढील मार्गाविषयी बोलूयात!